Wednesday, July 31, 2019

एक संवाद




सहज आम्ही आमचे सांगोल्यातले दिवस आठवीत बसलो होतो. खूप दिंड्यांचे दर्शन आषाढीच्या काळात आम्हाला व्हायचे. पंढरपूर अगदी २५ किमी, अर्धा तास. त्यामुळे कधीही सहज विठूमाउलीचे दर्शन व्हायचे. ऑनलाइन दर्शन बुकिंगमुळे तर फ़ारच छान सोय झाली असायची. पै पाहुण्यांसोबतही ब-याच वेळेला माउलीचे दर्शन झाले. सहज चर्चेत सौभाग्यवतींनी विचारले.

सौ. : काय रे. पंढरपूरला रुक्मिणी विठ्ठलापासून लांब का उभी ?

अस्मादिक : अग, ती रुसलीय ना.

सौ. : रुसायला काय झालं ?

अस्मादिक : अग तिचा नवरा भक्तासाठी अठ्ठावीस युगे वाट पहात एका विटेवर उभा आहे. आता समज, आपण कॉलेज कॅम्पसमध्ये फ़िरत असताना माझ्या एखाद्या विद्यार्थ्याने मला काही अभ्यासातला प्रश्न विचारला आणि त्याला समजावून देण्यासाठी मी तुला २८ मिनीटेच तिथे नुसते उभे रहायला सांगून त्याच्या प्रश्नात गुंतलो तर तुला रुसवा येईल की नाही ?

काय सांगू ? मुद्दा चटकन पटला.

Tuesday, July 30, 2019

चिंतनीय काही - २ (समाज जीवनातले आणि समाज मनातले बदल)

२०१२ ते २०१७ ही पाच वर्षे महाराष्ट्रातच, पण निम शहरी भागात गेली. सांगोला आणि शिरपूर ही अनुक्रमे सोलापूर आणि धुळे जिल्ह्यातली तालुक्याची गावे होती. आणि त्यातही दोन्ही ठिकाणी आमचा मुक्काम हा त्या त्या महाविद्यालयांनी दिलेल्या रहिवासात व मुख्य म्हणजे महाविद्यालयाच्या परिसरातच असल्याने नागर जीवनाशी रोजचा संपर्क जवळपास नव्हताच. आठवडा पंधरवाड्याला खरेदी / सिनेमा बघण्यासाठी सांगली, सोलापूर, धुळे, नाशिक किंवा इंदूर इत्यादी शहरांच्या फ़े-या व्हायच्यात, नाही अस नाही पण त्या भेटी फ़ार चुटपुटत्या असायच्यात. समाजजीवनात काय चाललय याचा फ़क्त काठावरून अंदाज यायचा, त्याचे परिणाम फ़ारसे भोगावे लागले नव्हते.

२०१७ मध्ये नागपूर महानगरात पुन्हा एकदा प्रवेशकर्ते झालोत आणि नागर जीवन पुन्हा सुरू झाले. सभा, समारंभ, धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे सुरू झाले आणि जाणवले की गेली साडेचार पाच वर्षे आपण या जीवनापासून बाहेर होतो आणि यात एव्हढे झपाट्याने बदल झालेले आपल्याला दिसले मात्र नाहीत. आश्चर्य, उव्देग, हतबलता या सर्वांचे मिश्रण आमच्या भावनांमध्ये झाले. दहा लोकांमध्ये या गोष्टी बोलाव्या का बोलू नयेत असा प्रश्न बराच काळ पडला होता. कारण ज्या समाजात, मंडळींमध्ये वावरायच आहे, त्यांच्याच मधल्या उणीवांवर बोट ठेवणे माझ्यासारख्या नेमस्त स्वभावाच्या माणसाला जरा अवघड होते. "लोकाचारे वर्तावे, अलौकिक नोहावे" या समर्थ वचनांना जागणारे आम्ही. कशाला उगाच लोकांच्या फ़ाटक्यात पाय घाला ? या विचाराने गप्प बसत होतो. बर पुलंच्या असा मी असामी तले भिकाजीपंत जोशी आपल्या मुलाला धोंडोपंताला उपदेश करतात तो ही आम्हाला अगदी तोंडपाठ. " बेंबट्या, शिंच्या, चार लोक वागतील तसे वागावे. तीर्थात मुंडण आणि कोर्टात भांडण न लाजता करावे." 

पण मग हळूहळू या प्रथा समाजजीवनाचे अभिन्न अंग बनून जायला लागलेल्या पाहिल्यात. आणि हीच जणू आपली संस्कृती असली पाहिजे ही नव्या पिढीची धारणा बघितली आणि श्रीतुकोबा आठवले. 
"सत्य असत्याशी, मन केले ग्वाही, मानियेले नाही, बहुमता" 
आणि मग या प्रकारांना वाचा फ़ोडायची ठरवली. उद्या ही प्रथा समाजात रूढ जरी झाली तरी याविषयी एका व्यक्तीने कधीकाळी क्षीण आवाज उठवला होता याची नोंद होईल. न जाणो, आपल्यासारखे समानधर्मीही अनेक असतील. या वाचा फ़ोडण्यामुळे ते एकत्र येतील आणि हे समाजजीवनाचे चक्र आपण योग्य रीतीने फ़िरायला लावूही शकू म्हणून हा लेखप्रपंच.

आजकाल सगळ्या धार्मिक, सामाजिक समारंभामध्ये मी बघतोय की जमिनीवर मांडी घालून बसणे हे कमीपणाचे लक्षण मानले जायला लागलेय. आजकाल सर्व मुलांना त्यांच्या बालपणापासूनच घरी आणि शाळेतही टेबल-खुर्ची वर बसण्याची सवय असल्याने असेल कदाचित आणि आपण सर्वांनीच जेवणासाठी डायनिंग टेबल चा स्वीकार बिनबोभाट केलाय त्यामुळेही असेल कदाचित पण मांडी घालून, पालखट मारून बसणे आपल्याला जमत नाही आणि कमी दर्जाचे वाटते. बहुतांश सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना हे माहिती असते त्यामुळे बैठक व्यवस्था तशी असतेच पण धार्मिक कार्यक्रमांमध्ये कधी खाली सतरंज्या, गाद्यांवर बसण्याची वेळ आलीच तर जनता नाखुष असते हा माझा आजकालचा अनुभव.

बर ज्या ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे जमत नाही किंवा काही तरूण, मध्यमवयीन मंडळींना काही वैद्यकीय कारणांमुळे जमत नाही त्यांच समजू शकतो पण या प्रकाराचे सरसकटीकरण झालेय हा माझा स्पष्ट आरोप आहे. ज्यांना सहज खाली (सतरंजी , गाद्यांवर वगैरे) बसून कार्यक्रम ऐकणे शक्य आहे ती मंडळी मग अशा शारिरीक व्याधींनी ग्रस्त वृद्ध व तरूण मंडळींसाठी राखीव खुर्च्यांवर पहिल्यांदा बसून जातात आणि ज्याला खरच गरज आहे त्या श्रोत्यांसाठी धावत पळत निराळी व्यवस्था करावी लागण्याचे प्रसंग येतात.

मांडी घालून बसून अभ्यास, जेवण करण्याचे, काही मनन करण्याचे काय फ़ायदे आहेत ? यावर भारतीय आणि पाश्च्यात्यांनी विपुल संशोधन केले आहे पण तरीही खुर्ची आम्हाला इतकी प्रिय का ? या बुचकळ्यात मी पडतो. बहुतेक सर्वपक्षीय राजकारण्यांचा प्रभाव असावा.

जी गोष्ट साध्या बसण्याची तीच संडासची ही. अगदी १० % वृद्ध आणि आजारी मंडळी भारतीय पद्धतीचा संडास वापरू शकत नाहीत हे वास्तव आहे. पण मग सगळ्याच भारतीयांना कमोड सिस्टीमचा संडास सोयीस्कर का वाटायला लागला ? हे मला न उलगडलेले कोडे आहे. भारतीय पद्धतीने उकीडवे बसून मलनि:सारण करण्याच्या पद्धतीमुळे पोटावर व्यवस्थित दाब पडून मलनि:सारण अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि ज्याचा कोठा साफ़ त्याला विविध प्रकारचे आजार जडण्याचा धोका फ़ार कमी असतो हे आयुर्वेदाने सांगितलेले आहे आणि आधुनिक वैद्यकशास्त्रानेही सिद्ध केले आहे आहे. मग हा पाश्चात्यांच्या अंधानुकरणाचा हव्यास का ? नवीन बांधणा-या घरांमधून तर आपण भारतीय बैठकीचा संडास हद्दपार केलेला आहेच पण जुन्या घरांचीही तोडफ़ोड करून कमोड बसवून घेण्याचा हव्यास म्हणजे मला मौज वाटते.

साधारण ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात घरोघरी एक टूम आली होती. एकेकाळी आपल्या घरी असलेली तांब्या पितळेची जुनी मोठमोठाली भांडी मोडीत काढण्याची फ़ॅशनच आली होती म्हणाना. त्या भांड्यांमधे तो तांब्या / पितळेचा पाणी तापविण्याचा बंबही सामील होता. त्या बदल्यात स्वयंपाकासाठी आणि वापरासाठी स्टेनलेस स्टीलची चकचकीत भांडी आपण वापरात आणली. आज ३० वर्षांनी पुन्हा एकदा तांब्याच्या भांड्यांतून पाणी पिण्याचे, काश्याच्या ताट वाटीतून जेवण करण्याचे फ़ायदे आपल्या लक्षात यायला लागलेत आणि आपण पुन्हा तेच तांबे / पितळ अत्यंत महागड्या भावाने विकत घेऊन घरी ठेवायला लागलो. तीच मौज मला आज या कमोडच्या हव्यासाची वाटते. त्यात गरज किती ? आणि अंधानुकरण किती ? हा भाग आपण विचारातच घेत नाही. उद्या अमेरिकेतून भारतीय बैठकीच्या संडासाची फ़ॅशन आली की आपण आपले कमोड हद्दपार करून पुन्हा भारतीय बैठकीकडे वळायला मोकळे.

पाश्चात्य पद्धतीच्या आणि आपल्या आहारामध्ये खूप फ़रक आहे रे बाबांनो. आपला आहार वेगळा मग आपली मलनि:सारण करण्याची बैठकही वेगळीच हवी. बर पाश्चात्य देशांमध्ये सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छतेला किती महत्व देतात ? त्यातल एक शंभरांश तरी आपण इथे देतो का ? मग त्यांचे या बाबतीत अंधानुकरण का ? 

आणि मला खटकलेली तिसरी गोष्ट म्हणजे गेल्या १० वर्षातले लग्न समारंभातले अफ़ाट आणि निरर्थक खर्चाचे प्रमाण आणि लग्न समारंभ सादर करण्याची बदललेली पद्धती. हा एक आप्त स्वकीयांचा आनंद सोहळा, दोन कुटुंबियांच्या जिव्हाळ्याचा सोहळा, संस्कारांचा सोहळा हे सगळे स्वरूप आता आपणच कालबाह्य ठरवीत चाललोय. पंजाबी संस्कृतीच्या आक्रमणाखाली (आज कुठलाही हिंदी सिनेमा घ्या. "तुस्सी, मैनू, गल, पैरी पौना, कुडी, मुंडा" अशा शब्दांशिवाय एकही गाणे नसते.) आपण अगदी कोरिओग्राफ़र आणून, डीजे लावून नाच बसवून, सीमांतपूजनाऐवजी मेहेंदी व नाच समारंभ करायला लागलोय. अरे, पंजाबी लोकांच्या अंगातच ती नाचाची लय असते रे. साधा ढोल जरी वाजायला लागला तरी त्यांच्यातला एकेक उठून नाचायला लागतो आणि ते छान दिसतही. इथे अगदी साठी सत्तरीला आलेल्या वरमाय, वधूमाय आणि त्यांचे नवरेही (जे जन्मात कधी नाचले नाहीत) त्या कोरिओग्राफ़र ने बसवलेल्या तालावर नाचावर नाचताना अतिशय कृत्रिम आणि हास्यास्पद दिसतात हे आपल्या लक्षातच येत नाही. (लग्नाचा व्हीडीओ बघताना लक्षात आले तरी पैसे अक्कलखाती जमा करून गप्प बसत असावेत.) बर हे सगळ त्या सीमांत पूजनाच्या जीवावर. "आम्ही सीमांतपूजनाला फ़ाटा दिलाय" हे आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. आपल्याच संस्कृतीला न ओळखता पुरून टाकून, वर मोठ्या अभिमानाने त्याचा उच्चार करणारी एकमेव जमात आम्हा महाराष्ट्रातल्या लोकांची असावी. इतर कुठल्याही प्रांतात आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या लग्न समारंभाशी अशी तडजोड खपवून घेतली जात नाही. 


लग्नाच्या वरातीत तर मग काय मज्जाच असते. "खरतर बॉलीवूडमध्येच सरोज खान, वैभवी मर्चंट, शामक दावर च्या हाताखाली नाच शिकायला जायच होत पण आईवडीलांच्या विरोधामुळे इथे खितपत पडलोय." अशा मनोवृत्तीची मुले, मुली, माणसे, बायका, बाप्ये, धगुरड्या बायका सगळे वरातीतल्या मुलासमोर आणि भर रस्त्यातल्या गर्दीसमोर आपली जन्मभराची हौस भागवून घेत असतात. वरात भर उन्हात जातेय, त्या टेरीकॉटसदृश शेरवानीच्या कापडात आणि ४५ अंश तापमानात तो नवरदेव घामाघूम होतोय आणि हा सगळा हिडीसपणा संपण्याची वाट बघतोय, मुहूर्ताची वेळ टळून चाललीय, रस्त्यातली इतर गर्दी त्रासतेय, कुचेष्टेने आपल्याकडे बघतेय इत्यादी काहीही विचार कुणाच्याच मनात नसतात. बस माझा परफ़ॉर्मन्स आणि मी. अरे आपला आनंद हा इतरांच्या दु:खाला कारण ठरतोय याच थोड तरी भान ? 

बर या समारंभात आनंद, आप्तांसोबत सुखदु:खाच्या गप्पा, मनमोकळेपणा इत्यादी लोप पावत चाललाय. आपल्या श्रीमंतीचे हिडीस प्रदर्शन हे एव्हढेच यातून होत आहे. त्यातून मत्सर, हेवेदावे, शिव्याश्राप आणि लग्नमंडपातच कटकारस्थाने (मराठी सिरीयल्सची ही देणगी) हे सगळे दिवसेंदिवस वाढीला लागतेय. बाबांनो, विचार करा. आपण जो अफ़ाट खर्च आजकाल लग्नसमारंभात करतोय त्यातला आवश्यक किती ? आणि केवळ प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी केलेला किती ? आजकाल होणा-या साक्षगंधाच्या खर्चामध्ये दोन गरीब कुटुंबातल्या मुलींची लग्ने सहज पार पडतील. जुन्या काळी मुलांची मुंज लावताना "एका मुलाचीच मुंज लावू नये" हा दंडक होता. मग एखाद्या कुटुंबात दोन मुले असतील तर दोघांची मिळून मुंज लावली जाई. आणि एखाद्या सधन कुटुंबातल्या एकुलत्या एक मुलाची मुंज लावताना सोबतच एखाद्या गरीब घरच्या मुलावरही त्याच खर्चात हा मुंजीचा संस्कार होई. किती चांगला दंडक होता नाही ? तोच दंडक आपण आपल्या मुला मुलींच्या लग्नातही वापरायला काय हरकत आहे ? तेव्हढ्याच खर्चात एखाद्या गरीब घरच्या मुला मुलीचे लग्न त्याच मांडवात होऊ शकत असेल तर तो पुढाकार आपण घ्यायला काय हरकत आहे ?

"नव्या मनूतील नव्या युगाचा शूर शिपाई आहे" म्हणणारे केशवसुत आपण जुने करून टाकलेत. त्यांचे नवीन विचार अंगीकारायला काय हरकत आहे ? आपली संस्कृती, परंपरा न सोडता नवीन मानवतावादी विचार अंगीकारायला अडचण ती कुठली ?

असो, गेल्या ४ - ५ वर्षातल्या अस्वस्थ करणा-या या काही गोष्टी आज इथे मांडल्यात. त्यावर साधक बाधक विचार व्हावा ही नम्र विनंती.


Thursday, July 25, 2019

वैगई एक्सप्रेस पॅटर्न.

१९८४ मध्ये माधवराव शिंदे रेल्वेमंत्री झाल्यावर त्यांनी रेल्वे कोचेसची ’रेक शेअरींग’ ही कल्पना आणली. एखाद्या गाडीचा रेक गंतव्य स्थानी पोहोचल्यानंतर जर काही तास नुसताच पडून राहत असेल तर तोच रेक दुस-या गाडीला वापरून मग दुस-या गाडीचा येणारा रेक या गाडीच्या पाठवणीसाठी वापरायचा ही त्यांची कल्पना. 

म्हणजे त्याकाळी कोल्हापूर - नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस संध्याकाळी १७.३० च्या आसपास नागपूरला यायची आणि तिची परतीची वेळ दुस-या दिवशी सकाळी १०.४० असायची. तर दादर - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस पहाटे ५.३० ला नागपूरला यायची आणि रात्री २२.१० ला परतायची. मग संध्याकाळी आलेली महाराष्ट्र त्याच रात्री सेवाग्राम म्हणून जायची आणि पहाटे आलेली सेवाग्राम लगेचच ५ तासात तय्यार होऊन महाराष्ट्र म्हणून जायची. या रेक शेअरींग साठी मी रात्री जागून केलेले संशोधन इथे वाचायला मिळेल.

आजही ब-याच गाड्यांमध्ये हे शेअरींग सुरू आहे. "ऑप्टिमायज़ेशन ऑफ़ रिसोर्सेस" हा शब्दही जेव्हा फ़ारसा प्रचलित नव्हता तेव्हापासून भारतीय रेल्वे ही प्रथा अंगिकारते आहे.

पण या सगळ्या शेअरींग मध्ये मला भावलेले शेअरींग म्हणजे वैगई आणि पल्लवन एक्सप्रेसचे शेअरींग. ते शेअरींग माहिती नसल्यामुळे माझी उडालेली तारांबळ मी या लेखात लिहीलेली आहे पण मग त्या शेअरींगची उपयुक्तता जाणवली आणि तशाच प्रकारचे शेअरींग आपण कुठेकुठे वापरू शकतोय याविषयी बुद्धीला चालना मिळाली.

१५ ऑगस्ट १९७७ रोजी तामिळनाडूची सांस्कृतिक राजधानी, मदुरै आणि राजकीय राजधानी चेन्नई यांना जोडणारी वैगई एक्सप्रेस सुरू झाली. विशेष रंगसंगतीचे डब्बे, त्यांना मॅचिंग रंगसंगतीचे डीझेल एंजिन आणि मीटर गेजवर धावत असूनही ब्रॉड गेज गाड्यांना लाजवेल असा वेग यामुळे पहिल्याच दिवशी या गाडीने मदुरै ते चेन्नई एग्मोर हे ४९५ किमी चे अंतर ७ तास ५ मिनीटांत पार केलेले होते. (मदुरै: ०६.००, चेन्नई एग्मोर: १३.०५) पुढे सुरक्षेच्या कारणास्तव या गाडीचा वेग थोडा मंद करण्यात आला. हेच अंतर ही गाडी ७ तास ३० मिनीटांत कापायला लागली.
(सध्याच्या ब्रॉडगेज अवतारात ही गाडी मदुरै ते चेन्नई अंतर ७ तास ३५ मिनीटांत तर परतीचे अंतर ७ तास ४० मिनीटांत कापते. जवळपास ८५ %  मार्ग  एकेरी असूनही.)



मीटर गेज अवतारातली वैगई एक्सप्रेस. विशिष्ट रंगसंगतीतले एंजिन आणि त्याच रंगसंगतीतले डब्बे. 
(Pic credit: Mani Vijay Sir & www.irfca.org)


मीटर गेज अवतारातली वैगई एक्सप्रेस. विशिष्ट रंगसंगतीतले एंजिन आणि त्याच रंगसंगतीतले डब्बे. 
(Pic credit: Mani Vijay Sir & www.irfca.org)


मीटर गेज अवतारातली वैगई एक्सप्रेस. विशिष्ट रंगसंगतीतले एंजिन आणि त्याच रंगसंगतीतले डब्बे. 
(Pic credit: Mani Vijay Sir & www.irfca.org)

या गाडीची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच राहिली कारण चेन्नईला सकाळी जायला अगदी आदर्श होती. पण हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागले की परतताना या गाडीला मदुरैपर्यंत परत पोचताना फ़ार उशीर होतोय. परतीच्या प्रवासात एंजिन मागे फ़िरवून वगैरे ही गाडी मदुरै ला पोचेपर्यंत रात्रीचे २२.०० / २२.३० व्हायचेत. मग काय करूयात ? हा प्रश्न सर्वत्र निर्माण झाला. इतक्या उशीरा मदुरैला पोचण्याची वेळ नागरिकांना सोयीस्कर वाटेना.

मग १५ ऑगस्ट १९८५ रोजी पल्लवन एक्सप्रेस सुरू झाली आणि तिरूचिरापल्ली ते चेन्नई एग्मोर हा ३३७ किमी चा प्रवास ५ तास ३५ मिनीटात शक्य झाला. पण यात मजा अशी होती की पल्लवन एक्सप्रेस तिरूचिरापल्ली ते चेन्नई एग्मोरला गेली की लगेच दुपारी १३.०० च्या सुमारास परतून वैगई एक्सप्रेस व्हायची आणि वैगई दुपारी १३.३० ला पोचली की दुपारी १४.३० ला पल्लवन म्हणून निघून निवांतपणे तिरूचिरापल्लीला पोहोचायची. पल्लवन आणि वैगई एक्सप्रेसमध्ये हे अत्यंत उपयुक्त रेक शेअरींग सुरू झाले. (२०१३ मध्ये पल्लवन एक्सप्रेसचा विस्तार हा आणखी ९० किमी वाढवून कराईकुडी पर्यंत करण्यात आला.)


वैगई एक्सप्रेसचा मार्ग




पल्लवन एक्सप्रेसचा मार्ग

विदर्भाचा विचार केला तर अशा पद्धतीची जनशताब्दी किंवा वंदे भारत एक्सप्रेस अकोल्यावरून मुंबईसाठी सुरू करता येईल. नागपूरवरून मुंबईसाठी गाड्या आहेत, अमरावतीवरूनही मुंबईसाठी गाडी आहेच. अकोल्यावरून सकाळी निघून नऊ तासांमध्ये मुंबईत पोचणारी गाडी परतीच्या प्रवासात फ़क्त जळगावपर्यंतचा ७ तासांचा प्रवास करू शकेल असे वेळापत्रक करता येईल. जळगाववरून सकाळी सकाळी निघून ७ तासात मुंबईला पोचणारी एक्सप्रेस लवकर परतीच्या प्रवासाला निघू शकेल आणि अकोल्याला खूप रात्र होण्याआधी पोहोचू शकेल.

म्हणजे, एक रेक
अकोला: --/०६.००
विदर्भ संपर्क क्रांती एक्सप्रेस
मुंबई: १५.००/--

मुंबई: --/१५.३०
खान्देश संपर्क क्रांती एक्सप्रेस
जळगाव: २२.३०/--

आणि दुसरा रेक
जळगाव: --/०६.००
खान्देश संपर्क क्रांती एक्सप्रेस
मुंबई: १३.००/--

मुंबई: --/१३.३०
विदर्भ संपर्क क्रांती एक्सप्रेस
अकोला: २२.३०/--

यात आणखी एक भर घालता येईल. खान्देश संपर्क क्रांतीला धुळ्यावरून सकाळी ६.०० च्या सुमारास निघालेले काही कोचेस चाळीसगावला जोडता येतील. आणि परतीच्या प्रवासात तेच कोचेस चाळीसगावलाच काढून रात्री २२.३० पर्यंत धुळ्याला नेता येतील. 

अशा वैगई-पल्लवन पॅटर्नच्या गाड्या कुठेकुठे सुरू करता येतील याचा विचार करता आणखी काही मार्ग मला सुचलेत.

शेगाव-रायपूर-नागपूर, नागपूर-रायपूर-शेगाव, 

नागपूर-हैद्राबाद-बल्लारशाह, बल्लारशाह-हैद्राबाद-नागपूर,

पुणे-हैद्राबाद-सोलापूर, सोलापूर-हैद्राबाद-पुणे,

अकोला-हैद्राबाद-नांदेड, नांदेड-हैद्राबाद-अकोला

तुम्हाला अजून काही मार्ग सुचतायत ?

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर (२५०७२०१९)


Friday, July 12, 2019

चिंतनीय काही - १ : चातुर्मास संकल्प

"मनाचा मवाळ, वाचेचा रसाळ,
त्याचे गळा माळ असो नसो 

आत्मानुभवी, चोखाळिल्या वाटा,
त्याचे माथा जटा, असो नसो

परस्त्रीचे ठायी, जो का नपुंसक,
त्याचे अंगा राख, असो नसो

परद्रव्य अंध, निंदेसी मुका,
तोची संत देखा, तुका म्हणे."




श्रीतुकोबांनी जवळपास ३२५ वर्षांपूर्वी हे समाजाच्या आदर्श पुरूषाचे चिंतन आपल्यासमोर मांडले होते. त्यांच्या विवेचनातला "संत" म्हणजे आदर्श पुरूष. आज चार शतकांमध्ये आपण भौतिकदृष्ट्या तर फ़ार प्रगती केली पण श्रीतुकोबांच्या कसोट्यांना आपण माणूस म्हणून उतरतोय का ? हा एक चिंतनीय विषय आहे.

आपल्या दृष्टीने संत म्हणजे कुणीतरी जटा, दाढी वाढवलेला, जंगलात, लोकांपासून अलिप्त राहणारा, जगाशी काही देणेघेणे नसणारा असा गृहस्थ किंवा स्त्री. आजकाल तर त्यात अधिक भर पडलीय. संत म्हणजे मोठमोठे आश्रम असणारा, राजकारण्यांपेक्षाही विलासात जीवन जगणारा, स्वतःचे (नवजात बाळाच्या साबणापासून ते मर्तिकाच्या सामानापर्यंत) प्रॉडक्टस बाजारात आणणारा उत्तम विक्रेता अशी इमेज होत चाललीय. नेमकी हीच वेळ आहे श्रीतुकोबांना काय म्हणायचय ते समजून घेण्याची आणि त्यांचा मार्ग अनुसरण्याची. 

व्हॉटसऍप युनिव्हर्सिटी आल्यापासून तर आपण खूपच ज्ञानी झालोय. अमुकच मुखी रूद्राक्ष, अमुकच जपाची माळ याच पूर्ण ज्ञान आपल्याला रोज प्राप्त होतय. (हा सगळा खटाटोप भौतिक सुखाच्या साधनांसाठीच असतो हे आपल्यालाही माहिती असत. देवाला देव म्हणून आपण भेटतच नाही. आपले भौतिक सुखाचे साधन घरपोच आणून देणारा नोकर म्हणूनच आपण आज देवाला भेटतो हो. आपले वाईट करू नये म्हणून नवस सायास, व्रत वैकल्यांची लाचही आपण नियमीतपणे देवाला देतो. अरे तो काय तुमच्याकडे "प्रोटेक्शन मनी" मागणारा गावगुंड आहे का ? प्रेम बीम वगैरे देवावर करायच असत हे आपण पारच विसरून गेलोय.) 

आज जो तथाकथित आध्यात्मिकतेचा कल्लोळ सर्वत्र चाललाय त्यात आपण सगळेच कळत नकळत वाहवत जातोय आणि मग केवळ बाह्य उपचारांवर आपला सगळ्यांचा भर जातोय. त्यावर श्रीतुकोबांचे हे विवेचन आहे. उग्र प्रकृतीच्या उद्धट माणसाने माळ घालून फ़ायदा नाही रे. त्यासाठी मनाने मवाळ आणि वाचेने रसाळ व्हावे लागेल. माळ घातली म्हणजे त्या विठ्ठलाच्या नावचे मंगळसूत्रच घातले. "आता तो धनी, आपण त्याचे चाकर. त्याच्या्च मर्जीने सगळे होणार. चालविता धनी तोच. तोच आपला योगक्षेम चालवणार, आपले भलेबुरे पाहणार." अशी भावना झाली म्हणजे मग कुठला उग्रपणा स्वभावात उरतो ? मग कुठला तुसडेपणा स्वभावात येईल ?

आजकाल अनुभव न घेता एखाद्या गोष्टीवर मार्गदर्शन करणारे आध्यात्मिक पुरूष सर्वत्र झालेत. आपण एखाद्याला काही मार्ग दाखवतो, त्या मार्गावर पुढे काय भलेबुरे आहे ? याचा आपल्याला अनुभव नको ? उगाचच एखाद्याला मार्ग दाखवायचा आणि तो त्यात पुढे जाऊन खड्ड्यात पडला तर जबाबदारी कोणाची ? तो मार्ग आपल्याला माहिती असायला आपल्याला त्याचा अनुभव पाहिजे. जी अशी आत्मानुभवी व्यक्ती आहे त्याच्या केवळ बाह्यांगाकडे पाहूनच आपण त्याची परीक्षा करणार आहोत का ? त्याच्या जटा वाढल्या असोत किंवा नसोत, आत्मानुभव किती आहे ? हे महत्वाचे. समर्थ रामदास स्वामी तर म्हणतात, "जो संसारतापे पोळला, तोच अध्यात्मसुखा अधिकारी झाला." मग आजकालचे किती लोक हा आत्मानुभव घेऊनच मग मार्गदर्शन करतात ?

गेल्या १० वर्षात इंटरनेट नावाच्या जादूने तर माणसांचे आयुष्य जगण्याचे संदर्भच पार बदलून गेलेत. प्रत्येकाचा मोबाईल लॉक्ड आणि जवळपास ९० % व्हॉटसऍप वाल्यांचा एक गुप्त समूह. घरच्यांपासून, मुलाबाळांपासून लपवून हे वासनेचे थैमान प्रत्येकाच्या हातात आहे. गोंडस समर्थन "आम्ही मॉडर्न आहोत. आमची प्रायव्हसी असते. प्रत्येकाची स्पेस प्रत्येकाला मिळायला हवी" तरी बर अजूनही हे सगळ कुटुंबासोबत एकत्र बघण्याचा बेशरमपणा आपल्या रक्तात आला नाही. पण हे असच चालत राहिल तर पुढल्या २० वर्षात हे नक्की होणार. २० वर्षांपूर्वी एखाद्या घरात वडील मुलाची सिगारेट पेटवताहेत, किंवा सासू सुनेच्या ग्लासात दारू (हो हो, वाईन असली तरी ती दारूच. उगाच वाईन, शॅम्पेन म्हणत त्याचे उदात्तीकरण करू नका.) ओतते आहे, हे दृष्य दुर्मीळ होत आणि समाजमनाला धक्का पोहोचवणार होत. आज हे प्रकार सर्रास दिसताहेत. आणि म्हणूनच असंख्य बलात्काराच्या आरोपांखाली (आरोप रीतसरपणे न्यायासनासमोर सिद्ध होऊन) गजाआड असलेला एखादा बाबा "मला पेरणी करण्यासाठी जेलमधून तात्पुरती रजा हवी" असल्याचा अर्ज करतो तेव्हा आपल्याला काहीही वाटत नाही. कुठे चाललोय आपण ?

ते सोडा हो. साध्यासाध्या भांडणांमध्ये, वादविवादामध्ये आपण सर्रास दुस-याच्या आईचा, बहिणीचा गलिच्छ उल्लेख करतो. मुंबईसारख्या शहरात तर ७५ % मुलांची आणि आजकाल मुलींचीही साधी साधी वाक्येही, बोलताना बहिणीच्या उल्लेखाच्या गलिच्छ शिवीशिवाय, सुरूच होत नाही. ("भें--, मला आठवणच राहिली नाही." इतक साध आणि निरूद्देश). यात काही चूक आहे असे आपल्याला वाटेनाच झालेय. ते सगळे "इन थिंग, स्लॅंग" आहे हे आपले त्याचे लटके समर्थन. या सगळ्यात आपण त्या मातृशक्तीची प्रचंड अवहेलना करतोय. आज आपण दुस-याच्या आई बहिणींचा उद्धार करतोय. उद्या हीच वेळ आपल्यावर येणार हे आपण लक्षातच घेत नाहीत. मग श्रीतुकाराम महाराज काय म्हणताहेत. आपली धर्मपत्नी सोडली तर इतर स्त्रियांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन हा अगदी कामभावना विरहित असला पाहिजे. स्त्री ही केवळ भोगवस्तू नसून मातृशक्ती आहे याची जाणीव चांगल्या दोन तीन लेकरांच्या बापाला येत नसेल तर तो माणूस म्हणून का गणावा ? आदिम कामभावनाच सर्वस्व मानणारा तो मानवरूपी पशूच.

बर आजच्या बायकाही काही कमी नाहीत. गेल्या १०-१२ वर्षात "लिव्ह इन" हे नवीन फ़ॅड जन्मलय. कुठल्याही कौटुंबिक जबाबदारीशिवाय केवळ वासनांचे चोचले पुरवायला एकत्र राहण्याचा ट्रेण्ड समाजात आलाय आणि हळूहळू रूजत चाललाय. गेल्या २-३ वर्षांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये ज्या काही बलात्काराच्या बातम्या येताहेत त्यातल्या ८० % केसेस मध्ये दोन तीन वर्षे असेच लिव्ह इन मध्ये एकत्र राहिलेत आणि आता लग्नाला नकार देतोय म्हणून केस दाखल झालीय अशाच आहेत. ग्रामीण ते शहरी, काश्मीर ते कन्याकुमारी, अरूणाचल प्रदेश ते व्दारका, सर्वत्र याच प्रकारच्या केसेस. दूर कशाला. आपल्या आसपास बघा. लग्न ठरल्यावर मुलांच्या आणि मुलींच्याही "बॅचलर्स पार्ट्या" सुरू झाल्यात आणि त्याचा पालकांना अभिमान आहे. बॉलीवूड आणि हॉलीवूडचे अंधानुकरण आपल्याला किती वेगाने अधोगतीच्या गर्तेत नेते आहे याची आपल्याला जाणीव होण्यापलीकडे आपण गेलोय का ?

वरील सर्व आम्हाला एकवेळ आम्ही करूही. वाचेने रसाळ होऊ, मनाने मवाळ होऊ, अनुभवाशिवाय कुणाला मार्गदर्शन करणार नाही, परस्त्रीला कामभावनेने बघणार नाही पण तुकोबा, हे काय ? परद्रव्य अंध ? छे, बुवा. अहो, माझ्यापेक्षा त्याला जास्त मिळतय आणि त्याच्याकडले मला कसे मिळेल ? ह्या विचारात तर आजच्या युगात सगळेच आहोत. मग ते मिळवण्यासाठी साम, दाम, दंड भेद मार्ग आम्ही अवलंबू. त्याची येथेच्छ निंदानालस्ती करू. आम्हाला तुमच्या कल्पनेतला संत व्हायचे नाही तुकोबा.

बाबांनो, आजपासून चातुर्मास सुरू होतोय. श्रीतुकोबांच्य या उपदेशातले एकतरी आपण या चार महिन्यात आचरणात आणू. किमान तसा संकल्प घेऊन प्रयत्न तर करू. सत्य संकल्पाच्या मागे विश्वातील सा-या शुभ शक्ती एकवटून उभ्या असतात. याचा अनुभव मला आहे मग आपल्यालाही येईल. आणि काय आहे, चार महिन्याचा संकल्प ही नेट प्रॅक्टीस आहे. ही जमली तर पूर्ण जीवनाच्या मॅचमध्ये आपण तसेच खेळू.


II सर्वेपि सुखिनः सन्तू, सर्वे सन्तू निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तू, मा कश्चित दु:खमाप्नुयात II