Saturday, January 17, 2026

नामयाचा जो जिव्हार

सकाळी उठलो आणि फ़ोनमध्ये युट्यूब उघडले. आज सकाळी सकाळी आवरताना, स्वयंपाक करताना, अभिषेकी बुवांचा शिवमत भैरव ऐकण्याची खूप मनापासून इच्छा झाली होती. "जितेंद्र अभिषेकी" हे नाव युट्यूब च्या शोध सदरात टाइप केले आणि अभिषेकी बुवांनीच गायलेला एक परिचित अभंग पहिल्या नंबरवर दिसला. मग तोच लावला. म्हटलं शिवमत भैरव यानंतर ऐकूयात. सकाळ छान सुरू झाली आणि मनात दिवसभरासाठी विचारचक्रही सुरू झाले.


संत जनाबाईंचा "संत भार पंढरीत" हा अभंग होता. आजवर अक्षरशः शेकडो वेळा ऐकलेला हा अभंग अभिषेकी बुवांनी छानच गायलाय. आणि अभिषेकी बुवांइतकाच छान आजच्या तरूण मंडळींपैकी केतकी माटेगावकरने पण गायलाय. सुंदर ठेहराव घेत, नजाकतीने, त्यातल्या जागा समजून. माझ्या प्ले लिस्ट मध्ये केतकीने गायलेला पण अभंग आहे. काहीकाही सूर दरवेळी ऐकताना मनाला हळवे करतात, डोळ्यात पाणी तरळवतात.


पण आज त्यातले शब्द वेगळ्याच अर्थाने खुणावू लागलेत. "सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचा जो जिव्हार" या शब्दांनी दिवसभर मनात पिंगा घातला होता. संत जनाबाई ह्या त्याकाळात संत नामदेवांच्या घरी वाढलेली संत नामदेव महाराजांच्या कुटुंबातील एक दासी. आजच्या युगाच्या भाषेत सांगायचे तर गृह मदतनीस सखी. संत नामदेवांच्या घरी त्याकाळी त्यांचे सगळेच कुटुंबिय अभंग रचनेत आणि ईश्वरभक्तीत रममाण झालेले होते. त्याचाच परिणाम त्यांच्या या दासीवर झाला असण्याची शक्यता आहे. संत नामदेवांच्या सहवासात विचारांना पक्की बैठक लाभलेल्या आणि ईश्वराप्रती पूर्ण समर्पण पावलेल्या संत जनाबाईंनी फ़ार सुंदर शब्द या अभंगात लिहीलेत. "सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचा जो जिव्हार" 


संत नामदेव महाराजांनी सर्व संतांची माऊली असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांना आपला सखा मानले होते आणि त्यांना ते आपला जिव्हार मानत असत असा एक लौकिकार्थ या अभंगातून संत जनाबाईंना मांडायचा आहे. जिव्हार या शब्दाचा एक अर्थ "जिवलग मित्र, आत्मा, प्रिय सखा" असाही होतो आणि आपण सर्वसामान्य मंडळी जिव्हार हा शब्द "हृदय" या अर्थाने सुद्धा वापरतो. एखादी गोष्ट "जिव्हारी लागणे" म्हणजे ती गोष्ट हृदयात खोचली जाणे, अगदी नेहेमीसाठी त्या गोष्टीचे स्मरण होणे या अर्थाने आपण हा शब्द वापरतो. जिव्हार या शब्दाचा आपल्या वापरातला आणखी एक अर्थ म्हणजे आपले मर्मस्थळ.


संत ज्ञानेश्वर माऊली या सकल मराठी माणसांचे मर्मस्थळ आहेत मग ते त्यांचे शिष्य असलेल्या संत नामदेवांचे मर्मस्थळ असल्यात म्हणून नवल ते काय ? मग मनात विचार येऊन गेला की आपणही आपल्या अगदी सुहृद नातेवाईकांमध्ये, अतिशय जवळच्या मित्रमंडळींमध्ये त्यांचा त्यांचा जिव्हार होऊ शकू का ? इतकी आत्मीयता, प्रेम आपण आपल्या जवळच्या मंडळींमध्ये आपल्या वागण्या बोलण्याने आणि प्रेमळ निःस्वार्थ वृत्तीने निर्माण करू शकू का ? आणि असे जर आपण जगात वागत गेलोत तर "किंबहुना सर्वसुखी" या माऊलींनीच दाखविलेल्या आनंदाप्रत आपण सहज पोहोचू शकू, नाही का ? 


"सगळ्या मोठ्या गोष्टी या अत्यंत साध्याच असतात" असे एका पाश्चात्य विचारवंताचे मत आहे. त्या इतक्या साध्या असतात की सर्वसामान्य माणसांचा सुरूवातीला त्यावर "छे ! छे ! एव्हढी मोठी गोष्ट इतकी साधी कशी असू शकेल ?" असा अविश्वास असतो. तसेच आपण आपल्या सुहृद नातेवाईकांचा आणि जवळच्या मित्रमंडळींचा जिव्हार बनण्य़ाच्या प्रक्रियेचे आहे. त्या प्रक्रियेची मूलतत्वे फ़ार साधी आहेत आणि ती आपल्याला आपल्या प्रेमळ, निःस्वार्थ वागण्या बोलण्यातून रूजवत जायची आहेत हे इतके सोपे आहे. एक शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांचा तरी जिव्हार आजवर बनलोय का ? किंवा भविष्यात बनू शकतो का ? या प्रश्नाच्या धांडोळ्यात आणि त्यासाठी आपली वागणूक कशी असावी ? हे नियोजन करण्यात आजचा दिवस छान गेला.


"जिव्हार" या शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे आपली जीभ. "ज्ञानोबामाऊली म्हणजे्च माझी वाणी आहेत, माझ्या सर्व अभंगांची प्रेरणा आहे "या अर्थाने तर संत नामदेवांना ज्ञानोबामाऊलींचा उल्लेख या अभंगात करायचा नव्हता ना ? हे शोधण्यात संध्याकाळ दरवळून गेली. यापूर्वी शेकडो वेळा ऐकलेल्या आणि सकाळपासून मनात रूंजी घालत असलेल्या या अभंगाने मनात अर्थाची निरनिराळी वलये निर्माण केलीत, मन अधिक सात्विकतेकडे ओढले, अधिक ईश्वरप्रवण केले हे मात्र नक्की.


- अनेक जन्म घेऊन संतांच्या चरणाची केवळ धूळ होण्याची तरी पात्रता लाभावी या प्रामाणिक आकांक्षेचा एक साधक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१७ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


No comments:

Post a Comment