परवा नागपुरातले एक प्रथितयश डॉक्टर आणि माझे वर्गमित्र डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांना अचानक दैवगती प्राप्त झाली. संपूर्ण नागपूर हळहळले. कारण अशा व्यक्ती केवळ एक व्यक्ती नसतात तर स्वतःच्या क्षेत्रातल्या ज्ञानामुळे त्या त्या व्यक्ती एक संस्था बनतात. अशा व्यक्तींचे काळाच्या पडद्याआड जाणे म्हणजे एक संपूर्ण संस्था नष्ट होण्यासारखे असते. संपूर्ण समाजाचे त्यामुळे नुकसान होते. स्वतः एक निष्णात सर्जन असतानाही त्यांना स्वतःच्या शरीरातील व्याधीचा वेध का घेता आला नाही ? म्हणून समस्त नागपूरकर आतून कुठेतरी हलले.
पण त्यानंतर फ़ेसबुकवर, व्हॉटस ॲपवर, इन्स्टाग्रामवर डॉक्टरी सल्ल्याच्या रील्सचा महापूर आला. तसा तो महापूर फ़ार पूर्वीपासून होता पण यानिमित्ताने यातल्याच जुन्या जुन्या रील्स पुन्हा आपापल्या फ़ीड्सवर दिसू लागल्यात. फ़ेसबुक आणि तत्सम ॲप्स वापरताना आपण खूप प्रकारच्या परमिशन्स त्यांना देत असतो. त्यामुळे आपण सहज कुणाशी चर्चा करीत असताना आपले बोलणे या ॲप्सने ऐकून त्याअनुषंगाने आपल्या फ़ीडवर तशा रील्स दाखवणे हे आपण अंगिकारले आहे.
पूर्वी "आजीबाईचा बटवा" म्हणून एक संकल्पना होती. मला आठवतय कालनिर्णय सारख्या कॅलेंडरच्या देखील मागील पानांवर "आजीबाईचा बटवा" असे सदर असायचे. त्यात आपल्या दैनंदिन डोकेदुखी, अंगदुखी, ताप, मळमळ सारख्या ऋतूमानबदलामुळे होणा-या सर्वसाधारण आजारांवर आपल्या घरीच उपलब्ध असलेला भाजीपाला, मुळ्या यांचा वापर कसा करावा ? याचे उपाय सुचवले असत. आपण अगदी छोट्याछोट्या आजारांच्या लक्षणांमुळे घाबरून न जाता आपल्या डॉक्टरांकडे गर्दी करू नये हा हेतूच त्यात असायचा. आपल्या आजीच्या काळात समाजात वृद्ध व्यक्तींना असलेले थोडे निसर्गोपचाराचे ज्ञान असे समाजाच्या उपयोगी येत असे. आणि हे छोट्याछोट्या आजारांपुरतेच मर्यादित असायचे.
आज सोशल मिडीयाच्या वापराचा अक्षरशः विस्फ़ोट आणि विस्कोट झालेला आहे. छोट्या वॉशिंग्टनच्या हातात कु-हाड आल्यानंतर तो ती कु-हाड सगळ्या झाडांवर चालवत सुटला होता तसे या सोशल मिडीयाच्या बाबतीत आपले झालेले आहे. आपल्या ओळखीपाळखीतल्या कुणी "मला माझ्या तब्येतीबाबत अमुक अमुक लक्षणे दिसत आहेत." असे नुसती सांगायची खोटी की आपण आजवर व्हॉटस ॲप विद्यापीठातून मिळालेले सगळे असले नसलेले ज्ञान त्याच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करतो.
"मी काय म्हणतो बाबुराव, तुम्ही रोज सकाळी स्प्राऊटस खायला सुरूवात करा."
"अरे, कसले ते स्प्राऊटस ! तुम्ही रोज फ़क्त ओट्सचा नाश्ता करा. बघा महिन्याभरात तुमची पोटाची व्याधी छूमंतर."
"डायबिटीस समूळ जाण्यासाठी रोज कारल्याचा रस घ्या. नाहीतर त्यात कडूलिंबाचा पाला घालून रोज सकाळी उपाशीपोटी प्या."
"अहो, कसले कडूलिंब आणि कारले घेऊन बसलेत रामभाऊ. डायबिटीस वर एकच उपाय. सकाळ संध्याकाळी फ़िरणे. ते ही चांगले ७ - ८ किलोमीटर."
ही आणि असली संभाषणे मी याची देही याची कानी ऐकलेली आहेत. या सगळ्या उपदेशांमागचा हेतू अत्यंत प्रामाणिक असतो. आपल्याकडे प्रकृतीची कुरबूर घेऊन आलेल्या माणसाला आपल्या ऐकीव माहितीचा काही फ़ायदा झाला तर बरे. त्या व्यक्तीला लवकर बरे वाटावे असाच उदात्त हेतू या सगळ्या सल्ल्यांमागे असतो. श्रीसमर्थांच्या "जे जे आपणास ठावे, ते इतरा सांगावे, शहाणे करून सोडावे, सकल जन." या उक्तीचा आपण फ़ारच अंगीकार केला असल्याचे हे द्योतक आहे. पण हे असे ऐकीव सल्ले घातक आहेत. हो अगदी नैसर्गिक असले तरीही घातक आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी असते. प्रत्येकाला एकच औषध लागू होईल असे नाही. त्यामुळे ह्या क्षेत्रातल्या जाणकार वैद्याला प्रकृती दाखवणे आणि त्याच निष्णात वैद्यांच्या सल्ल्यानेच कुठलीही औषधे घेणे हे कायम श्रेयस्कर आहे.
श्रीगुरूचरित्रात विवेचन केलेले आहे की नाडीपरिक्षा (म्हणजे आजच्या आधुनिक वैद्यकात संपूर्ण वैद्यकीय तपासणी) केल्याशिवाय जी व्यक्ती औषध सुचवते, ती अत्यंत पापाचा धनी असते. लक्षात घ्या आपल्या समाजात सुदैवाने अजूनही उत्तम वैद्य डॉक्टरांची संख्या खूप आहे. त्यामुळे आपण जर आपण सश्रद्ध व्यक्ती असू, आपल्या गुरूमहाराजांच्या उपदेशाला, आपल्या धर्मग्रथांना मानत असू तर स्वतःबाबत आणि इतरांबाबतही असे झटपट रोगनिदान टाळूयात. याउलट आपल्याला ज्ञात असलेल्या या क्षेत्रातल्या जाणकार वैद्य डॉक्टरांची भेट त्या व्यक्तीला घालून देऊयात आणि तिच्या रोगमुक्त होण्यासाठी आपल्या रोजच्या प्रार्थनेत त्या व्यक्तीसाठी २ मिनीटे का होईना जादा प्रार्थना करूयात.
बाय द वे, सध्या वाढलेल्या थंडीमुळे अचानक डोके धरून येण्यावर उपाय कुठला हो ? सांगाल का मला ? गेले ४ दिवस या थंडीमुळे होणा-या डोकेदुखीपायी अगदी हैराण झालोय बघा.
- प्रत्येक धड्याशेवटी विद्यार्थ्यांची एक छोटीशी का होईना पण परिक्षा घेणारा एक हाडाचा शिक्षक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
४ जानेवारी २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
No comments:
Post a Comment