Tuesday, October 28, 2025

जुळल्या सगळ्या त्या आठवणी : N 9456

 बालपणी चंद्रपूरला जाण्यासाठी आपल्या महाराष्ट्र एस. टी. च्या तीन प्रकारच्या बसेस होत्या.

सुपर (अती जलद) : या बसेस फ़क्त जांबचा थांबा घ्यायच्यात आणि नागपूर ते चंद्रपूर हे १५३ किलोमीटर अंतर ३ तास ते ३ तास २० मिनीटांत पार करायच्यात. या बसेसचा मार्गफ़लक पांढ-या पार्श्वभूमीवर लाल, केशरी अक्षरे आणि असे तिरप्या स्टाईलमध्ये हिरव्या अक्षरांमध्ये सुपर लिहीलेले असे असायचे. सुपर एक्सप्रेस बसेसबाबत आठवणींचा व्हिडीयो इथे.



1512 टाटा कमिन्स. बी. एस. 3 इमिशन स्टॅण्डर्डस ची बस. २०११.

एक्सप्रेस (जलद) : या बसेस जांब बरोबर वरोरा, भद्रावती (आणि काहीकाही बसेस डिफ़ेन्स, भद्रावती) पण थांबा घ्यायच्यात. नागपूर ते चंद्रपूर या १५३ किलोमीटर प्रवासासाठी या प्रकारच्या बसेस ३ तास ३० मिनीटे ते ४ तास असा वेळ घ्यायच्यात. अर्थात हा वेळ या मार्गात लागणारी खापरी, बुटीबोरी, ब्राह्मणी, (एक्सप्रेस बसेससाठी) वरोरा, ताडाळी आणि (क्वचितच) डिफ़ेन्स, भद्रावती इथली रेल्वे फ़ाटके मोकळी मिळताहेत की बंद मिळताहेत आणि बंद मिळालीत तर किती खोळंबा होतोय या बाबींवर पण अवलंबून होता.

या बसेसचा मार्गफ़लक पांढ-या पार्श्वभूमीवर लाल रंगातली अक्षरे असा असायचा.



नागपूर सुपर राजुरा. राजुरा आगार, चंद्रपूर विभाग. २०१० - ११ या वर्षात मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने बांधलेली २३३ वी नवीन टाटा बस.

साधारण सेवा (ऑर्डिनरी) : या बसेस चंद्रपूरला दोन मार्गे जायच्यात. पहिला मार्ग हा धोपट मार्ग. त्यात त्या बुटीबोरी, जांब, खांबाडा, व्होल्टास फ़ॅक्टरी, आनंदवन, वरोरा, भद्रावती, ताडाळी, पडोली असे अनेक थांबे घेत नागपूर ते चंद्रपूर हे १५३ किलोमीटर अंतर ४ तास ते ४ तास ३० मिनीटांत पार करायच्यात. या गाड्यांमध्ये आगाऊ आरक्षण करून बसण्याची सोय नव्हती.

आणखी एक मार्ग म्हणजे नागपूर ते चंद्रपूर जुना रस्ता. उमरेड, भिवापूर, नागभीड, सिंदेवाही, मूल मार्गे. या मार्गाने नागपूर ते चंद्रपूर हे अंतर २०० किलोमीटर्स पडत असे. त्यासाठी या बसेसना तब्बल ५ तास लागत असत. 

प्रवासासाठी आमची पसंदी कायम सुपर बसेसना असे. अगदीच नाईलाज झाला, कधी आरक्षणे मिळालीच नाहीत तरच मग जलद बस. पण साधारण सेवा बसेसनी आम्ही या मार्गावर कधीही प्रवास केला नाही.

१९९० च्या दशकात खाजगी बसेसची सेवा सुरू झाली आणि एस. टी. बसेसचे एकूणच ग्लॅमर ओसरले. रिझर्वेशन करून जाणे वगैरे प्रकार इतिहासजमा झालेत. स्पर्धेत आपली एस. टी. खूप मागे पडली. मग सुपर, जलद, ऑर्डिनरी हे प्रकार जणू विस्मृतीच्या कप्प्यातच गेलेत.




साधारण १४ वर्षांपूर्वी नागपूरच्या हिंगणा मध्यवर्ती कार्यशाळेत बनलेली ही बस आणि या बसवरचा सुपर हा बोर्ड दिसला आणि गाण्यांच्या ओळीच आठवल्यात.

स्वर आले दुरूनी

जुळल्या सगळ्या त्या (सुपर बसच्या, बालपणाच्या) आठवणी.

- बसप्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


Wednesday, October 22, 2025

अरनॉल्ड तानवडे आणि सिल्व्हेस्टर किन्हीकर

बालपणापासूनच आमची तब्येत म्हणजे सिंगल हड्डी, अगदी काडी पहेलवान अशी. त्यामुळे आम्ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलला प्रवेश घेतला तेव्हा आम्ही वयाची विशी आणि वजनाची तिशी गाठायचीच होती. हॉस्टेलला चार वर्षानंतर पदवी मिळवताना आमचे वजन फ़क्त ४२ किलो होते हे मी आज अत्यंत आनंदाने नमूद करू इच्छितो. तडतडा स्वभाव आणि त्यामुळे काटक शरीर. शिवाय आज जेव्हढा मी फ़ूडी आहे तेव्हढा माझ्या तरूणपणात नव्हतो. माझी आई अगदी अन्नपूर्णा होती. तिला विविध पदार्थ करता येत असत आणि तिच्या हाताइतकी उत्तम चव कुठेच नाही म्हणून बाहेरचे काही खाऊन बघण्याचा फ़ार सोस आम्हाला नव्हता. अगदीच आपदधर्म म्हणून बाहेर खावे लागले तर गोष्ट वेगळी पण मुद्दाम बाहेर जाऊन खाणे हा प्रकार नव्हता. एकतर तो काळ तसा नव्हता आणि तशा सोयीही फ़ारशा उपलब्ध नव्हत्या. तात्पर्य काय ! अनेकविध कारणांमुळे आम्ही सिंगल चे सिंगल हड्डीच राहिलेले होतो.


कराडला गेल्यानंतर पहिल्या वर्षीचे बुजरेपण गेल्यानंतर मग नवनवे मित्र, मैत्रिणी मिळायला लागलेत. मनुष्य नागपूरचा असो, नगरचा असो, सांगलीचा असो किंवा अगदी नाशिकचा असो त्याच्या घरी आपल्या घरच्यासारखेच वातावरण, संस्कार आहेत. एखाद्या गोष्टीबाबत त्याच्या क्रिया प्रतिक्रिया अगदी आपल्यासारख्याच आहेत ही जाणीव पटली की मग भौगोलिक अंतरे मनाच्या अंतरांशी कसलेही संबंध ठेवत नसत. "काय बेटे तुम्ही पुण्या मुंबईची माणसे !" असे वाक्य बोलणा-या माणसाने आयुष्यात एकदाही अकोला जिल्ह्याच्या पश्चिमेला पाऊल ठेवलेले नसते आणि "काय तुमच्या विदर्भात कायम दुष्काळ !" असे म्हणणा-या माणसाने त्याच्या आयुष्यात मुंबई - पुणे - नाशिक हा त्रिकोण ओलांडलेला नसतो. घराबाहेर रहायला लागल्यानंतर वृत्ती विशाल होते, दृष्टीकोन व्यापक होतो. "वसुधैव कुटुंबकम" ही वृत्ती अंगी बाणायला सुरूवात होते.


तसाच एक अत्यंत गुणी मित्र मला लाभला तो म्हणजे सांगलीचा सतीश सुरेश तानवडे. एक अत्यंत उत्तम गायक, अंगात एक उपजतच सांगलीकर फ़टकळपणा, कुठल्याही अवघड प्रसंगात अजिबात दडपण न घेता एखादा अत्यंत मार्मिक विनोद वापरून तो प्रसंग अगदी हलका करून टाकण्याचे त्याचे कसब आणि मित्र म्हणून जिवाला जीव देणारा "सत्या" आम्हा सर्व मित्रमंडळींमध्ये अत्यंत लोकप्रिय होता. त्याउलट मी. एक "न कलाकार", भीडस्त स्वभावाचा, "नाही" म्हणायचे मनात असताना बहुतांशी वेळा "हो" म्हणून नंतर पस्तावणारा, अवघड प्रसंगांचे पटकन दडपण घेणारा. अशावेळी त्याची आणि त्याच्या अत्यंत विरूद्ध स्वभावाच्या माझी मैत्री कशी जुळली ? आणि इतकी वर्षे कशी टिकली ? हे एक कोडेच आहे. 


तसे आमचे मित्रमंडळ मस्तच होते. पण सगळे माझ्यासारखेच, अगदी सिंगल हड्डी. आमच्या मित्रमंडळींमध्ये मात्र आपण असे सिंगल हड्डी आहोत असा एक बोचणारा न्यूनगंड होता. बरे, जिम लावावी का ? या विषयावर प्रचंड मतभेद होते. बहुतांशी जणांचे म्हणणे असे की जिम लावायची, तिथे नियमाने जाऊन घाम गाळायचा आणि एव्हढे करून आपल्या अंगावर सध्या असलेले अडीच किलो मासही जिममध्ये जाऊन अंगावरून उतरून गेले तर ? नको, नकोच ती जिम. त्यामुळे जिमचा प्रश्नच निकालात निघाला होता. 


त्याकाळी बाजारात १० - १० रूपयांमध्ये अशी ए - 3 आकाराची, गुळगुळीत कागदांवर छापलेली नटनट्यांची, प्रसिद्ध क्रिकेटियर्सची पोस्टर्स मिळायचीत. आता हॉस्टेल म्हटले की तिथे ही सगळी पोस्टर्स भिंतींवर चिटकवणे आलेच. आमच्यातली काही अतिउत्साही मंडळी त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या विदेशी नटी "शेवंताबाई कोल्हे" (समझनेवाले समझ गये है.) यांचीही अर्धावृत्त, अनावृत्त पोस्टर्स लावायचीत. (आणि मग हॉस्टेल वार्डन सर किंवा प्राचार्य सरांचा हॉस्टेल राऊंड असल्यावर त्या पोस्टर्सवर तात्पुरते टॉवेल्स टाकून, कपडे लटकवून ती पोस्टर्स झाकायचा अगदी आटोकाट प्रयत्न करायचीत.)


आमच्या मित्रमंडळींनी मात्र आपल्या डोळ्यासमोर बॉडीबिल्डींगचा आदर्श असावा म्हणून त्याकाळच्या तगड्या क्रिकेट प्लेयर्सचे पोस्टर्स आमच्या रूम्सवर लावलेले होते. रोज सकाळी उठल्यानंतर आमच्या तत्कालीन मांडीएव्हढा दंड असलेल्या त्या क्रिकेट्पटूचे दर्शन घायचे आणि कधीतरी ५ - १० वर्षांनी आपलाही दंड त्याच्यासारखा होईल अशी दुर्दम्य आशा बाळगायची म्हणजे आज ना उद्या आपणही तितकेच बलदंड नक्कीच होऊ असा आमचा स्वतःवरच एक अत्यंत पॉझिटिव्ह असा मानसिक प्रयोग होता.


त्यात सतीश ने भर घातली. एकेदिवशी त्याच्या मनात काय आहे कुणास ठाऊक ! तो मला म्हणाला, "राम्या, आजपासून तू मला अरनॉल्ड स्वार्तझनेगर च्या धर्तीवर अरनॉल्ड तानवडे म्हणायचे आणि मी तुला सिल्व्हेस्टर स्टॅलीनच्या धर्तीवर सिल्व्हेस्टर किन्हीकर म्हणणार." झाले. त्याच्या अत्यंत आग्रही स्वभावानुसार आम्ही हा प्रयोग ते सेमीस्टरभर चालवला. कुठेही भेटलोत की "हाय अरनॉल्ड !" किंवा "हाय सिल्व्हेस्टर !" असे एकमेकांना अभिवादन करीत असू. या अभिवादनामुळे आमच्या मनात स्वतःविषयी तशी उच्च भावना जागृत होऊन काहीही विशेष प्रयत्न न करता आम्ही असेच मनाच्या पॉझिटिव्ह विचारसरणीच्या जोरावर तसे हट्टेकट्टे बनू ही आमची अगदी भाबडी समजूत. आज ते आठवलं की हसू येते. 


एव्हढही करून कॉलेजमधून पास होऊन परतताना आमच्या वजनांनी धड पन्नाशी सुद्धा गाठली नव्हती. हा फ़ोटो मी फ़ायनल इयरच्या परिक्षेनंतर कराड सोडून नागपूरला परतताना कराडच्या बसस्टॅंडवर काढलेला आहे. सतीश, मी आणि आमच्या दोघांचीही एक छान मैत्रिण वैशाली. आम्ही सगळेच अगदी काटक होतो. आज या सगळ्या वजनांचा आणि आपण तेव्हा किती काटक आणि फ़िट होतो याचा अक्षरशः हेवा वाटतो. मध्यंतरी सुखावण्याच्या काळात वजनाने ७५ गाठले होते आणि प्रकृतीच्या नवनवीन कुरबुरी सुरू झालेल्या होत्या ते आठवले की अंगावर काटा येतो. किती प्रयत्नांनी वजनाला काबूत आणता आले हे माझे मलाच माहिती.



जिममध्ये जाऊन कृत्रिम फ़ूड सप्लीमेंटस घेऊन, औषधे, इंजक्शने घेऊन बनविलेल्या त्या सिक्स पॅक शरीरांविषयीही आता काही वाटेनासे झाले आहे. वाटलीच तर फ़क्त कीव वाटतेय. या औषधांचे, इंजेक्शनांचे दुष्परिणाम जेव्हा या लोकांना जाणवायला लागतील तेव्हा यांच्यासारखे दुर्दैवी जीव हेच असतील असेही आज वाटून जाते. पण कॉलेजच्या काळात आमच्याकडे नसलेल्या या डबल हड्डी बॉडीचा आदर्श आमच्या डोळ्यांसमोर होता हे मात्र नक्की.


- पुन्हा एकदा कॉलेज जीवन अनुभवू इच्छिणारा, सिंगल हड्डी - डबल हड्डी आणि पुन्हा सिंगल हड्डी असा प्रवास करून आलेला एक विद्यार्थी सिल्व्हेस्टर किन्हीकर.





Tuesday, October 21, 2025

सध्या इंटरनेटवर अत्यंत व्हायरल झालेला मी काढलेला एक फ़ोटो.

१९९९ मध्ये मी काढलेला हा फ़ोटो सध्या इंटरनेटवर फ़ार व्हायरल झालेला आहे. खूपशा ग्रूप्समधून हा फ़ोटो महाराष्ट्र एस. टी. च्या जुन्या बांधणीच्या बसचा फ़ोटो म्हणून फ़िरतो आहे. गोष्ट खरी आहे. महाराष्ट्र एस. टी. च्या साध्या बसचे हे डिझाईन जवळपास चार दशके तरी तसेच होते.



हा फ़ोटो मी कोडॅक के. बी 10 या कॅमे-याने काढलेला आहे आणि नंतर त्याला स्कॅन करून डिजीटल रूपात बदललेला आहे. या फ़ोटोची प्रिंट आणि त्याचे निगेटिव्हज माझ्याकडे आहे. जुन्या काळी (साधारण २००८ - २०११ पर्यंत) फ़ोटोवर कॉपीराईट कसा टाकायचा ? याबद्दल मी अनभिज्ञ होतो आणि म्हणूनच १५ वर्षांपूर्वी हा फ़ोटो माझ्या फ़्लिकर अकाऊंटवर मी टाकला. तिथेही त्या फ़ोटोला जवळपास २४०० व्ह्यूज आलेले आहेत आणि एस. टी. मधल्या जाणका-यांच्या कॉमेंटसही.


मुंबईला दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापन करताना दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांच्या SURVEYING या विषयाचा कॅम्प म्हणून आम्ही सेंट झेव्हियर्स व्हिला, खंडाळा इथे आठवडाभर मुक्कामी असायचोत. या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाजवळच पुणे - मुंबई (जुन्या, NH 4) या महामार्गाचा बसथांबा होता. ज्यांनी जुन्या NH 4 ने मुंबई - पुणे - मुंबई प्रवास केलाय त्यांना ठाऊक असेल की खंडाळा गावातून मुंबई - पुणे व पुणे मुंबई हे दोन मार्ग वेगळे व्हायचेत. 


त्याच पुणे - मुंबई महामार्गावर जुन्या NH 4  वरील खंडाळा बोगद्याच्या अगदी वर हा राजमाची पॉइंट होता. इथे एक छोटेसे उद्यान सुद्धा होते. त्या उद्यानालगतच आपल्या महाराष्ट्र एस. टी. चा हा एक ब्रेक टेस्टिंग पॉइंट होता. आपल्या महाराष्ट्र एस. टी. ची एक शेड होती. त्यात काही अधिकारी, बदली चालक, काही तंत्रज्ञ वगैरे मंडळी बसलेली असायचीत. या ठिकाणी थांबणे हे सर्वच्या सर्व बसेसना अनिवार्य होते.


या ठिकाणी थांबून सर्व चालक मंडळी त्या शेडमध्ये जायचीत. तिथे त्यांनी अंमली पदार्थ सेवन केले आहेत की नाही याची ब्रेथ ॲनालायझरद्वारे चाचणी व्हायची. गाडी संपूर्णपणे थांबल्यामुळे गाडीचीही चाचणी व्हायची. कारण या राजमाची पॉइंटनंतर अमृतांजन पुलापर्यंत जुन्या पुणे - मुंबई घाटाला एक तीव्र उतारांची आणि शार्प वळणांची अशी साखळीच होती. त्यामुळे या ठिकाणी चालकाची आणि वाहनाची तपासणी अत्यावश्यकच होती.


ही तळेगाव डेपोची बस लोणावळा - राजमाची - लोणावळा अशी सर्वसामान्य (ऑर्डिनरी) सेवा घेऊन लोणावळ्यातील पर्यटकांना राजमाची उद्यानापर्यंत आणून थोडावेळ थांबून परत जायची. अशाच एका संध्याकाळी काढलेला त्या बसचा हा फ़ोटो. त्या काळी प्रत्येक विभाग हा आपापल्या बसचे दर्शनी भागातील ग्रील्स आणि काहीवेळा खिडक्यासुद्धा वेगवेगळ्या रंगांनी रंगवीत असत. पुणे विभाग आपल्या बसेसना तेव्हा असा गुलाबी रंग ग्रील्सना आणि खिडक्यांना देत असे. ग्रील्सभोवती पांढरी बॉर्डर ही पण पुणे विभागाचीच खासियत होती.


मध्यवर्ती कार्यशाळा दापोडीने बांधलेली ही टाटा बस आज महाराष्ट्र एस. टी. च्या बसबांधणीतले एक मानचिन्ह झालेले पाहून माझ्यातला बसफ़ॅन खरोखर आनंदित होतो.


आपल्याला आठवतात का आपापल्या विभागातल्या जुन्या बसेसच्या ग्रील्सचे आणि खिडक्यांचे रंग ?


उदाहरणार्थ


1. चंद्रपूर विभाग समोरच्या बफ़रला काळ्या बॉर्डरमध्ये छोटासा पिवळा पट्टा मारयचेत. ग्रिल व खिडक्या हिरव्या रंगाच्या असायच्यात.

2. यवतमाळ विभागातल्या बसेसचे ग्रिल्स आणि खिड्क्या आकाशी निळ्या रंगाच्या असायचेत.

3. अकोला विभागातल्या बसेसच्या काळ्या ग्रिल्सभोवती अशीच एक पांढरी बॉर्डर असायची.

4. अहिल्यानगर व जळगाव विभागातल्या बसेसची ग्रिल्स निळ्या रंगांची असायचीत.

5. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा काही काळ अशी गुलाबी रंगाची ग्रिल्स असायचीत नंतर मग काळपट चंदेरी (Steel Grey) रंगांच्या ग्रिल्स असायच्यात.

6. नांदेड विभागाच्या बसेस तर पिवळ्या धमक ग्रिल्ससाठी प्रसिद्ध होत्या.


कळवा आणखी काही रंग जे कदाचित आज माझ्या आणि काही बसफ़ॅन्सच्या विस्मृतीत गेलेले असतील. तुमच्या उत्तरांमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.


- एक अत्यंत जुना बसफ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Thursday, October 2, 2025

कालौघात हरवलेले बालपण : चंद्रपूर बस स्थानक

३१ आॅक्टोबर २००८ म्हणजे जवळपास १७ वर्षांपूर्वी एका हिवाळ्यातल्या दुपारी काढलेला चंद्रपूर बसस्थानकाचा हा फोटो.



त्यावेळी या बसस्थानकाला फक्त ५ फलाट होते. फोटोत एक बस उभी दिसतेय तो सगळ्यात डावीकडला म्हणजे फलाट क्र. १.

या फलाटावरून शेगाव, शिर्डी, निर्मल, मंचेरीयल, गोंदिया, तुमसर , आर्वी, अमरावती, अकोला येथे जाणार्या बसेस सुटायच्यात.

त्याबाजूला दुसरी बस उभा असलेला फलाट म्हणजे फलाट क्र. २. या फलाटावरून नागपूर, जबलपूर या बसेस सुटायच्यात.

छायाचित्रात रिकामा दिसतोय तो फलाट क्र. ३. या फलाटावरून बल्लारपूर, राजुरा, अहेरी आणि त्या मार्गावर जाणार्या साधारण फेर्या सुटायच्यात.

त्यानंतरचा रिकामा फलाट म्हणजे फलाट क्र. ४. या फलाटावरून मूल, ब्रह्मपुरी, वडसा आणि त्यामार्गावर जाणार्या साधारण फेर्या सुटायच्यात.

एक निमआराम बस उभी आहे तो फलाट क्र. ५. तो फलाट घोट, चामोर्शी आणि गडचिरोली व त्यामार्गावर जाणार्या इतर सामान्य फेर्यांसाठी होता.

हे छायाचित्र आमच्या अत्यंत आवडत्या जागेवरून, म्हणजे चंद्रपूर डेपोच्या प्रवेशद्वारावरून काढलेले आहे. चंद्रपूर बसस्थानकावर गेलो आणि आपण जर नागपूरला प्रवास करणार असू तर डेपोच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन आजच्या आपल्या प्रवासाची चं. चंद्रपूर डेपोची सुंदरी कोण असणार ? याविषयी अंदाज घेणे हा आमचा आवडता कार्यक्रम असे.

नुसत्या बसफॅनिंगसाठी चंद्रपूर बसस्थानकावर गेल्यानंतरही एक चक्कर डेपोच्या प्रवेशद्वारावर टाकून चं. चंद्रपूर आगारात कुणा नवीन सुंदर्यांचे आगमन झालेय का ? याची नोंद घेणे हे आमचे आवडते काम असायचे.

या छायाचित्रात फलाट क्र. १ वर उभी असलेली बस MH 40 / 87XX सिरीजमधली चंद्रपूर आगाराची नागपूर सुपर फेरी आहे. त्याबाजूला उभी असलेली MH 40 / 85XX सिरिजमधली भंडारा विभागाची बस. बहुतेक चंद्रपूर जलद तुमसर मार्गे मूल, नागभीड, पवनी, भंडारा जाणारी. थोडासा काळपट रंगाकडे झुकणारा आणि थोडासा मोठ्ठा पिवळा पट्टा हे त्याकाळच्या भंडारा विभागाच्या गाड्यांचे वैशिष्ट्य होते.

छायाचित्रात उभी असलेली निम आराम बस म्हणजे MH 31 / AP 9XXX सिरीजमधली चंद्रपूर निमआराम गडचिरोली बस आहे. या सिरीजमधे खूप कमी निमआराम गाड्या मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरने बांधलेल्या होत्या.

आता मात्र महाराष्ट्रातल्या इतर बसस्थानकांप्रमाणे चंद्रपूर बसस्थानकाचा विस्तार आणि नूतनीकरण झालेले आहे. स्वारगेट, बारामती वगैरे बसस्थानकांप्रमाणे curvilinear terminal (वर्तुळाकार स्थानक) ही कल्पना नवीन बसस्थानकाच्या डिझाईनमध्ये अवलंबिली आहे. उलट नागपूर, यवतमाळ या बसस्थानकांच्या नूतनीकरणात linear terminal (एकरेषीय सरळ बसस्थानक) ही कल्पना अवलंबिली आहे.

वर्तुळाकृती रचनेत प्रवाशांची जास्त सोय होते हे माझ्या लक्षात आलेले आहे. वर्तुळाकृती रचनेत प्रवाशांना या फलाटावरून त्या फलाटावर जाण्यासाठी कमी अंतर चालावे लागते तर एकरेषीय सरळ रचनेत प्रवाशांच्या धावपळीचा परीघ वाढतो. वर्तुळाकृती रचनेत बसेसना थोडे जास्त अंतर धावावे लागेल पण प्रवाशांच्या धावपळीपेक्षा हे बरे.

दक्षिण भारतातील तिरूपती सारख्या विशालकाय बसस्थानकात ही अशी वर्तुळाकृती रचना आढळते ती यामुळेच.

चंद्रपूर बस स्थानक म्हणजे बालपणापासून जुळलेला ऋणानुबंध, अनंत आठवणींचे गाठोडे आणि माझ्या मनाला पुन्हाला बालपणात नेणारी जादू.

- पक्का चंद्रपुरी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.