जानेवारी १९९०, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथील आमचे दुसरे सत्र नुकतेच सुरू झालेले होते. पहिल्या सत्राचा नुकताच निकाल लागलेला होता. मी अनपेक्षितपणे चांगले गुण मिळवून पास झालेलो होतो. त्याबद्दलची गंमतजंमत इथे. जानेवारीत आमच्या महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे वारे वाहायला सुरूवात झाली होती. त्यानिमित्त विविध स्पर्धा, खेळ यांचा महाविद्यालयात मस्त माहौल तयार झाला होता.
आमच्याच वर्गात मेकॅनिकल अभियांत्रिकीत नागपूरचाच शशांक चिंचोळकर म्हणून एक मुलगा होता. अतिशय हुशार, कराडच्या आमच्या हॉस्टेलच्या भाषेत "एकदम तोडू" मुलगा. त्याने पहिल्याच सत्राच्या परिक्षेत विद्यापीठात पहिल्या तिघांत येऊन आपल्या हुशारीची चुणूक दाखविलेली होती. अर्थात महाविद्यालयातली त्यानंतरची सगळी सत्रे शशांक कायम पहिल्या तीन मध्ये असायचा. त्याच्याकडे बघितल्यानंतर अभ्यास करणे ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट वाटत असे. महाविद्यालयाच्या दुस-या आणि तिस-या वर्षाला असताना आम्ही दोघे रूम पार्टनर्स होतो याचा मला आजही अगदी अभिमान वाटतो.
पण प्रथम वर्षाला असताना आम्हा दोघांची केवळ थोडीशीच ओळख होती. फ़ार घसट अशी नव्हती. त्यावर्षी आमच्या फ़्रेशर्स पार्टीला मी नकला, गाणी असे विविध गुणदर्शन केलेले असल्याने मी त्याला माहिती असणार असे मला वाटते. आमच्या महाविद्यालयात स्नेहसंमेलनानिमित्त प्रश्नमंजुषेची (क्विझची) घोषणा झाली आणि त्यातल्या चमूत भाग घेण्यासाठी शशांकने मला विचारले. दोन जणांची चमू असणार होती. मला त्याने त्याच्या सोबत चमूत भाग घेणार का ? असे विचारल्यानंतर मला थोडे आश्चर्यच वाटले. त्यापूर्वी जरी अशा प्रश्नमंजुषांचे अनेक कार्यक्रम मी दूरदर्शनवर बघितलेले असले तरी अशा प्रश्नमंजुषेत स्पर्धक म्हणून मी पहिल्यांदाच उतरणार होतो. मी अगदी आनंदाने होकार दिला.
प्रश्नमंजुषा चांगलीच दर्जेदार होती. आमच्या महाविद्यालयाचा प्रश्नमंजुषाकार (क्वीझ मास्टर) संकेत आंबेरकर म्हणून आमचा सिनीयर होता. तो अगदी व्यावसायिक पद्धतीने प्रश्नमंजुषेचे संचालन करायचा. पहिल्याच राऊंडमध्ये शशांक चिंचोळकर आणि राम किन्हीकर या जोडीची एकदम हवा झाली. इतर स्पर्धकांपेक्षा खूप मोठ्ठ्याफ़रकाने आम्ही तो राऊंड जिंकलो. शशांक म्हणजे चालताबोलता ज्ञानकोश होता. जगभरातल्या देशांच्या राजधान्या, त्यांच्या भाषा, चलन, भारतातल्या राज्यांच्या राजधान्या, महत्वाच्या नद्या, त्यांची लांबीरूंदी, लोकसंख्येचे प्रमाण वगैरे गोष्टी त्याला अगदी तोंडपाठ होत्या. दरवर्षी प्रसिद्ध होणारे मनोरमा इयर बुक तो पहिल्याच दिवशी विकत घ्यायचा आणि ते त्याला जवळपास तोंडपाठ असायचे. त्यामुळे प्रश्नमंजुषेची पहिली फ़ेरी आम्ही अगदी आरामात जिंकल्यावर आमच्याविषयी इतर फ़ेरींमधून पुढल्या फ़ेरीत आलेल्या स्पर्धाकांच्या चमूंमध्ये आदरयुक्त भिती पसरली असल्याचे वर्तमान आम्हाला आमच्या हॉस्टेलला कळले होते.
दुस-या फ़ेरीतही आम्ही इतर स्पर्धक चमूंना अत्यंत मोठ्या फ़रकाने हरविल्यानंतर आम्ही अंतिम फ़ेरीत प्रवेश केला. अंतिम फ़ेरी आमच्या स्नेहसंमेलनाच्याच पहिल्या दिवशी अगदी महाविद्यालयाच्या स्टेजवर होणार होती. खूप झगमगाटात आणि जवळजवळ आमच्या सगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, प्राचार्यांच्या उपस्थितीत. त्यामुळे त्याविषयी आम्हाला पण खूप उत्सुकता होती. आम्ही आमची तयारी वाढविली.
स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला. सुंदर स्टेजवर चार चमू हजर झाल्यात. सुटाबुटातला क्वीझ मास्टर संकेत आंबेरकर मोठ्या झोकात संचलन करायला लागला. स्टेजच्या समोरचे आमच्या महाविद्यालयाचे पटांगण तुडुंब भरलेले होते. आता आमच्या स्पर्धकांमध्ये होते ते म्हणजे आमच्यासारखेच या स्पर्धेच्या दोन फ़े-या जिंकून अंतिम फ़ेरीत आलेले इतर तीन चमू, सहा स्पर्धक. त्या स्पर्धकांमध्ये आम्हाला दोन वर्षे सिनीयर असलेले आणि आजवर ज्यांनी महाविद्यालय आणि विद्यापीठातल्या सगळ्या प्रश्नमंजुषा जिंकलेल्या होत्या असे पराग लपालीकर आणि अभिनव बर्वे नावाचे अत्यंत हुशार, गुणी विद्यार्थी होते. आमची खरी स्पर्धा त्यांच्या चमूशी होणार हे आम्हाला कळत होते.
अंतिम स्पर्धा सुरू झाली. आणि अपेक्षेप्रमाणे आमच्या आणि पराग + अभिनव या चमूमध्येच अगदी काटेंकी टक्कर होऊ लागली. प्रेक्षकांमधून थर्ड इयरची मुले पराग आणि अभिनव या चमूला आणि फ़र्स्ट इयरची मूले आम्हाला प्रोत्साहन देत होती. आमच्या प्रत्येक बरोबर उत्तरावर आमच्याबाजूने आरोळ्या वाढत होत्या आणि हेच जर पराग + अभिनव यांच्या चमूच्या बाबतीत घडले तर त्यांची मित्रमंडळी, वर्गमित्र आरोळ्या ठोकत होते. अगदी माहौल तयार झाला होता.
त्या स्टेजवर अंतिम फ़ेरीत एक क्षण असा आला की आमच्या क्वीझचे सगळे राऊंडस संपले होते आणि आमची चमू आणि पराग व अभिनवची चमू टायब्रेकर मध्ये आली. आता संकेत एकच प्रश्न विचारणार होता. सगळ्यात पहिल्यांदा समोरचा बझर दाबून त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देणारी चमू त्यावर्षीची विजेती चमू ठरणार होती.
संकेतने प्रश्न विचारायला सुरूवात केली. स्टेजवर आनंद सिनेमातले "मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने" हे गाणे वाजले. संकेतचा प्रश्न होता "या गीताचे संगीतकार ओळखा." मी एका इम्पल्सने पटकन बझर दाबला आणि उत्तर दिले "सलील चौधरी". अगदी खरे सांगतो. त्याक्षणी हे उत्तर माझ्या डोक्यात कसे आले ? हे मलाही कळले नाही. मी इतका पटकन बझर दाबून खूप जलद उत्तर दिलेले होते. उत्तर अर्थातच बरोबर होते. आमची जोडी पहिल्याच वर्षी ही स्पर्धा जिंकलेली होती. दिग्गज खेळाडूंना हरवून. आमच्या बाजूने जल्लोष सुरू झाला होता. पराग आणि अभिनवने अत्यंत खिलाडू वृत्तीने स्टेजवरच आमचे अगदी मनापासून अभिनंदन केले. परागने तर मला उचलूनच घेतले होते. सर्वत्र अगदी आनंदीआनंद होता.
आज मी त्या क्षणाच्या माझ्या मॅडनेस मागची मेथड शोधतो तेव्हा माझे मलाच अनेक दुवे जुळून आलेले दिसतात. त्या मॅडनेस मागची मेथड मला आज दिसू लागते. नागपूरला टेलीव्हिजन आल्यानंतर त्यावर आलेला पहिला बॉलीवुड चित्रपट म्हणजे "आनंद". आमच्या वडिलांच्या एका स्नेह्याच्या घरी रविवारी संध्याकाळी जाऊन आम्ही हा चित्रपट बघितलेला होता. तो चित्रपट तेव्हा मला फ़ारसा आवडला नव्हता. एकतर अमिताभ बच्चन असणार म्हणजे चित्रपटात छान फ़ायटिंग वगैरे असणार या बालसुलभ अपेक्षेने आम्ही हा चित्रपट बघायला गेलो होतो. पण यात अजिबात फ़ायटिंग नाही. त्यात अमिताभ हा साईड हिरो आणि मुख्य हिरो म्हणजे रडका राजेश खन्ना. त्यातही या चित्रपटाची कथा शोकांत, रडकी. हा चित्रपट आम्हा लहान मुलांना आवडण्याजोगे असे त्यात काहीही नव्हते.
बरे त्याकाळी संगीत वगैरे अजिबातच कळत नव्हते. आजसारखा इंटरनेटचा प्रसार नव्हता त्यामुळे एखाद्या चित्रपटाचे गीतकार - संगीतकार हे बिनाका गीतमाला वगैरे रेडियोंच्या कार्यक्रमांमधून किंवा छायागीत , चित्रहार, रंगोली या दूरदर्शनवरी; कार्यक्रमांमधूनच कळायचेत. तेव्हाही हे गीत यातला कुठल्याही कार्यक्रमांमध्ये बघितल्याचे, ऐकल्याचे मला अजिबात आठवत नव्हते. घरी रेकॉर्ड प्लेयर किंवा रेडियो किंवा टेप रेकॉर्डर असण्याची सुबत्ता नव्हतीच. त्यामुळे या चित्रपटाच्या रेकॉर्ड्स कॅसेस वगैरेंशी संबंध आलेला नव्हता. फ़क्त हा चित्रपट एका बंगाली माणसावर आधारित आहे हे धूसरसे आठवत होते. आणि बंगाली जनतेमध्ये चौधुरी हे आडनाव असते हे सामान्य ज्ञान पक्के होते. तसे चौधरी हे नाव महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात असते हे माहिती होते पण सलील हे नाव फ़क्त मराठी आणि बंगाली लोकांमध्ये ऐकले होते. म्हणून लगेच "सलील चौधरी" हे उत्तर माझ्या तोंडातून बाहेर पडले. आणि आम्ही टायब्रेकर जिंकून क्वीझ जिंकलेलो होतो.
आज हे लिहायला, वाचायला जेव्हढा वेळ लागतोय त्यापेक्षा एक शतांश वेळात ही प्रक्रिया माझ्या मेंदूत पूर्ण झालेली होती. वरवर बघता तो मॅडनेस, इम्पल्सिव्ह डिसीजन वाटले होते तरी त्यामागे एक निश्चित मेथड होती हे आज जाणवतेय. स्वतःचा स्वतःच्या निर्णयक्षमतेचा असा स्वतःलाच शोध लागला की मनाला एक वेगळेच समाधान मिळते, हो, नं ?
- स्वतःचाच निरंतर शोध घेणारा, प्रत्येक मॅडनेसमध्ये मेथड शोधणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
२० जानेवारी २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
No comments:
Post a Comment