Showing posts with label Luxury bus. Show all posts
Showing posts with label Luxury bus. Show all posts

Wednesday, June 25, 2025

प्रसन्न "गोल्ड लाईन" घाडगे पाटील "Snooooozer" आणि लक्झरी बसेस बद्दल माझ्या अपेक्षा

 माझ्या कुंडलीत प्रवासाचे भरपूर योग असावेत आणि त्यातही प्रवास आरामदायकच व्हावेत असेही योग असावेत. तूळ किंवा वृषभ राशीचा उच्चीचा शुक्र असला की आयुष्यात असे लक्झरीचे योग येतात असे म्हणतात. माझ्या कुंडलीत हा बेटा शुक्र कुठे बसला आहे, कोण जाणे ! पण आरामदायक प्रवासाचे भरपूर योग आलेत हे मात्र नक्की. अर्थात काही काही प्रवास दगदगीचेही ठरलेत म्हणा. त्यांच्यावर एक स्वतंत्र ब्लॉगपोस्ट येऊ शकते. कदाचित तेव्हा तो गोचरीचा शुक्र नेमका वक्री असावा. बाकी शुक्र मार्गी असावा असेच योग जास्त.


मागील एका लेखात वर्णन केल्याप्रमाणे प्रसन्न ट्रॅव्हल्सने साधारण १९९३ मध्ये नागपूर - पुणे प्रवासासाठी त्यांची "गोल्डलाईन" ही लक्झरी बस सुरू केली होती. त्यातल्या ब-याचशा सोयीसुविधा त्या काळाच्या पुढे होत्या आणि काहीकाही सोयीसुविधा तर आजही ब-याचशा आराम गाड्यांमध्ये दिसत नाहीत. 


प्रसन्न ची "गोल्डलाईन" बस नागपूरवरून प्रसन्नच्याच "विदर्भ क्वीन" च्या पाटोपाठ दुपारी ३.३० च्या सुमारास निघत असे. अकोल्याला रात्री ८.३० ला पोचून पुढे पुण्याला सकाळी ७ पर्यंत पोचत असे. या वातानुकूल गाडीचे काहीकाही खास फ़ीचर्स असे होते.


अ) या गाडीमध्ये आसनांच्या ६ च रांगा होत्या. त्याकाळी "विदर्भ क्वीन" आणि इतरही गाड्यांमध्ये आसनांच्या १० रांगा असायच्यात. म्हणजे दोन रांगांमधले अंतर "गोल्डलाईन" मध्ये इतर बसेसच्या तुलनेने १६६ % जास्त होते.


आ) या "गोल्डलाईन" बसमध्ये आसनांची व्यवस्था २ बाय १ अशी होती. इतर सर्व बसेसमध्ये ती २ बाय २ अशी असायची. म्हणजे प्रत्येक आसनाची रूंदी १३३ % जास्त असू शकत होती. म्हणजे अधिकचा आराम.


इ) "गोल्डलाईन" बस इतर बससारखी १०.५ मीटर लांब असूनही फ़क्त १८ प्रवाशांना घेऊन प्रवास करीत होती. त्याकाळच्या इतर बसेस मात्र ३५ आसनी होत्या. याचाच अर्थ या "गोल्डलाईन" बस मधल्या सगळ्या प्रवाशांना मधल्या थांब्यांवर चढण्या उतरण्यासाठी कमी वेळ, कमी गर्दी लागत असणार. ही बस प्रवाशांना एखाद्या मोठ्या कारसारखीच वाटत असणार.


ई) "गोल्डलाईन" ही बस सेमी स्लीपर बस होती. दोन रांगांमध्ये अंतर जास्त असल्याने प्रत्येक प्रवाशाला भरपूर पुशबॅक करता येत होता आणि त्यासोबतच पायांच्या पोट-यांना अधिकचा आधार या गाडीतल्या विशेष आसनांमुळे मिळत होता. त्याकाळी स्लीपर बसेसचे प्रस्थ नागपूर - पुणे मार्गावर फ़ारसे नव्हते, किंबहुना एक सुद्धा स्लीपर कोच बस या मार्गावर नव्हती. तेव्हा त्याकाळी ही "गोल्डलाईन" सेमी स्लीपर बस आरामाच्या दृष्टीने या मार्गावर सर्वोत्त्तम होती हे नक्की.


उ) त्याकाळी बसमध्ये टी व्ही. असणे आणि एव्हढ्या लांबच्या प्रवासात मनोरंजन म्हणून एक दोन सिनेमे बघणे हे त्या काळी सगळ्यांसाठी एक आवश्यक गोष्ट होती. बरे, रात्री एका विशिष्ट वेळेनंतर काही काही प्रवाशांना झोप घ्यायची असायची तर इतर काही प्रवाशांसाठी टी. व्ही. सुरूच असायचा त्यामुळे काही प्रवाशांची अकारण झोपमोड होत असे. प्रसन्न कडून प्रत्येक प्रवाशाला स्वहेडफ़ोन्स दिले जात होते. त्यामुळे ज्यांना टी. व्ही. बघायचा नाही ते प्रवासी निवांत हेडफ़ोन्स काढून झोपेची आराधना करू शकायचेत. या बसच्या सीटस मध्ये चॅनेल म्युझिक ऐकण्यासाठी जॅक्स होते. त्यामुळे ज्याला उत्त्तम संगीताचा आनंद घ्यायचाय असे प्रवासी संगीतसुद्धा ऐकू शकायचेत. अर्थात प्रसन्न मध्ये लागणारे सिनेमे सुद्धा दर्जेदार असायचेत.


ऊ)  या "गोल्डलाईन" बसमध्ये प्रवाशांचे स्वागत एका वेलकम ड्रिंकने होत असे. सोबतच एक पाण्याची बॉटल आणि एक वेट वाईप टिश्यू पेपर दिला जात असे. 


प्रसन्न "गोल्डलाईनची" जाहिरात. आसनव्यवस्था त्या काळाच्या मानाने भरपूर पुढचा विचार केलेली होती.

बाकी इतर तर प्रसन्न चे सिग्नेचर फ़ीचर्स सोबत असायचेत. चांगल्या ठिकाणी जेवायला थांबणे, वेळेवर निघणे आणि पोचणे, मधल्या थांब्यांवरून अनधिकृत प्रवासी न घेणे वगैरे. त्यामुळे त्या काळी ही "गोल्डलाईन" बस नागपूर पुणे प्रवासाच्या सोयींमधली लक्झरीचा सर्वोच्च आदर्श होती. अर्थात या बसचे तिकीटही इतर बसेसच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त महाग होते. पण प्रवाशांच्या सोयीचा, आरामाचा विचार करून, इतर स्पर्धक काय देऊ शकत नाहीत ते आपण देऊयात या भावनेने सोयी सुविधा पुरवलेली नागपूर - पुणे प्रवासासाठीची ही पहिली बस होती. हिची बस बांधणीपण "विदर्भ क्वीन" प्रमाणेच पुण्यातल्या ऑटो बॉडी या कंपनीनेच केलेली होती.


बाकी अशीच एक अतिशय उत्त्तम सेवा बरीच वर्षे कोल्हापूर ते मुंबई, मुंबई ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर कोल्हापूरचे घाडगे पाटील ट्रॅव्हल्स (मोहन ट्रॅव्हल्स) चालवीत असे. ही बस वातानुकूल शयनयान होती पण शयन आसनांची रचना इतर गाड्यांप्रमाणे २ बाय १  नसून १ बाय १  असायची. म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूला खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला एक एकच बर्थस. या गाडीत अशा ५ बर्थसच्या रांगांमध्ये २० बर्थस ची सोय होऊ शकत होती पण घाडगे पाटलांनी पहिले रांगेतले उजवीकडले पहिले दोन बर्थस काढून तिथे प्रवाशांच्या हॅंडबॅग्जसाठी जागा केलेली होती. बर्थसवर झोपताना जवळ आपली बॅग घेऊन अवघडून झोपण्यापेक्षा ती बॅग त्या रॅकमध्ये आपल्या नजरेसमोर ठेऊन सगळे प्रवासी निवांत झोपण्याचा आनंद घेऊ शकत होते. मोठे जड सामानसुमान ठेवायला बसच्या पोटात डिक्की होतीच पण तरीही जवळच्या छोट्या छोट्या सामानासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसमध्ये फ़क्त १८ च बर्थस होते. आणि त्याकाळी कोल्हापूर - मुंबई धावणा-या इतर गाड्यांच्या तुलनेने हिचे तिकीट थोडेसेच महाग होते. म्हणजे दीडपट वगैरे. अत्यंत आरामदायक प्रवासासाठी एअर सस्पेन्शन असणा-या या गाडीवर दोन्हीही बाजूला "Snooooozer" असे लिहीले असायचे. त्यातही मधल्या दोन "oo" त दोन अत्यंत झोपाळू असे डोळे काढलेले असायचे आणि शेवटल्या "r" नंतर घोरण्याचे प्रतिक म्हणून z z z असायचेत. या गाडीत बसतानाच आपण इथे निवांत झोपणार आहोत अगदी घोरेपर्यंत निवांत ही भावना व्हायची. बस तशी खरोखर खूप आरामदायक होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक शायिकेखाली प्रवाशांची पादत्राणे एकाच जागी आणि व्यवस्थित राहतील अशी उत्त्तम शू रॅक पण त्या बसमध्ये होती.  


घाडगे पाटील मधला आमचा कोल्हापूर ते वाशी प्रवास. तसा आरामदायक बसप्रवास पुन्हा झाला नाही.


नंतर घाडगे पाटलांनी ही सेवा बंद केली. नवी सेवा "Snooooozer" होती खरी पण ती इतर ट्रॅव्हल्सप्रमाणे २ बाय १  केलेली होती. घाडगे पाटलांची बस, त्यांच्या बसचे मेण्टेनन्स वगैरे इतर कुणापेक्षाही उजवे असले तरी या बसचे वैशिष्ट्यपूर्ण फ़ीचर १ बाय १  शयनव्यवस्था होते ते हरवले होते.


आजच्या ट्रॅव्हल कंपन्यांनी जर २० वर्षांपूर्वीसारखा, प्रसन्न आणि घाडगे पाटील ट्रॅव्हल्स सारखा प्रवाशांच्या सुखसोयींचा आणि नेमकी त्यांची मागणी काय आहे ? याचा विचार केला तर आजही लांब पल्ल्याच्या बससेवेत खालील बदल घडू शकतील.


१) बसप्रवासासाठी आजकाल प्रवाशांची विशेषतः महिला प्रवाशांची आणि ज्येष्ठ नागरिकांची मुख्य अडचण म्हणजे बसेसमध्ये चांगली स्वच्छतागृहे नसणे. प्रवासात निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी दरवेळी बस थांबवावी लागणे. यात बसचालकांचाही 

ब-याचदा नाईलाज असतो. रात्री बेरात्री निर्जन स्थळी अशी बस थांबवून प्रवाशांना उतरण्यासाठी मुभा देणे धोक्याचे असू शकते. ज्या थांब्यांवर बस जेवण, नाश्यासाठी थांबते तिथली स्वच्छतागृहे चांगली आहेत की नाहीत यावर ट्रॅव्हल कंपनीचे कुठलेच नियंत्रण नसते. अशा कारणासाठी एखादा थांबा वगळून दुस-या थांब्यावर बस थांबवली तर तिथेही पहिले पाढे पंचावन्नच असतात.


यावर उपाय म्हणजे बसमधली मागची एक पूर्ण रांग काढून तिथे विमानाच्या धर्तीवरची दोन व्हॅक्युम स्वच्छतागृहे तयार करणे. आताशा अशी टेक्नॉलॉजी वापरणे म्हणजे रॉकेट सायन्स नव्हे आणि या दर्जाची स्वच्छतागृहे आता उभारणीच्या आणि नियमित देखभालीच्या दृष्टीनेही तुलनेने स्वस्त आहेत. त्यामुळे मागच्या शयन रांगेच्या ऐवजी अशी दोन स्वच्छतागृहे प्रवाशांचा खूप मोठा त्रास वाचवू शकतील.


२) सरसकट सगळी आसने १ बाय १  च असावीत आणि त्यातही आसनांची व्यवस्था पॉडसारखी असावी. आजकाल सगळी माणसे घरीसुद्धा एकमेकांशी सर्वच बाबतीत अंतर ठेऊन असतात आणि अतिशय वैयक्तिक रित्या घरीही वावरत असतात त्यामुळे प्रवासात सहप्रवाशांशी गप्पा, त्यांच्यासह सुखदुःख वाटून घेणे खूप दूरची गोष्ट आहे. त्यात आपला बर्थ हा कुणासोबत शेअर करायचा म्हटल्यावर बहुतेकांना खूप अवघडल्यासारखे होते. त्यामुळे पॉड सारखे बर्थस असलेली बस लगेचच लोकप्रिय होईल यात शंका नाही. जपानमध्ये अशा पॉड बसेस आधीपासून वापरात आहेत.


३) आज प्रवाशांची सोय बघून विशेषतः जे प्रवासी एका दिवसाच्या कामासाठी नागपूर ते पुणे ते नागपूर असा प्रवास करत असतात त्यांच्या सोयीसाठी शेवटल्या रांगेतल्या काढलेल्या शायिकांऐवजी दोन स्वच्छतागृहांसोबत आणखी दोन क्युबिकल्समध्ये अत्यंत मॉड्युलर असे शॉवर्स उपलब्ध करून द्यावेत. म्हणजे रात्रभर प्रवास करून पुण्यात सकाळी पोचून दिवसभराची कामे करून रात्री परत नागपूरला परतणारी अशी जी मंडळी असतील त्यांना हे शॉवर्स म्हणजे वरदान ठरतील. रात्रभर प्रवास करून सकाळी पुण्यात पोचण्याआधी असे स्वच्छ अंघोळ वगैरे करूनच बसबाहेर पडणे त्यांच्यासाठी एका दिवसाच्या हॉटेलचा खर्च वाचविणारे ठरू शकते. असे शॉवर्स सुद्धा उभारणीच्या आणि नियमित देखभालीच्या दृष्टीने आजकाल शक्य आहेत. फ़ार खर्चिक नाहीत. पण जर अशा प्रवाशांची सोय बघितली तर या बसला थोडे जास्त तिकीट द्यायला अशा प्रवाशांची ना असणार नाही. आज पुण्यासारख्या शहरात एखाद्या हॉटेलची रूम फ़क्त अंघोळीसाठी आणि कपडे वगैरे बदलण्यासाठी घेणे यात प्रवाशांचे किमान १००० रूपये तरी जातात. त्याऐवजी या बसेसचे थोडे महाग तिकीट प्रवाशांना परवडेलच.


४) आता अशी बस ट्रॅव्हल्सवाल्यांना आणि प्रवाशांनाही परवडण्याच्या अर्थशास्त्राचा विचार करू. साध्या २ बाय १  शायिका असलेल्या बहुतांशी बसमध्ये आजकाल ६ रांगांमध्ये ३६ शायिका असतात. प्रत्येक आसना / शायिकेसाठी नागपूर ते पुणे तिकीट १५०० रूपये धरले तर एका पूर्ण बसमधून एका ट्रीपमध्ये ट्रॅव्हल्सवाल्यांना ५४००० रूपयांचा महसूल मिळतो.


आपण शेवटली रांग काढून तिथे दोन स्वच्छतागृहे आणि दोन शॉवर्स ठेवण्याचे नियोजन करतोय. त्यामुळे आपल्या बसमध्ये शायिकांच्या ५ च रांगांची व्यवस्था असेल. प्रत्येक रांगेत उजव्या बाजूला २ पॉडसदृश शायिका (१ खाली आणि १ वर अशा रचनेच्या) आणि डाव्या बाजूला सुद्धा २ च पॉडसदृश शायिका (१ खाली आणि १ वर अशा रचनेच्या) अशा ४ शायिका येतील. म्हणजे एकूण प्रवासीसंख्या २० होईल.


आता एकूण मिळणा-या महसूलाला (५४००० रूपये) २० ने भागले तर प्रत्येक प्रवाशाला २७०० रूपये प्रवासखर्च येईल. म्हणजे साधारण बसच्या जवळपास पावणेदोन पट. पण त्या वाढीव तिकीटात ज्या सोयीसुविधा मिळत आहेत त्या हव्या असणारे २० प्रवासी तर रोज दोन्हीबाजूने अशा बसला मिळतीलच. 


काय म्हणताय ? पोचवताय आमचे म्हणणे संबंधितांपर्यंत ? "गोल्डलाईन" किंवा "Snooooozer" सारखी अशी उत्कृष्ट सोयीसुविधायुक्त, आरामदायक बस सुरू झाली तर थोडे जास्त पैसे खर्चून प्रवास कराल ?



- स्वतः एस. टी. च्या साध्या बसने कोल्हापूर ते पुणे ते अकोला ते नागपूर असा सलग २५ तास प्रवास केलेला आणि "Snooooozer"  ने सुद्धा प्रवास केलेला, सर्वत्र असा आरामदायक प्रवास आवडणारा, सगळ्यांच्या आरामाचा विचार करणारा एक प्रवासी पक्षी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


बुधवार, २५ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Sunday, May 26, 2024

तिरूपती ते चेन्नई प्रवास. तिरूपती बस फ़ॅनिंग.

तिरूपतीला गेल्यानंतर दर्शन पार पाडून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी म्हणून चेन्नईकडे जाण्याची सोय बघू लागलोत. चेन्नई ते नागपूर असे आमचे राजधानी एक्सप्रेसचे तिकीट होते. तसा आमच्या हातात एक दिवस होता. न जाणो तिरूपतीला दर्शनाला एखादा दिवस जास्त लागला तर असो म्हणून आम्ही एक दिवस रिझर्वड ठेवला होता. पण नियोजित दिवशीच संध्याकाळी आमचे दर्शन झाले त्यामुळे पुढला एक संपूर्ण दिवस आम्हाला थोडा मोकळा मिळाला. 


तिरूपती ते चेन्नई जाणारी हिरव्या पिवळ्या रंगसंगतीतल्या कोचेसची आणि त्याला मॅचिंग अशा रंगांचे एंजिन्स मिळणारी सप्तगिरी एक्सप्रेस ही अत्यंत चांगली गाडी होती पण तिचे आरक्षण ऐनवेळी उपलब्ध नव्हते. तीनच तासांचा प्रवास असला तरी आरक्षण असल्याशिवाय परक्या प्रांतात कुटुंबकबिल्यासकट प्रवास करणे ही गोष्ट मला रूचणारी नव्हती. तरूणपणी विद्यार्थीदशेत असे धाडसी प्रवास मी भरपूर केलेले होते पण आता मात्र ते शक्य नव्हते. मग आमचा मोर्चा तिरूपतीच्या बसस्थानकाकडे वळला.


हिरव्या पिवळ्या रंगसंगतीचे डबे आणि तशाच रंगसंगतीचे इंजिन.

 
चेन्नई तिरूपती सप्तगिरी एक्सप्रेस तिरूपती रेल्वे स्थानकात येताना. आमच्या हॉटेलच्या खिडकीतून टिपलेले प्रकाशचित्र.

सप्तगिरी एक्सप्रेसच्या इंजिनचे मृण्मयीने काढलेले स्केच.

तिरूपतीचे बसस्थानक म्हणजे एका बसफ़ॅनसाठी चंगळच होती. आंध्र प्रदेश परिवहन, कर्नाटक परिवहन, केरळ परिवहन आणि तामिळनाडू परिवहन च्या बसेसची तिथे जत्राच लागलेली होती. काय बघू आणि काय नको ? अशी माझी अवस्था तिथे झालेली होती. एका सुंदर बसचा फ़ोटो काढतोय न काढतोय तोच दुसरी सुंदरी माझ्यासमोरून पसार व्हायची. बराच वेळ असे विविध बसेसचे फ़ोटोज काढण्यात रमल्यावर मग सुपत्नीने आठवण करून दिली की आपल्याला चेन्नईला जाणा-या बसचे रिझर्वेशन करायचे आहे. त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत.


तिरूपती आहे आंध्र प्रदेशात पण तामिळनाडूपासून फ़ार जवळ असल्याने तिरूपती ते चेन्नई बसेस फ़ार आहेत आणि विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. साधी एक्सप्रेस बस, डिलक्स बस, वातानुकुलीत डिलक्स बस. 


त्यातली ही साधी एक्सप्रेस बस. 





त्या बसेसचे रिझर्वेशन होतच नव्हते. ऐनवेळी या आणि जी जागा मिळेल ती पकडा अशी सिस्टीम त्या बसेसची होती. यातल्या सीटस आपल्या शहर बस सारख्या होत्या. 


ही तामिळनाडू राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आणखी एक साधी बस. वेगळ्या रंगसंगतीतली. नंतर जया अम्मा सत्तेवर आल्यात आणि सगळ्या बसेसना एकसारखी हिरवी पोपटी रंगसंगती दिल्या गेली. ते रंगीबेरंगी दिवस संपलेत.


३ ते ४ तासांचा हा प्रवास असला तरी  शहरबससारख्या अजिबातच हेडरेस्ट नसलेल्या त्या सीटसवर अत्यंत अवघडून बसून जाण्यापेक्षा डिलक्स किंवा वातानुकूल डिलक्सचा पर्याय आम्हाला चांगला वाटला. डिलक्स आणि वातानुकूल डिलक्स या बसेसच्या प्रवासभाड्यात फ़ारसा फ़रक नव्हता मग आम्ही एस. ई. टी. सी (तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाची एक उपकंपनी) च्या वातानुकुलीत बसचे आगाऊ तिकीट काढले आणि तिरूपती ते चेन्नई या दोन परराज्यांमधल्या मार्गावर प्रवासासाठी सज्ज झालोत. 


ही एस. ई. टी. सी. ची लक्झरी बस, बिगर वातानुकूल


                        ही एस. ई. टी. सी. ची लक्झरी बस, बिगर वातानुकूल


ही एस. ई. टी. सी. ची आणखी एक बिगर वातानुकूल लक्झरी बस, वेगळ्या रंगसंगतीतली


तिरूपती ते चेन्नई या मार्गावरची आंध्र प्रदेश परिवहन निगम ची एक्सप्रेस बस. नागपूर बस स्थानकावर नागपूर ते आदिलाबाद जाणा-या या प्रकारच्या बसेस दिसतात. चंद्रपूर बस स्थानकावरही चंद्रपूर ते निर्मल या मार्गावर जाणारी एक्सप्रेस बस आणि चंद्रपूर ते आसिफ़ाबाद जाणारी पल्ले वेलुगू (ग्रामीण बस सेवा) बस पण दिसते.



पल्ले वेलुगू (ग्रामीण बस सेवा) नवे डिझाईन


पल्ले वेलुगू (ग्रामीण बस सेवा) जुने डिझाईन








आंध्र प्रदेश परिवहन निगम ची तिरूपती - तिरूमला - तिरूपती बालाजी एक्सप्रेस सेवा. या मार्गावरील घाटांमध्ये या बसेस अगदी जोरदार चालवतात. त्यांना सवय असते पण पहिल्यांदाच प्रवास करणारे आपण अगदी जीव मुठीत घेऊन घाटातला प्रवास करतो. विशेषतः उतरताना. या प्रवासात जेव्हढे तन्मयतेने आणि श्रद्धेने आपण त्या बालाजीचे स्मरण करत असतो तेव्हढे जर आपण रोज केले तर बालाजी तिरूमलावरून आपल्या घरीच आपल्या संनिध येईल.

आंध्र प्रदेश परिवहन मधल्या एक्सप्रेस बसमधील आसन व्यवस्था. ही ३ बाय २ अशीच असली तरी तामिळनाडू परिवहन पेक्षा थोडी आरामदायक आहे.


ही आमच्या तिरूपती ते चेन्नई प्रवासाची साथी असलेली वातानुकुलित सुपर डीलक्स लक्झरी बस. या बसमधल्या प्रवासाचे सविस्तर वर्णन पुढल्या ब्लॉगमध्ये.


- महाराष्ट्र एस. टी. वर प्रेम असणारा आणि भारतभरच नव्हे तर जगभरच्या सार्वजनिक वाहतुकीविषयी कुतूहल असणारा बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, August 17, 2016

शिवशाही : एक चिंतन

साधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची "शिवशाही" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही बातमी वाचली आणि अपेक्षा उंचावल्यात. अर्थात मनात शंका होत्याच. यापूर्वीचा एस.टी.चा आराम गाड्यांच्या व्यवस्थापनाबाबतचा अनुभव फ़ारसा चांगला नाही आणि बदलत्या काळासोबत बदलायला एस.टी. तयार नाही ही त्या शंकेमागची रास्त कारणे. उदाहरणार्थ:

१. ७ जुलै २०१२ रोजी एस.टी. ने नागपूर - चंद्रपूर या १५३ किमी मार्गावर  वातानुकुलीत आराम सेवा "शीतल" सुरू केली. भर पावसाळा म्हणजे ऑफ़ सिझन आणि त्यातही तिचे तिकीट २२५ रूपयांच्या आसपास ठेवले.{सुमेघ देशभ्रतार साहेब, बरोबर ना ? या बसच्या पहिल्या प्रवासात आमचे बसफ़ॅन मित्र सुमेघ देशभ्रतार हे एक (आणि बहुतेक एकमात्र) प्रवासी होते.} खाजगी आराम गाड्या भर उन्हाळ्यात २०० रूपयांच्या आसपास वातानुकुलीत सेवा देत असताना ही सेवा एप्रिल महिन्यात एस.टी. ने एव्हढ्याच रूपयांत दिली असती तर थोडा तरी प्रतिसाद मिळाला असता पण नियोजनशून्य धोरणांमुळे ऑफ़ सिझनमध्ये ७ - ८ दिवसांनंतर ही सेवा बंद पडली.

२. २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात एस.टी. ने मुंबई - नागपूर व्हॉल्व्हो सेवा सुरू केली. तिकीट दर २२०० रूपये "फ़क्त". यापेक्षा कमी दर रेल्वेच्या २ टायर एसी च्या तत्काळ सेवेचा असतो आणि एव्हढ्या पैशात आणखी २०० रूपये टाकलेत की फ़र्स्ट क्लास एसी ने आरामात आणि जवळपास निम्म्या वेळात प्रवास होतो. फ़र्स्ट एसी ची तिकीटेसुद्धा या प्रवासासाठी साधारण आठवडाभर आधी उपलब्ध असतात. मग काय ? व्हायचे तेच झाले आणि ही सर्व्हिसपण "सुपरफ़्लॉप" ठरली.

३. मुंबई - पुणे, मुंबई - नाशिक आणि काही प्रमाणात पुणे - नाशिक सेवा सोडता एस.टी.ची आरामबस सेवा पूर्णपणे फ़्लॉप ठरल्याची उदाहरणे मुंबई - पणजी, कोल्हापूर - पणजी, मुंबई - हैद्राबाद (स्कॅनिया प्रयोग) भरपूर आहेत.

४. यामागील सरकारमधील परिवहन मंत्री धर्मरावबाबा आत्राम आठवतायत का ? अहेरी - मुंबई महाबसचा २५ तासांचा आणि ११०० रूपये तिकीटांचा तुघलकी प्रयोग त्यांनी केलेला होता. अहेरी हा त्यांचा मतदारसंघ ना ? म्हणून. काय झाल ? काही फ़े-यांनंतरच हा प्रयोग बंद पडला.

५. आताच चंद्रपूर - पुणे स्कॅनिया बस सुरू होणार अशी बातमी वाचली. तिकीट दर फ़क्त २२०० रूपये. १२०० रूपयांच्या आसपास प्रसन्नच्या पर्पल प्लस स्लीपरने हा प्रवास सोडून कोण हा १४ तासांचा प्रवास बसून करणार आहे ? तो पण एव्हढा महाग ! "दिवाळ्याचा अर्ज मागवून ठेव म्हणाव" हे अंतू बर्व्याचे वाक्य आठवले.




दरवेळी महाग तिकीटांचा विषय निघाला की "आम्ही, शासनाकडे कर भरतो. खाजगीवाले भरत नाहीत. म्हणून त्यांना स्वस्त तिकीटे परवडतात." असा ठरलेला युक्तीवाद केला जातो. पण अरे तो बोजा सर्वसामान्य प्रवाशांवर का ? शासनाला करमाफ़ी मागा ना ? असली अवास्तव भाडी भरून कुणीही तुमच्या गाड्यांमध्ये प्रवास करणार नाही हे तुमच्या लक्षात येतय का ? अरे बाबांनो तुमचे जुने दिवस गेलेत. आता प्रवासी केंद्रीत नियोजनाचे दिवस आलेत. एखाद्या मार्गावर स्पर्धा करण्यासाठी भाडी कमी ठेवावी लागतीलच हे सत्य एस. टी. जेव्हढ्या लवकर ओळखेल तेव्हढ्या लवकर एस. टी. ला चांगले दिवस येतील.

असो, तर ही शिवशाही बस म्हणे एस.टी. भाडेतत्वावर खाजगी ऑपरेटर्सकडून घेणार आणि चालवणार. "दुधाने तोंड पोळले की माणूस ताकही फ़ुंकून पितो" ही म्हण एस. टी. ला माहिती नसावी. मागे महाबसच्या आणि आत्ताही व्हॉल्व्होच्या प्रयोगावेळी खाजगीवाल्यांची चंगळ झाली होती आणि एस. टी. अधिकाधिक खड्ड्यात गेली होती ही गोष्ट एस. टी. चे अधिकारी विसरलेत की काय ? की त्यातही काही हितसंबंध गुंतलेत ? अरे बाबांनो, तुमच्याकडे एव्हढा प्रशिक्षित चालक वाहकांचा ताफ़ा असताना खाजगीकडे चालकत्व का ? तुमच्या तीन तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. मग त्यातल्या कर्मचा-यांना स्लीपर बस बांधण्याचे प्रशिक्षण तुम्ही देवू शकत नाही आणि या गाड्या आपल्याच कार्यशाळांमध्ये बांधू शकत नाहीत ? एकेकाळी डब्ब्यासारखी ठोकळेबाज बांधणी करणारे इंदौरमधले छोटे छोटे गॅरेजेस जर छान लक्झरी कोचेस बांधू शकतात तर सतलज पंजाब, आझाद बंगलोर च्या तोडीच्या गाड्या आपणच आपल्या कार्यशाळांमध्ये सुंदरपणे बांधू शकतो. गरज आहे ती आपल्या कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण देण्याची आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवण्याची.

एक एस. टी. प्रेमी म्हणून सध्याच्या स्थितीतही मी "शिवशाही" यशस्वी कशी होईल याचा विचार करतो तेव्हा मला खालील ३ महत्वाचे मुद्दे सुचतात.

१. रिझर्वेशन सिस्टीम
२. मार्गांचे नियोजन आणि
मार्गांवरील भाड्यांची आखणी 
३. गाड्यांची स्वच्छता व देखभाल :
                                                  


१. रिझर्वेशन सिस्टीम: मी यापूर्वीच्या लेखात याचा विस्तृत उहापोह केलेला आहे.तो लेख नंतर ब-याच व्हॉटस ऍप ग्रूप्सवर माझ्या नावाविना बघायलाही मिळाला. या लेखाचीही तीच अवस्था होणार हे मी जाणून आहे.

सध्याच्या रिझर्वेशन सिस्टीममध्ये स्लीपर बस चे रिझर्वेशन टाकणे म्हणजे एस. टी. साठी आत्महत्या ठरेल. स्लीपर बसमध्ये रिझर्वेशन न करता कुणीतरी ऐनवेळी येईल आणि आपण त्याला जागा देवू शकू ही अपेक्षा भाबडेपणाची आहे. नेहेमीच्या ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये पाहिजे तो बर्थ, पाहिजे ती जागा,  मिळणार नसली तर सध्या लोक दुस-या ट्रॅव्हल्सची त्याच मार्गावरची बस निवडतात हे एस. टी. ला माहिती हवेय. त्यामुळे सध्याच्या रिझर्वेशन सिस्टीम मध्ये ब-याच सुधारणा त्यांना घडवून आणाव्या लागतील. याबाबत एस. टी. बरीच मागे आहे. जग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अग्रेसर असताना ते तंत्रज्ञान नाकारून वाळूत तोंड खुपसून शहामृगी झोप घेण्यात एस. टी. मग्न आहे.

नुकत्याच झालेल्या महाड अपघाताची घटना घ्या. गाडीत जीपीएस असते आणि त्यांचे रियल टाईम मॉनिटरींग असते तर त्यांचा पत्ता लवकर लागला असता. एव्हढेच कशाला ? तिकीट यंत्रातून किती तिकीटे विकल्या गेलीत आणि त्या क्षणी गाडीत किती प्रवासी होते हे आजतागायत नक्की कळलेले नाही. आधुनीक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी फ़ार पैसे लागत नाहीत. फ़क्त सजगता, आत्मीयता आणि कल्पकता लागते हे एस. टी. च्या अधिकारीवर्गाला कुणीतरी समजावून सांगा रे. आज बहुतेक खाजगी गाड्या जीपीएस चा वापर करून मधल्या थांब्यांवर चढणा-या प्रवाशांना एस. एम. एस. पाठवतात. ज्यात असलेल्या गूगल लिंकवरून आपण त्या गाडीचे नक्की ठिकाण नकाशवर बघून आपल्या घरून निघण्याची वेळ निश्चित करू शकतो. रात्री अपरात्री ह्याचा सर्वांनाच फ़ार उपयोग होतो. पण एस. टी. च्या हे गावीही नाही.

तुमच्या रिझर्वेशन साईटवर गेल्यावर लॉग इन करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशाला आपली सर्व माहिती पहिल्यांदा द्यावी लागते. का ? सध्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या "रेडबस" वर तर कुणीही बुकिंग करू शकतो. अरे. ज्याला जायचय त्याच्या कडून पैसे मिळून त्याला तिकीट मिळाल्याशी मतलब. बर रिझर्वेशन साईटवर स्लीपर बसेसच्या तरी सीटस नीट दिसणार आहेत का ? अजूनही परिवर्तन बसेसच्या त्या २ बाय २ की ३ बाय २ यात एस. टी. चाच गोंधळ आहे. आणि प्रवाशांना हवी ती सीट मिळण्याची शाश्वती नाही.



एकाच गावाचे इतके कोड ? नक्की कुठला कोड म्हणजे मला हव असलेले गाव हे सर्वसामान्य माणसाला कसे कळणार ? की त्याला कळू नये म्हणूनच हा खटाटोप ?



एकाच गावाचे इतके कोड ? नक्की कुठला कोड म्हणजे मला हव असलेले गाव हे सर्वसामान्य माणसाला कसे कळणार ? की त्याला कळू नये म्हणूनच हा खटाटोप ?


मुळात ही साइट एव्हढी जडजंबाल आहे की माझ्यासारखा बसफ़ॅनही साधे शिरपूर ते नाशिक तिकीट बूक करू शकत नाही. दिवसाला कमीत कमी २० बसेस असताना. हे सुधारणार आहेत की नाही ? अशा पध्दतीच्या रिझर्वेशन सिस्टीममध्ये स्लीपर बस चालू शकत नाही.

२. मार्गांचे नियोजन : शिवशाही बसेस यशस्वी होण्यासाठी त्यांच्या मार्गांचे नियोजन योग्य रीतीने होणे आवश्यक आहे. नागपूर - पुणे मार्गावर जवळपास ४० खाजगी गाड्या आज रोज चालत  असताना त्यात महागड्या शिवनेरीने प्रवास कोण करणार ? पुणे - औरंगाबाद या ५ तासांच्या प्रवासासाठी स्लीपर कोच बसची खरच आवश्यकता आहे का ? स्लीपर कोच या मार्गावर आणल्यातही तर त्यांच्या एकतर निघण्याच्या वेळा अडनिड्या होणार किंवा पोहोचण्याच्या वेळा अडनिड्या होणार. रात्री ११ वाजता निघालेली गाडी भल्या पहाटे ४ वाजता प्रवाशांना मुक्कामावर सोडणार,  नाहीतर सकाळी ६ वाजता गंतव्य स्थानी जाऊ इच्छिणा-यांना रात्री १ वाजता बसमध्ये बसावे लागणार. दोन्ही वेळेला झोपेचे खोबरेच. दिवसा प्रवासासाठी स्लीपर कोच म्हणजे अडचणच होणार. मुंबई - औरंगाबाद मार्गावर पण या गाडीला प्रतिसाद लाभेल असे वाटत नाही कारण खाजगी गाड्यांची स्पर्धा आणि त्यांच्या स्पर्धात्मक भाड्यांपुढे आपली एस. टी. टिकाव धरणार नाही. पुणे - चंद्रपूरचे उदाहरण ताजेच आहे.


यावर उपाय म्हणून एस. टी. ने टीयर टू शहरांचा प्राधान्याने विचार करावा. ज्या शहरांमध्ये चांगली प्रवासीसंख्या आहे पण ज्या शहरांना खाजगी ऑपरेटर्स सेवा द्यायला उस्तुक नसतात त्याठिकाणी एस. टी. ने शिवशाही सुरू केली तर प्रतिसाद मिळून फ़ायद्यात जाण्याची प्रक्रिया सुरू होईल. उदा.

१. मुंबई / ठाणे - शेगाव :  मार्गे नाशिक - धुळे- जळगाव - खामगाव हा रात्रभरचा हा रूट फ़ायद्याचा ठरेल.


२. शेगाव - शिर्डी : मार्गे खामगाव - चिखली - जालना - औरंगाबाद - नेवासे हा रात्रभरचा मार्गही भाविकांसाठी फ़ायद्याचा ठरेल.


३. शेगाव - अक्कलकोट : मार्गे खामगाव - चिखली - जालना - बीड - कुंथलगिरी - येरमाळा - तुळजापूर  हा रात्रभरचा मार्गही चांगले उत्पन्न देवू शकतो.


४. शिर्डी - अक्कलकोट : मार्गे अहमदनगर - मिरजगाव - करमाळा - टेंभूर्णी - मोहोळ - सोलापूर हा रात्रभरचा मार्गही चांगले उत्पन्न देवू शकतो.


५. नागपूर - पंढरपूर : सध्याच्या मार्गावर निम आराम ऐवजी स्लीपर बस तुफ़ान चालेल.


६. नांदेड - नाशिक : मार्गे परभणी - जालना - औरंगाबाद हा मार्गही स्पर्धा नसल्याने चालायला हरकत नाही.


७. चंद्रपूर - नाशिक : मार्गे वणी - यवतमाळ - कारंजा - मेहेकर - चिखली - बुलढाणा - मलकापूर - भुसावळ - जळगाव - धुळे - मालेगाव. या मार्गावरपण सध्या स्पर्धा नाही.





आता यात ग्यानबाची मेख अशी आहे की वरील आणि वरीलप्रमाणे इतर मार्ग यशस्वी व्हायला हवे असतील तर मार्गावरचे थांबे कमी करण्याचे धोरण महामंडळाला पाळावे लागेल. विशेषतः रात्री १० ते सकाळी ६ मध्ये कमीतकमी थांबे घेतलेत तर प्रवाशांची झोपेची गरज पूर्ण होईल. शेगाववरून रात्री ९, ९.३० च्या सुमारास अक्कलकोटकडे निघालेल्या बसला खामगाववरून रात्री १० च्या आसपास प्रवासी घेतलेत की मधल्या चिखली, जालना, बीड च्या प्रवाशांची गरज नसावी. या सर्व प्रवाशांना जाण्यायेण्यासाठी दिवसा चिकार गाड्या आहेत आणि रात्री या मार्गावरून जाणा-या इतर परिवर्तन सेवाही आहेत. खामगावनंतर थेट तुळजापूरला गाडी थांबवली तर भाविकांची मोठी सोय होईल. थोड्याशा फ़ायद्यासाठी लांब पल्ल्याचे प्रवाशी महामंडळाला गमावून चालणार नाही. नागपूर - पंढरपूर बसलाही यवतमाळ नंतर जवळ जवळ तुळजापूरपर्यंत प्रवासी चढ उतारीचा थांबा नसावा. ममतादीदींनी आणलेल्या दुरांतो गाड्यांना आपण सुरूवातीला कितीही नाके मुरडली तरी आजही लांब प्रवासासाठी आपली पहिली पसंती दुरांतोंनाच असते. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी ही सेवा लोकप्रिय व्हायला हवी असल्यास मधले अनावश्यक थांबे टाळणे अत्यंत आवश्यक आहेत.




अर्थात प्रवाशांच्या सोयीसाठी, त्यांच्या मूलभूत शारिरीक गरजा आणि चहा जेवण यांसाठी, चांगल्या सोयी असलेल्या हॉटेल्सची निवड महामंडळाने अगदी काटेकोर निकषांवर करावी. हा सर्व खाजगी गाड्यांचा वीक पॉइंट आहे. केवळ याच एका मुद्द्यावर प्रवासी आपल्याकडे वळवू शकतो हे महामंडळाने लक्षात घ्यावे. अतिशय कठिण निकष लावून आणि दर्जेदार सेवेची हमी घेऊनच या थांब्यांची निवड व्हावी. यात गलथानपणा झाला किंवा वैयक्तिक हितसंबंध आडवे आलेत तर सगळ्यांचाच तोटा आहे हे सर्व संबंधित अधिका-यांनी लक्षात ठेवायला हवे. आज खाजगीवाले नेमके हेच करू शकत नाहीत. याचा फ़ायदा आपण घ्यायला हवा.




३. गाड्यांची स्वच्छता व देखभाल : आज जवळपास प्रत्येक डेपोत गाड्या धुण्याचे यंत्र आहे. त्याचा वापर झाल्याचे मात्र दिसत नाही. जवळपास ९० % गाड्या आतून आणि बाहेरून अस्वच्छ असतात. स्लीपर कोचला हे धोरण चालणार नाही. गाडी तिच्या गंतव्य स्थळी पोहोचल्यानंतार बाहेरून आणि आतून स्वच्छ करण्याची चांगली व्यवस्था असायला हवी. प्रवाशांना देण्यात येणारी अंथरूणे पांघरूणे यांचाही पुरवठा आणि दर्जा सतत चांगला राखावा लागेल. काही खाजगी सेवा हे सर्व करू न शकल्यामुळे हळूहळू प्रवाशांच्या मर्जीतून उतरत जातात आणि सातत्याने हा दर्जा सांभाळणारे प्रसन्न, सैनी, वर्मा सारखे ट्रॅव्हल ऑपरेटर्स गेल्या २५ वर्षांपासून त्यांचा मार्केट शेअर सांभाळून आहेत याचा गांभीर्याने व्हावा.

मित्रांनो, आपली प्रेमाची एस. टी. टिकायला, वाढायला हवी म्हणून हा प्रपंच. आज आपल्याला आपल्या डोळ्यासमोर या एस. टी. ला संपवणा-या त्रुटी दिसत असताना त्या दाखवण्याचे काम आपण करणार नसू तर आपण एस. टी. प्रेमी म्हणून आपली वंचनाच करून घेतोय असे होईल. आपली एस. टी. टिकली, वाचली तरच आपण एस. टी. फ़ॅन्स म्हणून मिरवू शकू हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवेय. (हा लेख व्हॉटसऍप किंवा इतर सोशल मेडीयावर कॉपी करताना नावासकट कॉपी करावा ही नम्र विनंती. मूळ विचारकर्त्याला मिळू देत की त्याच श्रेय. उगाच उसनी विद्वत्ता मिरवायचा सोस कशाला न ?)                                                                                                                    - प्रा. राम प्रकाश किन्हीकर