मागील एका पोस्टमध्ये लिहील्याप्रमाणे आम्हा बस आणि रेल्वे फ़ॅन्सना बस किंवा रेल्वे ह्या निर्जीव वस्तू वाटतच नाहीत. तर त्या अगदी आपल्यासारख्याच सजीव वस्तू वाटतात. अगदी तसेच काहीतरी या बसकडे पाहून वाटले होते.
आपल्या महाराष्ट्र एस. टी. च्या स्वतःच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि दापोडी, पुणे. तिथे बसगाड्यांची टाटा किंवा लेलॅण्ड चेसिसवर बांधणी होते. यातल्या नागपूर कार्यशाळेत प्रामुख्याने टाटा बसगाड्या बांधल्या जातात. अगदी अपवाद म्हणून काही लेलॅण्ड गाड्याही नागपूर कार्यशाळेने बांधल्या आहेत.
आजवर महाराष्ट्रात विभागीय भुगोल लक्षात घेऊन विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात टाटाच्या बसेस पाठवल्या जातात तर कोकण, मराठवाडा आणि खान्देशात अशोक लेलॅण्डच्या बसेस पाठवल्या जातात. लेलॅण्डच्या बसेस घाटात चांगल्या असतात हे आपल्या एस. टी. चे गृहीतक आहे.
महाराष्ट्रातले बस आगार आपल्या बसगाड्यांची मागणी आपापल्या विभागानुसार एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठवतात आणि कार्यशाळेत तयार झालेल्या नव्या बसेस या मागणीनुसार त्या त्या विभागातल्या आगारांना पाठवल्या जातात.
MH - 40 / N 9745
मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर
ASHOK LEYLAND CHEETAH model
जुने आगार वर्धा (वर्धा विभाग)
नवे आगार तुळजापूर (धाराशिव विभाग, जुने उस्मानाबाद)
पण या दोन्हीही कन्यांनी नव्या घरात जायला नाखुषी दर्शविलेली दिसते. सासरी जाऊन काही महिने लोटलेत तरीही या कन्या तिथे नांदायला नाखुश दिसतायत. माहेरचेच नाव मोठ्या गौरवाने मिरवतायत.
आता माणसांसारखी या बसेसमध्ये दोन दोन आडनावे (पुल म्हणतात त्या प्रमाणे डब्बल बॅरेल आडनावे. उदाहरणार्थ वैभवी देशपांडे - किन्हीकर) लावण्याची सोय नाही हो. नाहीतर ही कन्या व. वर्धा - उ. तुळजापूर असे दोन दोन डेपो मिरविते झाली असती.
- बसेसची मानवीरूपात कल्पना करून त्या कल्पनाविश्वात रमणारा बसफ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment