यापूर्वीचे भाग इथे वाचा.
दक्षिण दिग्विजय : भाग १ नागपूर ते चेन्नई
दक्षिण दिग्विजय : २ (चेन्नई ते मदुराई)
२ डिसेंबर २००८
पहाटे ४ : ३० ला म्हणजे नियोजित वेळेआधी तब्बल १ तास आम्ही कन्याकुमारीजवळील नागरकोईल नावाच्या स्टेशनवर सहकुटुंब उतरलो. नियोजन केल्याप्रमाणे रेल्वेच्या प्रथम वर्गात निवांत झोप झालेली होती आणि पॅसेंजर गाडीचा प्रथम वर्ग असल्याने खिशाला भुर्दंड पण फ़ारसा बसलेला नव्हता. अनोळखी प्रदेश, अनोळखी गाव. हिवाळा ऋतू त्यामुळे सूर्यदर्शन अंमळ उशीरा होणार त्यामुळे इथून आता कन्याकुमारी कसे गाठायचे ? हा एक प्रश्न होता.
आम्हाला इथपर्यंत आणणारी गाडी आता दिशा बदलून क्विलोन च्या दिशेने रवाना झालेली होती. आमच्यासोबत ७ वर्षाची आमची लेक आता पेंगुळत होती. मी स्टेशनच्या बाहेर गेलो आणि एक भला टॅक्सीवाला मला भेटला. त्याने नागरकोईल स्टेशन ते कन्याकुमारी आम्हाला नेण्याचे कबूल केले. भाडेही अगदी वाजवी घेत होता. आम्ही त्याच्या टॅक्सीने जाण्याचा निर्णय घेतला.
पहाटेच्या सुखद गारव्यात आमची टॅक्सी नागरकोईल ते कन्याकुमारी हा प्रवास करायला लागलोत. मस्त आणि प्रशस्त ॲंबेसेडर टॅक्सी होती. या गाडीत फ़ार बालपणी आम्ही आमच्या आजोळी भरपूर प्रवास केलेला होता पण जाणते झाल्यावर आणि गाड्यांमधली लेगरूम, हेडरूम, सस्पेन्शन्स या संज्ञा कळायला लागल्यानंतरचा हा पहिलाच प्रवास. अगदी राजेशाही थाटाने प्रवास करतोय हे जाणवत होते.
डिसेंबर महिना असूनही हा परिसर समुद्राला जवळ असल्याने गारठा नव्हता. सुखद, गुलाबी थंडी मात्र होती. साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही कन्याकुमारी शहरात दाखल झालो. गाडीनेच आम्ही थोडी हॉटेल्स शोधलीत आणि त्यातल्याच एका ठिकाणी ठिय्या ठोकण्याचा निर्णय घेतला. त्या टॅक्सीवाल्यालाच दिवसभरच्या कन्याकुमारी दर्शनसाठी विचारले तो सुद्धा अगदी रास्त भावात आम्हाला कन्याकुमारी दाखविण्यासाठी तयार झाला.
हॉटेलमध्ये जाऊन थोडी विश्रांती घेतली. आमचे कन्यारत्न तर पेंगुळले होतेच पण आम्ही दोघांनीही आमच्या हॉटेलरूमच्या समुद्राकडल्या खिडकीतून त्या दिवशीचा सूर्योदय बघितला. अगदी मंत्रमुग्ध होऊन आम्ही दोघेही ते दृश्य बघत होतो. "डोळ्यांचे पारणे फ़िटणे" या वाक्प्रचाराची अनुभूती येण्याचा तो क्षण. कॅमे-यानेही तो क्षण टिपला पण डोळ्यांनी जे बघितले त्याची अनुभूती कॅमे-याला कशी येणार ? काही मिनीटे निःशब्द होऊन, हातात हात गुंफ़ून आम्ही तो क्षण बघत होतो. आज आमच्या लग्नाचा ८ वा वाढदिवस होता. तो दिवस अशा एका अदभूत क्षणाने सुरू होऊन साजरा होणार होता याची कल्पना आम्हा दोघांनाही नव्हती.
- स्वपत्नीत, तिच्या आनंदात, तिच्या सुखदुःखात फ़ार म्हणजे फ़ारच गुंतलेला वैभवीरमणा गोविंदा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
२२ जानेवारी २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
No comments:
Post a Comment