Showing posts with label Sleeper coach in MSRTC. Show all posts
Showing posts with label Sleeper coach in MSRTC. Show all posts

Wednesday, October 25, 2023

प्रवाशांच्या सेवेसाठी की अडवणुकीसाठी ?

 चला सणासुदीचे दिवस आलेत. प्रवाशांच्या गर्दीचे दिवस आलेत. आपापल्या आप्तजनांना भेटण्यासाठी लांबवरचे प्रवास करून आपापल्या घरट्यात परतणा-या पिल्लांचे दिवस आलेत.


त्याचबरोबर नेमके हेच दिवस साधून मध्य रेल्वेच्या पुणे ते नागपूर मार्गावर काही ना काही कारणांनी रेल्वे यार्डांचे रिमॉडेलिंग, मार्गाचे नूतनीकरण, रूट रिले इंटरलॉकिंग इत्यादी तांत्रिक कारणे सांगून या मार्गावरील रेल्वेगाड्या ऐन गर्दीच्या वेळी रद्द करून प्रवाशांना खाजगी बसेसची अव्वाच्या सव्वा भावाची तिकीटे काढण्यास भाग पाडण्याचेही दिवस आलेत. गेल्या तीन चार वर्षांपासून मी हा प्रकार नियमितपणे होताना बघतोय. यामागे काही अर्थपूर्ण हितसंबंध, साटेलोटे नसतीलच याची कुणीही खात्री देऊ शकत नाही.


त्यात आपली महाराष्ट्र एस. टी. नियोजनशून्य. नागपूर ते पुणे मार्गावर नवीन आलेल्या स्लीपर बसेस सुरू केल्यात ख-या पण आपला 1970 च्या दशकातला खाक्या काही एस. टी. ने सोडला नाही. या बसेस नागपूर ते पुणे या प्रवासासाठी तब्बल 16 तास घेत आहेत. नागपूरवरून निघाली की कोंढाळी - तळेगाव - अमरावती - मूर्तिजापूर - अकोला - खामगाव - चिखली - जालना - छत्रपती संभाजीनगर - देवी अहिल्यानगर हे सगळे थांबे घेत घेत या बसेस पुण्याला पोहोचणार. दर थांब्यावर बस थांबली की प्रवाशांची चढ उतार होणार, बसच्या आतल्या भागातले दिवे लागणार, प्रवाशांची झोपमोड होणार. हे दर तासातासाला. कोण कशाला या बसेसना पसंती देतोय ?


आपलेच नियोजन, आपलीच संसाधने यांना मध्यवर्ती ठेऊन नियोजन करण्याचे दिवस आता संपलेत हे ज्या दिवशी एस. टी. च्या ध्यानात येईल, त्या दिवसापासून एस. टी. चा तोटा कमी व्हायला सुरूवात होईल. आता प्रवाशांची गरज मध्यवर्ती ठेऊन नियोजन व्हायला हवेय. मला वाटते 2017 च्या दिवाळीत एस. टी. ने नागपूर ते पुणे या मार्गावर "दुरांतो" बससेवा सुरू केली होती. नागपूरवरून निघाल्यानंतर फ़क्त अमरावती बायपास इथले प्रवासी घेऊन ती बस खाजगी बसेससारखी कुठेही न थांबता थेट छत्रपती संभाजीनगर आणि देवी अहिल्यानगर इथले थांबे घेत पुण्याला 14 तासात पोहोचायची. या बसेसना दिवाळीत दोन्ही बाजूंनी तुफ़ान प्रतिसाद मिळाला होता.


यावर्षीही एस. टी. ने आपल्या नवीन स्लीपर बसेसबाबत हा प्रयोग करून पहायला हरकत नाही. नागपूरवरून निघाल्यानंतर समृद्धी महामार्गाने फ़क्त वर्धा (येळाकेळी टोल, इंटरचेंज क्रं 4), अमरावती / यवतमाळ (नांदगाव खंडेश्वर टोल, इंटरचेंज क्रं 7), इथे थांबून प्रवासी घेऊन सहा तासात जालना, सात - साडेसात तासात छत्रपती संभाजीनगर, साडेनऊ तासात देवी अहिल्यानगर करीत बारा ते साडेबारा तासात पुण्याला पोहोचणारी सेवा एस. टी. ने दिवाळीत दिली तर ती हाऊसफ़ुल्ल जाईल. वर्धेपासून येळाकेळी टोल (इंटरचेंज क्र. 4 पर्यंत) आणि यवतमाळ / अमरावती पासून नांदगाव खंडेश्वर टोल (इंटरचेंज क्र. 7 पर्यंत) एस. टी. ने प्रवाशांची ने आण करण्यासाठी या बसेसच्या वेळेवर जर आपली फ़ीडर बस सर्व्हिस पाठवली तर वर्धा, अमरावती / यवतमाळ इथल्या प्रवाशांनाही हा प्रवास सुखकर होईल. आज सगळी नवीन संसाधने उपलब्ध आहेत पण "योजकस्तत्र दुर्लभः" हे विधान एस. टी. च्या बाबतीत प्रकर्षाने अनुभवायला येतेय हे ही खरेच. 


ओ यष्टीवाले. करा रे हा नवीन प्रयोग. आणि ओ रेल्वेवाले. या तरी दिवाळीत अशी दुष्काळी कामे काढून प्रवाशांची गैरसोय करू नका.


- प्रवाशांच्या हिताची कायम काळजी असलेला रेल्वे आणि बसफ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


यासंबंधीचा माझा व्लॉग इथे 

Friday, November 27, 2020

एस. टी. चा आंतरराज्य मार्ग: एक विस्मृतीत गेलेला अभिनव प्रयोग

 १९८७ -१९८८ चा काल. एस. टी. ने चंद्रपूर जलद जबलपूर, यवतमाळ जलद जबलपूर आणि अमरावती जलद जबलपूर असे तीन आंतरराज्य मार्ग सुरू केलेत. हे तीनही मार्ग नागपूर - २ (सध्याचे गणेशपेठ) आगारातर्फ़े चालविले जायचे. चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावतीवरून या गाड्या सकाळी ७.०० वाजता निघायच्यात. नागपूरला सकाळी १०.३० च्या सुमारास पोहोचल्यात की त्यातली अमरावती जलद जबलपूर गाडी जबलपूरच्या फ़लाटावर (फ़लाट क्र. ४) वर लागायची आणि इतर दोन गाड्यांमधले (चंद्रपूर जलद जबलपूर आणि यवतमाळ जलद जबलपूर) थेट जबलपूरचे प्रवासी या गाडीमध्ये स्थानांतरित व्हायचेत. या दोन्ही गाड्यांची वाहक मंडळी या स्थलांतरापर्यंत प्रवाशांच्या सोबत असायचीत, प्रवाशांना मदत करायचीत. चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती या प्रत्येक ठिकाणावरून थेट जबलपूरसाठी रोज पूर्ण गाडी भरून प्रवासी मिळणे कठीण होते. म्हणून ही व्यवस्था. 


तेव्हा नागपूरवरून जबलपूरसाठी सकाळी ११.००, दुपारी १.०० आणि दुपारी ३.०० अशा तीन वेळांवर नागपूर - २ डेपोच्या गाड्या होत्या. त्यातल्या सकाळी ११.०० च्या वेळा नागपूर डेपोने अशा वाटून दिल्या होत्या.


परतीच्या प्रवासात जबलपूरवरून सकाळी ११.०० वाजता जबलपूर - अमरावती गाडी निघायची. नागपूरला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही गाडी पोहोचली की फ़लाट १ वरून हीच गाडी अमरावतीसाठी आणि फ़लाट १८ आणि १९ वरून अनुक्रमे जबलपूर जलद यवतमाळ आणि जबलपूर जलद चंद्रपूर गाड्या सुटायच्या. रात्रभर अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूरला मुक्कामी राहून सकाळी या सगळ्या गाड्या परतीच्या प्रवासाला निघायच्यात.


नागपूर ते जबलपूर हे २६० किमी अंतर कापायला त्याकाळी सात ते साडेसात तास लागायचेत. त्याकाळी राष्ट्रीय महामार्ग क्र ७ ची (वाराणसी ते कन्याकुमारी) स्थिती तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात चांगली असली तरी तत्कालीन मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेशात प्रवेश केला की रस्त्यावरचे खड्डे आपले अस्तित्व दाखवायला सुरूवात करायचेत. आता मात्र उलट परिस्थिती आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाने रस्ता बांधणीत खूप प्रगती केलेली आहे तर तत्कालीन प्रगत महाराष्ट्र या आघाडीवर जरा माघारलाय.


आज नागपूर डेपो आपली एकही गाडी नागपूर - जबलपूर मार्गावर पाठवत नाही. आज हा प्रवास पाच ते सहा तासात होऊ शकतो. खाजगी गाड्यांकडून दिवसा तरी या मार्गावर स्पर्धा नाही. दोन शिवशाही दिवसा आणि एक आसनी + शयनयान गाडी रात्रीच्या वेळेवर फ़ुल्ल चालू शकतील. फ़क्त योग्य नियोजन आणि या मार्गाची भरपूर जाहिरात प्रवाशांमध्ये होणे आवश्यक आहे. 


तशीच एखादी शिवशाही नागपूर - रायपूर मार्गावरही सकाळी जाऊन, संध्याकाळी परतीच्या वेळेवर धाडता येईल. खाजगी कडून सकाळच्या वेळेला स्पर्धा नाही. प्रवाशांना केवळ रेल्वेवर अवलंबून रहावे लागते आणि सध्य नियमित रेल्वे सुरू झालेल्या नाहीत याचा फ़ायदा एस. टी. ने घ्यायलाच हवा. शिवाय एकेकाळी नागपूर ते रायपूर या ३०० किमी प्रवासाला ७ ते ८ तास लागायचेत त्यासाठी आता फ़क्त ५ तास लागतात. (स्पीड लॉक असलेल्या आपल्या एस. टी. साठी ६ तास)  


एस. टी. ने आता नवनवीन कल्पना अंमलात आणण्याची गरज आहे.


- एस. टी. टिकावी, वाढावी असे मनापासून वाटणारा प्रवासी पक्षी, राम.




Wednesday, August 17, 2016

शिवशाही : एक चिंतन

साधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची "शिवशाही" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही बातमी वाचली आणि अपेक्षा उंचावल्यात. अर्थात मनात शंका होत्याच. यापूर्वीचा एस.टी.चा आराम गाड्यांच्या व्यवस्थापनाबाबतचा अनुभव फ़ारसा चांगला नाही आणि बदलत्या काळासोबत बदलायला एस.टी. तयार नाही ही त्या शंकेमागची रास्त कारणे. उदाहरणार्थ:

१. ७ जुलै २०१२ रोजी एस.टी. ने नागपूर - चंद्रपूर या १५३ किमी मार्गावर  वातानुकुलीत आराम सेवा "शीतल" सुरू केली. भर पावसाळा म्हणजे ऑफ़ सिझन आणि त्यातही तिचे तिकीट २२५ रूपयांच्या आसपास ठेवले.{सुमेघ देशभ्रतार साहेब, बरोबर ना ? या बसच्या पहिल्या प्रवासात आमचे बसफ़ॅन मित्र सुमेघ देशभ्रतार हे एक (आणि बहुतेक एकमात्र) प्रवासी होते.} खाजगी आराम गाड्या भर उन्हाळ्यात २०० रूपयांच्या आसपास वातानुकुलीत सेवा देत असताना ही सेवा एप्रिल महिन्यात एस.टी. ने एव्हढ्याच रूपयांत दिली असती तर थोडा तरी प्रतिसाद मिळाला असता पण नियोजनशून्य धोरणांमुळे ऑफ़ सिझनमध्ये ७ - ८ दिवसांनंतर ही सेवा बंद पडली.

२. २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात एस.टी. ने मुंबई - नागपूर व्हॉल्व्हो सेवा सुरू केली. तिकीट दर २२०० रूपये "फ़क्त". यापेक्षा कमी दर रेल्वेच्या २ टायर एसी च्या तत्काळ सेवेचा असतो आणि एव्हढ्या पैशात आणखी २०० रूपये टाकलेत की फ़र्स्ट क्लास एसी ने आरामात आणि जवळपास निम्म्या वेळात प्रवास होतो. फ़र्स्ट एसी ची तिकीटेसुद्धा या प्रवासासाठी साधारण आठवडाभर आधी उपलब्ध असतात. मग काय ? व्हायचे तेच झाले आणि ही सर्व्हिसपण "सुपरफ़्लॉप" ठरली.

३. मुंबई - पुणे, मुंबई - नाशिक आणि काही प्रमाणात पुणे - नाशिक सेवा सोडता एस.टी.ची आरामबस सेवा पूर्णपणे फ़्लॉप ठरल्याची उदाहरणे मुंबई - पणजी, कोल्हापूर - पणजी, मुंबई - हैद्राबाद (स्कॅनिया प्रयोग) भरपूर आहेत.

४. यामागील सरकारमधील परिवहन मंत्री धर्मरावबाबा आत्राम आठवतायत का ? अहेरी - मुंबई महाबसचा २५ तासांचा आणि ११०० रूपये तिकीटांचा तुघलकी प्रयोग त्यांनी केलेला होता. अहेरी हा त्यांचा मतदारसंघ ना ? म्हणून. काय झाल ? काही फ़े-यांनंतरच हा प्रयोग बंद पडला.

५. आताच चंद्रपूर - पुणे स्कॅनिया बस सुरू होणार अशी बातमी वाचली. तिकीट दर फ़क्त २२०० रूपये. १२०० रूपयांच्या आसपास प्रसन्नच्या पर्पल प्लस स्लीपरने हा प्रवास सोडून कोण हा १४ तासांचा प्रवास बसून करणार आहे ? तो पण एव्हढा महाग ! "दिवाळ्याचा अर्ज मागवून ठेव म्हणाव" हे अंतू बर्व्याचे वाक्य आठवले.




दरवेळी महाग तिकीटांचा विषय निघाला की "आम्ही, शासनाकडे कर भरतो. खाजगीवाले भरत नाहीत. म्हणून त्यांना स्वस्त तिकीटे परवडतात." असा ठरलेला युक्तीवाद केला जातो. पण अरे तो बोजा सर्वसामान्य प्रवाशांवर का ? शासनाला करमाफ़ी मागा ना ? असली अवास्तव भाडी भरून कुणीही तुमच्या गाड्यांमध्ये प्रवास करणार नाही हे तुमच्या लक्षात येतय का ? अरे बाबांनो तुमचे जुने दिवस गेलेत. आता प्रवासी केंद्रीत नियोजनाचे दिवस आलेत. एखाद्या मार्गावर स्पर्धा करण्यासाठी भाडी कमी ठेवावी लागतीलच हे सत्य एस. टी. जेव्हढ्या लवकर ओळखेल तेव्हढ्या लवकर एस. टी. ला चांगले दिवस येतील.

असो, तर ही शिवशाही बस म्हणे एस.टी. भाडेतत्वावर खाजगी ऑपरेटर्सकडून घेणार आणि चालवणार. "दुधाने तोंड पोळले की माणूस ताकही फ़ुंकून पितो" ही म्हण एस. टी. ला माहिती नसावी. मागे महाबसच्या आणि आत्ताही व्हॉल्व्होच्या प्रयोगावेळी खाजगीवाल्यांची चंगळ झाली होती आणि एस. टी. अधिकाधिक खड्ड्यात गेली होती ही गोष्ट एस. टी. चे अधिकारी विसरलेत की काय ? की त्यातही काही हितसंबंध गुंतलेत ? अरे बाबांनो, तुमच्याकडे एव्हढा प्रशिक्षित चालक वाहकांचा ताफ़ा असताना खाजगीकडे चालकत्व का ? तुमच्या तीन तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. मग त्यातल्या कर्मचा-यांना स्लीपर बस बांधण्याचे प्रशिक्षण तुम्ही देवू शकत नाही आणि या गाड्या आपल्याच कार्यशाळांमध्ये बांधू शकत नाहीत ? एकेकाळी डब्ब्यासारखी ठोकळेबाज बांधणी करणारे इंदौरमधले छोटे छोटे गॅरेजेस जर छान लक्झरी कोचेस बांधू शकतात तर सतलज पंजाब, आझाद बंगलोर च्या तोडीच्या गाड्या आपणच आपल्या कार्यशाळांमध्ये सुंदरपणे बांधू शकतो. गरज आहे ती आपल्या कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण देण्याची आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवण्याची.

एक एस. टी. प्रेमी म्हणून सध्याच्या स्थितीतही मी "शिवशाही" यशस्वी कशी होईल याचा विचार करतो तेव्हा मला खालील ३ महत्वाचे मुद्दे सुचतात.

१. रिझर्वेशन सिस्टीम
२. मार्गांचे नियोजन आणि
मार्गांवरील भाड्यांची आखणी 
३. गाड्यांची स्वच्छता व देखभाल :
                                                  


१. रिझर्वेशन सिस्टीम: मी यापूर्वीच्या लेखात याचा विस्तृत उहापोह केलेला आहे.तो लेख नंतर ब-याच व्हॉटस ऍप ग्रूप्सवर माझ्या नावाविना बघायलाही मिळाला. या लेखाचीही तीच अवस्था होणार हे मी जाणून आहे.

सध्याच्या रिझर्वेशन सिस्टीममध्ये स्लीपर बस चे रिझर्वेशन टाकणे म्हणजे एस. टी. साठी आत्महत्या ठरेल. स्लीपर बसमध्ये रिझर्वेशन न करता कुणीतरी ऐनवेळी येईल आणि आपण त्याला जागा देवू शकू ही अपेक्षा भाबडेपणाची आहे. नेहेमीच्या ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये पाहिजे तो बर्थ, पाहिजे ती जागा,  मिळणार नसली तर सध्या लोक दुस-या ट्रॅव्हल्सची त्याच मार्गावरची बस निवडतात हे एस. टी. ला माहिती हवेय. त्यामुळे सध्याच्या रिझर्वेशन सिस्टीम मध्ये ब-याच सुधारणा त्यांना घडवून आणाव्या लागतील. याबाबत एस. टी. बरीच मागे आहे. जग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अग्रेसर असताना ते तंत्रज्ञान नाकारून वाळूत तोंड खुपसून शहामृगी झोप घेण्यात एस. टी. मग्न आहे.

नुकत्याच झालेल्या महाड अपघाताची घटना घ्या. गाडीत जीपीएस असते आणि त्यांचे रियल टाईम मॉनिटरींग असते तर त्यांचा पत्ता लवकर लागला असता. एव्हढेच कशाला ? तिकीट यंत्रातून किती तिकीटे विकल्या गेलीत आणि त्या क्षणी गाडीत किती प्रवासी होते हे आजतागायत नक्की कळलेले नाही. आधुनीक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी फ़ार पैसे लागत नाहीत. फ़क्त सजगता, आत्मीयता आणि कल्पकता लागते हे एस. टी. च्या अधिकारीवर्गाला कुणीतरी समजावून सांगा रे. आज बहुतेक खाजगी गाड्या जीपीएस चा वापर करून मधल्या थांब्यांवर चढणा-या प्रवाशांना एस. एम. एस. पाठवतात. ज्यात असलेल्या गूगल लिंकवरून आपण त्या गाडीचे नक्की ठिकाण नकाशवर बघून आपल्या घरून निघण्याची वेळ निश्चित करू शकतो. रात्री अपरात्री ह्याचा सर्वांनाच फ़ार उपयोग होतो. पण एस. टी. च्या हे गावीही नाही.

तुमच्या रिझर्वेशन साईटवर गेल्यावर लॉग इन करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशाला आपली सर्व माहिती पहिल्यांदा द्यावी लागते. का ? सध्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या "रेडबस" वर तर कुणीही बुकिंग करू शकतो. अरे. ज्याला जायचय त्याच्या कडून पैसे मिळून त्याला तिकीट मिळाल्याशी मतलब. बर रिझर्वेशन साईटवर स्लीपर बसेसच्या तरी सीटस नीट दिसणार आहेत का ? अजूनही परिवर्तन बसेसच्या त्या २ बाय २ की ३ बाय २ यात एस. टी. चाच गोंधळ आहे. आणि प्रवाशांना हवी ती सीट मिळण्याची शाश्वती नाही.



एकाच गावाचे इतके कोड ? नक्की कुठला कोड म्हणजे मला हव असलेले गाव हे सर्वसामान्य माणसाला कसे कळणार ? की त्याला कळू नये म्हणूनच हा खटाटोप ?



एकाच गावाचे इतके कोड ? नक्की कुठला कोड म्हणजे मला हव असलेले गाव हे सर्वसामान्य माणसाला कसे कळणार ? की त्याला कळू नये म्हणूनच हा खटाटोप ?


मुळात ही साइट एव्हढी जडजंबाल आहे की माझ्यासारखा बसफ़ॅनही साधे शिरपूर ते नाशिक तिकीट बूक करू शकत नाही. दिवसाला कमीत कमी २० बसेस असताना. हे सुधारणार आहेत की नाही ? अशा पध्दतीच्या रिझर्वेशन सिस्टीममध्ये स्लीपर बस चालू शकत नाही.

२. मार्गांचे नियोजन : शिवशाही बसेस यशस्वी होण्यासाठी त्यांच्या मार्गांचे नियोजन योग्य रीतीने होणे आवश्यक आहे. नागपूर - पुणे मार्गावर जवळपास ४० खाजगी गाड्या आज रोज चालत  असताना त्यात महागड्या शिवनेरीने प्रवास कोण करणार ? पुणे - औरंगाबाद या ५ तासांच्या प्रवासासाठी स्लीपर कोच बसची खरच आवश्यकता आहे का ? स्लीपर कोच या मार्गावर आणल्यातही तर त्यांच्या एकतर निघण्याच्या वेळा अडनिड्या होणार किंवा पोहोचण्याच्या वेळा अडनिड्या होणार. रात्री ११ वाजता निघालेली गाडी भल्या पहाटे ४ वाजता प्रवाशांना मुक्कामावर सोडणार,  नाहीतर सकाळी ६ वाजता गंतव्य स्थानी जाऊ इच्छिणा-यांना रात्री १ वाजता बसमध्ये बसावे लागणार. दोन्ही वेळेला झोपेचे खोबरेच. दिवसा प्रवासासाठी स्लीपर कोच म्हणजे अडचणच होणार. मुंबई - औरंगाबाद मार्गावर पण या गाडीला प्रतिसाद लाभेल असे वाटत नाही कारण खाजगी गाड्यांची स्पर्धा आणि त्यांच्या स्पर्धात्मक भाड्यांपुढे आपली एस. टी. टिकाव धरणार नाही. पुणे - चंद्रपूरचे उदाहरण ताजेच आहे.


यावर उपाय म्हणून एस. टी. ने टीयर टू शहरांचा प्राधान्याने विचार करावा. ज्या शहरांमध्ये चांगली प्रवासीसंख्या आहे पण ज्या शहरांना खाजगी ऑपरेटर्स सेवा द्यायला उस्तुक नसतात त्याठिकाणी एस. टी. ने शिवशाही सुरू केली तर प्रतिसाद मिळून फ़ायद्यात जाण्याची प्रक्रिया सुरू होईल. उदा.

१. मुंबई / ठाणे - शेगाव :  मार्गे नाशिक - धुळे- जळगाव - खामगाव हा रात्रभरचा हा रूट फ़ायद्याचा ठरेल.


२. शेगाव - शिर्डी : मार्गे खामगाव - चिखली - जालना - औरंगाबाद - नेवासे हा रात्रभरचा मार्गही भाविकांसाठी फ़ायद्याचा ठरेल.


३. शेगाव - अक्कलकोट : मार्गे खामगाव - चिखली - जालना - बीड - कुंथलगिरी - येरमाळा - तुळजापूर  हा रात्रभरचा मार्गही चांगले उत्पन्न देवू शकतो.


४. शिर्डी - अक्कलकोट : मार्गे अहमदनगर - मिरजगाव - करमाळा - टेंभूर्णी - मोहोळ - सोलापूर हा रात्रभरचा मार्गही चांगले उत्पन्न देवू शकतो.


५. नागपूर - पंढरपूर : सध्याच्या मार्गावर निम आराम ऐवजी स्लीपर बस तुफ़ान चालेल.


६. नांदेड - नाशिक : मार्गे परभणी - जालना - औरंगाबाद हा मार्गही स्पर्धा नसल्याने चालायला हरकत नाही.


७. चंद्रपूर - नाशिक : मार्गे वणी - यवतमाळ - कारंजा - मेहेकर - चिखली - बुलढाणा - मलकापूर - भुसावळ - जळगाव - धुळे - मालेगाव. या मार्गावरपण सध्या स्पर्धा नाही.





आता यात ग्यानबाची मेख अशी आहे की वरील आणि वरीलप्रमाणे इतर मार्ग यशस्वी व्हायला हवे असतील तर मार्गावरचे थांबे कमी करण्याचे धोरण महामंडळाला पाळावे लागेल. विशेषतः रात्री १० ते सकाळी ६ मध्ये कमीतकमी थांबे घेतलेत तर प्रवाशांची झोपेची गरज पूर्ण होईल. शेगाववरून रात्री ९, ९.३० च्या सुमारास अक्कलकोटकडे निघालेल्या बसला खामगाववरून रात्री १० च्या आसपास प्रवासी घेतलेत की मधल्या चिखली, जालना, बीड च्या प्रवाशांची गरज नसावी. या सर्व प्रवाशांना जाण्यायेण्यासाठी दिवसा चिकार गाड्या आहेत आणि रात्री या मार्गावरून जाणा-या इतर परिवर्तन सेवाही आहेत. खामगावनंतर थेट तुळजापूरला गाडी थांबवली तर भाविकांची मोठी सोय होईल. थोड्याशा फ़ायद्यासाठी लांब पल्ल्याचे प्रवाशी महामंडळाला गमावून चालणार नाही. नागपूर - पंढरपूर बसलाही यवतमाळ नंतर जवळ जवळ तुळजापूरपर्यंत प्रवासी चढ उतारीचा थांबा नसावा. ममतादीदींनी आणलेल्या दुरांतो गाड्यांना आपण सुरूवातीला कितीही नाके मुरडली तरी आजही लांब प्रवासासाठी आपली पहिली पसंती दुरांतोंनाच असते. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी ही सेवा लोकप्रिय व्हायला हवी असल्यास मधले अनावश्यक थांबे टाळणे अत्यंत आवश्यक आहेत.




अर्थात प्रवाशांच्या सोयीसाठी, त्यांच्या मूलभूत शारिरीक गरजा आणि चहा जेवण यांसाठी, चांगल्या सोयी असलेल्या हॉटेल्सची निवड महामंडळाने अगदी काटेकोर निकषांवर करावी. हा सर्व खाजगी गाड्यांचा वीक पॉइंट आहे. केवळ याच एका मुद्द्यावर प्रवासी आपल्याकडे वळवू शकतो हे महामंडळाने लक्षात घ्यावे. अतिशय कठिण निकष लावून आणि दर्जेदार सेवेची हमी घेऊनच या थांब्यांची निवड व्हावी. यात गलथानपणा झाला किंवा वैयक्तिक हितसंबंध आडवे आलेत तर सगळ्यांचाच तोटा आहे हे सर्व संबंधित अधिका-यांनी लक्षात ठेवायला हवे. आज खाजगीवाले नेमके हेच करू शकत नाहीत. याचा फ़ायदा आपण घ्यायला हवा.




३. गाड्यांची स्वच्छता व देखभाल : आज जवळपास प्रत्येक डेपोत गाड्या धुण्याचे यंत्र आहे. त्याचा वापर झाल्याचे मात्र दिसत नाही. जवळपास ९० % गाड्या आतून आणि बाहेरून अस्वच्छ असतात. स्लीपर कोचला हे धोरण चालणार नाही. गाडी तिच्या गंतव्य स्थळी पोहोचल्यानंतार बाहेरून आणि आतून स्वच्छ करण्याची चांगली व्यवस्था असायला हवी. प्रवाशांना देण्यात येणारी अंथरूणे पांघरूणे यांचाही पुरवठा आणि दर्जा सतत चांगला राखावा लागेल. काही खाजगी सेवा हे सर्व करू न शकल्यामुळे हळूहळू प्रवाशांच्या मर्जीतून उतरत जातात आणि सातत्याने हा दर्जा सांभाळणारे प्रसन्न, सैनी, वर्मा सारखे ट्रॅव्हल ऑपरेटर्स गेल्या २५ वर्षांपासून त्यांचा मार्केट शेअर सांभाळून आहेत याचा गांभीर्याने व्हावा.

मित्रांनो, आपली प्रेमाची एस. टी. टिकायला, वाढायला हवी म्हणून हा प्रपंच. आज आपल्याला आपल्या डोळ्यासमोर या एस. टी. ला संपवणा-या त्रुटी दिसत असताना त्या दाखवण्याचे काम आपण करणार नसू तर आपण एस. टी. प्रेमी म्हणून आपली वंचनाच करून घेतोय असे होईल. आपली एस. टी. टिकली, वाचली तरच आपण एस. टी. फ़ॅन्स म्हणून मिरवू शकू हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवेय. (हा लेख व्हॉटसऍप किंवा इतर सोशल मेडीयावर कॉपी करताना नावासकट कॉपी करावा ही नम्र विनंती. मूळ विचारकर्त्याला मिळू देत की त्याच श्रेय. उगाच उसनी विद्वत्ता मिरवायचा सोस कशाला न ?)                                                                                                                    - प्रा. राम प्रकाश किन्हीकर