प्रवासात वेळ, पैसा आणि आराम या तीन बाजू असतात. यातल्या कुठल्याही दोन बाजू कमीत कमी करायच्या ठरवल्या तर तिस-या बाजूशी तडजोड अपरिहार्य असते. पण आयुष्यात एकदाच कमीतकमी वेळात, कमीतकमी पैशात पण आरामशीर प्रवास करण्याचा अनपेक्षित योग मला प्राप्त झाला आणि म्हणूनच तो अवर्णनीय ठरला.
१८ ऑक्टोबर २००६. दिवाळीचा बसुबारसाचा दिवस होता. मी नागपूरला रामदेवबाबा महाविद्यालयात होतो. नेहेमीप्रमाणे महाविद्यालयात गेलो आणि फ़ोन वाजला. मुंबईला दत्ता मेघे महाविद्यालयात एका तातडीच्या कामासाठी बोलावणे आले. १९ ऑक्टोबरलाच मुंबईत जाऊन काम करणे क्रमप्राप्त होते. २० ऑक्टोबरपासून मुंबईत दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या. मग ते काम नोव्हेंबरपर्यंत रखडले असते. १८ ला दुपारी फ़ोन आला म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत निघणा-या गाडीने प्रवास करणे क्रमप्राप्त होते.
पटकन इंटरनेटवरून रेल्वेच्या तिकीट उपलब्धीचा शोध घेतला. दिवाळीचे दिवस असल्याने रेल्वे तर पूर्णपणे आरक्षित होत्या. सगळ्याच गाड्यांची आरक्षणाची स्थिती "क्षमस्व" (Regret) दाखवत होत्या. जावे तर कसे ? यावे तर कसे ? बस तिकीटांकडे मोर्चा वळवला तर नागपूर - पुणे बसेसची तिकीटे विमान तिकीटाच्या वरताण होती. आणि पुण्याहून मुंबईला पोहोचेपर्यंत दुपार झाली असती मग उरलेल्या वेळात मुंबईतले काम पूर्ण झाले असतेच याची खात्री नव्हती.
काय करावे ? या विचारात आणि आपले काम नोव्हेंबरपर्यंत होत नाही या निराशेत असताना अचानक एक आशेचा किरण दिसला. तिथेही निराशा होणार हे गृहीत धरूनच विमान तिकीटांचा शोध सुरू केला. त्याकाळी नागपूरवरून मुंबईसाठी एअर डेक्कन चे एक विमान संध्याकाळी होते. दुपारी सहज म्हणून तिकीटांची किंमत पहायला इंटरनेटवरून शोध घेतला आणि काय ?
१८ ऑक्टोबरच्या संध्याकाळच्या ६ च्या विमानाचे नागपूर ते मुंबई १ रूपया तिकीट आणि ४९९ रूपये विमानतळ शुल्क असे एकूण ५०० रूपयांमध्ये उपलब्ध होते. क्षणाचाही विचार न करता (खरेतर परतीच्या प्रवासाच्या सोयीचा विचार करायला हवा होता हे नंतर जाणवले पण त्याक्षणी मुंबईला पोहोचणे अतिशय आवश्यक होते. परतीसाठी बसने मुंबई - पुणे - औरंगाबाद - नागपूर असा टप्प्याटप्प्याचा प्रवास चालून गेला असता.) तिकीट बुक केले आणि घरी सौभाग्यवतींना फ़ोन केला.
तिला मुंबईच्या बोलावण्याबाबत वगैरे काहीच कल्पना नव्हती. कारण सकाळी घरून कॉलेजला जाईपर्यंत मुंबईला जाण्याचा वगैरे विषयच नव्हता. तिला "कॉलेज सुटल्यावर मी साडेचार वाजेपर्यंत घरी येतोय आणि सहाच्या विमानाने मुंबईला जातोय. दोन दिवसांचे कपडे वगैरे तयारी करून बॅग भरून ठेव." एव्हढीच कल्पना दिली. परतीच्या प्रवासासाठी तेच विमान दुपारी ४.३० ला मुंबईवरून होते पण दिवाळीमुळे त्याचे तिकीट अव्वाच्या सव्वा होते. परतीच्या प्रवासाचे नशीबावर सोडले आणि साधारण ४.०० च्या सुमारास महाविद्यालयातले कामकाज आटोपून घरी गेलो.
घरून आवरून निघायला पावणेपाच झालेत. आता इकॉनॉमी मोडमध्ये चाललोच आहोत तर सर्वच इकॉनॉमी मोडमध्ये होऊ देत हा विचार केला आणि रिक्षा / टॅक्सीच्या मागे न लागता सौभाग्यवतीलाच तिच्या ऍक्टीव्हावर विमानतळापर्यंत सोडायला सांगितले. ३ किमी अंतरावर विमानतळ होते. १५ मिनीटांत आम्ही विमानतळावर पोहोचलोत. मला Departure Gate वर सोडून ती तशीच घरी गेली. माझ्याकडे एका हॅवरसॅकशिवाय फ़ारसे सामानसुमानही नव्हते.
चेक इन रांगेत लागून माझा बोर्डिंग पास हातात घेतला. बोर्डिंग पास घेताना मी नेहेमीप्रमाणे खिडकीच्या जागेची मागणी केली आणि मला धक्काच बसला. त्या विमानात Free Seating असल्याची (सु ?) वार्ता बोर्डिंग पास देणा-या "सुकांत चंद्रानने"नी दिली. Free Seating म्हणजे विमान आल्यानंतर ज्याला जी जागा मिळेल ती जागा त्याची. Low cost airlines मध्ये ही अशी व्यवस्था असेल असे वाटले नव्हते. हे म्हणजे टेंभूर्णीच्या ष्टॅण्डावर आपली बार्शी - मुंबई यष्टी लागल्यावर खिडकीतून रूमाल, पंचा वगैरे टाकून इंदापूर जाणा-या पॅसेंजरने जागा मिळवण्यापैकी होते. आता, विमानाच्या खिडक्या इतक्या उंच असतात की हातही पुरणार नाहीत त्यात विमानाच्या खिडक्या तर बंद असतात मग मुंबईवरून येणा-या विमानात जागा मिळवण्यासाठी पंचा, रूमालादि वस्तू टाकाव्यात तरी कशा ? हा प्रश्न मला पडला. "भगवंता, Low Cost Airline मध्ये काय काय दाखवशील याचा नेम नाही बाबा." हे मकरंद अनासपुरेच्या शब्दात मनाशीच म्हटले आणि मुकाट्याने नागपूर विमानतळाच्या पासिंजरांच्या वेटिंग हॉलमध्ये प्रवेशकर्ता झालो.
आता यापूर्वी तसे पाच सात विमानप्रवास झालेले होते त्यामुळे तिथल्या वातावरणाला सरावलो होतो. संध्याकाळ असूनही तिथल्या पेपर स्टॅण्डवर असलेला Indian Express उचलला आणि सराईतपणे वाचू लागलो. एक डोळा येणा-या विमानावर आणि Free Seating ला इतर प्रवासी मंडळी कसा प्रतिसाद देताहेत यावर होता. Indian Express वरून यांत्रिकपणे नजर फ़िरत होती.
साडेपाचच्या सुमारास आमचे विमान मुंबईवरून आले. बोर्डिंग करण्याची उदघोषणा झाली आणि काय विचारता ? Free Seating ची कल्पना असल्यामुळे महाराष्ट्रातल्या मोहोळ किंवा नरडाणा किंवा विटावा किंवा वडीगोद्री किंवा बोरखेडी इथल्या बस थांब्यांवरवर सीझनच्या काळात दूरून बस येताना दिसल्यावर प्रवाशांची रांग लावण्यासाठी जी रेटारेटी होईल तशी त्यादिवशी नागपूर विमानतळाच्या boarding gate पाशी झाली. रोजच होत असणार. मला आपली त्यादिवशी दिसली एव्हढीच. सुटाबुटात असणारी, लॅपटॉप वगैरे बाळगणारी विमानप्रवासी मंडळीही अंतरंगी आपल्यासारख्या बसप्रवाशांच्या अंगी असणारी घुसाघुशी करण्याची कळा बाळगून असतात हे पाहून आनंद झाला.
विमानात बसण्याची उदघोषणा झाली. (Boarding announcement) रांगेत ढकलाढकली करीत सर्वांनी बसण्यापूर्वीच्या तपासणीकडे अधीरतेने धाव घेतली. ती तपासणी झाल्यानंतर विमानाकडे नेणा-या बसची वाट न बघता सरळ टारमॅकवर उभ्या असलेल्या विमानाच्या शिडीकडे धाव घेतली. (तेव्हा नागपूर विमानतळावर एरोब्रिज नव्हते. तळमजल्यावरून घ्यायला आलेल्या बसमधून विमानापर्यंत जाणे आणि तिथे असलेल्या शिडीच्या सहाय्याने विमानात चढणे असा साधा प्रकार होता.) शिडीवरून जागा पकडण्यासाठी धावणा-यांमध्ये माझाही समावेश होताच.
विमानाच्या आत शिरल्यावर मी पहिल्यांदा उजवीकडल्या एका खिडकीची जागा पकडली आणि त्यानंतर विमानात जे चित्र दिसले त्याला तोड नाही. एकेक प्रवासी धावत धावतच विमानाच्या मुख्य दारातून आत येई आणि अधीर उतावीळपणे जागेचा शोध घेई. आणि त्यातले काही काही तर आत जागा पकडल्यानंतर उशीरा येणा-या आपल्या आप्त मित्रांसाठी शेजारच्या आसनांवर रूमाल वगैरे टाकून जागा अडवून ठेवत असे. अगदी मोहोळ किंवा नरडाणा किंवा विटावा किंवा वडीगोद्री किंवा बोरखेडी इथल्या बसस्टॅण्डवर लागलेल्या बसमधल्या प्रवाशांसारखे. इथे पटक्याऐवजी हातरूमाल होते, पिशव्यांऐवजी लॅपटॉपच्या बॅग्ज होत्या. एव्हढा सांस्कृतिक फ़रक वगळता सगळ्यांची वृत्ती तीच.
यथावकाश विमानात हवाई सुंदरी आणि इतर परिचारक मंडळी दाखल झालेत आणि मला दुसरा धक्का बसला. हीच मंडळी नागपूर विमानतळावर चेक इन काऊंटरवर बसलेली होती आणि प्रवाशांचे चेक इन करत होती. अवांतर खर्च वाचवून प्रवाशांना स्वस्तात सेवा देण्यासाठी जमिनीवर काम करणारे कर्मचारी आणि आकाशात काम करणारे कर्मचारी असा दुहेरी खर्च परवडत नाही असा एक जास्तीचा धडा आम्हाला मिळाला.
तासाभराचा प्रवास करून मुंबईत दाखल झालो. आता सगळाच प्रवास इकॉनॉमी मोड ने करायचे ठरवल्यामुळे मुंबई विमानतळावरून टॅक्सी वगैरे घेण्याचा विचार नव्हताच. नागपूर ते मुंबई विमानप्रवास ५०० रूपये आणि मुंबई ते ऐरोली टॅक्सीप्रवास ६०० रूपये हे गणित खिशाला परवडण्यासारखे आणि मनाला मानवण्यासारखे नव्हतेच. मग विमानतळापासून अंधेरीपर्यंत बस, अंधेरी ते मुलुंड बस आणि मुलुंड ते ऐरोली बसने रात्री ९.०० वाजता ऐरोलीत दाखल झालो. आमचे मित्र डॉ. देशमुख यांचे हक्काचे असे घर तिथे आहेच. तिथेच मुक्काम केला.
१९ ऑक्टोबर २००६. धनत्रयोदशीचा दिवस. सकाळपासून महाविद्यालयात गेल्याने ज्या कामासाठी एव्हढा आटापिटा करीत मुंबईत आलो होतो ते काम पटकन झाले. बोलका स्वभाव आणि जागोजागी अनेक मित्रमंडळी असल्याने सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्यात आणि या भेटीगाठींमध्येच परतीच्या प्रवासाचा प्रश्न चुटकीसरशी सुटला. मुंबईत असताना ज्यांच्या निर्भीड व दिलखुलास स्वभावाचा मला कायमच हेवा वाटत आलाय असे माझे कौटुंबिक स्नेही, ज्येष्ठ मित्र आणि मार्गदर्शक प्रा. उपेंद्र माटे आपल्या कुटुंबासह त्याचदिवशी नागपूरला यायला निघणार होते. त्यादिवशी दुपारी निघणा-या सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये त्यांचे ४ जणांचे आरक्षण होते. प्रा. माटे, सौ. माटे वहिनी आणि त्यांच्या दोन छोट्या मुली. दोन्ही मुली इतक्या छोट्या होत्या की दोघींना रेल्वेचा एक बर्थ पुरत असे. मग काय ? दुपारी ठाणे स्टेशनला जरा लवकर पोहोचलो. साधारण तिकीटांच्या रांगेत लागून ठाणे ते नागपूर व्दितीय वर्गाचे १५५ रूपयांचे तिकीट काढले आणि प्रा. माटे सरांसोबत मस्त स्लीपर कोचमध्ये बसलो. दिवाळीचा दिवस असल्याने गाडीला गर्दी होतीच आणि एव्हढ्या गर्दीत रेल्वेचे नेहेमीचे आरक्षणाचे नियम शिथिल होत असतात हा आमचा नेहेमीचा अनुभव होता.
नरक चतुर्दशीला भल्या पहाटे ५.३० ला अजनीला उतरलो. ३६ तासात नागपूर - मुंबई - नागपूर प्रवास. खर्च फ़क्त ६५५ रूपये + मुंबईतला स्थानिक प्रवास खर्च. आरामाची लेव्हल, अत्युत्कृष्ट. पैसे, वेळ आणि आरामाचे असे गणित क्वचितच जमते. त्यादिवशी जमून गेले.
एअर डेक्कन आता बंद झाले. त्यांची विमाने विकत घेऊन अतिशय लक्झरी सेवा देणारे किंगफ़िशरही मोडीत निघालेय. पण एअर डेक्कन या प्रवासानिमित्ताने माझ्या मनात मात्र चिरंतन राहील.
- सर्व राष्ट्रीय विमानसेवांचा लाभ घेतलेला हवाई प्रवासी पक्षी, राम किन्हीकर.