खरा क्रिकेटप्रेमी असला की त्याला कुठल्याही लेव्हलच्या क्रिकेटमध्ये मजा येते. अगदी टेस्ट मॅच बघताना जी मजा येते तीच मजा अगदी गल्लीतले क्रिकेट म्हणा किंवा घरातल्या छोट्याशा पॅसेजमध्ये खेळल्या गेलेल्या फ़ूटपट्टीच्या बॅट आणि पिंगपॉंगच्या बॉलने खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये म्हणा ख-या क्रिकेटप्रेमीला तितकीच मजा येते.
यापूर्वी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडमध्ये असताना खेळलेल्या क्रिकेट मॅचची कथा इथे. आता वय वाढत चाललय. चपळपणे धावणे, जोरकस बॅटींग करणे हळूहळू कठीण होत चाललय हे लक्षात घेऊन मी या खेळातून खेळाडू म्हणून निवृत्ती घ्यायची ठरवली. आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक व इतर शिक्षकेतर कर्मचा-यांची क्रिकेट मॅच होणार आणि मॅचच्या एक दिवस आधी त्या मॅचसाठी सिलेक्शन्स होणार आहेत हे कळल्यावर मी खेळाडू म्हणून भाग घेण्याऐवजी मॅचचा अंपायर म्हणून भाग घेण्याचे निश्चित केले.
मॅचच्या दिवशी अंपायरला साजेसा पोषाख वगैरे करून मैदानावर हजर झालो. मॅचच्या आधी पिच रिपोर्ट वगैरे सांगताना रवी शास्त्री, हर्षा भोगले यांच्या नकला करून झाल्यावर खरोखरच्या मॅचला सुरूवात झाली. मॅचमध्येही काही बॅटसमनना पिचवरून धावताय म्हणून उगाच समज दे, (टेनिस बॉल असूनही) मध्येच बॉलचा आकार बदललाय की काय ? हे तपासून पहा वगैरे माझ्या नकला सुरू होत्याच. आणि मॅचच्या पाचव्याच ओव्हरमध्ये रन आऊटचे अपील झाले. ज्या बॅटसमनविरूद्ध अपील झाले ते माझ्याच स्थापत्य विभागातले माझे सहकारी प्राधापक प्रा. सतीश केणे. ते आऊट नव्हते यावर माझा पूर्ण विश्वास होता पण अपील तर जोरदार झाले होते. त्यावर उपाय म्हणून उगाचच टी. व्ही. अंपायरकडे दाद माग, माझा स्टंपव्हिजन कॅमेरा बिघडलाय अशा सबबी सांग अशा माझ्या नकला सुरू झाल्या.
दुस-या टीमच्या खेळाडूंकडून आणि उपस्थित असलेल्या प्राध्यापक प्रेक्षकांकडूनही श्री. केणे सर माझे निकटचे सहकारी असल्याने मी आऊट देत नाही असे गंमती गंमतीचे आरोप सुरू झालेत. त्यावर गंमत म्हणून खिशातून लाल कव्हर असलेला फ़ोनच काढून फ़ुटबॉलप्रमाणे रेड कार्ड (प्रेक्षकांना हं) दाखवून हा वाद थांबवला. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना मजा आली म्हणजे झालं, हा माझा त्यामागचा दृष्टीकोन.
गंमती गंमतीची, खेळीमेळीची क्रिकेट मॅच असली तरी ती हिरीरीने खेळली गेली पाहिजे आणि त्यात मजा आली पाहिजे हे दोन्हीही माझे दृष्टीकोन. क्रिकेटची मजा आली पाहिजे हे माझे ध्येय.
- ९९ % नकलाकार असलेला १ % क्रिकेटर, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment