Tuesday, June 18, 2019

डबल डेकर

सगळीच मुले बालपणी बसगाड्यांची आणि रेल्वेची फॅन्स असतात. आमच्यासारखे काही हे वेड अगदी तारूण्यात आणि जख्ख वृध्दापकाळातही जपून ठेवतात. या दोन प्रेयस्यांसाठी मनाचा एक कोपरा कायम राखीव असतो. आम्हा सर्वांना बसगाड्या एकाहून एक देखण्या दिसतात .आणि "सगळ्या बसेस तर मेल्या सारख्याच दिसतात. त्यात काय एव्हढ वळून वळून बघायचय ?" या सहप्रवाशांच्या प्रश्नाला आमच्याकडे उत्तर नसत.

आणि त्यात डबलडेकर बस म्हणजे आकर्षणाचा परमोच्च बिंदू. बालपणी मावशीकडे मुंबईत गेल्यावर डबलडेकर मध्ये बसल्याच्या धूसर आठवणींना १९९५ मध्ये नोकरीसाठी मुंबईत आल्यानंतर पुन्हा सुवर्णझळाळी मिळाली. सुटी मिळाली आणि दक्षिण मुंबईत जाण्याचा योग आला की कुलाब्यापर्यंत आणि परत बोरीबंदरपर्यंत निरर्थक, निरूद्देश प्रवास याच डबलडेकर बसने आम्ही करत असू. त्यातही वरच्या मजल्यावर सगळ्यात समोरची सीट मिळाली तर आनंद काय वर्णावा ! आपण चक्रधर आहोत आणि आपला रथ जमिनीपासून सहस्रांगुळे वरून हाकतोय असलाच तो अवर्णनीय आनंद. मला मुंबई खूप आवडते पण डबलडेकरच्या वरच्या मजल्यावर समोरच्या सीटवरून मुंबई अगदी अप्सरेसारखी दिसते. लग्नानंतर पत्नीसोबत मुंबईत फिरताना हा प्रवास आम्ही जोडीने करून बघितला आणि सहजीवनात हे क्षण अगदी वेचून ठेवलेत.

मध्ये २०१४ साली सोलापुरातही भय्या चौक ते जुळे सोलापूर ते विमानतळ या मार्गावर सोलापूर मनपा ची डबलडेकर दिसली होती. मी लगेच तिला कॅमेर्‍यात पकडून इथे सगळ्यांसाठी डकवली होती. खूप जुनी प्रेयसी आयुष्यात पुन्हा भेटण्याचाच तो क्षण. तसही सोलापूर मनपाच्या बससेवेविषयी माझे मत थेट १९७८ च्या इथल्या पहिल्या भेटीपासूनच खूप चांगले आहे.


सोलापूर मनपाच्या शहर बस सेवेत असलेली ही डबलडेकर. रंगभवन चौक ते विमानतळ (मार्गे जुळे सोलापूर) मार्गावर सेवा देताना. इसवी सन २०१३ .


सोलापूर मनपाच्या शहर बस सेवेत असलेली ही डबलडेकर. रंगभवन चौक ते विमानतळ (मार्गे जुळे सोलापूर) मार्गावर सेवा देताना. इसवी सन २०१३ .
आज हे सगळ आठवण्याचे कारण म्हणजे आमचे तेलंगी बसफॅन मित्र श्री. Vamshi Krishna R यांनी अगदी पहाटेपहाटे नागपूरच्या रेल्वे आणि बसेसचे १९८० च्या उत्तर दशकातले दुर्मिळाहून दुर्मिळ फोटोज मला मेसेज केलेत. आणि मी पुन्हा मनाने १९८७ -८९ मध्ये शिकत असतानाच्या काळात गेलो.

नागपूर शहर बस वाहतुकीत या काळात काही वषे महाराष्ट्र राज्य एस. टी. कडे २ डबलडेकर बसेस होत्या. MCU 9804 आणि MCU 9805. MCU या ठाणे पासिंगच्या त्या का होत्या ? कोण जाणे ? मला वाटत की त्या नवीन मुंबईत अॅण्टोनी गॅरेजने बांधलेल्या असाव्यात आणि अगदी १९९६—९७ पर्यंत नवीन मुंबईच्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन ठाण्याच्या नंबरनेच व्हायचे. MH -43 ही एक आधुनिक बाब आहे.

मला आठवत की मी ११ वीत असताना रघुजीनगर ते मोरभवन बर्डी या मार्गावर या डबलडेकर धावायच्यात. सक्करदरा बाजार — हनुमान नगर — मेडीकल काॅलेज — टीबी वाॅर्ड — अजनी — काँग्रेसनगर — धंतोली — मुंजे चौक — झाशीराणी चौक मार्गे.

शाळेसाठी आमचा बसप्रवास नंदनवन ते अयाचित मंदीर ते लाॅ काॅलेज ते रवीनगर असा व्हायचा पण या बसमध्ये बसायला मिळाव म्हणून पार रघुजीनगर पर्यंत तंगडतोड करत जायची आमची तयारी असे. बर्डी ला उतरून रवीनगर पर्यंतचा पुढला प्रवास बर्डी — वायुसेनानगर बसने करण्याचे सव्यापसव्य आम्ही करायला तयार असायचो ते केवळ या डबलडेकर मध्ये बसायला मिळाव म्हणून.

डबलडेकरमध्ये तिकीट काढून खालच्या मजल्यावर बसणे म्हणजे बासुंदीसोबत बनपाव खाण्याइतके बावळटपणाचे. नाही, पोट भरेल पण बासुंदी — पुरीची कृतार्थता कशी येईल ? तसच खालच्या मजल्यावरून प्रवास होईल पण त्यात डौल नाही.

मग १९८९ मध्ये अभियांत्रिकी शिक्षणासाठी कराडला गेलो आणि ४ वर्षांसाठी नागपूरचा रोजचा संपर्क तुटला. मध्येमध्ये सुट्यांमध्ये यायचो तर या दोन्हीही बसेस बर्डी — वाडी मार्गावर कष्टकरी बांधवांच्या सेवेसाठी झटताना दिसायच्यात. १९९३ ला केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षांच्या तयारीसाठी वर्षभर नागपुरला होतो तेव्हा त्या कधी गायब झाल्यात कळलच नाही.

डबलडेकरच आयुष्य तस कमीच. एकतर क्षमतेच्या दीड — पावणेदोनपट ओझी निरंतर वाहा आणि एखाद्या पुराणमतवादी कुटुंबात वाढणार्‍या कन्यांप्रमाणे अनेक बंधनांना सामोरे जा. हव्या त्या मार्गाने जाण्याच स्वातंत्र्य दोघींनाही नाही. तिकडे सामाजिक चालीरीती आडव्या येतात तर इकडे शहरातल्या इमारती, पूल आडवे येतात.

शेवटल्या थांब्यावर मोकळ्या मैदानात कुठल्याही अडथळ्याविना वळत असलेली डबलडेकर आणि एखाद्या पुराणमतवादी घरातली सगळी थोर मंडळी घराबाहेर गेल्यानंतर कुठल्याही धाकाविना गुपचूप नट्टापट्टा करून, आरशात पाहून, स्वतःभोवती गिरकी घेणारी नवयौवना मला सारख्याच वाटत आल्यात.



हा फोटो मोरभवन स्थानकात थांबलेल्या MCU 9804 या बसचा. 

२०१४ च्या उन्हाळ्यात माहूरगडावरून पारवा - पांढरकवडा मार्गे नागपूरला जात असताना पांढरकवडा शहराबाहेर दिसलेली ही डबलडेकर. त्यावर्षीच्या आयपीएल इव्हेण्ट प्रमोशन साठी हैद्राबादकडे निघालेली. गडी थांबला होता. निवांत. परवानगी घेऊन आत जाऊन फ़ोटो काढून आलोत.














No comments:

Post a Comment