माझ्या मागील एका लेखात मी माझ्या वृत्तपत्रीय जीवनाबद्दल लिहीलेले होते. मी दहाव्या, बाराव्या वर्गात असल्यापासूनच हे वृत्तपत्रीय लेखन करतो आहे. त्याबद्दलचा लेख इथे. हा लेख लिहूनसुद्धा आज तब्बल १० वर्षे झालीत. पण मधल्या काळाचे अवलोकन सूक्ष्म दृष्टीने केल्यास मलाच हा प्रश्न पडला की आजच्या युगात वृत्तपत्रे किंवा एकंदरच छापील मिडीया हा कालबाह्य झालाय का ? आणि याला जबाबदार घटक कोण कोण आहेत ?
आमचे घर वाचनवेडे. आमच्या वडिलांकडून आम्ही हा उदंड वाचनाचा वारसा घेतला. सकाळी सकाळी पहिल्या चहासोबत त्यांना वर्तमानपत्र वाचायला हवे असायचे. मग जो वृत्तपत्रविक्रेता सकाळी ६ ते ६.१५ च्या आसपास घरी वर्तमानपत्र आणून देईल त्याची निवड व्हायची. एखाद्या दिवशी त्याने थोडा जरी उशीर केला तरी त्याला आमच्या दादांची बोलणी ऐकून घ्यावी लागायची. माझे वडील वर्तमानपत्र संपूर्ण म्हणजे अगदी संपूर्ण वाचायचेत. आणि आम्हालाही त्यांनी तशा सवयी लावल्यात.
बरे घरी त्याकाळी रोजचा तरूण भारत तर यायचाच. सोबत दर रविवारी मुंबई रविवार सकाळ, लोकसत्ता, मटा वगैरे दैनिके सुद्धा यायचीत. अर्थात ही सगळी वृत्तपत्रे त्याकाळी फ़ार दर्जेदार लिखाण घेऊन यायचीत. अतिशय दर्जेदार साहित्यिक संपादकवर्ग या सर्व दैनिकांना लाभलेला होता. यामुळे आमचे वाचन समृद्ध होत गेले.
आम्ही यु पी एस सी चा अभ्यास करीत असताना नागपूरला बर्डीवर खुराणा बुक स्टॉलवरून दररोज संध्याकाळी जाऊन मुंबईवरून गीतांजली एक्सप्रेसने येणारा टाईम्स ऑफ़ इंडिया वाचनासाठी आणत असू. श्री खुराणाजी आम्हाला यु पी एस सी सिव्हील सर्व्हिसेसचे अभ्यासक विद्यार्थी म्हणून ओळखत आणि आमच्यासाठी खास चेन्नईवरून द हिंदू हे वर्तमानपत्र मागवीत असत. जे एन यू छाप डाव्या विचारवंतांचा यु पी एस सी मध्ये इतका भरणा त्यावेळी होता की पटत नसून सुद्धा रोमिला थापर सारख्यांनी लिहीलेला अजिबात भारतीय नसलेला थापाडा इतिहास आम्हाला भारतीय इतिहास म्हणून अभ्यासावा लागे. द हिंदू या अतिशय हिंदूविरोधी वर्तमानपत्रातली विश्लेषणे टाचण करून ठेवावी लागत कारण यु पी एस सी पास व्हायचे असेल तर याच पद्धतीने व्हावे लागते हे आम्हाला माहिती होते. तिथे थोडेही आपले पांचजन्य चे ज्ञान पाजळले असते तर आम्हाला खड्यासारखे बाजूला केले गेले असते.
जी गत वर्तमानपत्रांची तीच मासिकांची. आमच्याकडे आमच्या बालपणापासून किशोर, अमृत, कुमार ही मासिके यायचीत. सोबतच लोकप्रभा सारखी साप्ताहिके सुद्धा यायचीत. चित्रलेखा आणि सकाळ साप्ताहिके सुद्धा आमच्याकडे दर शनिवारी आमचे दादा आणायचेत. या सर्व साप्ताहिकांचे, नियतकालिकांचे, वर्तमानपत्रांचे दिवाळी अंकही आमच्याकडे आवर्जून यायचेत. आम्हाला ह्या सर्व वाचनात एक विशिष्ट वाचनानंद मिळायचा. मन तृप्त व्हायचे, मेंदू तल्लख व्हायचा. त्याकाळी काही काही मासिके तर घरच्या कुठल्या तरी बजेटमध्ये काटछाट करून दादांना घरी आणावी लागायचीत. पण तरीही एक वाचनाचे समाधान होते.
पण एका विशिष्ट कालावधीनंतर हळूहळू ही वर्तमानपत्रे, नियतकालिके प्रचारकी थाटाची होत गेलीत. तोपर्यंत एलेक्ट्रॉनिक मिडीयाने सुद्धा आपला जम बसवला होता. बातम्या दिवसभर ताज्या आणि "सबसे तेज" कळू लागल्यात, बातम्यांसाठी वृत्तपत्रांची वाट बघणे संपले. तरीही वृत्तपत्रे आपला जम टिकवून होती कारण बातम्या जरी कळल्यात तरी त्यामागील संपादकीय दृष्टीकोन काय आहे ? हे वाचण्याची उत्सुकता असायची. नागपूर तरूण भारत ने आपला हा वाचकवर्ग आजही टिकून ठेवलाय त्याचे एकमात्र कारण हेच आहे. एखाद्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनेची फ़ोड कशी करायची याबाबत संपादकीय विद्वत्तेची लोकांना गरज असायची. पण २०१२ च्या आसपास फ़ेसबुक , व्हॉटस ॲप, यू ट्यूब वगैरे समाज माध्यमे वाढलीत आणि त्यावर ही विश्लेषणे अनेक दृष्टीकोनातून प्रसिद्ध होऊ लागलीत. त्यामुळे संपादकीय प्रचारकीपणा, पेड न्यूज वगैरे प्रकार जनतेच्या ध्यानात येऊ लागलेत आणि छापील माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात येऊ लागली. संपादकीय मतांमागची पक्षीय लबाडी लोकांच्या ध्यानात चटकन येऊ लागली. आज सर्वच वर्तमानपत्रांचा खप कमालीचा खालावलाय. वर्षभर अगदी रद्दीच्या किंमतीत देऊन, सोबत विविध गृहपयोगी वस्तू देऊनही हा खप फ़ारसा वाढत का नाही ? याचे आत्मचिंतन जर या मराठी वृत्तपत्रांनी आणि एकंदरच छापील माध्यमांनी केले तर त्यांना आपली चूक लक्षात येईल पण आता वेळ निघून गेलेली आहे. खूप उशीर झालेला आहे.
२०१९ च्या निवडणुकांनंतच्या प्रचारकी थाटानंतर मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीयाची लबाडी सुद्धा लोकांच्या लक्षात येऊ लागली. बातम्या आणि त्यांचे विश्लेषण लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या नावाखाली सर्व मराठी इलेक्ट्रॉनिक मेडीया त्यांचा आपला आपला एक नॅरेटिव्ह आपल्या मनात पसरवतोय हे लोकांना हळूहळू कळायला लागले. त्यासाठी हा मराठी इलेक्ट्रॉनिक मेडीया स्वतः मात्र भरभक्कम पैसे घेतोय हे ही लोकांना कळू लागलेय. बरोबर आहे हो. "ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी" हे त्यांना अगदी बालपणापासून माहिती आहे ना. पण या सगळ्या उपदव्यापात,आपण अव्यापारेषू व्यापार करून ज्या फ़ांदीवर बसलोय तीच तोडतोय हे त्यांच्या ध्यानात आलेच नाही.
काल मराठी छापील मिडीया सुपात होता आज जात्यात आहे पण आजचा मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीया सुपात आहे हे त्यांच्या अजूनही लक्षात आलेले नाही. आपले निरपेक्षत्व जपले पाहिजे, आपण हा लोकशाहीचे पाचवे स्तंभ आहोत आपण लोकांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण केले पाहिजे, नुसते ब्रेकिंग न्यूजच्या मागे लागून स्वतःचा नाश करून घेऊ नये हे कळायला या इलेक्ट्रॉनिक मिडीयाची सदसदविवेकबुद्धी तर जागृत हवी ना ? मराठी छापील मिडीया जात्यातून सुपात जायला आणि कालबाह्य व्हायला जवळपास तीस वर्षे लागलीत. मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीया तर पुढल्या पाचच वर्षात असा जात्यातून सुपात जाईल आणि भरडला जाऊन निःशेष होईल अशी माझी खात्री आहे.
- मराठी छापील मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा परखड विश्लेषक आणि एकेकाळी मास कम्युनिकेशनला प्रवेश घेऊन पत्रकारिता करण्याचे निश्चित केलेला एक होता होता राहिलेला पत्रकार, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
२४ जानेवारी २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
No comments:
Post a Comment