Showing posts with label Double Decker. Show all posts
Showing posts with label Double Decker. Show all posts

Saturday, December 30, 2023

हंपी ला दिसलेल्या एका आगळ्यावेगळ्या बसची कथा आणि त्यानिमित्ताने भारतीय शयनयान बसेसबद्दलचे एक चिंतन.

होस्पेट - हंपी - होस्पेट अशा फेर्या करणारी कर्नाटक राज्य परिवहनची वैशिष्ट्यपूर्ण शहर बस.


जालंदर येथल्या सतलज मोटर्सने २००५ च्या सुमारास अशी (यापेक्षा थोड्या जास्त उंचीची पण अगदी याच डिझाईनची) डबल डेकर लक्झरी बस आणण्याचा प्रयत्न केला होता. खालच्या मजल्यावर स्लीपर बर्थस आणि पायर्या चढून वर गेल्यानंतर वर बसण्यासाठी सीटस असा तो उपयुक्त थाट होता.
{उपयुक्त अशासाठी की बसचा गुरूत्वमध्य (center of gravity) बसच्या खालच्या भागाजवळ असतो. आणि जेवढे आपण गुरूत्वमध्याजवळ असू तेवढा बसच्या वाटचालीमुळे होणारा त्रास कमी. म्हणूनच सध्याच्या स्लीपर कोच बसमध्ये खालच्या बर्थपेक्षा वरच्या बर्थसवर बसची जास्त हालचाल होते आणि पर्यायाने जास्त त्रास जाणवतो. तसेच समोरून दुसर्या रांगेच्या बर्थसवर सगळ्यात कमी त्रास, त्यानंतर तिसरी रांग, पहिली रांग, चौथी रांग, पाचवी रांग आणि (असल्यास) सहावी रांग असा चढत्या क्रमाने त्रास वाढत जातो. म्हणून जाणकार मंडळी स्लीपर कोचमधे बुकिंग करताना दुसर्या रांगेतल्या खालच्या बर्थसचेच रिझर्वेशन करतात. बुकिंगमध्ये ते बर्थस सगळ्यात आधी संपलेले दिसतात. सतलजच्या या डबलडेकरमध्ये बर्थस खालच्या मजल्यावर असल्याने प्रवाशांना सुखकर झोपेसाठी उपयुक्त ठरणारे होते. वरच्या मजल्यावर जरी बसची हालचाल जास्त जाणवणार असली तरी वर सीटस होत्या आणि आसनांवर बसलेल्या प्रवाशांची एकंदर सावधानता झोपलेल्या प्रवाशांपेक्षा नैसर्गिकरित्याच जास्त असते. हेच जर उलट असते (खालील मजल्यावर आसन व्यवस्था आणि वरच्या मजल्यावर शयनव्यवस्था) तर कठीण होते.}
पण काही अगम्य कारणांनी सतलजची ती कल्पना इथल्या बसकंपन्यांना फारशी पसंत पडली नाही. आणि नंतर सतलजने ती बसच बनविणे बंद केले.
होस्पेट आणि हंपीला ही चित्ताकर्षक बस बघितल्यावर त्या आठवणी ताज्या झाल्यात.

बाकी आम्ही सगळे बसफॅन एकसारखेच. शेजारून एखादी बस आणि सोबतच ऐश्वर्या राय जरी जात असेल तरी आम्ही वळून वळून बसकडेच बघणार. साधी एस टी ची बस आम्हाला "चित्ताकर्षक" वगैरे वाटते, मग असल्या सुंदर बससमोर विश्वसुंदरीची प्रभाही आम्हाला फिकी वाटणारच ना.

- सर्व भारतभरातील एस टी व खाजगी बसेसच्या ग्रुप्समधला एक सक्रिय सदस्य, बसफॅन, रामण्णा हिप्परगिरीकर.

Thursday, November 4, 2021

भारतीय शयनयान बसेसमधले आवश्यक असे बदल.

 खालील फ़ोटोंमध्ये परदेशी बांधणीच्या डबल डेकर बसचे फ़ोटो आहेत.






परदेशी बसेस डबलडेकर असूनही त्यांची उंची जास्त नाही. तेवढी उंची आपल्याकडल्या स्लीपर कोचेसची किंवा आपल्या महाराष्ट्र एस टी ने मधल्या काळात आणलेल्या माईल्ड स्टील बसेसची असतेच असते. (आता पुन्हा आपल्या एस टी ने कमी उंचीच्या माईल्ड स्टील बसेस बांधायला सुरूवात केलीय हे चांगले पाऊल आहे.)


आपल्याकडल्या स्लीपर कोचेसमध्ये वरच्या बर्थसवर चढणे / उतरणे हे स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांना जिकीरीचे होऊन जाते. त्याऐवजी तेवढ्याच उंचीच्या डबलडेकर बसेसमध्ये खालच्या आणि वरच्या अशा दोन्ही मजल्यांवर सगळेच लोअर बर्थ उपलब्ध होतील. शयनक्षमता तेव्हढीच असेल आणि खालच्या मजल्यावर मागील बाजूला प्रवाशांचे सामानसुमान व्यवस्थितपणे रचून ठेवण्यासाठी विमानासारखा कक्षही तिथे उपलब्ध होईल. किंवा खालच्या डेकवर मागल्या बाजूला प्रवाशांसाठी विमानाच्या धर्तीवर एखाद दुसरा प्रसाधनकक्ष (शुध्द मराठीत टाॅयलेट ब्लाॅक) उपलब्ध करून देता येईल. आज बंगलोर ते जोधपूर, पणजी ते इंदूर, पुणे ते गोरखपूर अशा ३५ - ४५ तासांच्या लांब लांब पल्ल्याच्या खाजगी बसेस उपलब्ध होत असताना आरामशीर प्रवास आणि अशी प्रसाधनगृहे उपलब्ध असणार्या बसेस मिळणे हे प्रवाशांसाठी भलतेच सुखकर होईल.

राष्ट्रीय महामार्गांचा निरंतर सुधारणारा दर्जा, मार्गावरील खाण्यापिण्याच्या उत्तम दर्जाच्या सुविधा आणि खंडप्राय धावणार्या अशा बसेस हे तिन्ही घटक भविष्यातली रस्ते वाहतुकीची समीकरणे बदलायला कारणीभूत ठरतील यात शंका नाही.
जागतिकीकरणाचा रेटा पाहिला तर ही संकल्पना भारतात लवकरच येईल यात शंका नाही.

तुम्हाला गंमत वाटेल पण जालंदर येथल्या सतलज मोटर्सने अशी बस SUTLEJ Lexus या माॅडेलच्या रूपात साधारण १२ वर्षांपूर्वीच बाजारात आणलेली होती. पण कालबाह्य संकल्पनेइतकीच काळाच्या खूप पुढे असणारी संकल्पनाही स्वीकारली जात नाही. म्हणून हे माॅडेल तेव्हा यशस्वी ठरले नाही. फारसे कुठे दिसलेच नाही.
पण आज जर असे सगळ्या लोअर बर्थसचे, सुखसुविधाजनक बसचे माॅडेल आले तर ते पटकन लोकप्रिय होईल यात शंका नाही.
- लांब पल्ल्याचे बसप्रवास सतत करणारा प्रवासी पक्षी, राम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, June 18, 2019

डबल डेकर

सगळीच मुले बालपणी बसगाड्यांची आणि रेल्वेची फॅन्स असतात. आमच्यासारखे काही हे वेड अगदी तारूण्यात आणि जख्ख वृध्दापकाळातही जपून ठेवतात. या दोन प्रेयस्यांसाठी मनाचा एक कोपरा कायम राखीव असतो. आम्हा सर्वांना बसगाड्या एकाहून एक देखण्या दिसतात .आणि "सगळ्या बसेस तर मेल्या सारख्याच दिसतात. त्यात काय एव्हढ वळून वळून बघायचय ?" या सहप्रवाशांच्या प्रश्नाला आमच्याकडे उत्तर नसत.

आणि त्यात डबलडेकर बस म्हणजे आकर्षणाचा परमोच्च बिंदू. बालपणी मावशीकडे मुंबईत गेल्यावर डबलडेकर मध्ये बसल्याच्या धूसर आठवणींना १९९५ मध्ये नोकरीसाठी मुंबईत आल्यानंतर पुन्हा सुवर्णझळाळी मिळाली. सुटी मिळाली आणि दक्षिण मुंबईत जाण्याचा योग आला की कुलाब्यापर्यंत आणि परत बोरीबंदरपर्यंत निरर्थक, निरूद्देश प्रवास याच डबलडेकर बसने आम्ही करत असू. त्यातही वरच्या मजल्यावर सगळ्यात समोरची सीट मिळाली तर आनंद काय वर्णावा ! आपण चक्रधर आहोत आणि आपला रथ जमिनीपासून सहस्रांगुळे वरून हाकतोय असलाच तो अवर्णनीय आनंद. मला मुंबई खूप आवडते पण डबलडेकरच्या वरच्या मजल्यावर समोरच्या सीटवरून मुंबई अगदी अप्सरेसारखी दिसते. लग्नानंतर पत्नीसोबत मुंबईत फिरताना हा प्रवास आम्ही जोडीने करून बघितला आणि सहजीवनात हे क्षण अगदी वेचून ठेवलेत.

मध्ये २०१४ साली सोलापुरातही भय्या चौक ते जुळे सोलापूर ते विमानतळ या मार्गावर सोलापूर मनपा ची डबलडेकर दिसली होती. मी लगेच तिला कॅमेर्‍यात पकडून इथे सगळ्यांसाठी डकवली होती. खूप जुनी प्रेयसी आयुष्यात पुन्हा भेटण्याचाच तो क्षण. तसही सोलापूर मनपाच्या बससेवेविषयी माझे मत थेट १९७८ च्या इथल्या पहिल्या भेटीपासूनच खूप चांगले आहे.


सोलापूर मनपाच्या शहर बस सेवेत असलेली ही डबलडेकर. रंगभवन चौक ते विमानतळ (मार्गे जुळे सोलापूर) मार्गावर सेवा देताना. इसवी सन २०१३ .


सोलापूर मनपाच्या शहर बस सेवेत असलेली ही डबलडेकर. रंगभवन चौक ते विमानतळ (मार्गे जुळे सोलापूर) मार्गावर सेवा देताना. इसवी सन २०१३ .
आज हे सगळ आठवण्याचे कारण म्हणजे आमचे तेलंगी बसफॅन मित्र श्री. Vamshi Krishna R यांनी अगदी पहाटेपहाटे नागपूरच्या रेल्वे आणि बसेसचे १९८० च्या उत्तर दशकातले दुर्मिळाहून दुर्मिळ फोटोज मला मेसेज केलेत. आणि मी पुन्हा मनाने १९८७ -८९ मध्ये शिकत असतानाच्या काळात गेलो.

नागपूर शहर बस वाहतुकीत या काळात काही वषे महाराष्ट्र राज्य एस. टी. कडे २ डबलडेकर बसेस होत्या. MCU 9804 आणि MCU 9805. MCU या ठाणे पासिंगच्या त्या का होत्या ? कोण जाणे ? मला वाटत की त्या नवीन मुंबईत अॅण्टोनी गॅरेजने बांधलेल्या असाव्यात आणि अगदी १९९६—९७ पर्यंत नवीन मुंबईच्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन ठाण्याच्या नंबरनेच व्हायचे. MH -43 ही एक आधुनिक बाब आहे.

मला आठवत की मी ११ वीत असताना रघुजीनगर ते मोरभवन बर्डी या मार्गावर या डबलडेकर धावायच्यात. सक्करदरा बाजार — हनुमान नगर — मेडीकल काॅलेज — टीबी वाॅर्ड — अजनी — काँग्रेसनगर — धंतोली — मुंजे चौक — झाशीराणी चौक मार्गे.

शाळेसाठी आमचा बसप्रवास नंदनवन ते अयाचित मंदीर ते लाॅ काॅलेज ते रवीनगर असा व्हायचा पण या बसमध्ये बसायला मिळाव म्हणून पार रघुजीनगर पर्यंत तंगडतोड करत जायची आमची तयारी असे. बर्डी ला उतरून रवीनगर पर्यंतचा पुढला प्रवास बर्डी — वायुसेनानगर बसने करण्याचे सव्यापसव्य आम्ही करायला तयार असायचो ते केवळ या डबलडेकर मध्ये बसायला मिळाव म्हणून.

डबलडेकरमध्ये तिकीट काढून खालच्या मजल्यावर बसणे म्हणजे बासुंदीसोबत बनपाव खाण्याइतके बावळटपणाचे. नाही, पोट भरेल पण बासुंदी — पुरीची कृतार्थता कशी येईल ? तसच खालच्या मजल्यावरून प्रवास होईल पण त्यात डौल नाही.

मग १९८९ मध्ये अभियांत्रिकी शिक्षणासाठी कराडला गेलो आणि ४ वर्षांसाठी नागपूरचा रोजचा संपर्क तुटला. मध्येमध्ये सुट्यांमध्ये यायचो तर या दोन्हीही बसेस बर्डी — वाडी मार्गावर कष्टकरी बांधवांच्या सेवेसाठी झटताना दिसायच्यात. १९९३ ला केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षांच्या तयारीसाठी वर्षभर नागपुरला होतो तेव्हा त्या कधी गायब झाल्यात कळलच नाही.

डबलडेकरच आयुष्य तस कमीच. एकतर क्षमतेच्या दीड — पावणेदोनपट ओझी निरंतर वाहा आणि एखाद्या पुराणमतवादी कुटुंबात वाढणार्‍या कन्यांप्रमाणे अनेक बंधनांना सामोरे जा. हव्या त्या मार्गाने जाण्याच स्वातंत्र्य दोघींनाही नाही. तिकडे सामाजिक चालीरीती आडव्या येतात तर इकडे शहरातल्या इमारती, पूल आडवे येतात.

शेवटल्या थांब्यावर मोकळ्या मैदानात कुठल्याही अडथळ्याविना वळत असलेली डबलडेकर आणि एखाद्या पुराणमतवादी घरातली सगळी थोर मंडळी घराबाहेर गेल्यानंतर कुठल्याही धाकाविना गुपचूप नट्टापट्टा करून, आरशात पाहून, स्वतःभोवती गिरकी घेणारी नवयौवना मला सारख्याच वाटत आल्यात.



हा फोटो मोरभवन स्थानकात थांबलेल्या MCU 9804 या बसचा. 

२०१४ च्या उन्हाळ्यात माहूरगडावरून पारवा - पांढरकवडा मार्गे नागपूरला जात असताना पांढरकवडा शहराबाहेर दिसलेली ही डबलडेकर. त्यावर्षीच्या आयपीएल इव्हेण्ट प्रमोशन साठी हैद्राबादकडे निघालेली. गडी थांबला होता. निवांत. परवानगी घेऊन आत जाऊन फ़ोटो काढून आलोत.