Showing posts with label Central Workshop Aurangabad. Show all posts
Showing posts with label Central Workshop Aurangabad. Show all posts

Thursday, January 1, 2026

आपल्या एस. टी. ची डिलक्स सेवा

आमच्या बालपणी जेव्हा जेव्हा आम्ही एस. टी. चा प्रवास करायचोत तेव्हा तेव्हा आम्हाला बसमधले आरक्षण करावे लागत असे. मग तो प्रवास नागपूर ते चंद्रपूर किंवा नागपूर ते यवतमाळ असा तीन तासांचाच का असेना. खाजगी बसेसचा उदय होण्यापूर्वीचा तो काळ. त्यामुळे प्रवासासाठी या मार्गांवर दर अर्ध्या तासाला बस असली तरी प्रवाशांची गर्दी कायमच असायची. त्यामुळे आगाऊ आरक्षण करून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.


त्या आरक्षित तिकीटांच्या मागील बाजूला आरक्षित तिकीटांसंबंधी विविध नियम छापलेले असत. त्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) आराम गाड्यांचा आणि वातानुकुलित गाड्यांचा उल्लेख होता. आरक्षण रद्द करण्याविषयीच्या नियमांमध्ये हा उल्लेख येई. 



आम्ही वैदर्भिय मुलांनी साधी, जलद, अति जलद आणि १९८२ नंतरच्या काळात निम आराम एव्हढ्याच प्रकारच्या गाड्या बघितलेल्या होत्या. त्यामुळे या आराम, वातानुकुलित, शयनयान वगैरे गाड्यांविषयी, त्यांच्या आसनव्यवस्थेविषयी, त्यांच्या एकंदर दिसण्याविषयी आमच्या मनात अपार कुतुहल असे. आमची मावशी कोकणात राहून आल्याने अशा प्रकारच्या गाड्या तिने बघितलेल्या होत्या. त्याकाळच्या सावंतवाडी - मुंबई या शयनयान गाडीचे किंवा कोकणमार्गे जाणा-या मुंबई - महाबळेश्वर वातानुकुलित बसगाडीचे  वर्णन आम्ही तिच्याकडूनच ऐकले होते. मग या प्रकारच्या गाड्यांविषयीचे आमचे कुतुहल आम्ही तिला अनेक प्रश्न विचारून शमवून घेत असू. पण शेवटी शब्दांनी केलेले वर्णन ते शब्दांनी केलेले वर्णनच. त्याला दृकश्राव्यतेची जोड थोडीच येणार ? या प्रकारच्या गाड्यांच्या दर्शनाची आमची भूक अपुरीच राहिली.


१९९५ मध्ये मुंबईला प्राध्यापकी करायला गेलो आणि मग आपल्या एस. टी. च्या डिलक्स, वातानुकुलित वगैरे दर्जाच्या बसगाड्यांचे प्रत्यक्ष दर्शन होऊ लागले. आमच्यातला बसफ़ॅनची उत्सुकता शमल्यामुळे तो सुखावला. अर्थात तोवर एस. टी. ने आपल्या शयनयान दर्जाच्या गाड्या बंद केलेल्या होत्या. 


हा असाच एक मी काढलेला आणि त्यानंतर अनेकांनी आपापल्या फ़ेसबुक वॉलवर, ग्रुप्सवर (कधी माझ्या नावानिशी तर कधी नावाशिवाय) चिकटवलेला फ़ोटो. हा फोटो माझ्यासाठी केवळ एक छायाचित्र नाही; तो एका संपूर्ण काळाची आठवण आहे. तो क्षण मी स्वतःच्या कॅमे-यातून टिपला आणि पुढे अनेकांनी तो आपापल्या पद्धतीने जपला. आज मागे वळून पाहताना, माझ्या छायाचित्रसंग्रहातील हा एक अत्यंत मौलिक आणि सर्वोत्तम क्लिक असल्याची जाणीव अधिक ठळकपणे होते.


ही आपल्या एस. टी. च्या सेवेतली डिलक्स बस आहे. या बसेसनी दादर - पुणे किंवा परळ – पुणे मार्गावर दीर्घकाळ वर्चस्व गाजविले होते..


१९८२ च्या नवी दिल्ली एशियाडसाठी तयार केलेल्या निम आराम (एशियाड) बसेसनी जवळजवळ ९० च्या दशकाच्या मध्यापर्यंत मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी सेमी लक्झरी (म्हणजेच आशियाड / आताचे ब्रॅंडनेम "हिरकणी") सेवा यशस्वीपणे दिल्याल्यानंतर, आपल्या एस. टी. ने २ x २ आसनरचनेच्या अशा डिलक्स लक्झरी बसेस सुरू केल्या. या बसेस यांच्या पूर्वसुरीसारख्या (एशियाड बसेससारख्याच) दादर -पुणे / परळ – पुणे मार्गावर दर १५ मिनिटांच्या अंतराने धावू लागल्या.


या बसेस आपल्या एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी आणि मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर)  येथील कार्यशाळांमध्ये तयार करण्यात आल्या होत्या. एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर येथे एकही बस तयार करण्यात आलेली नव्हती आणि विदर्भ विभागात या प्रकारच्या बसेसची एकही फेरी (शेड्युल) नियोजित करण्यात आलेली नव्हती.


पुणे स्टेशन – दादर


MH 20 / D 3375


अशोक लेलँड चित्ता मॉडेल


मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर)  येथे बांधलेली.


२ x २ आसन व्यवस्था असलेली लक्झरी बस. उंच पाठ असलेली आसने, कापडी (फॅब्रिक) अपहोल्स्ट्री आणि प्रत्येक खिडकीजवळ बसवलेले पंखे अशी सुविधा या बसमध्ये होती.


एकूण आसनसंख्या ४३ (४२ प्रवासी + १ कंडक्टरसाठी केबिनमध्ये आसन).


मुं. परळ डेपो (मुंबई विभाग परळ आगार)


सर्व टाटा डिलक्स बसेस पुणे विभागातील स्वारगेट किंवा शिवाजीनगर आगारांना ठेवण्यात आल्या होत्या, तर सर्व अशोक लेलँड डिलक्स बसेस मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला नेहरू नगर आगारांना देण्यात आल्या होत्या.


हा फोटो फेब्रुवारी १९९९ मध्ये राजमाची पॉइंट येथील ब्रेक टेस्टिंग स्टॉपवर काढलेला आहे. या राजमाची पॉईंटनंतर पुण्याहून मुंबईकडे येणा-या रस्त्यावर खंडाळा घाटातला सगळ्यात तीव्र उतार आणि अत्यंत तीव्र वळणांचा रस्ता होता. त्यामुळे या ठिकाणी पुणे ते मुंबई जाणा-या सर्व बसेसना थांबवून बसेसची आणि चालकाच्या अवस्थेची चाचणी होत असे. तिथे जवळच एस. टी. चे एक छोटेखानी शेडवजा ऑफ़िस होते. तिथे एस. टी. ची अधिकारी मंडळी, गरज भासली तर बदली चालक आणि बसेसची तंत्रज्ञ मंडळी बसलेली असत. घाट सुरू होण्यापूर्वी घाटातून उतरणा-या प्रत्येक बसची संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच बस पुढे रवाना व्हायची.


येथे स्पष्ट करावेसे वाटते की हा फोटो डिजिटल कॅमे-याने नव्हे, तर कोडक K-10 या नॉन-डिजिटल कॅमेऱ्याने टिपलेला आहे. तो आधी छापण्यात आला आणि नंतर २००६ मध्ये स्कॅन करून फ्लिकरवर पोस्ट करण्यात आला.


मी, दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ऐरोली, नवी मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना, दरवर्षी खंडाळा येथे आयोजित होणाऱ्या सिव्हील इंजीनीअरींग सर्व्हे कॅम्पचा भाग असायचो. खंडाळ्याच्या राजमाची पॉइंटजवळच असलेले सेंट झेवियर्स व्हिला हे आमचे बेस स्टेशन व निवासाची जागा असे. काम सुरू होण्यापूर्वी किंवा दिवसाचे काम संपल्यानंतर आम्हाला छायाचित्रणासाठी भरपूर संधी मिळत असत.


राजमाची पॉइंट हा रेल्वे गाड्या, बोगदे, द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ यांच्या दृश्यांच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. माझ्यासारख्या बस आणि रेल्वेप्रेमी व्यक्तीसाठी या सर्व्हे कॅम्पमधला माझा सहभाग हा एक आठवड्याचा खरा आनंदोत्सवच असे.


आता आजच्या युगात नवनव्या प्रकारच्या आराम, वातानुकुलित, शयनयान गाड्या आल्यात ख-या. पण या डिलक्स बसेसची बांधणी आणि एकूणच रस्त्यावर धावत असताना त्यांचा एकंदर रूबाब हा अतुलनीय होता हे मात्र प्रत्येक बसफ़ॅन मान्य करेल.


- बसेस आणि रेल्वेंवर जीव ओवाळून टाकणारा, अशा सुंदरींच्या एका दर्शनासाठी तासन तास वाट बघत उभा असलेला एक बस आणि रेल्वे आशिक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६

Thursday, December 26, 2024

आपल्या एस. टी. कार्यशाळांना हे का जमू नये ?


या प्रकाशचित्रात डावीकडे वीरा वाहना उद्योग या बंगलोर इथे असलेल्या खाजगी बस बांधणी कंपनीने अशोक लेलँड बससाठी बनवलेला डॅशबोर्ड कन्सोल आहे आणि उजव्या बाजूला आपल्या महाराष्ट्र एस. टी. मधील मध्यवर्ती कार्यशाळेने बनवलेल्या अशोक लेलँड बसचा डॅशबोर्ड कन्सोल आहे.


मला नेहमी आश्चर्य वाटते की या डिझाइनमध्ये असे काय रॉकेट सायन्स आहे की आपल्या एस. टी. ला डॅशबोर्ड कन्सोलचे असे डिझाइन करणे शक्य होत नाही ?


- बाहेरून गाड्या बांधून घेण्यापेक्षा आपल्याच कार्यशाळेतल्या कर्मचा-यांना प्रशिक्षण देऊन, अधिक सक्षम बनवून आपल्या संसाधनांचा अधिकाधिक चांगला वापर करून घेऊ शकतो आणि प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा देऊ शकतो या मताचा बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर

Monday, December 16, 2024

महाराष्ट्र एस टी ला हे का जमू नये ?






तेलंगण राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक्सप्रेस सेवा,

नागपूर जलद आदिलाबाद,

अशोक लेलँड व्हायकिंग माॅडेल.

आदिलाबाद डेपो.

पूर्वीचे आंध्रप्रदेश मार्ग परिवहन आणि आता तेलंगण मार्ग परिवहन च्या बसेसची बांधणी मजबूत वाटते. त्यांच्या बस बाॅडीबिल्डींग मियापूर, हैद्राबाद कार्यशाळेत येथेच या गाड्यांची बांधणी होते. या गुणवत्तेची बांधणी आपल्या महाराष्ट्र मार्ग परिवहनच्या तीनही मध्यवर्ती कार्यशाळेंकडून का होत नाही ? हाच मला कायम प्रश्न पडतो.

तसेच तेलंगण, आंध्र आणि कर्नाटक राज्य परिवहनचे डेपो ज्या पध्दतीने या बसेसची नियमित देखभाल करतात तसे आपले डेपो का करीत नाही ? हा सुध्दा मला पडलेला आणखी एक  प्रश्न.


Saturday, July 13, 2024

बसफ़ॅनिंग: एक वेगळाच सूक्ष्म पैलू

आमचे बसफ़ॅनिंग आमच्या अगदी बालपणी नागपूर ते चंद्रपूर एस टी प्रवासादरम्यान सुरू झाले. अगदी पहिल्या वर्गात अक्षरओळख नुकतीच झालेली असताना आजोळी चंद्रपूरला जातानाच्या प्रवासात माझ्या वडीलांनी एस. टी. च्या बसगाड्यांवर लिहील्या जाणा-या म. का. दा. (मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी), म. का. चि. (मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा) आणि म. का. ना. (मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर) हे अर्थ उलगडवून दाखवत प्रत्येक बस वेगळी असते ही दृष्टी आम्हाला दिली. मग यवतमाळ विभागातल्या डेपोंच्या बसेसचे फ़िकट निळ्या रंगात रंगवलेले ग्रिल्स, पुढचे बंपर आणि कधीकधी खिडक्यासुद्धा. चंद्रपूर विभागातल्या डेपोंच्या बसेसचे काळपट पिवळ्या ( Yello Ochre) रंगात रंगविलेले ग्रिल्स आणि पुढले बंपर्स, अकोला विभागातल्या डेपोंच्या बसेसना काळ्या ग्रिल्सभोवती दिलेली पांढरी बॉर्डर तर भंडारा विभागासाठी हीच बॉर्डर पिवळ्या रंगात हे बारकावे लक्षात घेऊन त्या त्या विभागाच्या बसेस ओळखणे आणि साधारण वेळ लक्षात घेऊन ती नक्की कुठली बस असेल ? याचा अचूक अंदाज बांधणे यात आम्ही प्रवीण झालो आणि नातेवाईक, मित्रमंडळींमधे भाव खाऊ लागलोत.


पाचव्या वर्गापासून इंग्रजीची तोडओळख झाली आणि मग हळूहळू ज्या बसने जातोय तिचा नंबर, तिचा चेसिस नंबर आदि डिटेल्स जमविण्याचा छंद लागला. मी पाचवीत असताना आम्ही नंदनवन येथे रहायला गेलो आणी महाल विभागात असलेल्या आमच्या  शाळेत जाण्यायेण्यासाठी पाचवीपासून शहर बस सेवेने जाणे येणे होऊ लागले. मग रोजची बसची तिकीटे जमविण्याचा छंद लागला, ती तिकीटेही नुसती जमवायची नाहीत तर तिकीटांच्या मागील मोकळ्या जागेत प्रवासाचा दिनांक, बस नं, प्रवास कुठून कुठे, बस शहर बस सेवेतली कुठल्या नंबरची सेवा होती ? कुठून कुठे जात होती हा सगळा तपशील लिहून ठेवणे सुरू झाले. तदनुषंगाने ही तिकीटे जपून ठेवणे, महिनावार, वर्षवार नीट जतन करून लावून ठेवणे वगैरे कामे आलीच. 






नागपूर आणि परिसरात त्याकाळी टाटा बसेसचेच प्राबल्य होते. शहर बस सेवेतही सगळ्या टाटाच्याच बसेस. त्याकाळी टाटाच्या चेसिस जमशेदपूर आणि पुण्याच्या टेल्को प्लॅंट मध्ये तयार व्हायच्यात. त्या एस. टी. च्या महाराष्ट्रातल्या तीनही कार्यशाळांमध्ये जायच्यात आणि त्यांच्यावर बसबांधणी व्हायची. टेल्कोचा पंतनगरचा प्लॅंट तेव्हा सुरू व्हायचा होता. सगळ्या चेसिस एकतर जमशेदपूर किंवा पुण्यावरून यायच्यात. बाय द वे इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्र एस. टी. आपल्या बहुतांशी बसगाड्यांचा ताफ़ा चेसेस मागवूनच आपल्या मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये बांधून घेते. गोव्यातल्या टाटा ए.सी.जी.एल. किंवा हुबळी इथल्या टाटा मार्कोपोलोने बांधलेल्या तयार बसगाड्या घेत नाही.


बसमध्ये बसल्यावर ड्रायव्हर काकांमागे त्याकाळच्या बसेसमध्ये असलेल्या आडव्या बाकड्यावर उलटे (केबिनमधून बसच्या दिशेकडे तोंड करीत) बसून प्रवास करणे हा तर त्याकाळच्या सगळ्याच बाळगोपाळांचा छंद असायचा. आमचाही होता. आम्ही आमच्या शोधक नजरेने बसच्या केबिनमधली एंजिनवरची "मेकर्स प्लेट" पाहून ती चेसिस जमशेदपूरवरून आलीय की पुण्यावरून आलीय हे शोधण्याचाही छंद आमच्या बसफ़ॅनिंगमध्ये सामील झाला. आत केबिनमध्ये तर मूळ चेसिसवर पोपटी किंवा चटणी रंग असायचा पण खाली उतरून चाकांच्या वर असलेल्या फ़ेंडर्सच्या आत थोडे डोकावत ती चेसिस मूळ केशरी रंगाची आहे की पिवळ्या रंगाची हे पण नोंदणे सुरू झाले. मग त्या प्रवासाच्या तिकीटांवर त्या चेसिसच्या मूळ रंगाची नोंदणीही ओघाओघाने आलीच. 


अजून एक गोष्ट लक्षात आली की केशरी चेसिस सगळ्या जमशेदपूरच्या असतात तर पिवळ्या रंगाच्या चेसिस पुण्याच्या.



आज आमच्या एका बसफ़ॅन ग्रूपवर ह्या केशरी चेसिसचा फ़ोटो दिसला आणि मन एकदम चाळीस वर्षे मागे गेले.


- बस आणि रेल्वेवर मनापासून प्रेम करणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Sunday, February 18, 2024

येऊ तशी कशी मी नांदायला ?

मागील एका पोस्टमध्ये लिहील्याप्रमाणे आम्हा बस आणि रेल्वे फ़ॅन्सना बस किंवा रेल्वे ह्या निर्जीव वस्तू वाटतच नाहीत. तर त्या अगदी आपल्यासारख्याच सजीव वस्तू वाटतात. अगदी तसेच काहीतरी या बसकडे पाहून वाटले होते.

आपल्या महाराष्ट्र एस. टी. च्या स्वतःच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि दापोडी, पुणे. तिथे बसगाड्यांची टाटा किंवा लेलॅण्ड चेसिसवर बांधणी होते. यातल्या नागपूर कार्यशाळेत प्रामुख्याने टाटा बसगाड्या बांधल्या जातात. अगदी अपवाद म्हणून काही लेलॅण्ड गाड्याही नागपूर कार्यशाळेने बांधल्या आहेत. 

आजवर महाराष्ट्रात विभागीय भुगोल लक्षात घेऊन विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात टाटाच्या बसेस पाठवल्या जातात तर कोकण, मराठवाडा आणि खान्देशात अशोक लेलॅण्डच्या बसेस पाठवल्या जातात. लेलॅण्डच्या बसेस घाटात चांगल्या असतात हे आपल्या एस. टी. चे गृहीतक आहे. 

महाराष्ट्रातले बस आगार आपल्या बसगाड्यांची मागणी आपापल्या विभागानुसार एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठवतात आणि कार्यशाळेत तयार झालेल्या नव्या बसेस या मागणीनुसार त्या त्या विभागातल्या आगारांना पाठवल्या जातात.



मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर

2011 - 12 मध्ये बांधलेली 141 वी नवीन लेलॅण्ड









बसचा मार्ग

तुळजापूर जलद कोल्हापूर

मार्गे सोलापूर - मोहोळ - पंढरपूर - सांगोला - जुनोनी - शिरढोण - मिरज - सांगली - जयसिंगपूर - हातकणंगले

MH - 40 / N 9745

मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर

ASHOK LEYLAND CHEETAH model

जुने आगार वर्धा (वर्धा विभाग)

नवे आगार तुळजापूर (धाराशिव विभाग, जुने उस्मानाबाद)


या बसच्या बाबतीत काय झाले की ही अशोक लेलॅण्डची बस 2011 - 12 या वर्षात नागपूर कार्यशाळेने बांधली तेव्हा विदर्भातल्या डेपोंकडूनच नव्या बसची मोठी मागणी आलेली होती. त्यानुसार या अशोक लेलॅण्डच्या बसेस वर्धा विभाग, अमरावती विभाग, बुलढाणा विभागांना दिल्या गेल्यात. नंतर नव्या टाटा बसेस बांधल्यावर त्या नव्या टाटा बसेस विदर्भातल्या काही डेपोंना देऊन या एक दीड वर्षे जुन्या अशोक लेलॅण्ड बसेस मराठवाडा आणि खान्देशमधल्या आगारांना दिल्या गेल्यात. असे होत असते. अशीच एक आठवण छत्रपती संभाजीनगर - 2 (जुने औरंगाबाद - 2) या आगाराचीही आहे. या आगाराला छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कार्यशाळेने बांधलेली बांधलेली एक नवी टाटा दिल्या गेली पण नंतर तिथे नवीन अशोक लेलॅण्ड बसेस आल्यानंतर जुन्या टाटा बसेसची रवानगी विदर्भातल्या डेपोंमध्ये झाली होती. अशीच एक छत्रपती संभाजीनगर - 2 (जुने औरंगाबाद - 2) या आगाराची बस अहेरी आगाराला दिल्या गेल्याचे एक प्रकाशचित्र येथे.





पण या दोन्हीही कन्यांनी नव्या घरात जायला नाखुषी दर्शविलेली दिसते. सासरी जाऊन काही महिने लोटलेत तरीही या कन्या तिथे नांदायला नाखुश दिसतायत. माहेरचेच नाव मोठ्या गौरवाने मिरवतायत. 


आता माणसांसारखी या बसेसमध्ये दोन दोन आडनावे (पुल म्हणतात त्या प्रमाणे डब्बल बॅरेल आडनावे. उदाहरणार्थ वैभवी देशपांडे - किन्हीकर) लावण्याची सोय नाही हो. नाहीतर ही कन्या व. वर्धा - उ. तुळजापूर असे दोन दोन डेपो मिरविते झाली असती.


- बसेसची मानवीरूपात कल्पना करून त्या कल्पनाविश्वात रमणारा बसफ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, February 6, 2024

Decoding म.का.दा., म.का.ना., म.का.चि. वगैरे

माझ्या बालपणी आमच्या कुटुंबासह 1977 सालच्या नागपूर ते चंद्रपूर प्रवासादरम्यान माझ्या वडिलांनी मला एस. टी. बस गाड्यांवर लिहीत असलेल्या विविध शॉर्टफ़ॉर्म्सबद्दल सविस्तर सांगितलेले होते. एस. टी. बसच्या पुढल्या बाजूला ती कुठल्या कार्यशाळेत बनली ?, कुठल्या वर्षी बनली ? आणि त्या वर्षी बनलेली ती कितवी बस ? ही सगळी माहिती लिहीलेली असते. ती सगळी माझ्या वडिलांनी मला समजावून सांगितली आणि ती पक्की लक्षात राहिली. त्यानंतर जितके प्रवास घडले त्या त्या प्रवासांमध्ये बसस्टॅण्डवर उभ्या असलेल्या सगळ्या गाड्यांची ही माहिती नोंदवून घेण्याचा छंदच मला लागला.


महाराष्ट्र एस. टी. च्या स्वतःच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. तिथे बसगाड्यांची टाटा किंवा लेलॅण्ड चेसिसवर बांधणी होते. मधल्या काळात काही आयशर बसगाड्यांचीही बांधणी या मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये झालेली होती. म. का. दा. म्हणजे मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी (पुणे), म. का. ना. म्हणजे मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर (हिंगणा) आणि म. का. चि. म्हणजे मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा (औरंगाबाद, सध्याचे छत्रपती संभाजीनगर). 1980 पर्यंत तरी या कार्यशाळेत बनलेल्या गाड्यांवर म. का. चि. असे लिहीलेले असायचे त्यानंतर म. का. चि. ऐवजी म. का. औ. असे लिहीले जायचे. 


नागपूर कार्यशाळेत प्रामुख्याने टाटा बसगाड्या बांधल्या जातात. अगदी अपवाद म्हणून काही लेलॅण्ड गाड्याही नागपूर कार्यशाळेने बांधल्या आहेत आणि एकमेव आयशर बस (MH - 40 / AQ 6454) नागपूर कार्यशाळेने बांधलेली आहे. नागपूर कार्यशाळा सर्वसाधारणपणे 300 ते 350 बसगाड्या वर्षभरात बांधते. या कार्यशाळेने बांधलेल्या बसेस विदर्भात आणि काही पश्चिम महाराष्ट्रातल्या आगारांमध्ये पाठवल्या जातात.


छत्रपती संभाजीनगर कार्यशाळेत प्रामुख्याने लेलॅण्ड गाड्या बांधल्या जातात. अपवाद म्हणून काही टाटा गाड्याही छत्रपती संभाजीनगर इथल्या कार्यशाळेने बांधल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर कार्यशाळेत वर्षभरात साधारण 600 ते 650 बसगाड्या बांधते. या बसेस मराठवाडा, खान्देश आणि कोकणातल्या काही आगारांमध्ये पाठवल्या जातात.


दापोडी कार्यशाळेत मात्र टाटा आणि लेलॅण्ड दोन्हीही गाड्या बांधल्या जातात. ही कार्यशाळा वर्षभरात साधारण 600 टाटा आणि 400 लेलॅण्ड गाड्या बांधते. या कार्यशाळेत बांधलेल्या गाड्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाडा अशा सर्वत्र दिल्या जातात. 



मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी इथे 2012 - 13 या वर्षात बांधलेली 387 वी नवी लेलॅण्ड असे इथले डिकोडिंग.



मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर इथे 2011 -12 या वर्षात बांधलेली 225 वी नवी टाटा असे इथले डिकोडिंग.


या कार्यशाळा एखादे वेळी अपघातात सापडलेल्या पण चेसिस चांगली असलेल्या बसच्या जुन्या चेसिसवरची जुनी बॉडी बदलून तिला नवीन बॉडी बसवण्याचेही काम करतात. त्यावेळी न. टा. (नवी टाटा) किंवा न. ले. (नवी लेलॅण्ड) ऐवजी पु. टा. (पुनर्स्थापित टाटा) किंवा पु. ले. (पुनर्स्थापित लेलॅण्ड) असे लिहीले जाते. पण अशा वेळा कमी येतात.


आता मधल्या काळात सगळ्या जुन्या ॲल्युमिनीयम बसबॉडीज बदलून माइल्ड स्टील (पोलादी) बसबॉडीज (Mild Steel एम. एस.) बसविण्याचे काम महामंडळाने सगळ्या कार्यशाळांमध्ये हाती घेतले होते. पण त्या गाड्यांवर असा कुठलाच छाप कुठल्याही कार्यशाळेने उठवला नव्हता. आता नवीन बी. एस. 6 टाईपच्या बसगाड्या बांधायला घेतल्यावर फ़क्त छत्रपती संभाजीनगर कार्यशाळेने असे छाप पुन्हा उठवने सुरू केल्याचे मी बघतोय पण नागपूर आणि दापोडी कार्यशाळांच्या बसेसवर असे छाप मलातरी दिसले नाहीत.


- एस. टी. प्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Sunday, July 10, 2022

MH 20 / D गॅंग मधला विशेष मेंबर.

 पुष्कळशा कार बनविणा-या कंपन्यांनी मधल्या काळात कार्सचे A, B आणि C पिलर्स काळ्या रंगाचे आणले होते. त्यामुळे त्यात म्हणे त्या कार्सचे छत "तरंगते छत" असल्यासारखे दिसायचे. आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हाच प्रयोग मधल्या काही काळात आपापल्या बसेसमध्ये केलेला होता. महामंडळाच्या तीनही मध्यवर्ती कार्यशाळेत (दापोडी, औरंगाबाद आणि नागपूर) त्या काळात बांधलेल्या बसेस अशाच प्रकारे खिडक्यांमधले पिलर्स काळ्या रंगात रंगवलेल्या होत्या.



या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुक्ताईनगर आगाराची ही बस ब-हाणपूर जलद मलकापूर या मार्गावर धावते आहे. बसच्या मार्गावरच्या एखाद्या डेपोने आपली बस एखाद्या मार्गावर देण्याची जी काही थोडी उदाहरणे आपल्या महाराष्ट्रात आहेत त्यातलेच हे एक उदाहरण. त्यातून हा आंतरराज्य मार्ग. हे म्हणजे बेळगाव - पुणे या जलद बससाठी कोल्हापूर किंवा सातारा डेपोने आपली बस देण्यापैकी आहे.



ब-हाणपूर जलद मलकापूर
मार्गे इच्छापूर - मुक्ताईनगर
(खरेतर इच्छापूरवरून मलकापूरकडे जाताना मुक्ताईनगर बायपास करूनही जाता येईल. पण आपल्या एस. टी. बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी फ़ारसे बायपास न घेता गावात जाऊन पुन्हा महामार्गाला लागतात.)
MH – 20 / D 6906
मध्यवर्ती कार्यशाळा, औरंगाबाद ने बांधलेली
Ashok Leyland CHEETAH model
३ बाय २ आसनव्यवस्था
एकूण ४९ आसने
ज. मुक्ताईनगर आगार (मुक्ताईनगर आगार, जळगाव विभाग)

Saturday, July 9, 2022

"D" gang of MSRTC

 

महाराष्ट्र एस. टी. त MH - 20 / D या सिरीजचे एक अभूतपूर्व महत्व आहे. महामंडळाच्या चिखलठाणा, औरंगाबाद (संभाजीनगर) कार्यशाळेत बनलेल्या गाड्यांना औरंगाबाद (संभाजीनगर) RTO ने या सिरीजमधले ०००१ ते ९९९९ पर्यंत सगळे नंबर्स राखीव ठेऊन दिलेत. म्हणजे MH - 20 / D या सिरीजच्या सगळ्या गाड्या या आपल्या महामंडळाच्याच मालकीच्या आहेत. या सिरीजने जवळपास गेले १५ वर्षे आपला दरारा कायम ठेवला आहे.
मुक्ताईनगर - जोधनखेडा सर्वसाधारण सेवा.
MH - 20 / D 4791
Ashok Leyland CHEETAH model
मध्यवर्ती कार्यशाळा औरंगाबाद ने बांधलेली गाडी
३ बाय २
एकूण ४९ आसने.
ज. मुक्ताईनगर आगार.

मुक्ताईनगर (एदलाबाद) हे भौगोलिक दृष्ट्या जरी खान्देशात येत असले पण विदर्भाशी त्या गावाचे नाते अगदी दृढ आहे. जसे बार्शी हे गाव भौगिलिक दृष्ट्या जरी सोलापूर जिल्ह्यात असले तरी त्याची एकंदर जवळीक, रोटीबेटी व्यवहार मराठवाड्यातल्या उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्याशी जास्त आहे. तसेच मुक्ताईनगर आणि विदर्भाचे आहे.

Friday, May 28, 2021

मार्गफ़लक केबिनमध्ये दडवलेली बस.





मार्गफ़लक दडवून केबिनमध्ये ठेवला म्हणून मार्ग दडत नाही.

म. का. औ.
न. ले. १४,
२०१२ -१३

नांदे. किनवट आगाराची (त्याकाळची) नवी कोरी बस माहूर - औरंगाबाद मार्गावर.

MSRTC's Central Workshops build buses with their calender starting from 01/06 every year. 01/06 is the MSRTC foundation day. The buses are built from 01/06 of every year till 31/05 of the next year.
This bus is the 14th Leyland bus built by Central Workshop, Aurangabad in 2012-13. This was captured on 06/06/2012 at Mahur. Brand new bus of Kinwat depot for Mahur - Aurangabad route. Before Mahur depot was created in Nanded division, all the buses originating from Mahur were catered by Kinwat depot which is just 50 kms from Mahur towards South East.
Though the bus is not yet ready with the display board, but the driver and the conductor brought it from the depot, parked it on the platform and the route board was seen hiding in the cabin to be displayed at its proper place, soon.
Mahur - Aurangabad Express service
Route length : 400 kms (Via Nanded)
MH - 20 / BL 1906
Kinwat depot, Nanded division.
Ashok Leyland CHEETAH model.
BS III emission standards.
Built at Central Workshop, Aurangabad.
Photographed at: Mahur bus stand.
Date: 6/6/2012, 18.20 hours.

Monday, May 17, 2021

Rusted, Dusted but still Trusted.

माहूर येथे बालपणापासून आम्ही गेलो सकाळी रेणुकादेवी, दत्त शिखर आणि अनसुया शिखराच्या दर्शनानंतर एक भेट बसस्थानकावर पक्की असायचीच. त्या प्रथेत आजही खंड पडलेला नाही. दोन मिनीटे का होईना मी बसस्थानकावर एक फ़ेरी मारतोच मारतो.


२०१२ साली दिलेल्या भेटीत भेटलेली ही एक जुनी प्रेयसी. (एस. टी. च्या परिभाषेत) वयाने निवृत्तीला आली तरी अजूनही देखणी. 





Old Ashok Leyland Bus serving local route.
Mahur is a pilgrimage place in Naded district and situated on the boarder of Maharashtra and Telangana.
Since childhood, we visit Mahur at least once in a year for holy darshan of Jagadmba Renuka Mata. We also are eager to get some glimpses of Ashok Leyland beasts which were rare in Vidarbha during our childhood. Our parents knew this and they used to take us to Mahur bus stand at least once during our pilgrimage trip.
This oldie is serving "Mahur - Renukagad - Datta Shikhar" route. It is for the facility of devotees to take up to Renuka Mandir and Datta Shikhar and back after their darshan. Mahur depot used to run at least 4 such schedules two in the morning and one each in the afternoon and evening.
This bus is waiting for its next evening schedule at Mahur Bus stand.
MH 20 / D 6308
Ashok Leyland CHEETH model.
Mahur depot, Nanded division
(Nanded division of MSRTC paints the front grill of its buses with yellow.)
Built by MSRTC's Central Workshop Aurangabad
3 by 2 seating arrangement.
Total 54 seats + 1 conductor.
Central Workshop Aurangabad built buses always give a feel of Robust body building of a bus.
(Noteworthy thing is that both the indicators are still intact. Later when C.W.A. started fitting the indicators of its buses at the bottom part of the front grill, we found more than 50 % of them in broken state only after a few months.)
Mahur bus stand
6/6/2012.
18.15 hours.

Thursday, May 6, 2021

MH - 20 / D गॅंगचा दरारा.

 सोलापूर विभागाची बस. तेव्हा सोलापूर विभाग आपल्या बसेसचे पुढचे ग्रील्स गुलाबी रंगाने रंगवायचे.



Just as MSRTC's Central Workshop, Nagpur mainly builds TATAs, MSRTC's Central Workshop Aurangabad mainly builds Ashok Leylands.

MH - 20 / D 5XXX must be one of the few series of buses (after the MWP series off course) that was TATA.

I captured the bus in the parking at Ganapatipule, one of the most famous religious and picnic spots in Maharashtra. It had brought students from a school in Madha Tahsil, Solapur District.

Madha to Ganapatipule must be 400 kms distance.

Those were the times when Solapur division buses used to get their front grill painted in "Pink" . Now they paint their front grill with "Steel Grey" colour.
20/02/2009.

Ganapatipule, district Ratnagiri, Maharashtra.