Tuesday, January 13, 2026

एका उपवधू तरूणाचे कल्पक प्रताप

इसवीसन १९९९. एका तरूणाच्या लग्नासाठी त्यांच्या घरात हालचाली सुरू झाल्या. नोकरी लागून चांगली ४ वर्षे झालेली होती. त्यामुळे आता त्याने दोनाचे चार हात करावेत अशा चर्चा घरात आणि त्याच्या परिचितांमध्ये सुरू झालेल्या होत्या. मुलगा वाचनवेडा, पुस्तक दिसले की कर फ़स्त अशा सवयीचा. तसा साधा सरळ. कुणाच्या अध्यात मध्यात नसणारा. त्याचबरोबर विनोदप्रिय. जीवनाला खेळकर अंगाने घेणारा. त्यामुळे त्याच्या मनात त्याला हव्या असलेल्या जीवनसाथी / जीवनसारथ्याची कल्पना अगदी पक्की होती. आजूबाजूचा समाज आणि एकंदरच काळ बदलायला सुरूवात झालेली आहे याची त्याला कल्पना आलेली होती. अशा वेळी जीवनाच्या अशा महत्वाच्या टप्प्यावर आपल्याला साथ देणारी मुलगी जर आपल्या अनुरूप असली नाही तर जीवनाचे काय हाल होतील ? या कल्पनेने तो थोडा बावरला होता.



त्याकाळी त्याचा इतर चारचौघांसारखाच ठरवून केलेला विवाह होणार होता. तोपर्यंतच्या जीवनाच्या एकूणच धबडग्यात, संघर्षात प्रेम वगैरे करणे आणि त्याचे विवाहात रूपांतर होणे ही कल्पना सुद्धा त्याला आलेली नव्हती. आणि प्रेमविवाहासाठी लागणा-या बहुतांशी बाजू त्या मुलाच्या उणे बाजूकडीलच होत्या. उत्कृष्ट रूप नसणे, सर्वांवर, विशेषतः मुलींवर प्रथमदर्शनी छाप पाडणारे व्यक्तीमत्व असणे, मुलींवर खर्चायला शिल्लक पैसे असणे वगैरे वगैरे गोष्टी नव्हत्याच. प्रेमविवाह जरी असले तरी या गोष्टी त्याने आसपास घडताना बघितल्या होत्या त्यामुळे त्या मार्गाने तो जाणारच नव्हता. मग अशा ठरवलेल्या विवाहात आपल्याला अनुरूप अशा मुलीची निवड एकाच बघण्यात होईल का ? तिचे खरे व्यक्तीमत्व आपल्याला कळेल का ? आपल्या व्यक्तीमत्वाला साजेशी अशी वाचनाची आवड असलेली, विनोदप्रिय, खेळकर स्वभावाची आणि अगदी सहज जीवन जगणारी किंबहुना जीवनावोषयी फ़ार असोशी नसणारी मुलगी नक्की आपल्याला एक अर्ध्या तासाच्या "मुलगी बघण्याच्या" कार्यक्रमातून जीवनसाथी म्हणून मिळेल का ? हे विचार त्याला भेडसावत होते. कारण हे गणित जर चुकले तर आयुष्य हुकले ही त्याची धारणा अगदी पक्की होती.


मग त्याने त्यावर खूप विचार करून एक प्रश्नावली तयार केली. त्यात त्या वधूच्या नावापासून, टोपणनावापासून ते शैक्षणिक पात्रतेपर्यंत आणि त्यापुढेही इतर आवडीनिवडींबाबत काही प्रश्न होते. ते प्रश्न वरवर बघता निरूपद्रवी वाटत असले तरी त्यांच्या आलेल्या उत्तरांमध्ये तो तरूण त्याच्याशी त्या मुलीची मते, आवडीनिवडी जुळतात की नाही ? हे ताडून बघणार होता. म्हणजे या मुलाचा आवडीचा चित्रपट "प्रहार", "एक रूका हुआ फ़ैसला", "थोडासा रूमानी हो जाए" असायचा आणि त्या मुलीचा आवडता चित्रपट "मोहरा" असायचा. त्याची आवडती डिश ही पुरणपोळी असायची तर तिची पास्ता असायची. 






नाही, तशी आवडनिवड भिन्न असायला हरकत नव्हती. "पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" हे मनापासून मानण्याइतका तो आणि त्याच्या घरची मंडळी सुसंकृत होती. कुठलीही आवडनिवड ही अत्यंत वैयक्तिक बाब असते आणि ती तशी असणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, त्यात अधिक उणे असे काही नसते ही त्याची अगदी प्रामाणिक धारणा होती. पण जीवनरथाची दोन्हीही चाके एकाच आकाराची असलीत की रथ अधिक सुलभतेने अनेक अडथळ्यांना पार करतो हे त्याचे पक्के प्रमेय होते आणि त्यासाठी आपल्याच आकाराचे चाक तो आपल्या जीवनरथाला शोधत होता. आवडीनिवडी थोड्या इकडेतिकडे असल्यात तरी तिच्या घरची संस्कृती आणि आपल्या घरची संस्कृती यात साम्यस्थळे किती आहेत ? आणि विसंगती किती आहेत ? हे तो त्या प्रश्नावलीवरून शोधणार होता. म्हणजे पुरणपोळी आणि वडाभाताचे जेवण झाल्यानंतर संध्याकाळी बाहेर पाणीपुरी, रगडा पॅटीस खाऊन घरी पुन्हा पिठलंभात खाल्यानंतर त्या घरात "पोटात अगदी गोपालकाला झालाय" असे म्हणतात ? की "पोटात आज अगदी कॉकटेल झालय" असे म्हणतात हे त्या प्रश्नावलीवरून त्याला कळणार होते. अगदीच भिन्न संस्कृतीत, संस्कारात वाढलेले दोन जीव फ़ार क्वचितच एकत्र आणि (त्याच्या दृष्टीकोनातून) सुखाचा समाधानाचा संसार करू शकतात यावर त्याचा दृढ विश्वास होता.


स्त्री पुरूष समानतेच्या काळात केवळ मुलाकडूनच अशा प्रकारची माहिती मुलीकडून मागवली जावी हा अन्याय झाला असता हे त्याला मान्य होते. तामुळे या प्रश्नावलीच्या आधी "थोडेसे माझे" म्हणून स्वतःचे एक मनोगत, आपला हेतू विशद करणारे Preamble  त्यात समाविष्ट केलेले होते. (केंद्रीय नागरी सेवा परिक्षां साठी भारतीय राज्यघटनेचा खूप अभ्यास केल्याचे असे परिणाम होतात. कुठेही आपले Preamble वगैरे टाकणे. छे !) त्यात त्या तरूणाने अशाच प्रकारची माहिती या किंवा वधूपक्षाने ठरविलेल्या इतर कुठल्याही फ़ॉर्मॅटमध्ये देण्याची तयारी दर्शवलेली होती.



घरच्या मंडळींनी त्याचा हा आग्रह पाहून मोठ्या कष्टाने त्याला परवानगी दिली. घरच्यांचेही बरोबरच होते. त्याकाळी हा एक मोठा प्रयोग होता. "तो मुलगा काय स्वतःला मोठा टिकोजीराव समजतोय की काय ?" असा लोकापवाद पसरविणारा होता. पण तो उपवधू मुलगा आपल्या विचारांवर ठाम होता. लोकांनी काहीही म्हटले तरी आपल्याला हवी असलेली जीवनसंगिनी ही आपल्याला, आपल्या कुटुंबातील संस्कारांना अनुरूप अशीच असली पाहिजे असा त्याचा अत्याग्रह होता.


पण या फ़ॉर्मचे फ़ार प्रयोग करण्याची वेळ आली नाही. दोन मुली बघितल्यानंतर तिस-याच मुलीकडून त्याला आणि त्याच्याकडून तिला पसंतीचा होकार कळवला गेला आणि ती अगदी त्याच्या जीवनात अनुरूपपणे आली आणि ते दोघेही एकमेकांमध्ये विरघळून गेलेत.


आज त्या घटनेला पाव शतकाहून अधिक काळ लोटला आहे तरी आजही त्याकाळच्या या प्रश्नावलीच्या या सुखद आठवणी त्याला स्वतःवरचा, स्वतःच्या निर्णय क्षमतेवरचा आणि स्वतःच्या कल्पनाशक्तीवरचा विश्वास अगदी दृढ करायला मदत करतात. 


- तारूण्यात मनाला अनेक पंख फ़ुटत असलेत तरी विचाराने आणि एका ध्येयाने जगणारा वागणारा कल्पक आणि विचारी तरूण, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


(त्याचे लग्न कसे जुळले ? आणि इतर गंमतीजंमतीच्या आठवणी इथे) 


१३ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


No comments:

Post a Comment