Friday, February 2, 2024

सावध, ऐका पुढल्या हाका.

गेल्या पाव शतकाहून अधिक काळ मी अभियांत्रिकी अध्यापन क्षेत्रात आहे. शिकवणे हे एकच कर्तव्य पार पाडून शांत बसणे हा स्वभाव नसल्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, त्यांच्या भावभावना जाणून घेणे,त्यांची कौटुंबिक,सामाजिक आर्थिक अवस्था जाणून त्यात काही मदत, समुपदेशन करता आले तर बघणे या सर्व गोष्टीत मी उत्साहाने व मनापासून सहभागी होतो आहे.

बरे, अनुभव म्हणाल तर मुंबई, नवी मुंबई च्या शहरी विद्यार्थ्यांपासून, नरसी मोनजी विद्यापीठातील श्रीमंत, अतीश्रीमंत विद्यार्थ्यांपासून, सांगोल्यासारख्या दुष्काळी भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांशी सारख्याच पातळीवरून सुसंवादाचा अनुभव.

पण एकूणच अभियांत्रिकी शिक्षणाविषयीची व्यथित करणारी वस्तुस्थिती गेल्या ३ - ४ वर्षात डोळ्यासमोर येतेय. त्यातले काही मुद्दे आणि मला जाणवलेली कारणे यांची ही मांडणी.


१. विद्यार्थ्यांची comprehension skills कमी होताना दिसताहेत. पूर्णपणे Theory असलेल्या पेपर्समध्ये दांड्या उडण्याचे प्रमाण हे पूर्णपणे किंवा थोडेबहुत numericals असणार्‍या पेपर्समध्ये दांड्या उडण्यापेक्षा खूप जास्त आहे.

यातही प्राथमिक शिक्षणापासून इंग्लिश मिडीयम मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना comprehension न येण्याचे प्रमाण ९० % पेक्षा अधिक आहे. या विद्यार्थ्यांना इंग्रजीत दिलेल्या साध्या सूचनाही कळत नाहीत (कारण प्राथमिक शाळेपासून उच्च माध्यमिक शालांत परीक्षेपर्यंतचे शिक्षक / शिक्षिका ज्या पध्दतीने, ज्या phrases वापरून सूचना देतात ती पध्दत इतकी अंगवळणी पडलीय की नवीन पध्दतीत सूचना स्वीकारणे या विद्यार्थ्यांना अतिशय जड जातेय.)


मराठी किंवा इतर मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेणार्‍या मुलांची स्थिती थोडीतरी बरी आहे.

बालवाडीत पाल्याला इंग्रजी माध्यमात टाकताना "अहो, आजच्या जगाची ज्ञानभाषा इंग्रजीच आहे" असे समर्थन करणारे पालक अभियांत्रिकीत पाल्याला तोंडी परीक्षा इंग्रजी माध्यमाऐवजी हिंदी किंवा मातृभाषेत द्यायला मिळावी ही रदबदली करताना " अहो भाषा हे केवळ माध्यम आहे. विचार व्यक्त करताना भाषेचा अडसर नको" असे प्रतिपादन करतात तेव्हा आपण हसावे की रडावे हे कळेनासे होते.


२. शिक्षक जमातीविषयीचा एकूणच आदर कमी झालाय. (मुन्नाभाई एमबीबीएस, थ्री इडियटस आदि सिनेमांचा परिणाम).

३.शिक्षक हा आपण दिलेल्या फी वर निर्वाह करणारी एक व्यक्ती आहे ही भावना वाढीला लागली आहे. १० वी नंतर IIT ची तयारी करवून देणारे तथाकथित कोचिंग, त्यांची महागडी फी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांची फी व सेवासुविधा यांचे व्यस्त प्रमाण हे यासाठी कारणीभूत आहे.


४. दरवर्षागणिक AICTE ज्या पध्दतीने अभियांत्रिकी शिक्षणाचे सोपीकरण करते आहे त्यामुळे ही नवीन अभियंत्याची पिढी खर्‍या आणि पूर्णपणे तांत्रिक ज्ञानापासून वंचित राहतेय. विद्यार्थ्यांची घसरलेली आकलन क्षमता लक्षात घेऊन तांत्रिक शिक्षणात पाणी मिसळून त्याला संयत करणे हे अस्वीकारार्ह आहे. आणि मग "७८ %अभियंते नोकरी करण्याजोगे नाहीत." म्हणून आपणच गळा काढायचा हा उच्च आणि तंत्रशिक्षण संस्था नियामकांचा (AICTE/ UGC) ढोंगीपणा आहे. तंत्रशिक्षणाचा दर्जा खालावून भारतातली एक पूर्ण पिढी नासवण्याचे पातक या संस्थांच्या दिशाहीन नियोजनाला जाणार आहे.


प्रत्येक अभियंत्याला दुसर्‍या अभियांत्रिकी शाखेचे थोडे ज्ञान असावे इतपर्यंत ठीक आहे. म्हणजे सिव्हील इंजिनीयरला softwares माहिती असावीत. इलेक्ट्रीकल इंजिनीयरला मेकॅनिकल मशीन्सची माहिती असावी इथपर्यंत ठीक आहे. पण अभियांत्रिकी शिक्षण सोपे करण्याच्या नादात प्रथम वर्ष अभियांत्रिकीत फक्त ५२ % तांत्रिक आणि उरलेला ४८ % अतांत्रिक अशा शिक्षणक्रमाचे नियोजन करणार्‍या व अभियंत्यांना "जीवशास्त्र" शिकवण्याचा घाट घालणार्‍या AICTE च्या "तज्ञां"चे किती कौतुक करावे ? याला शब्द अपुरे पडतात. "सुमारांची सद्दी" हा एकच शब्द चपखल लागू पडतो.


५. दहावीनंतर शाळा / महाविद्यालयातील शिक्षणाकडे दुर्लक्ष करून फक्त कोचिंग क्लासमधल्या घोकंपट्टीवर पाल्यांना अभियंता बनवू पाहणारे पालकही या अधोगतीला तितकेच जबाबदार आहेत. आपल्या पाल्याचा कल, आकलन क्षमता लक्षात न घेता त्याला IIT च्या स्पर्धेत ढकलणारे पालक कोपरापासून नमस्कारास पात्र आहेत.


- बर्‍याच दिवसांपासून मनात असलेले मुद्दे अभिजनांच्या चर्चेसाठी मांडण्याची इच्छा असलेला आणि भंगारला "भंगार" म्हणण्याची ताकद असलेला आपला राममास्तर.

12 comments:

  1. उत्तम लेख सर

    ReplyDelete
  2. सर, आपण अगदी मार्मिक विश्लेषण केले आहे. AICTE, Engineering Colleges, coaching classes बद्दल सत्य परिस्थिती मांडली आहे. यामध्ये विनाकारण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कालावधी, त्यासाठी लागणारा खर्च सर्वतोपरी कारणी लागत नाही आणि हवा तसा अभियंता घडत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

    ReplyDelete
  3. Good observation, pls suggest remides for the same.

    ReplyDelete
  4. नमस्कार सर
    आपले विचार अगदी पटले. मी 20 वर्ष्यापासून आय टी क्षेत्रात कार्यरत आहे. वेगवेगळ्या काळात विद्यार्थ्यांचे इंटरव्हिव घेताना हा फरक प्रकर्षाने जाणवत आहे.

    मी स्वतः ज्ञानेश्वर विद्यापीठाचा विद्यार्थी असून कित्तेक वेळा त्यावरून हिणवण्यात आले आहे.

    पण आता सध्याचे चित्र पाहता आम्ही 2000 साली काळाच्या कित्ती पुढे होतो त जाणवून अभिमान वाटतो.
    देव करो आणि या अभ्यासक्रम नियोजनकर्त्यांना सुबुद्धी येवो.

    ReplyDelete
  5. अभ्यासून, अनुभवातून मांडलेले मार्गदर्शक मत.

    ReplyDelete
  6. अनुभवातून मांडलेले मार्गदर्शक विचार

    ReplyDelete
  7. आपण नेहमी सारासार विचार करून लिहिता. त्या मुळे आपले विचार समतोल वाटतात
    मी वैद्यकीय शिक्षणाचा सरकार, शिक्षण सम्राट आणि जिथे तिथे सर्व जनाना शहाणे करून सोडणारी न्याय संस्था यांच्या खेळ खंडोबा विषयी काही सांगावे म्हणतो.
    खाजगी वैद्यकीय महाविद्यालये ही ग्रामीण भागात उघडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे सोईचे करू सांगून शहरातील समर्थ मुले तिथे शिकायला गेली. जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज असा प्रकार सुरू झाला आणि तिथे practical साठी रुग्ण लागतात हे विसरले आहेत. पुस्तकी ज्ञान काही कामाचे नाही. बरे जुन्या आणि प्रस्थापित कॉलेजात विद्यार्थी फक्त पुढील स्पर्धा परीक्षा कशी क्रॅक करावी यात मश्गूल आहेत. सरकारी कॉलेजात शिक्षक पुरेसे नाहीत. काही अवघड नाही. मेडिकल कौन्सिल चे इन्स्पेक्शन असले की तेच प्राध्यापक आज धुळे उद्या बारामती आणि परवा अजून कुठे असे फिरवतात. खाणे पिणे आणि लिफाफे याची सोय असली की इन्स्पेक्टर लोक खूष आणि सगळे पहिल्या सारखे.
    प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये हक्काचे गुलाम मिळावे म्हणून DNB साठी हॉस्पिटल मान्यता देण्यात परत लिफाफा कमी येतो. मग हेच वैद्यकीय पदवीधर बाहेर पडून मुद्दल परत मिळवण्या साठी रुग्णाला नाडतात. गरीब भरडले जातात आणि मग मारामारी होते. नीट परीक्षेच्या वर्गात जाण्याची आर्थिक कुवत नसेल तर सगळेच संपले कारण महाविद्यालयात ११ आणि १२ साठी कोणी शिकवत नाही.
    भारतातील परिस्थितीचे चटके खाऊन पण सुदैवाने उत्तम मेडिकल उच्च शिक्षण घेऊन , सरकारी बॉण्ड पूर्ण करून पाश्चिमात्य देशात नाईलाजाने जाऊन यशस्वी झालेला एक वैद्यकीय व्यावसायिक🙏

    ReplyDelete