Monday, January 5, 2026

भारतीय रेल्वे गाड्यांची नावे : काही हरवलेली, काही गवसलेली, काही हुकलेली काही चुकलेली

आपल्या भारतीय रेल्वेतल्या काही काही गाड्यांच्या नावांचा संदर्भच हरवत चाललाय. उदाहरणार्थ गंगा कावेरी एक्सप्रेस. ही गाडी जेव्हा सुरू झाली होती तेव्हा ती वाराणसी ते थेट तिरूचिरापल्ली अशी गंगेला आणि कावेरीला जोडणारी होती. गंमत म्हणजे तेव्हा मद्रास ते तिरूचिरापल्ली हा रेल्वेमार्ग मीटर गेज होता. वाराणसी ते चेन्नई ही गाडी ब्रॉडगेजने प्रवास करायची तर मद्रास बीच या स्टेशनवरून बाजूच्याच फ़लाटावर असलेल्या मीटर गेज एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे स्थलांतर होऊन त्यापुढील प्रवास ही गाडी मीटर गेजने करीत असे. आज मद्रास ते तिरूचिरापल्ली (व पुढेही रामेश्वरम आणि कन्याकुमारीपर्यंत) हा संपूर्ण मार्ग ब्रॉड गेज झालेला आहे पण ही गाडी धावतेय ते छापरा ते मद्रासपर्यंतच. मद्रास शहरापासून कावेरी नदी किमान ३५० किलोमीटर दूर असूनही आज या गाडीला तेच नामाभिधान प्राप्त झालेले आहे. त्याचा संदर्भ हरवलेला आहे.



तसाच संदर्भ हरवलेली दुसरी गाडी म्हणजे आपली देवगिरी एक्सप्रेस. ही गाडी सुरू झाली तेव्हा ही मुंबई ते छत्रपती संभाजीनगर अशी धावायची. दोन शहरांना जोडणारी आणि दोन्हीकडील प्रवास एका रात्रीत करून दोन्हीही शहरातील कामाच्या माणसांना त्यांच्या त्यांच्या कामांसाठी पुढला पूर्ण दिवस मोकळा ठेवणारी ही गाडी लोकप्रिय होती. पण हळूहळू ही गाडी नांदेडपर्यंत आणि नंतर थेट सिकंदराबादपर्यंत वाढवून् छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असलेल्या देवगिरी किल्ल्याचा संदर्भच हा गाडीने हरविलेला आहे. आता एखाद्या हैद्राबाद, निझामाबाद किंवा तेलंगणातल्या नागरिकाला हा देवगिरी नावाचा संदर्भ, वारसा, अभिमान कसा कळावा ? तसा आजकाल महाराष्ट्रातल्या तरी किती जणांना हा देवगिरी नावाचा वारसा माहिती आहे ? हा सुद्धा संशोधनाचाच विषय आहे म्हणा. 



याच्या अगदी उलट कथा आपल्या गोवा एक्सप्रेसची झाली आहे. १ जुलै १९९० रोजी दिल्ली वरून गोव्यापर्यंत ही गाडी सुरू करण्यात आली. गंगा कावेरी एक्सप्रेसप्रमाणेच ही गाडी दिल्ली ते मिरज हा प्रवास ब्रॉडगेजने करीत असे आणि मिरज ते गोव्यातल्या वास्को द गामा स्टेशनपर्यंत हा प्रवास मीटरगेजने करीत असे. साधारण १९९६ च्या आसपास मिरज ते लोंडा ते वास्को हा मीटर गेज मार्ग रूंदीकरणासाठी बंद करण्यात आला तेव्हा मधली ३ वर्षे ही गाडी मिरज ते दिल्ली पर्यंतच गोवा एक्सप्रेसच्या नावाने धावत असे. पण रूंदीकरणानंतर मात्र या गाडीच्या हरवलेल्या नावाचा संदर्भ तिला पुन्हा गवसला. पण मिरज, सांगली, कराडकर मंडळी या गाडीला गोवा एक्सप्रेस या नावाने कधीच ओळखत नव्हते. म्हणजे गाडीवर जरी गोवा एक्सप्रेस असे लिहीलेले असले तरी ही मंडळी या गाडीला "निजामुद्दीन एक्सप्रेस" या नावानेच ओळखायचीत. त्यामुळे फ़क्त आपल्या मिरज पासून दिल्लीला जाणा-या या गाडीला गोवा एक्सप्रेस का म्हणतात ? हा प्रश्न इथल्या स्थानिकांना कधी पडला असण्याची शक्यता नाही.


नावाची अशीच काहीशी कथा १ जुलै १९९० रोजीच सुरू झालेल्या गोंडवाना एक्सप्रेसची झाली. नागपूरकरांना दिल्लीला जोडणारी थेट गाडी म्हणून ही गाडी आठवड्यातून तीन दिवसनागपूर ते हजरत निजामुद्दीन अशी गोंडवाना एक्सप्रेस म्हणून रेल्वेने दिली खरी. पण लगेचच वर्षभरात ही गाडी आठवड्यातून ५ दिवस करून थेट बिलासपूरपर्यंत वाढवण्यात आली. तसाही नागपूरच्या रेल्वे कर्मचा-यांना नवीन गाड्या नागपूरवरून सुरू झाल्यात की त्यांची देखभाल करा, त्यांना तेलपाणी करा या सगळ्या गोष्टींचा कंटाळाच येतो म्हणा. कारण या गाडीनंतर दीक्षाभूमी एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस आणि अगदी आता आता सिकंदराबाद नागपूर एक्सप्रेस नागपूरवरून पळवण्यात आल्या पण नागपूरकर रेल्वे कर्मचा-यांना त्याचे फ़ारसे दुःख झालेले दिसले नाही.



ही गाडी बिलासपूरपर्यंत पळवल्यानंतर जरी या गाडीवरचा नामफ़लक "गोंडवाना एक्सप्रेस" असे दाखवित असला तरी समस्त छत्तीसगडी जनता या गाडीला कायम "महामाया एक्सप्रेस" या नावानेच पुकारायचेत. छत्तीसगड आणि पूर्व विदर्भ हा प्राचीन इतिहासात गोंडवनाचाच भाग असला तरी या गाडीचा "गोंडवाना" हा संदर्भ छत्तीसगडी जनतेने कायमचाच पुसून टाकला. आता तर ही गाडी आठवड्यातले ५ दिवस हजरत निजामुद्दीन ते बिलासपूर तर उरलेले २ दिवस हजरत निजामुद्दीन ते भुसावळ अशी धावते. आता पश्चिम विदर्भ, खान्देशातल्या प्रवाशांना किंबहुना रेल्वे अधिका-यांना या गाडीच्या गोंडवाना शब्दाचा संदर्भ लागणे शक्य नाही.


काही हुकलेल्या आणि चुकलेल्या गाड्यांमध्ये पहिला नंबर लागतो तो महाराष्ट्र एक्सप्रेसचा. नवी दिल्ली वरून विविध राज्यांच्या राजधान्यांना जोडणा-या जलद, अतिजलद गाड्यांची नावे त्या त्या राज्यांच्या नावांच्या एक्सप्रेस गाड्यांना दिलेली आहेत. उदाहरणार्थ नवी दिल्ली ते मद्रास ही अतिजलद आणि प्रतिष्ठित गाडी तामिळनाडू एक्सप्रेस, नवी दिल्ली ते तिरूवनंतपुरम ही जलद गाडी केरळ एक्सप्रेस, नवी दिल्ली ते बंगलोर ही प्रतिष्ठित जलद गाडी कर्नाटक एक्सप्रेस, नवी दिल्ली ते जुन्या आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या हैद्राबादला जोडणारी गाडी आंध्रप्रदेश एक्सप्रेस पण आंध्र आणि तेलंगणा वेगळी राज्ये झाल्यानंतर याच आंध्रप्रदेश एक्सप्रेसचे नाव तेलंगणा एक्सप्रेस असे झाले तर नवी दिल्ली ते विशाखापट्टण (मार्गे विभक्त आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या विजयवाडा) असलेल्या नव्या गाडीला आंध्रप्रदेश हे नामाभिधान प्राप्त झाले. बाकी विजयवाडा आणि विशाखापट्टण या शहरांचा रेल्वेबाबतचा भ्रातृभाव हा खरोखर बोध घेण्यासारखा आहे. विजयवाडाचे रेल्वेवाले आपल्या हक्काच्या आणि मालकीच्या रेल्वे खुशाल विजयवाड्याला प्रदान करतात. अगदी तसेच नाते रायपूर आणि बिलासपूरचे आहे. छत्तीसगडची राजधानी जरी रायपूर असली तरी रायपूरच्या हक्काच्या आणि मालकीच्या गाड्या ही मंडळी मोठ्या भावाच्या उदारतेने बिलासपूरपर्यंत वाढवू देतात. छत्तीसगड राजधानी सुद्धा रायपूर ते नवी दिल्ली ऐवजी बिलासपूर ते नवी दिल्ली अशी आहे.


या न्यायाने मुंबई ते नवी दिल्ली या मार्गावर धावणा-या जलद, अतिजलद प्रतिष्ठित गाडीला महाराष्ट्र एक्सप्रेस हे नाव द्यायला हवे होते. पण ही गाडी नागपूर ते कोल्हापूर आणि आता गोंदिया ते कोल्हापूर या मार्गावर अतिशय कूर्मगतीने धावते. या मार्गावरील इतर कुठल्याही गाडीत आरक्षित जागा मिळत नसेल तर आणि तरच प्रवासी या गाडीचा विचार करतात ही या गाडीची प्रतिष्ठा. नावाच्या बाबतीत पूर्णपणे हुकलेली ही गाडी.


शेजारच्या राज्यातली बिलासपूर ते अमृतसर जाणारी छत्तीसगड एक्सप्रेस जरी वेगाच्या, खूप भरमसाठ थांब्याच्या बाबतीत हिचाच कित्त्ता गिरवीत असली तरी ती किमान त्या राज्याच्या राजधानीला दिल्लीपर्यंत जोडते तरी पण महाराष्ट्र एक्सप्रेस मात्र नावाच्या बाबतीत पूर्णपणे हुकलेली आणि चुकलेली आहे. 


थोडा विचार केला गाड्यांच्याच नावांचे काय ? माणसांची नावे तरी अशी न हुकलेली असतात काय ? सगळ्यांचीच नावे त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी असतात काय ? सगळेच राम एकवचनी आणि एकबाणी असतील असे कुठे आहे ? मला वाटतं आपल्या पिढीची नावे ठेवताना आपल्या आईवडीलांनी आणि आजीआजोबांनी अजामिळाच्या कथेची खूप पारायणे केली असावीत. मृत्यूसमयी पुत्रमिषाने का होईना पण परमेश्वराचे नाव आपल्या मुखात यावे आणि त्याद्वारे आपल्याला या जन्म मरण 

फ़े-यातून कायम मुक्ती मिळावी अशा थोड्याशा स्वार्थी हेतूने त्यांनी देवादिकांची नावे आपापल्या मुलामुलींना दिलेली असावीत. आजकाल जन्म काय किंवा मृत्यू काय कशातूनच आपल्याला मुक्त व्हावेसे वाटत नाही. आपल्याला अधिकाधिक अट्टाहासाने, असोशीने जगावेसेच वाटते. पाप पुण्याचा हिशेब करणे तर आपण केव्हाच सोडून दिलेले आहे म्हणून मग आजकाल अनेक वैचित्र्यपूर्ण, अगम्य आणि कसलाही अर्थ नसलेली अत्यंत टुकार नावे आपापल्या अपत्यांना देण्याचा एक वाह्यात ट्रेंड सुरू झालाय. 


असो. माणसेच अशी नावांच्या बाबतीत हुकलेली आहेत तर मग माणसांनीच निर्मिलेल्या रेल्वे गाड्यांनी नावांच्या बाबतीत हुकले काय ? चुकले काय ? हरवले काय ? गवसले काय ? कोण हिशेब ठेवणार ?

- बालपणी नागपूर ते चंद्रपूर प्रवासात चंद्रपूर आगाराच्या सुंदर बसला "महाकाली एक्सप्रेस" असे नाव दिलेले बघून त्या बसच्या नावाच्या सजावटीच्या किंबहुना एकंदरच त्या रूपाच्या प्रेमात पडणारा एक बस आणि रेल्वेप्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


५ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


No comments:

Post a Comment