५ जुलै १९९६. स्कॉटलंडमध्ये क्लोनिंग तंत्रज्ञानाने पहिल्या सजीवाचा जन्म झाला. डॉली नावाच्या मेंढीचा. एखाद्या सजीवाची तंतोतंत नक्कल करून त्याच्यासारखाच नवीन सजीव तयार करण्याचे तंत्रज्ञान जगाने पहिल्यांदाच अनुभवले.
पण आमच्या भारतीय रेल्वेने मात्र वेगळ्या प्रकाराने का होईना हे तंत्रज्ञान त्यापूर्वीच जवळपास साडेचार वर्षे आधी आपल्या आचरणात आणलेले होते. त्यांनी पुणे - मुंबई मार्गावर १ जून १९३० पासून धावणा-या, अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि म्हणूनच प्रवाशांची कायम खूप मागणी असणा-या डेक्कन क्वीन एक्सप्रेसची क्लोन एक्सप्रेस म्हणून २७ डिसेंबर १९९१ रोजी प्रगती एक्सप्रेस ही रेल्वेगाडी पुणे आणि मुंबई या शहरांदरम्यान आणली होती. त्यानंतर भारतीय रेल्वेत अशा क्लोन एक्सप्रेस गाड्यांचे युग सुरू झाले.
पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस पुण्यावरून सकाळी ७ वाजून १५ मिनीटांनी सुटून मुंबईला सकाळी १० वाजून २५ मिनीटांनी पोचते. पुण्यात राहून मुंबईत नोकरी करणा-या चाकरमान्यांना ही अतिशय सोयीची गाडी होती आणि अजूनही आहे. त्यामुळे अगदी सुरूवातीपासूनच या गाडीची लोकप्रियता फ़ार होती. जुन्या काळीही या गाडीत आरक्षण मिळणे अवघड असे. बरे या गाडीआधी पुण्याहून मुंबईला जाणारी सिंहगड एक्सप्रेस असायची पण ती सकाळी ६ वाजून ५ मिनीटांनी पुण्याहून सुटायची. म्हणजे पुण्याच्या उपनगरांमध्ये राहणा-या प्रवाशांसाठी थोडी गैरसोयीची होती.
म्हणून अगदी डेक्कन क्वीनसारखीच. तिच्याच सारखे कोचेस असलेली, तिच्याच सारखे थांबे असलेली, पण तिच्याच मागे १५ मिनीटांनी सुटून मुंबई गाठणारी क्लोन एक्सप्रेस म्हणून प्रगती एक्सप्रेस १९९१ मध्ये रेल्वेने आणली. जरी पुणे ते मुंबई तिचा प्रवासवेळ डेक्कन क्वीनपेक्षा १० मिनीटे जास्त असला तरी ही गाडी प्रवाशांच्या पसंतीला उतरली होती. डेक्कन क्वीनचे आरक्षण मिळाले नाही तर ही गाडी प्रवाशांची पुढली पसंती असायची.
त्यानंतर चारच दिवसांनी, १ जानेवारी १९९२ ला मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणा-या राजधानी एक्सप्रेसची क्लोन म्हणून ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस धावली. मुंबईत ब्रिटीश सरकारविरूद्ध १९४२ साली झालेल्या ऑगस्ट क्रांती आंदोलनाचे सुवर्ण वर्ष म्हणून ही गाडी रेल्वेने सुरू केली खरी पण हिचा मुख्य उद्देश मुंबई ते दिल्ली धावणा-या राजधानी एक्सप्रेसवरचा प्रवाशांचा ताण कमी करणे हाच होता. १७ मे १९७२ मध्ये सुरू झालेली मुंबई - दिल्ली राजधानी ही प्रवाशांमध्ये अतिशय सोयीची आणि म्हणूनच अतिशय लोकप्रिय गाडी होती. तिची क्लोन म्हणून तिच्याच सारखे डबे असलेली, जवळपास तिच्याच सारखे थांबे घेणारी आणि तिच्याच सारखी धाववेळ असणारी ही ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस मूळ राजधानीसारखीच लोकप्रिय झाली.
क्लोनिंग केल्या गेलेल्या गाड्यांचे गेल्या १५ वर्षातले उदाहरण म्हणजे १२८५९ / १२८६० गीतांजली एक्सप्रेसची क्लोन म्हणून आणलेली १२८६९ / १२८७० एक्सप्रेस. ४ नोव्हेंबर १९७८ ला मुंबई ते हावडा दरम्यान सुरू झालेली गीतांजली एक्सप्रेस तिच्या कमीतकमी थांब्यांमुळे आणि वेगवान प्रवासामुळे अनेक दशके लोकप्रिय होती. त्या गाडीवरच्या वेटलिस्टचा ताण कमी करण्यासाठी १२८६९ / १२८७० एक्सप्रेस सुरू केल्या गेली. फ़क्त यापूर्वीच्या क्लोन गाड्यांमध्ये आणि ह्या गाडीमध्ये फ़रक इतकाच होता की ही क्लोन गाडी गीतांजलीसारखी रोज धावणारी नव्हती. ही साप्ताहिक गाडी होती. हावड्यावरून दर शनिवारी आणि मुंबईवरून दर सोमवारी.
क्लोनिंग भलेही १९९६ मध्ये जगासमोर आले असेल पण आमच्या भारतीय रेल्वेने त्यापूर्वीच प्रवाशांच्या सेवेसाठी हे प्रयोग केलेत. आजही एखाद्या सणावाराच्या प्रसंगी एखाद्या लोकप्रिय गाडीची वेटिंग लिस्ट फ़ार जास्त झालेली असेल आणि भारतीय रेल्वेकडे एखादा रेक उपलब्ध असेल तर भारतीय रेल्वे त्या गाडीची क्लोन गाडी म्हणून तिच्याच पुढेमागे, तिच्याच सारखे थांबे आणि डबे असलेली क्लोन गाडी सोडत असते.
तुम्हाला अशाच एखाद्या क्लोन गाडीबद्दल माहिती असेल तर नक्की कॉमेंटमध्ये लिहा.
- रेल्वेफ़ॅन प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.



No comments:
Post a Comment