Sunday, February 4, 2024

महाराष्ट्र एक्सप्रेस : बिचारेपणाचा चलचित्र प्रवास.

महाराष्ट्र एक्सप्रेस या गाडीकडे कायम होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल मी एका लेखात. तो लेख इथे. सविस्तर लिहीलेले होते. त्याचीच सचित्र झलक एकेदिवशी नागपूरजवळ पहायला मिळाली.

२६ / ०९ / २०२१ : आम्ही कुटुंबीय नागपूरजवळील वडगाव धरण येथे सहलीसाठी गेलेलो होतो.  परतताना बोरखेडी फ़ाटकात आम्हाला बराच वेळ थांबावे लागले. 

दुपारी १.५७ : महाराष्ट्र एक्सप्रेस हळूहळू बोरखेडी स्टेशनात दाखल झाली आणि प्लॅटफ़ॉर्म क्रमांक १ वर थांबवल्या गेली. तेव्हाच आता या गाडीच्या बाबतीत काहीतरी अन्यायकारक घडणार याची चाहूल आम्हाला लागली होती. कारण बोरखेडीला या गाडीचा थांबा नाही. खरेतर ही गाडी मध्य रेल्वेची. हिला प्राधान्य देऊन तसेच नागपूरपर्यंत नेले असते तर सध्याच्या वेळेच्या किमान १ तास लवकर ही गाडी नागपूरपर्यंत येऊ शकते. पण मध्ये रेल्वेचा अवसानघातकीपणा सर्वत्र आड येतो.


दुपारी २.०२ : नागपूरवरून येणारी नवी दिल्ली - चेन्नई ग्रॅंड ट्रंक (G T) एक्सप्रेस तिच्या पुढच्या थांब्याकडे, सेवाग्रामकडे धाडधाड निघून जातेय. महाराष्ट्र एक्सप्रेस बिचारी अजूनही वाट बघतेच आहे. न थांबवता जर तिला पुढे जाऊ दिले असते तर किमान बुटीबोरीपर्यंतचे अर्धे अंतर तिने कापलेच असते पण नाही.

दुपारी २.०५ : महाराष्ट्र एक्सप्रेसच्या मागून येणारी तामिळनाडू एक्सप्रेस पूर्ण वेगात येऊन महाराष्ट्रला ओव्हरटेक करून पुढे काढली जातेय. जर महाराष्ट्र एक्सप्रेस पुढे काढली असती तर या गाडीला मागाहून कमी वेगाने यावे लागले असते. पण दक्षिण रेल्वेच्या गाडीसाठी पायघड्या आणि आपल्या स्वतःच्या गाडीसाठी साधी चांगली वागणूकही नाही हे तर मध्य रेल्वेचे व्यवच्छेदक लक्षण आहे.


आता ही तामिळनाडू एक्सप्रेस बुटीबोरीला जाईपर्यंत पुढची ७ - ८ मिनीटे तरी हा ब्लॉक मोकळा होणार नाही. मग महाराष्ट्र एक्सप्रेस या स्थानकावरून हलू शकेल. म्हणजे दुपारी १.५७ ला इथून निघून जायची ती तब्बल २. १३ पर्यंत विनाकारण बोरखेडीतच पडून राहणार. १६ मिनीटांचा विनाकारण खोळंबा.

मध्य रेल्वे सोडली तर आपल्याच विभागाच्या गाड्यांना स्वतःच इतकी सावत्र वागणूक देण्याचे उदाहरण संपूर्ण भारतात इतर कुठलेही नसेल.



- महाराष्ट्रीय नावाच्या बाण्याचा, मराठी माणूस, प्रा. राम प्रकाश किन्हीकर













No comments:

Post a Comment