Showing posts with label AICTE. Show all posts
Showing posts with label AICTE. Show all posts

Friday, February 2, 2024

सावध, ऐका पुढल्या हाका.

गेल्या पाव शतकाहून अधिक काळ मी अभियांत्रिकी अध्यापन क्षेत्रात आहे. शिकवणे हे एकच कर्तव्य पार पाडून शांत बसणे हा स्वभाव नसल्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, त्यांच्या भावभावना जाणून घेणे,त्यांची कौटुंबिक,सामाजिक आर्थिक अवस्था जाणून त्यात काही मदत, समुपदेशन करता आले तर बघणे या सर्व गोष्टीत मी उत्साहाने व मनापासून सहभागी होतो आहे.

बरे, अनुभव म्हणाल तर मुंबई, नवी मुंबई च्या शहरी विद्यार्थ्यांपासून, नरसी मोनजी विद्यापीठातील श्रीमंत, अतीश्रीमंत विद्यार्थ्यांपासून, सांगोल्यासारख्या दुष्काळी भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांशी सारख्याच पातळीवरून सुसंवादाचा अनुभव.

पण एकूणच अभियांत्रिकी शिक्षणाविषयीची व्यथित करणारी वस्तुस्थिती गेल्या ३ - ४ वर्षात डोळ्यासमोर येतेय. त्यातले काही मुद्दे आणि मला जाणवलेली कारणे यांची ही मांडणी.


१. विद्यार्थ्यांची comprehension skills कमी होताना दिसताहेत. पूर्णपणे Theory असलेल्या पेपर्समध्ये दांड्या उडण्याचे प्रमाण हे पूर्णपणे किंवा थोडेबहुत numericals असणार्‍या पेपर्समध्ये दांड्या उडण्यापेक्षा खूप जास्त आहे.

यातही प्राथमिक शिक्षणापासून इंग्लिश मिडीयम मध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना comprehension न येण्याचे प्रमाण ९० % पेक्षा अधिक आहे. या विद्यार्थ्यांना इंग्रजीत दिलेल्या साध्या सूचनाही कळत नाहीत (कारण प्राथमिक शाळेपासून उच्च माध्यमिक शालांत परीक्षेपर्यंतचे शिक्षक / शिक्षिका ज्या पध्दतीने, ज्या phrases वापरून सूचना देतात ती पध्दत इतकी अंगवळणी पडलीय की नवीन पध्दतीत सूचना स्वीकारणे या विद्यार्थ्यांना अतिशय जड जातेय.)


मराठी किंवा इतर मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेणार्‍या मुलांची स्थिती थोडीतरी बरी आहे.

बालवाडीत पाल्याला इंग्रजी माध्यमात टाकताना "अहो, आजच्या जगाची ज्ञानभाषा इंग्रजीच आहे" असे समर्थन करणारे पालक अभियांत्रिकीत पाल्याला तोंडी परीक्षा इंग्रजी माध्यमाऐवजी हिंदी किंवा मातृभाषेत द्यायला मिळावी ही रदबदली करताना " अहो भाषा हे केवळ माध्यम आहे. विचार व्यक्त करताना भाषेचा अडसर नको" असे प्रतिपादन करतात तेव्हा आपण हसावे की रडावे हे कळेनासे होते.


२. शिक्षक जमातीविषयीचा एकूणच आदर कमी झालाय. (मुन्नाभाई एमबीबीएस, थ्री इडियटस आदि सिनेमांचा परिणाम).

३.शिक्षक हा आपण दिलेल्या फी वर निर्वाह करणारी एक व्यक्ती आहे ही भावना वाढीला लागली आहे. १० वी नंतर IIT ची तयारी करवून देणारे तथाकथित कोचिंग, त्यांची महागडी फी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांची फी व सेवासुविधा यांचे व्यस्त प्रमाण हे यासाठी कारणीभूत आहे.


४. दरवर्षागणिक AICTE ज्या पध्दतीने अभियांत्रिकी शिक्षणाचे सोपीकरण करते आहे त्यामुळे ही नवीन अभियंत्याची पिढी खर्‍या आणि पूर्णपणे तांत्रिक ज्ञानापासून वंचित राहतेय. विद्यार्थ्यांची घसरलेली आकलन क्षमता लक्षात घेऊन तांत्रिक शिक्षणात पाणी मिसळून त्याला संयत करणे हे अस्वीकारार्ह आहे. आणि मग "७८ %अभियंते नोकरी करण्याजोगे नाहीत." म्हणून आपणच गळा काढायचा हा उच्च आणि तंत्रशिक्षण संस्था नियामकांचा (AICTE/ UGC) ढोंगीपणा आहे. तंत्रशिक्षणाचा दर्जा खालावून भारतातली एक पूर्ण पिढी नासवण्याचे पातक या संस्थांच्या दिशाहीन नियोजनाला जाणार आहे.


प्रत्येक अभियंत्याला दुसर्‍या अभियांत्रिकी शाखेचे थोडे ज्ञान असावे इतपर्यंत ठीक आहे. म्हणजे सिव्हील इंजिनीयरला softwares माहिती असावीत. इलेक्ट्रीकल इंजिनीयरला मेकॅनिकल मशीन्सची माहिती असावी इथपर्यंत ठीक आहे. पण अभियांत्रिकी शिक्षण सोपे करण्याच्या नादात प्रथम वर्ष अभियांत्रिकीत फक्त ५२ % तांत्रिक आणि उरलेला ४८ % अतांत्रिक अशा शिक्षणक्रमाचे नियोजन करणार्‍या व अभियंत्यांना "जीवशास्त्र" शिकवण्याचा घाट घालणार्‍या AICTE च्या "तज्ञां"चे किती कौतुक करावे ? याला शब्द अपुरे पडतात. "सुमारांची सद्दी" हा एकच शब्द चपखल लागू पडतो.


५. दहावीनंतर शाळा / महाविद्यालयातील शिक्षणाकडे दुर्लक्ष करून फक्त कोचिंग क्लासमधल्या घोकंपट्टीवर पाल्यांना अभियंता बनवू पाहणारे पालकही या अधोगतीला तितकेच जबाबदार आहेत. आपल्या पाल्याचा कल, आकलन क्षमता लक्षात न घेता त्याला IIT च्या स्पर्धेत ढकलणारे पालक कोपरापासून नमस्कारास पात्र आहेत.


- बर्‍याच दिवसांपासून मनात असलेले मुद्दे अभिजनांच्या चर्चेसाठी मांडण्याची इच्छा असलेला आणि भंगारला "भंगार" म्हणण्याची ताकद असलेला आपला राममास्तर.