Sunday, August 24, 2025

काटा रूते कुणाला ?

चंद्रपूरला जाणा-या वातानुकूलित बसमध्ये तो शिरला तेव्झ बस सुटायला अवकाश असला तरी बहुतेक मंडळी बाहेरच्या रणरणत्या उन्हापेक्षा आतच आरामशीर बसलेली होती. वास्तविक खाजगी कंपन्यांचे पेव फुटुन त्यांच्यात स्पर्धा सुरू झाल्यानंतर संपूर्ण भरलेली बस हे दृश्य दुर्मिळ झाले होते. खाजगी गाड्यांच्या पोऱ्यांची प्रवाशी मिळवण्यासाठी काशीच्या पंड्यांशी स्पर्धा करणारी धावपळ पाहून तो कुठेतरी सुखावत होता. त्याला त्याच्या बालपणीचे दिवस आठवले. उन्हाळ्याच्या सुट्या, आजोळी जाण्याचे एक महिना आधीचा बेत, मोजक्याच एस. टी. गाड्या, ८ दिवस आधी रांगेत उभे राहून वेळप्रसंगी ३ तासाच्या प्रवासासाठी ३ तास उभे राहून मिळवलेली आरक्षणे, ती विजयी मुद्रा. सगळं आठवून त्याचं त्यालाच हसू आलं.



५, ६ रांगा टाळत तो आसनांपाशी आला. तिथे आधीच कुणीतरी बसलं होतं. त्याच्या मिशांमधून पुन्हा हसू ओघळलं. मुद्दाम आरक्षण करून उशिरा बसमध्ये चढायचं आणि आपल्या आसनावर बसलेल्या माणसांवर रुबाब दाखवत त्यांचा 'मोरू' करायचा ह्या गोष्टीत तो तरुण असताना त्याला विलक्षण आनंद व्हायचा. पण आता ? "आपलं एवढं वयोमान झालं." त्यानं विचार केला, "तरीही तश्शीच मजा अजूनही येते." यातल्या ’आपलं वयोमान झाले' या विचाराशी तो थबकला. छे ! आपण एवढे काही म्हातारे दिसत नाही काही ? हं आता केस थोडे पांढरे झाले असतील. चाळीशीही नाकावर असेल. पण एकंदर पूर्वीचा रुबाबदारपणा कायम आहे. परवा कुणीतरी बोलताना म्हणालं देखील की हा चष्मा तुम्हाला शोधून दिसतोय म्हणून. केससुद्धा आज कसे अगदी स्टाईलमध्ये.....


"तुमचा सीट नंबर काय?" अचानक त्या बसलेल्या व्यक्तीने प्रश्न विचारला आणि त्याची विचारशृंखला तुटली.


त्यानं तिच्याकडे बघितलं आणि अक्षरशः हादरून, स्वप्न बघितल्यासारखाच तो बघत राहिला. तिनंही बहुधा त्याला तेव्हाचं नीट बघितलं. ती सुद्धा त्याच्याकडे विस्कारित नेत्रांनी बघत राहिली.


"तू ?” ती जवळ जवळ किंचाळलीचं


"तू?" नेमका तोही त्याचवेळी ओरडला.


"अरे आहेस कुठं ? करतोस काय ? आज इकडे कसा ? आणि अचानक ?"


"अगं हो! हो ! पहिले मला नीट बसू तर देशील. आणि हे सगळे प्रश्न मीच तुला विचारायला हवेत." 


"छे ! छे! लेडिज फर्स्ट"


"वा ! प्रश्न विचारताना 'लेडिज फर्स्ट' म्हणे आणि उत्तरे देताना ?"


"तस्साच भांडकुदळ आहेस अजून. झालं."


एव्हाना त्या बसमधलं इस्त्रीचं वातावरण बिघडलं होतं. अनेक भुवया उंचावल्या गेल्या होत्या. पुढल्या आसनांवरच्या काही मााना १८० अंशच्या कोनांमधून वळल्या होत्या. त्यासरशी दोघंही ओशाळले. खिडकीशी ती सरकून बसली आणि तो तिच्या शेजारी.


"गाडी फक्त जांबला थांबेल" कंडक्टरने दार लावून घेता घेता पुकारा केला. बस सुरू झाली.


"कुठे जातोयसं ?"


"आवारपूरला जातोय. अगं माझ्या मोठ्या मुलाला तिथे जॉब मिळालाय ना ? त्याला भेटायला."


तिनं त्याच्याकडे पाहिलं. खरंच की ! हा एवढ्या मोठ्या पोराचा बाप झालाय. आपलीही पन्नाशी फारशी दूर नाही. केवढा काळ गेला नाही मधे !


"किती वर्षांनंतर भेटतेस गं ?" ती विचारात गढली असताना त्याने प्रश्न विचारला. तिला आश्चर्य वाटलं. हा मनकवडा वगैरे आहे की काय ? "आणि तू कुठे जातेयसं ?"


"चाल्लेय चंद्रपूरला. माझ्या मुलीसाठी स्थळ आलंय तिथलं. जरा चौकशी करून येते. ह्यांना वेळच नाही नं. अजिबात, म्हणून आपली एकटीच."


"कॉलेज सोडल्यानंतर आपण पहिल्यांदाच भेटतोय न गं ? मधे तू पत्रंही पाठवलं नाहीस. हं! सोडताना मारे आपण वचनं, शपथा घेतल्या होत्या. नंतर विसरलीस ? तशी तू काय म्हणा....." पुढलं वाक्य त्यानं अर्धवटच सोडलं होतं. ती मात्रा अस्वस्थ होऊन खिडकीबाहेर पाहू लागली होती. एव्हाना बस गावाबाहेर पडली होती.


तो सुद्धा अस्वस्थ झाला. "एवढ्या वर्षांनी बिचारीची भेट होतेय आणि आपण पुन्हा तस्सेच हट्टी."


बराच वेळ शांततेत गेला. कंडक्टर येऊन तिकीटं तपासून निघून गेला होता. दोघंही सीटवर माना टेकवून झोपल्याचा आभास निर्माण करत होते. पण मनातली खळबळ चेहेऱ्यावर दोघांनाही लपवता येत नव्हती.


कॉलेजचे दिवस. मोरपीस गालांवरून फिरून जावं तसले दिवस. अतिशय हळुवार भावनांचे तरंग मनाच्यां त्या सरोवरात नुसत्या हवेच्या झुळुकीने उठायचे दिवस कॉलेजला असताना..


"पुण्यावरून कधी आलास, बाय द वे ?" तिच्या प्रश्नाने त्याची तंद्री पुन्हा भंगली.


"अं ? अगं पुण्याला माझी फॅमिली फक्त असते. मी हल्ली मुंबईत असतो. आज सकाळीच विदर्भ एक्सप्रेसने आलो आणि लगेच स्टॅण्डवर."


"हे रे काय ? घरी नाही का यायचं ?"


घरी येऊन तरी आपली चुकामूकच झालेली बघायची नं ? आणि तुझा लग्नानंतरचा पत्ता कुठाय मायाकडे ? साधी पत्रिकापण पाठवली नाहीस ?" तो अगदी वय विसरून २०-२५ वर्षांपूर्वीच्या गोष्टींवर तावातावात भांडायच्या पावित्र्यात आला होता. तिचा हिरमुसलेला चेहेरा पाहून मात्र तो वरमला "बाय द वे, वाय करतात तुझे मिस्टर ?"


"सध्या अमरावतीला असतात. इंजीनियर आहेत. पण मी आणि मुलं नागपूरलाच असतो." 


"आणि मुलं किती ?" तो बराच ’नॉर्मल’ला आलाय हे त्याच्या आवाजावरून जाणवत होतं.


"अरे दोन्ही मुलीचं. थोरली यंदाच एम. कॉम. झाली. धाकटी मेडिकलला. अजून शिकतेय. ए ! मीच मघापासून बडबडतेय. तुझ्याविषयी सांग ना."


"माझ्याविषयी ? हं! काय सांगणार ? मधल्या इतकी वर्षांनी आपल्याला एकमेकांपासून एवढं दूर नेलं की एकमेकांच्या संगतीत जीवन घालवण्याच्या शपथा विसरून आपण एकमेकांच्याच जीवनाविषयी विचारतोय. सांगतो. सदगुणी, सुंदर बायको आहे. एकच मुलगा जाहे. दोन वर्षांपूर्वी आपल्याच कॉलेजमधून इंजीनियर झाला आणि आवारपूरला लागलाय."


"छान ! बापाचं नाव मुलानं काढलं तर ! ए, बाकी तू अजूनही गातोस वगैरे का रे?"


बराच वेळ तो गप्प होता. बहुधा शब्दांची जुळवाजुळव करत असावा. मोठा सुस्कारा सोडून, विचारांना पूर्णविराम देत तो म्हणाला "खरं सांगू? तू निघून गेल्यानंतर मैफिलीतली सतार जी अबोल झाली ती कायमचीच. मैफिल विस्कटली ती विस्कटलीच. आताशा् तंबो-याची गवसणीसुद्धा काढत नाही मी वर्षानुवर्ष. खरंच गेले ते दिन गेले. 


वर्षा ! आठवते तुला माझी ती शेवटली मैफिल ? ’लाख चुका असतील केल्या.....' गाण्यातून तू मधूनच उठून गेलीस. खरंच वर्षा. अगं, जीवनाच्या पहाटे एखादं सत्य, सत्य वाटलं म्हणजे ते अगदी तसंच संध्याकाळी ही वाटेल असं नाही. सुरूवातीला असंच वाटलं होतं गं. पण तुला अजूनही विसरू शकलो नाही. सुखी संसाराच्या ह्या वाटचालीत कधीकधी जुन्या आठवणींचे सल असे बोचतात. थांबून थोडं मागे पहायला लावतात आणि मग वर्षा, तुझ्या नावाचं वळण आपोआप येतचं गं" बोलताना त्याला धाप लागली होती. त्याचा आवाजही कापरा झाला होता.


"शांत हो अभि. शांत हो. अरे या सगळ्या गोष्टी आत्ता पुन्हा बोलायलाच हव्यात कां ?"


अभिजित थोडा सावरला "बघ. अजून तशीच निगरगट्ट आहेस. भावनेच्या भरात अजिबात वहात नाहीस."


बस जांबच्या स्टँडमध्ये शिरली होती. फक्त तो उत्तरला, परतताना हातात एक मोठं कागदी पुडकं होतं.


"काय आणलंस ? बघू ?"


"समोसे आहेत. तुला आवडतात नां."


आता मात्र तिला भडभडून आलं. अजूनही ह्याचं आपल्या आवडी निवडी जपणं सुरूच आहे ? नकळत ह्या विचाराने मनात आणि अश्रुंनी डोळ्यात दाटी केली होती. न संकोचता तिने ते अश्रू ओघळू दिले.


बस पुन्हा सुटली होती. समोसे संपेपर्यंत कुणीही बोलत नव्हते.


"तू कशी आहेस ?" त्यानं थोड्या काळजीनं विचारलं.


"तशी सुखीच आहे. हे चांगले आहेत म्हणजे शांत, मनमिळावू वगैरे. मुलीसुद्धा छान आहेत. तुझ्यासारखंच अगदी. ए, तू नागपूरला परत कधी येतोयस? ए, रहायलाच ये ना एक दिवस आमच्या घरी. सगळ्यांशी तुझी ओळख होऊन जाईल."


"होऊन जाईल" ला तो सातमजली हसला. तो पुण्याचा आणि ती अस्सल वऱ्हाडी. त्यामुळे कॉलेजला असतानाच तिच्या 'करून राहिले, घेऊन राहिले' अशा शब्दप्रयोगांना तो असंच सातमजली हसायचा. त्याच्य असल्या हसण्याने तिचा कावराबावरा झालेला चेहरा बघून आणखीनच त्याला हसायला यायचं.


"तसं माझं नक्की नाही गं. त्यातून चिरंजिवांनी परस्पर बल्लारपूर-मुंबई रिझर्वेशन केलं असेल तर कठीण आहे."


पुन्हा बराच वेळ दोघंही गप्प होते. वरोरा मागे पडलं होतं. भद्रावतीची लालभडक कौलारू घरं दिसायला लागली होती.


"अभि, हे सगळं लौकिक, ऐश्वर्य, हे सुख, म्हणजे खर समाधान असतं का रे ? किती वेगळ्या कल्पना होत्या नाही आपल्या; आपण कॉलेजात असताना ? खरंच आपणच बदलतो की ती सगळी गद्धेपंचवीशी असते रे?"


तो काहीच बोलला नाहीं. जीवनप्रवास एकत्रे करण्याची शपथ घेतलेले ते दोन जीव 'यथा काष्ठं च काष्ठ च" प्रमाणे कॉलेजनंतर प्रवाहातून वेगळे झाले होते. कॉलेजात असताना वर्षा म्हणजे अभिजितच्या मैफिलीचा प्राण होती आणि तो आपल्या गोड गळ्यामुळे कॉलेजच्या सगळ्या स्वप्नाळूच्या गळ्यातला ताईत. दोघांचं जोडीनं फिरणं, सिनेमाला जाणं वगैरेमुळे कॉलेजात दोघांच्याही नावाची चर्चा होतीच. वर्षासारख्या हि-याला  अभिजितसारखंच कोंदण हवं यावर सगळ्यांचं एकमत होतं. नकळत एकामागून एक दाटी केलेल्या विचारांनी तो अस्वस्थ झाला. मनाच्या बंद, पारदर्शी खिडकीवर जुन्या आठवणीचे थेंब ओधळून जात होते. तो नुसता फुलून गेला होता.


बस आता चंद्रपुरात शिरली होती.


"ए, मी पाण्याच्या टाकीजवळच्या स्टॉपवर उतरते. हा माझा पत्ता, नागपूरला आलास की नक्की ये. मी उद्याच परत जातेय.


"एक मिनीट, वर्षा, एक प्रश्न गेली पंचवीस वर्ष माझ्या मनात सलत्तोय तेवढा तू मला आज विचारू दे." त्याचा आवाज त्याच्याही नकळत कापरा झाला होता.


"त्या दिवशी तू मला विचारल्यावर मी तुला नकार का दिला? हाच न तो प्रश्न ?"


"हूं."


"अभिजित अरे त्याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मी गेली पंचवीस वर्षे होती. काही क्षण काही आठवणी फार सलतात रे. मी पहिल्यापासून थोडी निष्ठुर आणि दगड मनाची. पण तू भावनेत लगेच वंहावत जायचास पण आज जाणवतंय मी वेदना भोगत असताना हा विचार तरी करू शकले की तू सुद्धा तेच भोगत असशील. तू तो विचारसुद्धा करू शकला नाहीस. हे लौकिक समाधान सगळं वरवरचं आहे रे. आत अंतर्मनातला आवाज माझ्याविरुद्धच कधी बंड करून उठतो. पण तू? तुला तो आवाज कधी जाणवलाच नाही. जीवनात सगळ्याच प्रश्नांची उत्तरे गाईडसारखी तयार मिळत नाहीत, जाऊ दे. तू फार आत्मकेंद्रित होतास आणि आहेसही. एनीवे, मी चलते."


स्टॉप आला होता. ती उतरली. तो बघत असतानाच तिने रिक्षाला हात केला "गांधी चौक चलो"


रिक्षात बसताना तिने डोळ्यांना लावलेला रुमाल आणि मागे वळून न पहता निरोपादाखल हलवलेला हात त्याच्या मनात घर करून होता.


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


ही कथा दै. तरूण भारत नागपूरच्या रविवारी प्रकाशित होणा-या "विविध विषय विभाग" या पुरवणीत दिनांक २७ नोव्हेंबर १९९४ रोजी प्रकाशित झालेली आहे.




No comments:

Post a Comment