Showing posts with label Toofan Express. Show all posts
Showing posts with label Toofan Express. Show all posts

Wednesday, June 4, 2025

नावांचा संदर्भ हरविलेल्या रेल्वेगाड्या.

पुलंच्या "१०० पर्सेन्ट पेस्तनकाका" या कथेत त्या म्हाता-या पेस्तनजींना प्रश्न पडला होता की "ए भाऊसाहेब, आता ते महालक्ष्मी एक्सप्रेस म्हन्जे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घ्यायला चाललेली महालक्ष्मी एक्सप्रेस ? का मुंबईला महालक्ष्मी रेसकोर्सवर रेस खेळायला जाना-यांसाटी असलेली महालक्ष्मी एक्सप्रेस ? सांग नी." पु.ल. हे स्वतः खूप मोठ्ठे रेलफ़ॅन होते. त्यांनी एका रेल्वे एंजिन चालकाला विनंती करून मिरज ते बेळगाव हा प्रवास रेल्वे एंजिनमधून केल्याची नोंद त्यांच्या लिखाणात आढळते.


त्याच पेस्तनकाकांना पुलंनी मग प्रतिसवाल केला होता की "काका, मग तुमच्यावेळी असलेल्या तुफ़ान एक्सप्रेसचे काय ?" त्याचे उत्तर तर पेस्तनजींनी टाळले पण आमच्यासारख्या रेल्वे फ़ॅन्सची याबाबत उत्सुकता चाळवली गेली. "ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये" अशी म्हण जरी असली तरी रेल्वेच्या नावांच्या मुळाचा शोध घेऊ नये असे आमच्या वाचनात कुठे आले नाही म्हणून आम्ही हा शोध सुरू केला आणि त्यात काही काही आपल्या नावांचे संदर्भ हरविलेल्या रेल्वेगाड्या मिळाल्यात.


पेस्तनजींच्या काळात, ब्रिटीश भारतात, दिल्ली ते हावडा धावणारी तुफ़ान एक्सप्रेस ही एक लोकप्रिय गाडी असली पाहिजे. ब्रिटीश भारताची पहिली राजधानी व त्याकाळचे महत्वाचे जलवाहतूक केंद्र, हावडा आणि ब्रिटीशांची नवनिर्मित राजधानी दिल्ली जोडणारी आणि वाटेत बंगाल, बिहार आणि उत्त्तर प्रदेशातली महत्वाची शहरे जोडणारी ही तुफ़ान एक्सप्रेस तत्कालीन नागरिकांसाठी कौतुकाचा विषय असली पाहिजे. पण स्वातंत्र्योत्त्तर भारतात आणि विशेषतः १९८० नंतरच्या रेल्वे कारभारात ह्या गाडीला दिल्ली स्टेशनवरून राजस्थानातल्या श्रीगंगानगर पर्यंत वाढविण्यात आले. आणि नावात फ़रक करून "उद्यान आभा तुफ़ान एक्सप्रेस" असे करण्यात आले. नावातले "उद्यान आभा" हे कलकत्त्त्यातल्या विविध उद्यानांवरून ठेवण्यात आलेले असले तरी नव्या अवतारात ही गाडी १९८१ किलोमीटरचे अंतर तब्बल १०५ थांबे घेत घेत ४६ तास ३० मिनीटांत आरामात कापत असे. साधारणतः एव्हढेच अंतर कापायला आपल्या मुंबई - हावडा गीतांजली एक्सप्रेसला फ़क्त ३१ तास ५० मिनीटे लागतात यावरून या "तुफ़ान" एक्सप्रेसची कूर्मगती लक्षात यावी. भारतातल्या सगळ्यात हळू धावणा-या १० एक्सप्रेस गाड्यांमध्ये या "तुफ़ान" एक्सप्रेसची गणना व्हावी ही केवढी मोठी विसंगती ! आपल्या नावाशी किती विसंगत वर्तन !


तशीच आपली "गंगा कावेरी एक्सप्रेस" ही गाडी १९७७ मध्ये जेव्हा सुरू झाली तेव्हा ती वाराणसीच्या गंगेला तिरूचिरापल्लीच्या कावेरीशी जोडणारी गाडी म्हणून अस्तित्वात आली. ही गाडी आपल्या जांभळ्या + नारिंगी अशा वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीसह वाराणसीवरून निघायची आणि चेन्नईच्या मद्रास बीच स्टेशनवर जायची. तिथे या ब्रॉडगेज रेल्वेच्या प्लॅटफ़ॉर्मशेजारी असलेल्या मीटर गेजच्या प्लॅटफ़ॉर्मवरून मीटर गेजची गंगा कावेरी निघायची ती थेट तिरूचिरापल्लीतल्या कावेरी नदीला ओलांडून थेट रामेश्वरम पर्यंत जायची. मद्रास पर्यंतच तेव्हा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग होता. त्यापुढे मीटर गेज असलेला हा रेल्वेमार्ग साधारण १९९५ नंतर हळूहळू ब्रॉडगेजमध्ये बदलला गेला. तोवर गंगा कावेरी एक्सप्रेसचा प्रवास हा असाच व्हायचा.



नंतर ही गाडी फ़क्त चेन्नई ते वाराणसी अशी धावायला लागली आणि "गंगा कावेरी" नावाचा संदर्भ हरवला. चेन्नई अड्यार नदीच्या काठी वसलेले शहर. इथून कावेरी नदी ३२५ किलोमीटर दूर आहे. तरीही या गाडीला हे संदर्भ हरविलेले नाम चिकटले ते चिकटलेच. आता ही गाडी वाराणसीवरून छापरा पर्यंत वाढवली गेली आहे. छापराला गंगा नदी आहे पण इकडे आता चेन्नई ते रामेश्वरम हा मार्ग संपूर्ण ब्रॉड गेज होऊनही ही गाडी कावेरी पर्यंत जात नाही ती नाहीच.


१९७६ मध्ये सुरू झालेल्या केरळ - कर्नाटक एक्सप्रेसची कथा ही अशीच वैशिष्ट्यपूर्ण. नवी दिल्लीवरून निघालेल्या या गाडीचा प्रवास भोपाळ - इटारसी - नागपूर - बल्लारशा - वारंगल - विजयवाडा - रेणीगुंटा - जोलारपेट्टी मार्गे होऊन जोलारपेट्टी ला  एक भाग बंगलोरला कर्नाटक एक्सप्रेस म्हणून जात असे आणि दुसरा भाग केरळ एक्सप्रेस म्हणून कोईंबतूर - शोरनूर - एर्नाकुलम मार्गे थिरूवनंतपुरमला जात असे. १९८० ला हे कनेक्शन तुटले आणि केरळ - कर्नाटक एक्सप्रेसचे आता नवी दिल्ली - बंगलोर कर्नाटक एक्सप्रेस आणि नवी दिल्ली - थिरूवनंतपुरम केरळ एक्सप्रेस असे दोन वेगवेगळे भाग झालेत. 


आताची कर्नाटक एक्सप्रेस भोपाळ - इटारसी - भुसावळ - मनमाड - दौंड - सोलापूर - गुंटकल मार्गे जायला लागली. केरळ एक्सप्रेस मात्र अजूनही जुन्या मार्गाने नागपूर वरूनच जाते.


केरळ - कर्नाटक एक्सप्रेसच्या (के. के. एक्सप्रेस) आता दोन वेगवेगळ्या गाड्या झाल्यात. पण अजूनही पुणे - सोलापूर - अहिल्यानगर भागात कर्नाटक एक्सप्रेस के. के. एक्सप्रेस म्हणूनच ओळखल्या जाते. केरळ कर्नाटक या नावाचा संदर्भ या भागात हरविलेला अजूनही दिसतो.


याउलट काहीकाही गाड्यांच्या नावांचा संदर्भ सुरूवातीपासून अजूनही तसाच आहे. याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे तिरूपती - कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेस. तिरूपती बालाजीवर रुसून त्यांची पत्नी जगन्माता श्रीमहालक्ष्मी कोल्हापूरला येऊन स्थायिक झाली आहे अशी सर्व भक्तमंडळींची समजूत आहे. दरवर्षी नवरात्रात आपल्या या रूसलेल्या प्रियेची समजूत घालण्यासाठी बालाजी संस्थानाकडून श्रीमहालक्ष्मीला मानाचा शालू येतो. ही हरिप्रिया महालक्ष्मी. या गाडीचे नाव अजूनही आपला संदर्भ टिकवून आहे. आणि गंमतीची गोष्ट म्हणजे दररोज दुपारी कोल्हापूरला आलेला तिरूपती - कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेसचा रेक रात्री कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस म्हणून जातो तर दररोज सकाळी सकाळी मुंबईवरून आलेला महालक्ष्मी एक्सप्रेसचा रेक त्याच दिवशी दुपारी तिरूपतीला हरिप्रिया एक्सप्रेस म्हणून जातो. म्हणजे "महालक्ष्मी" हीच "हरिप्रिया" आहे हा अध्यात्मिक सिद्धांत रेल्वेलाही पटलाय तर ! 


- रेल्वेच्या नावांचा अभ्यासक रेल्वेफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


बुधवार, ४ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५