आज १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. राष्ट्रीय युवक दिवस. आज महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शिकवताना आजच्या दिवसाची आठवण करून दिली. त्यांच्या युवक असण्याचे महत्व त्यांना ठसवले. स्वामीजींच्या चरित्रातील एक चारित्र्य निर्माणाची कथाही सांगितली. विद्यार्थ्यांनी ती मन लावून ऐकली, त्यांना ती पटलीही पण फ़ार काळ त्यांच्या मनःपटलावर ती राहील असे मात्र वाटले नाही. अशी चरित्रे ऐकून, वाचून त्या विचाराने झपाटले जाण्याचे दिवस आता संपलेत असे वाटून गेले. आता विविध समाजमाध्यमांवरील रील्ससुद्धा २० सेकंदांपेक्षा अधिक कालावधीच्या नसतात कारण आपल्या सगळ्यांचाच लक्ष देऊन एखादी गोष्ट ऐकण्याचा, शिकण्याचा कालावधी कमालीचा कमी झालेला आहे.
मधल्या काळात आम्हा प्राध्यापकांना आपापल्या विषयातले MOOC (Massive Open Online Courses) तयार करण्यासाठी आय आय टी च्या तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लाभले. त्यात त्या सगळ्यांनीच स्पष्ट सूचना दिल्यात की तुमची ऑनलाईन लेक्चर्स चित्रित करताना एव्हढी खबरदारी घ्या की एक लेक्चर हे फ़क्त १० ते १२ मिनीटे कालावधीचे असावे. कारण त्यांच्याकडे असलेल्या एका अहवालानुसार अभियांत्रिकी विद्यार्थ्या्चा, एकाचवेळी एकूणच लक्ष देण्याचा, शिकण्याचा कालावधी हा फ़क्त १० ते १२ मिनीटे एव्हढाच आहे. म्हणूनच आय आय टी च्या तज्ञ प्राध्यापकांची ऑनलाईन्स लेक्चर्स ही छोटी छोटी असतात. एका तासात, एकाच लेक्चरमध्ये एखादी संकल्पना विद्यार्थ्यांच्या गळी उतरवायची असेल तर ती संकल्पना अशी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागून ५ - ६ लेक्चर्समध्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगितली तर ती त्यांच्यापर्यंत अधिक चांगली पोहोचते हा आय आय टी चा अभ्यास आहे. आणि तिथली बहुतांशी प्राध्यापक मंडळी याचे पालन करीत असतात.
आजकाल महाविद्यालयात १ तासाचे लेक्चर घ्यायचे म्हटले की विद्यार्थ्यांना तब्बल तासभर आपल्या विषयात गुंतवून ठेवण्यासाठी आम्ही प्राध्यापक मंडळी किती तारेवरची कसरत करतो हे सगळ्यांच्या लक्षात येईल. बरे आपल्या विषयावरील ऑनलाईन कण्टेण्ट डाऊनलोड करून तसेच विद्यार्थ्यांना शिकवणे हे आमच्यातल्या हाडाच्या प्राध्यापकाला मंजूरच नाही. आमचे अनेक व्यवसायबंधू तसे करतात खरे, पण त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांना किती अनादर वाटतो हे आम्हाला माहिती आहे. आणि असा अनादर डोळ्यात असलेल्या विद्यार्थ्यांना केवळ पगारासाठी शिकवणे हे मरणाहून मरण आहे हे सुद्धा आम्हाला कळतय. त्यामुळे आपला विषय तर विद्यार्थ्यांना शिकवायचाय, त्यांची लक्ष देऊन ऐकण्याची क्षमता ही अत्यंत कमी आहे हे लक्षात घेऊन थोडी मौजमस्ती करीत, थोडी त्यांच्या विश्वातली गंमत करीत, त्यांना आपण त्यांच्यातलेच एक वाटलो पाहिजेत याची काळजी घेत आणि तरीही आपल्या विषयाशी बांधून ठेवत तासभर शिकवणे ही खरोखर तारेवरची कसरत आहे.
आजकालच्या इंटरनेटच्या महाविस्फ़ोटाच्या आणि चॅट जीपीटी किंवा तत्सम कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांच्या काळात एखाद्या विषयाची माहिती अतिशय मुबलकपणे विद्यार्थ्यांना वर्गखोलीच्या चार भिंतीबाहेर उपलब्ध आहे. ती माहिती ते त्यांच्या अतिशय रचनात्मक वेळात घेऊ शकतात. त्यासाठी महाविद्यालयात जाऊन, विशिष्ट वेळेला एका वर्गखोलीत बसून ती माहिती घेण्याचे प्रयोजन त्यांना उरले नाही. एखाद्या विद्यार्थ्याचा अत्यंत रचनात्मक वेळ रात्री ११ ते १२ असू शकतो आणि या वेळात त्याने / तिने शिकलेले त्याच्या / तिच्या डोक्यात कायमचे राहू शकते. त्यासाठी भर दुपारी प्राध्यापकांकडून लेक्चर्स ऐकून त्याविषयावर चिंतन मनन करण्याची गरज उरलेली नाही. बहुतेक दुपारची वेळ ही तशीही मेंदूच्या फ़ार रचनात्मक कार्यासाठी भारतीय उपखंडात तरी विद्यार्थ्यांकडून पसंत केली जात नाही हे माझे वैयक्तिक निरीक्षण. मग अशावेळी कृत्रिम बुद्धीमत्ता, माहितीचा महापूर हा आपल्या शिक्षकी पेशालाच अकाली निवृत्त करतोय की काय ? अशी एक भितीची भावना आम्हा प्राध्यापकवर्गात बघायला मिळते.
पण इथेच कधी नव्हे ती प्राध्यापकांची मोठी भूमिका येते. आणि ती म्हणजे माहिती आणि ज्ञान यात असलेला फ़रक आपल्या विद्यार्थ्यांना जाणवून द्यायची. आंतरजालावर अफ़ाट माहिती उपलब्ध आहे. तिच्यातून योग्य ते निवडून त्या माहितीचे ज्ञानात, कौशल्यात कसे रूपांतर करायचे ? याचे मार्गदर्शन आजकालच्या शिक्षकांकडून अपेक्षित आहे. इंग्रजी भाषेत सांगायचे तर शिक्षक हा एक Knowledge Facilitator म्हणून विद्यार्थ्यांना हवाय. त्याहून पुढली गोष्ट म्हणजे आज विद्यार्थ्यांना हे सुद्धा अगदी प्रेमाने समजावून सांगावे लागेल की आज आपण अभ्यासक्रमात जे काही शिकतोय ते कमी अधिक कालावधीनंतर कालबाह्य होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या शिकण्याच्या वर्षात "एखादी गोष्ट शिकायची कशी ?" हे जर विद्यार्थ्यांनी शिकले ते त्यांच्या जीवनात पुढेपुढे नवनवीन विद्या, कौशल्ये शिकू शकतील. अगदी कुठल्याही वयात, कुठल्याही नोकरी व्यवसायात स्वतःला अपग्रेड करू शकतील, अपडेट ठेऊ शकतील. जीवनभर विद्यार्थी म्हणून नवनवीन गोष्टी शिकण्याचे त्यांना त्यांच्या जीवनात कायकाय फ़ायदे मिळणार आहेत ? हे त्यांना एकदा कळले की ते आपला वेळ, शक्ती "एखादी गोष्ट शिकायची कशी ?" याच्या अभ्यासातच घालवतील.
त्यासाठी शिक्षक प्राध्यापकांनाही आपले जुने धोरण, जुन्याच नोटसवरून पुढे चालू, तेच ते घिसेपीटे जोक्स त्याच त्याच वेळी अशा सवयी निग्रहाने त्यागाव्या लागतील. नवीन जगात काय सुरू आहे ? नवी पिढी कसा विचार करतेय ? आपल्या विद्यार्थ्यांना आजच्या बाह्य जगात कुठल्याकुठल्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे ? याचे अद्ययावत ज्ञान शिक्षक प्राध्यापकांना घेत रहावे लागेल. आणि बाह्य जगात वावरताना केवळ विद्यार्थ्यांना शिकवणारे पंतोजी म्हणून न वावरता विद्यार्थ्यांचा कायम सांगाती म्हणून वावरावे लागेल. आज विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाच स्वतःमध्ये बदल घडवण्याची वेळ आलेली आहे.
- आज ३० वर्षांपासून अध्यापन करीत असलेला आणि जवळपास दोन पिढ्यांमधील विद्यार्थी, त्यांच्या आशा आकांक्षा, त्यांच्यातील शिक्षणाचा दृष्टीकोन डोळसपणे अभ्यासणारा, त्यांच्याहून तिस-याच पिढीतला एक शिक्षक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
१२ जानेवारी २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६


No comments:
Post a Comment