आम्ही आहोत भूगोल प्रेमी. शाळेत आम्हाला भूगोल शिकवायला आमचे पितृतुल्य असे वेरूळकर सरांसारखे अतिशय उत्तम शिक्षक होते. त्यामुळे अगदी शालेय जीवनापासून भुगोलाची खूप गोडी लागली. शालेय जीवनानंतर महाविद्यालयीन जीवनासाठी, नोकरीसाठी म्हणून घराबाहेर पडल्यानंतर भुगोलात शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्ष दृष्टीपथास पडल्या आणि जिज्ञासा अधिकच वाढली. प्रत्येक प्रवासात त्या त्या जागेच्या भुगोलाचा वेध घेत प्रवास करण्याची सवय लागली.
बालपणापासून श्रीसमर्थांच्या "बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा" उपदेशाप्रमाणे रोज संध्या, पूजा घडत गेल्या. त्यात सुद्धा रोजच्या संध्येत, पूजेत "गोदावर्याः उत्तरे तीरे, रेवायाः दक्षिणे तीरे" या संकल्पातील देवाला आपले लोकेशन सांगण्यामुळे भुगोलाशी असलेला संबंध रोज थोडा थोडा दृढ होतच गेला. बाय द वे, पुलंनी म्हटल्याप्रमाणे पूजा करीत असताना आपण देवाशी फ़ार बोलतो हे मला पटते. पण हा आपल्या आत्मनिवेदन भक्तीचा एक प्रकार आहे हे समजून आम्ही त्या बोलांचा आनंद घेतो.
एका मानववंशशास्त्रज्ञाच्या मते आपण सगळेच महाराष्ट्रीय देशस्थ गोदावरीच्या उत्तर किंवा दक्षिण तीरावर वाढलेल्या संस्कृतीतले आहोत. एव्हढेच नव्हे तर त्यांच्या मते आपण मराठी मंडळी ना आर्य वंशाचे आहोत ना द्रविड वंशाचे. आपण सगळेच इथले मूलनिवासी आहोत. गोदावरीच्या दोन्हीही तीरांवर आपली देशस्थ संस्कृती वाढली. प्रशस्त आणि ऐसपैस. आजही महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकाचा उत्तर भाग इथल्या संस्कृतीत अनेक साम्यस्थळे आहेत. इथे अनेक शतकांपासून रोटी बेटी व्यवहार होत आहेत. इथल्या खाद्यसंकृतीही एकच आहेत. आता आधुनिक जगात राज्या राज्यांच्या सीमारेषांनी, भाषेनी जरी ही माणसे वेगळी वाटत असलीत तरी त्यांच्या घरच्या चालीरिती, त्यांची एखाद्या घटनेबद्दल प्रतिक्रिया देण्याची पद्धत, घरातले संस्कार हे सगळे अगदी एकसारखे आहेत. एव्हढच काय आपण आपल्या भारतवर्षात जर आसेतू हिमालय फ़िरलोत आणि तिथे नुसते न फ़िरता प्रत्येक प्रांतातल्या टिपीकल घरांचा आढावा घेतला, त्यांना त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की चालीरिती वरवर जरी वेगळ्या भासल्यात तरीही आतल्या संस्कारांचा धागा एक आहे. आणि हे पहाणे मोठे विलोभनीय असते.
पहिल्यांदा मी नागपूरच्या उत्तरेला प्रवास केला तो म्हणजे नागपूर ते इंदूर असा. या प्रवासात आपल्याला कर्कवृत्त नावाचा पृथ्वीच्या पोटावरचा एक अदृश्य पट्टा लागणार हे मला माहिती होते. रात्री आमची रेल्वे नागपूरवरून निघाली. मी आपला भुगोल आठवत प्रवास करीत जागा होतो. गाडीतले सहप्रवासी एव्हढेच काय माझे कुटुंबिय सुद्धा गाढ झोपी गेले होते. उत्सुकतेमुळे मला मात्र द्विस्तरीय वातानुकूल शयनयानासारख्या (मराठीतला "सेकंड एसी") आरामदायक कोचमध्ये सुद्धा झोपच नव्हती. रात्री साधारण कर्क वृत्त ओलांडल्यानंतरच मी झोपी गेलो. तेव्हा स्मार्टफ़ोन्स, गुगल वगैरे नव्हते. नाहीतर या प्रवासात मी नक्की कुठे कर्क वृत्त ओलांडले ते मला अचूक कळले असते. असो, पण ही मजासुद्धा काही कमी नव्हती. आजही उत्तरेकडल्या प्रवासात जेव्हा जेव्हा मी कर्क वृत्त ओलांडतो तेव्हा तेव्हा आजूबाजूच्या वातावरणात, आसपासच्या प्रांतांमध्ये मातीत, नद्यांमध्ये काही बदल होतोय का याचासुद्धा वेध मी घेत असतो.
पुणे ते सातारा हा प्रवास मी रेल्वेमार्गे, रस्तामार्गे अक्षरशः शेकडो वेळा केलाय. महाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा नदी पुणे ते सातारा रस्ता प्रवासात नक्की कुठे आपल्याला ओलांडते हे मला कुतूहल असायचे. कारण पुण्याहून निघताना महाबळेश्वर उजवीकडे पण कराडला कृष्णामाय रस्त्याच्या डावीकडे असायची. मग ही नेमकी आपल्या उजवीकडून डावीकडे कुठल्या ठिकाणापाशी जाते ? हा प्रश्न मला बरेच दिवस छळत होता. कारण कराडला, सांगलीला, नरसोबाच्या वाडीला कृष्णेचा विस्तार बघितला असल्याने त्याच विस्ताराच्या कृष्णेचा मी पुणे ते सातारा प्रवासात मागोवा घ्यायचो. पण ब-याच उशीरा कळले की पुणे ते सातारा रस्त्यावर वाई फ़ाटा ते सातारा या दरम्यान अगदी छोट्या स्वरूपाची कृष्णा नदी आपल्या रस्त्याला ओलांडून उजवीकडून डावीकडे जाते. महाबळेश्वर वरूनच उगम पावणा-या आणि महाबळेश्वर ते कराड ही कृष्णेपेक्षा अगदी वेगळी वाट चोखाळणा-या कोयना नदीला तर आम्ही अगदी कराड शहराच्या हद्दीत रस्त्याच्या उजवीकडून डावीकडे जाताना बघायचो. आणि या दोन बहिणींचा प्रितीसंगम तर कराडला शिकत असताना आमची रोजची संध्याकाळ रमण्याचे ठिकाण होते.
पुणे ते सातारा ते कराड ते सांगली हा रेल्वेमार्ग रस्ता मार्गापासून इतका फ़टकून का चाललाय ? हे सुद्धा आमचे एक कुतूहलच होते. पुणे ते कराड हे रस्ता मार्गाने फ़क्त १६५ किलोमीटर्सचे अंतर रेल्वेमार्गाने २०२ किलोमीटर्सचे का असावे ? हा आम्हा सर्व वैदर्भिय विद्यार्थ्यांना भेडसावणारा प्रश्न. पण मग तत्कालीन सरकारपुढली अभियांत्रिकी आव्हाने लक्षात आलीत. मोठ्या नद्या कमीत कमी वेळा ओलांडावा लागावा असा रेल्वेमार्ग असणे त्या काळच्या तंत्रज्ञानाला उपयुक्त होता. म्हणून पुणे ते सांगली कुठेही कृष्णा नदी न ओलांडता या रेल्वेमार्गाचे नियोजन झालेले आहे हे लक्षात आले. त्याकाळचे पुल बांधण्याचे तंत्रज्ञान इतके प्रगत नसावेत किंवा कमीत कमी पुल ओलांडावे लागावे हा आर्थिक नियोजनाचा त्यावेळेसचा भाग होता. म्हणून सातारा रोड रेल्वेस्थानक हे क्षेत्र माहुलीच्या सुद्धा ५ किलोमीटर पलिकडे आहे. सातारा शहरातून जर रेल्वेमार्ग नेण्य़ाची वेळ आली असती तर कृष्णा नदी ओलांडावी लागली असती. तो पर्याय जुन्या काळी टाळल्या गेलाय.
मग इतरही ठिकाणच्या रेल्वे मार्गांच्या नियोजनाचे रहस्य उलगडू लागले. मुंबई ते दिल्ली हा मध्य रेल्वेचा रेल्वेमार्ग बरोबर भुसावळ नंतर रावेर - ब-हाणपूर च्या खिंडीतून सातपुडा ओलांडतो आणि इटारसी गाठतो. त्याकाळात पर्वतांना ओलांडण्याचे, त्यातून काढणा-या बोगद्यांचे तंत्रज्ञान आजच्याइतके विकसित आणि सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झालेले नव्हते. म्हणून मग नैसर्गिक रित्या असलेल्या खिंडींचा शोध ब्रिटीशांनी घेतला असला पाहिजे. उत्तर प्रदेश, बिहारच्या गंगेच्या मैदानी प्रदेशात रेल्वेमार्गाचे जाळे खूप प्रमाणात असण्याचे कारण तिथल्या अफ़ाट लोकसंख्येइतकेच तिथे रेल्वेमार्ग टाकण्यासाठी येणारी कमी आव्हाने हे सुद्ध एक आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीतून मुंबई - पुणे, मुंबई - नाशिक हे रेल्वेमार्ग टाकायला ब्रिटीशांना अपार श्रम झालेले होते. मुंबईसारखे जगातले सर्वोत्तम बंदर आणि त्यातून समुद्रमार्गाने होणारा व्यापार ब्रिटीशांना खुणावत होते म्हणून मुंबईला त्यांनी इतर भारताशी जोडणारे रेल्वेमार्ग खूप आणि अथक परिश्रमांनी तयार केलेत.
नाशिक ते हैद्राबाद या रेल्वेमार्गाबाबत सुद्धा माझे हेच निरीक्षण आहे. एकतर मनमाड ते हैद्राबाद हा रेल्वेमार्ग बराच काळ मीटर गेज होता. या मार्गाचा रोख आपण लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की नाशिक शहराच्या हद्दीत गोदावरी नदीचा छोटासा प्रवाह रेल्वेने ओलांडला आणि गोदावरीला आपल्या उजव्या बाजूला घेतले की थेट नांदेडपर्यंत हा रेल्वेमार्ग गोदावरीला न ओलांडता गोदावरीच्या उत्तर तीरावरून जातो.गोदावर्यां उत्तरे तीरे ते दक्षिणे तीरे हा प्रवास थेट तेलंगणातल्या बासर ब्रह्मेश्वर येथे होतो.
आपली समजूत असते की आपले दख्खनचे पठार हे दक्षिणेकडे उताराचे होत होत गेलेले आहे. पण सहज गूगल मॅपवर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातला तुंगभद्रा आणि कृष्णेचा प्रवास बघितला आणि चकित झालो. या दोन्हीही नद्या कर्नाटकात जवळजवळ उत्तरवाहिनी ते ईशान्यवाहिनी झालेल्या आहेत. महाराष्ट्रातले एक प्रख्यात भुगोल तज्ञ आणि "भुगोलकोश" कार श्री एल के कुलकर्णींसोबतच्या चर्चेतून समजले की तुंगभद्रा नदी ही दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी उत्तरवाहिनी नदी आहे. दक्षिण भारतीय पठार आपण समजतो तसे सगळेच दक्षिणेकडे उताराचे नाही. मग कृष्णेच्या दक्षिणेला आणि तुंगभद्रेच्या उत्तरेला बशीसारखी खोलगट रचना आहे का ? याचा शोध सुरू झाला आणि नवीन भुगोल कळला. आता पुढच्या वेळी हंपी, बदामी ला जाईन तेव्हा हा नवा भुगोल डोक्यात असेल. नव्याने तो परिसर बघितल्यासारखे वाटेल.
- दरवेळी रेल्वे किंवा बसप्रवासात तिथल्या तिथल्या समाजजीवनाशी, भुगोलाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणारा आणि जगभर प्रवास करून तिथल्या तिथल्या भुगोलाची अशी अनुभूती घेऊ इच्छिणारा एक प्रवासी पक्षी, भुगोलप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
११ जानेवारी २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
No comments:
Post a Comment