Saturday, February 10, 2024

पहिला विमानप्रवास आणि त्यात उडालेली घाबरगुंडी

माझ्या आयुष्यातला पहिला विमानप्रवास कुठल्या कारणाने आणि कसा घडला ? हे मी सविस्तर या लेखात लिहीलेला आहे. त्या विमानप्रवासाच्या शेवटी घडलेली आणि मनावर कोरल्या गेलेली एक घटना.


विमान उतरताना विमानाच्या पंखांवरचे, एंजिनावरचे रिव्हर्सर्स कार्यरत होत असतात. विमानाची धावपट्टी ही वा-याच्या झोताच्या दिशेनेच आखलेली असते. विमान उतरताना ते धावपट्टीवर टेकल्यानंतर विमान अतिशय वेगात असताना हे रिव्हर्सर्स कार्यरत होऊन अधिक प्रमाणात वारा अडविला जातो आणि विमान धावपट्टीवर कमी अंतरात थांबू शकते.



पहिल्या विमानप्रवासात मी डावीकडल्या एका खिडकीपाशी बसलेलो होतो. विमानाच्या पंखांच्या मागे असलेल्या खिडकीत. माझ्या खिडकीतून मला पंख पूर्णपणे दिसू शकत होते. नागपूर विमानतळावर विमान उतरल्यानंतर ते रिव्हर्सर्स पूर्णपणे उघडलेत आणि आतमधला एंजिनाचा भाग मला दिसू लागला. हा सगळा प्रकार दरवेळी होत असतो त्यामुळे त्यात घाबरण्यासारखे काही नाही हे मला माहिती नव्हते. त्यामुळे हे रिव्हर्सर्स असे उघडल्यावर मला वाटले की विमान उतरताना बसलेल्या हाद-यामुळे एंजिनावरचे हे हूड निघालेले आहे आणि ते रिव्हर्सर्स ही अगदी पूर्ण उघडून जमिनीला टेकतायत की काय अशा स्थितीत होते. माझ्या मनात चलबिचल सुरू झाली. विमान उतरताना हे हूड उघडलेले आहे. वेगात असलेल्या विमानामुळे ते आता थोड्याच वेळात रनवेवर घासल्या जाऊन त्यातून ठिणग्या वगैरे निघू शकतील. विमानाचे सगळे इंधन त्याच्या पंखांमध्ये भरलेले असल्याने त्या ठिणग्या पंखांपर्यंत पोहोचतील आणि विमान पेट घेईल. आपला पहिला विमानप्रवास हा शेवटचा विमानप्रवास ठरेल. उद्याच्या वर्तमानपत्रांमध्ये या अपघाताची बातमी छापून येईल तेव्हा कदाचित आपल्या नावासह "या तरूणाचा पहिला प्रवास हा शेवटचा प्रवास ठरला" असा मथळा छापून छोट्या चौकटीत आपलीही बातमी येईल. आपल्या आई वडीलांना किती वाईट वाटेल ? अशा अनेक कल्पना काही सेकंदात मनात आल्यात. आजवर नॅशनल जिओग्राफ़िकवर पाहिलेले अनेक "Air Crash Investigations" चे एपिसोडस मनात तरळून गेलेत.


पण काही नाही. जसेजसे विमान पुढे जात होते तसेतसे ते रिव्हर्सर्स पूर्ववत होत होत एंजिन झाकते झालेत आणि हा प्रयोग पूर्वनियोजित होता याची माझ्या मनाची खात्री पटली. त्याकाळी यू ट्यूब वगैरेचे प्रस्थ नव्हते. खूप वर्षांनी यू ट्यूब वर आणि आजकाल इंस्टाग्रामवर, फ़ेसबुकवर असे हजारो व्हिडीयोज जेव्हा मी बघतो तेव्हा स्वतःच्या उडालेल्या घाबरगुंडीबाबत हसू येतं. पण  ते काही सेकंद माझ्या मनात आलेले विचार आज जवळपास तीस वर्षांनंतरही अगदी तसेच आठवण्याइतके प्रखर आहेत हे लक्षात येतं.


- आनंदी घटना कायम लक्षात ठेवणारा आणि मनाला वेदनादायी घटना फ़ार लवकर विसरणारा माणूस पण अशी थरारक घटना कायम लक्षात राहते याचा अनुभव घेणारा साधा मनुक्ष, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

4 comments:

  1. चला बरे वाटले वाचून , मला ही अशीच काहीशी धाकधूक असते मनात विमान प्रवास करताना . खूप सुंदर शब्दांमध्ये मांडले आहे 👍👌🏻

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी. "पिंडी ते ब्रह्मांडी" किंवा "As you write more and more personal, it becomes more and more universal" याचा प्रत्यय कायम येतोच.

      Delete