Saturday, January 24, 2026

दक्षिण दिग्विजय : ५ सुचिंद्रम आणि मेणपुतळ्यांचे संग्रहालय

 यापूर्वीचे भाग इथे  वाचा

दक्षिण दिग्विजय : भाग १ नागपूर ते चेन्नई

दक्षिण दिग्विजय : २ (चेन्नई ते मदुराई)

दक्षिण दिग्विजय : ३ (मदुराई - रामेश्वरम - मदुराई - कन्याकुमारी.)

रेल्वेच्या एका दुर्मिळ वर्गातून प्रवास.

दक्षिण दिग्विजय : ४ कन्याकुमारी - सूर्योदय


२ / १२ / २००८

ठरविल्याप्रमाणे ते टॅक्सीवाले बंधू सकाळी ८ च्या सुमारास आमच्या हॉटेलसमोर आलेत. मस्त प्रशस्त ॲंबेसेडर टॅक्सीत बसून आमचे कन्याकुमारी दर्शन सुरू झाले. ते बंधू आम्हाला कन्याकुमारीपासून जवळपास १५ किलोमीटर असलेल्या सुचिंद्रम मंदिरात घेऊन गेलेत. दक्षिण भारतातल्या अनेक सुंदर मंदिरांसारखे एक सुंदर, स्वच्छ आणि नेटके मंदिर. मंदिरालगत मोठी पुष्करिणी होती. हनुमंताने लंका जाळून परत भारतभूमीकडे उड्डाण केल्यानंतर आपले जळालेले पुच्छ याच पुष्करिणीत विझवले अशी येथे मान्यता आहे. ज्या ठिकाणी आपण पर्यटनाला जातो तेथील मान्यता समजून घेण्यात, मान्य करण्यात शहाणपणा असतो असे मी कायम मानत आलेलो आहे. त्यामुळे हंपीत गेल्यावर हनुमंताचे जन्मगाव तिथल्याच एखाद्या पर्वतरांगांवर आहे आणि नाशिकजवळील अंजनेरी पर्वतावर पण हनुमंताचे जन्मस्थान आहे या दोन्हीही समजूती मला मान्य असतात. नक्की ठिकाण कुठले ? याच्या वादात पडून आपली प्रखर मते मांडण्यापेक्षा श्रीरामकथेने भारतवर्ष अगदी अयोध्येपासून रामटेक - नाशिक - किष्कींधा (हंपी) - सुचिंद्रम - श्रीलंका कसे बांधले गेलेले आहे, कसे भारले गेलेले आहे हे अनुभवण्यात मला धन्यता असते. या मंदिरात हनुमंताचा विशालकाय असा विग्रह आहे आणि तिथे त्याच्या पुच्छाला भाविकांकडून ज्वलनदाह शांत करण्यासाठी लोणी लावले जात असते. अर्थात तिथे प्रकाशचित्र काढण्यास मनाई असल्याने आम्ही मंदिराच्या आत प्रकाशचित्र काढू शकलो नाही पण तो विशालकाय विग्रह आणि भाविकांचे पाच हजार वर्षांपासूनचे आपल्या भगवंतावरचे प्रेम यापुढे आम्ही नतमस्तक मात्र नक्कीच झालोच.




सुचिंद्रम मंदिराबाहेर दक्षिणेतील इतर सर्व मंदिरांबाहेर असतात तशी हार फ़ुले गज-याची रेलचेल होती. स्वपत्नीसाठी गजरा घेणे झाले. लग्नाचा वाढदिवस होता. मग कन्यारत्नानेही गज-यासाठी हट्ट धरला. तिचाही हट्ट पुरवला गेला. भारतभर आणखी एक साम्य. सर्वत्रच छोट्या छोट्या मुली आपल्या केसांपेक्षा मोठा गजरा माळून त्याला आपल्या केसांपेक्षा चेहे-यावर मिरवण्यात धन्यता मानतात. अगदी बंगाल पासून गुजरात पर्यंत आणि काश्मिर पर्यंत अगदी एकच पॅटर्न. आमचे कन्यारत्न याला अपवाद नव्हते.



बरे ज्या सुचिंद्रम मंदिरात गेलो हे हनुमंताचे मंदिर नाहीच मुळी. ते आहे भगवान शंकराचे मंदिर. भगवान शंकर वर म्हणून प्राप्त व्हावेत हा हट्ट धरून भारताच्या दक्षिण टोकाला तप करीत बसलेली कन्याकुमारी. तिच्या प्रेमासाठी, तिच्यासह विवाहासाठी भगवान शंकर थेट कैलासावरून निघालेत आणि इतक्या जवळ येऊन कुठल्यातरी भक्ताच्या हाकेत, भाकेत गुंतल्यामुळे इथेच स्थायिक झालेत. कन्याकुमारीपर्यंत पोहोचलेच नाहीत. "So near yet so far" अशी अवस्था. ती आजही भारताच्या दक्षिण टोकाला त्यांच्याशी लग्न होईल याची वाट बघत कुमारी आहे. आणि हे सुचिंद्रम भक्तकामकल्पद्रुम बनून इथे आपल्या भक्तांच्या मनोकामना पुरवताहेत. किती रोमॅंटिक कल्पना ! "स्वप्नातल्या कळ्यांनो. उमलू नकाच केव्हा" ह्यातल्या रोमॅंटिसिझम ज्याला कळला त्यालाच हा सुचिंद्रम आणि कन्याकुमारीमधले फ़क्त १५ किलोमीटर अंतरावरचे अपु्रे अव्यक्त प्रेम यातला रोमॅंटिसिझम कळेल.



मनसोक्त दर्शन झाले. भारावलेल्या मनःस्थितीतच आम्ही बाहेर पडलोत. मध्ये एका "सर्वाणा भवन" मध्ये जेवण झाले. अर्थातच दक्षिणी पद्धतीचे, शुद्ध शाकाहारी. जिथे जावे तिथले तिथले स्थानिक पदार्थ खाऊन बघावेत. उगाच दक्षिण भारताच्या प्रवासाला जायचे आणि तिथे आपल्यासारखे पोळ्या आणि पिठले मिळाले नाही म्हणून परतल्यावर मित्र आणि नातेवाईकांमध्ये गळे काढायचे हे मला मान्य नाही. म्हणून "आम्ही काश्मीरला डाल लेकमध्ये पुरणपोळीचे जेवण आमच्या पर्यटकांना दिले" आणि "अहो, कन्याकुमारीला आमच्या पर्यटकांचा श्रीखंड पुरीचा बेत रंगला" अशा जाहिराती करणा-या पर्यटन संस्थेशी आमचे गोत्र जुळतच नाही. अरे लेको. श्रीखंड पुरी, पुरणपोळीच खायची असेल तर ती आपल्या घरीच खा ना. तिरूवनंतपुरमला जाऊन तिथले नारळाच्या तेलातले मलबारी पराठे आणि अमृतसरला जाऊन तिथले सुद्ध देसी घी मधले थबथबलेले अमृतसरी प्राठे खाल्लेच नाहीत तर तो तो प्रांत तुम्ही काय अनुभवला ! एखादा पदार्थ आपल्या सवयीचा नसेल पण तो तिथल्या तिथल्या हवा पाण्यासाठी उत्तम आणि उत्कृष्ट असतो. हे असे पदार्थ तिथल्या तिथल्या वातावरणात खाऊन बघितलेत तर प्रवास संपल्यानंतर पोट बिघडून आजारी पडण्याची वेळ येत नाही.


कन्याकुमारी देवीचे दर्शन आणि स्वामी विवेकानंद स्मारक शिळेवर नावेने जाऊन दर्शन हे आमच्या उद्याच्या कार्यक्रमात होते. आज ते बंधू आम्हाला तिथल्या मेणपुतळ्यांच्या संग्रहालयात घेऊन गेलेत. कन्याकुमारीत अरबी समुद्र किना-यावर पश्चिमेला असलेले हे ठिकाण (तेव्हा तरी) फ़ारसे प्रसिद्ध नव्हते. गर्दी अजिबात नव्हती. पुतळ्यांचा दर्जा आणि स्वरूपता अगदी वाखाणण्याजोगी होती. आम्ही तिथे भरपूर प्रकाशचित्रे घेतलीत. काही छान काही थोडी आगाऊसुद्धा. मजा मजा करायची हे धोरण होतेच.









सकाळी आम्ही आमच्या हॉटेलच्या खोलीतून बंगालच्या उपसागरावरून होणारा अविस्मरणीय सूर्योदय बघितला होता. संध्याकाळी तोच सूर्य अरबी समुद्रात बुडताना बघण्यासाठी आम्ही पश्चिम किना-यावर गेलोत. एकाच गावात एका समुद्रातून सूर्योदय आणि दुस-या समुद्रात सूर्यास्त बघायला मिळणे हे अगदी दुर्मिळ असते. ती दूर्मिळ पर्वणी आम्ही साधली.








आजचा दिवस अगदी अविस्मरणीय. ज्या आपल्या कुटुंबियांना आनंदी ठेवण्यासाठी मनुष्य आयुष्यभर झटत असतो, त्यांच्या चेहे-यावरचा आनंद बघणे ही एखाद्या गृहस्थासाठी सर्वोच्च समाधानाची परमावधी असते. तो आनंद, ते समाधान कुठेही विकत घेता येऊ शकत नाही आणि कितीही पैशांच्या राशी ओतल्यात ते विकत मिळत नाही. 





- सर्वोच्च समाधानी गृहस्थ, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


२३ जानेवारी २०२६ 


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


No comments:

Post a Comment