Tuesday, January 5, 2016

मनाचे श्लोक - ३



मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे
मना बोलणे नीच सोशीत जावे
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे
मना सर्व लोकांसी रे नीववावे  II ७ II 


आपला व्यवहारातला असा अनुभव आहे की आपण सात्विकपणे वागायला गेलो की हे जग जणू आपली परीक्षाच पहायला येत असत. संत कबीराचा छान दोहा आहे.
" मुझे जो कराना था पथ पार
बिठाये उसपर भूत पिशाच्च
रचाये उसमे गहरे गर्न
और फ़िर करने आया जॉच.

त्यामुळे समर्थांच्या उपदेशानुसार सत्वगुणाच्या आश्रयाने आपण एकदा रज आणि तमोगुणांचा नाश करण्याचे ठरवल्यानंतर आपल्या निर्धाराची परीक्षा पहाणा-या गोष्टी घडू लागतात. अशा वेळी या सर्व त्या प्रभू श्रीरामचंद्राच्याच इच्छेनेच घडताहेत हे जाणून थोडा धीर साधकाने धरायला हवा. असे हे धारिष्ट्य आपण दाखवायला हवे आणि एखाद्या कुणाचे टोचून बोलणेही (अगदी विनाकारण असले) तरी दुर्लक्षित करून सोसायला हवे. श्री गजानन विजय ग्रंथात १९ व्या अध्यायात परमेश्वराकडे जाणारे विविध मार्ग, पट्टशिष्य बाळाभाऊंना समजावून सांगताना, श्री गजानन महाराज पण दुस-या कुणालाही न दुखावण्याचा, दुरूत्तरे न देण्याचा उपदेश करतात . "ही माझी परीक्षा आहे आणि प्रत्यक्ष परमेश्वर परीक्षक आहे."  हा भाव मनी असेल तर अशा घटनांचा मनावर फ़ार परिणाम आपण होऊ देणार नाही. आणि मग स्वाभाविकच एका साधकाच्या वागण्यात अकृत्रिम नम्रता येइल आणि तो सर्व जनांत प्रिय होईल. प.पू. ब्रम्हचैतन्य महाराज म्हणतात की " असे जनप्रियत्व असलेला भक्त मला फ़ार आवडतो."


देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी
मना सज्जना हेचि क्रिया धरावी
मना चंदनाचे परी त्वा झिजावे
परी अंतरी सज्जना नीववावे  II ८ II 



या जगात हा अशाश्वत देह सोडून केव्हा ना केव्हा परत जायचे आहे हे ठरलेच आहे. मग या जगात असेपर्यंत चांगलीच कर्मे का करू नयेत ? देहत्यागानंतर आपली चांगली कीर्ती मागे उरायला हवी. अशा पद्धतीची चांगली कर्मे आपल्या हातून झालीत तर हे जग सकल प्राणीमात्रांसाठी किती छान जागा होईल नाही ? श्री समर्थ आपल्या सगळ्यांना चंदनाप्रमाणे जनसेवेत झिजायचा उपदेश करताहेत. चंदन स्वतः झिजून झिजून गेले तरी ते सकल जीवांच्या सान्निध्यात आल्यावर, त्यांच्या कपाळी, अंगावर लागल्यानंतर त्या जीवाला शांत करणारा थंडावा प्रदान करीत असते. त्याप्रमाणे आपले सर्वांचे जीवन असावे असे श्री समर्थ आग्रहाने प्रतिपादन करताहेत. आपण जनसेवेत झिजलो तरी मनात याबद्द्ल गर्व नसावा उलट हे नित्यकर्तव्य समजून त्या सेवाकार्यायोगे सकल जीवांना आनंद प्रदान व्हावा असे आपले जीवन असावे असे श्री समर्थ सांगताहेत.

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे
अती स्वार्थबुद्धी न रे पाप साचे
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे
न होता मनासारिखे दुःख मोठे  II ९ II



आज कलियुगात आपली भौतिक गोष्टींसाठी सगळी धाव हळूहळू हावेत बदलली आहे. अधिक हवे, अधिक हवे या हवेहवेपणाच्या शर्यतीत आपणा सर्वांच्या पापपुण्याच्या कल्पनाच बोथट होत जात आहेत आणि त्याची आपणा सर्वांना कल्पनाही नाही असे भीषण चित्र आहे.श्री समर्थ हे बघू शकत नाहीयेत आणि आपल्याला सावध करताहेत. आपल्या पूर्वजांचे काही तरी द्रव्य आपल्याला मिळावे अशी स्वार्थबुद्धी पापाला जन्म देते. आणि कर्माच्या सिद्धांतानुसार केलेले कर्म हे भोगावे लागणारच आहे. आपण कितीही सर्व दुनियेपासून लपून पाप कर्म केले असेल पण आपल्या अंतर्मनाला सगळे पाप पुण्य माहिती असतात. आणि म्हणूनच आपले मनच आपल्याला योग्य वेळी आपल्याही नकळत त्या कर्माची शिक्षा देत असते. जे कर्म केल्यावर आपले मन दुःखी कष्टी होते ते कर्म साहजिकच पापकर्म समजायला हवे आणि मनालाच दुःख होणारी पापकर्मे करू नयेत असे श्री समर्थ सुचवताहेत.

                                                             II जय  जय रघुवीर समर्थ II

No comments:

Post a Comment