Wednesday, January 6, 2021

वाहनांचे ओव्हरटेकिंग : एक विचार

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात सर्वत्र रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जातो. त्यानिमित्ताने परवा प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीवर माझे लक्ष गेले आणि जरी अपेक्षित आकडेवारी असली तरी मी चरकलोच. होणा-या एकूण अपघातांमध्ये ३१.२६ % अपघात हे ओव्हरटेकिंगच्या दरम्यान होतात असे आढळून आलेले आहेत.


आपण गाडी चालवत जात असताना जर कुणी आपल्यापेक्षा हळू गाडी चालवत असेल तर त्याच्याविषयी "काय मंद आहे हा माणूस / ही बाई ? निवांत जातोय. " अशी भावना आपल्या सगळ्यांच्याच मनात येते. (काहीकाही घटनांमध्ये ही मनातली भावना ओठांपर्यंत येऊन काही शब्दांची अदलाबदलही होते, हा भाग निराळा.) आणि जर एखादा माणूस आपल्यापेक्षा वेगात जात असेल तर "काय घाई आहे हा माणसाला ?" असे आपले मन म्हणते. (विदर्भात "काऊन आगभुकाई करत बे ?" किंवा दिल्ली, हरियाणा, पंजाब कडे " ओय, क्या तूने अपनी नानी ब्याहनी है क्या ? इतनी जल्दी जा के ?" वगैरे शेलके उदगारही निघतात.) मनुष्य स्वभाव मोठा विचित्र आहे. माझे तेव्हढे खरे असे आपल्याला कायम वाटत आलेले आहे.

 मग ओव्हरटेकिंग करताना आपल्यातली ९० % मंडळी उत्सुक का असतात ? याचा मी खोलवर जाऊन विचार केला. आणि लक्षात आले की यामागे मनुष्यमात्रांची स्वातंत्र्याची भूक ही आदिम प्रेरणा आहे. प्रत्येक मनुष्यमात्रांला स्वतंत्र राहायला आवडते. आपले निर्णय आपण स्वतः घ्यायला आवडते. कामाच्या ठिकाणी, घरी, समाजात असे आपले निर्णय आपल्याला घ्यायला मिळणारी भाग्यवान मंडळी फ़ार दुर्मिळ असतात. म्हणून मग रस्त्यांवर गाडी चालवताना मनुष्याला जास्तीत जास्त स्वातंत्र्य उपभोगायचे असते. आपल्या विचारांच्या लयीवर चालणा-या वेगाचे स्वातंत्र्य. या स्वातंत्र्यात बाधा येते ते आपल्याच मार्गाने समोरून जात असलेल्या गाडीमुळे. त्या समोर जाणा-या गाडीमुळे एकतर आपल्याला समोरचा रस्ता, त्यावरील पुढील वळणे, रस्त्यातले अनेक अडथळे ह्यांच्या बाबतीत स्वतःचा विचार करण्याचे स्वातंत्र्य नाहीसे होते. पुढल्या माणसाने ब्रेक मारला तर आपल्यालाही ब्रेक मारावा लागतो, त्याने खड्डा चुकवायला डावीकडे वळण घेतले तर आपलीही प्रतिक्षिप्त क्रिया अगदी तशीच होते. म्हणून मग मागच्या चालकाला वैताग येतो. त्या वेळापुरते त्याचे, आपल्या गाडीच्या संचलनाबाबतचे, निर्णयस्वातंत्र्य बाधित होते आणि म्हणून त्या घुसमटीत ओव्हरटेकिंगचे प्रकार घडतात. 




अर्थात बेफ़ाम ओव्हरटेकिंगमुळे होणा-या अपघातांचे समर्थन करण्याचा हेतू नाहीच. पण ओव्हरटेकिंग हे "आवश्यक राक्षस" (necessary evil) म्हणून आपण स्वीकारलेले आहेच. ओव्हरटेकिंग नसते तर आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा वेग अत्यंत धीमा झाला असता. "समाजातल्या सर्वात दुबळ्या घटकाचा विचार करून नियोजन" वगैरे समाजवादी विचार देशाच्या नियोजनाबाबतीत खरे आहेत. रस्ता वाहतुकीत असे झाले तर आपल्याला एखाद्या बैलगाडीच्याच वेगाने गाड्या चालवाव्या लागतील, हो नं ?


परवा चंद्रपूरवरून येताना संध्याकाळी तिन्हीसांजेला निघावे लागले. मला संध्याकाळी अंधारात गाडी चालवायला आवडत नाही. पहाटे लवकर निघून आपले लक्ष गाठणारा असा मी पहाटपक्षी आहे. मागे एका लेखात लिहील्याप्रमाणे पहाटेचा आणि रात्रीचा अंधार जरी शास्त्रीय दृष्ट्या सारखाच असला तरी पहाटेच्या अंधाराला क्षणोक्षणी उजाडत जाणा-या प्रकाशाची आशावादी किनार असते जी रात्रीच्या अंधाराला नसते. मी क्वचितच रात्री ड्रायव्हिंग करतो. पण काही कामांनिमित्त चंद्रपूरवरून संध्याकाळी निघून रात्री नागपूरला पोहोचणे घडलेच. गाडी चालवताना माझ्या लक्षात आले की रात्रीच्या वेळेला आपल्या समोर साधारण आपल्याच वेगाने धावत असलेल्या गाडीइतका आधार दुस-या कुणाचा नसतोच. त्या माणसाच्या निर्णयस्वातंत्र्यावर विश्वास ठेऊन आपण त्याच्या पाठोपाठ साधारण तीन सेकंदांच्या अंतराने चालत राहिलो की रात्रीच्या ड्रायव्हिंगचा ताण बराचसा कमी होतो. एकतर समोरून येणा-या गाड्यांच्या फ़्लडलाईटसची लाट समोरच्या वाहनाच्या काचेवर फ़ुटते, त्या आपत्तीला तो तोंड देत असतो व आपण सुरक्षित असतो आणि समोरचा रस्ता कसा आहे ? त्यावर काय निर्णय घ्यायचेत ? हे सर्वस्वी तो ठरवतो. फ़क्त त्याने चूक केली तर त्याची चूक त्याच्याबरोबर तुम्हालाही भोगावी लागू शकते हा भाग अलहिदा. पण पहिल्यांदा निवडतानाच समोरच्या चालकाचे ड्रायव्हिंग पाहून योग्य निवड केली तर ९० % प्रश्न सुटू शकतात. (हे वाक्य जोडीदार निवडीबाबतही तेव्हढेच खरे आहे हो.) 


तसेही रात्रीच्या वेळेला आ्पल्या दृष्टीचा आवाका मर्यादितच झालेला असतो. दिवसा आपली दृष्टी आपल्या शारिरीक दृष्टी एव्हढी असते तर रात्री आपली दृष्टी आपल्या गाडीच्या हेडलाईतसच्या प्रकाशाएव्हढीच असते. त्यामुळे फ़ार वेगात गाडी चालवणे शक्य नसते. 





गाडीच्या चालनामध्ये महत्तम (मराठीत Maximum) माझे काही आडाखे आहेत. कुठलीही गाडी असो, तिच्या स्पीडोमीटरमध्ये बरोबर निम्मा वेग हा स्पीडोमीटरच्या सगळ्यात वरच्या बाजूला असतो. त्या वेगाशी आपल्या वेगाच्या डायलने, उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला, जास्तीत जास्त १० ते १५ डिग्रीचा कोन करून गाडी चालवणे म्हणजे ब-यापैकी सुरक्षित वेग. उदाहरणार्थ: फ़ोटोत दाखविलेल्या माझ्या वॅगन आर चा महत्तम वेग १८० किमी प्रतितास. अर्धा वेग म्हणजे ९० किमी प्रतितास. मग जर माझी गाडी मोकळ्या रस्त्यावर ८० किमीप्रतितास ते १०० किमीप्रतितास चालवली तर ते गाडीच्या आणि माझ्याही प्रकृतीसाठी सर्वोत्तम. पण मधल्या वेगाशी ४५ डिग्रीचा कोन असलेल्या डायलने गाडी चालवणे म्हणजे (डाव्याबाजुला तर काहीही विशेष न घडता चालून जाईल पण उजव्या बाजूला डायलचा ४५ डिग्रीचा कोन करून चालवणे म्हणजे) अनियंत्रित गाडी होऊन अपघाताला निमंत्रण देण्यासारखेच आहे.

"If you want to travel fast, travel alone but if you want to travel longer, travel with people"  असे म्हटले जाते. त्यामुळे इथला प्रवास संपवून एकटेच परमेश्वराच्या भेटीला जायचे असेल तर वेगात जा बापडे, पण जर दीर्घायुषी होऊन मित्र, मैत्रिणी मुलांसोबत नातवंडांसमवेत जगायचे असेल तर वेग मर्यादेत ठेवा आणि ओव्हरटेकिंगचे योग्य निर्णय घ्या हे कळकळीचे सांगणे. 

- १,९०,००० किमी ड्रायव्हिंग करून (पृथ्वीला जवळपास जणू पाचवी प्रदक्षिणा पूर्ण करत आलेला पर्यटक) आपले उपदेशामृत पाजणारा ड्रायव्हर, राम प्रकाश किन्हीकर.


Monday, January 4, 2021

नागपुरात Hop On - Hop Off (Ho-Ho) बसेसची आवश्यकता : एक विचार

 नागपूर शहरातली वाहतूक हा गेल्या ३५ वर्षांपासूनच्या माझ्या चिंतनाचा आणि गेल्या २० वर्षांपासूनचा माझ्या चिंतेचा विषय आहे. बालपणापासून शाळेत जाताना बसचा वापर करणारा मी, त्या काळीही वृत्तपत्रांमधून बससेवेसाठी काही सूचना पाठवीत असे. सार्वजनिक वाहतूक खूप बेभरवशाची, उद्दाम आणि वक्तशीर नसल्यामुळेच नागपुरात वैयक्तिक वापराच्या खाजगी दुचाकी आणि आजकाल चारचाकींना पर्याय नाही अशी स्थिती उदभवली आहे. 


जास्तीत जास्त खाजगी गाड्यांचा वापर म्हणजे पार्किंगचा मोठ्ठा प्रश्न, प्रदूषणाचा प्रश्न आणि एकंदरच रस्त्यांवर ट्रॅफ़िक जाम सारख्या समस्या. मुंबईसारख्या शहरातली अत्यंत भरवशाची लोकल आणि बेस्ट सेवा अनुभवल्यावर तर नागपूरच्या सेवेतील त्रुटी अधिकच प्रकर्षाने जाणवायला लागल्यात. मुंबईत, नवी मुंबईत, ठाण्यात जर बससेवा लोकांना केंद्रबिंदू मानून चालवल्या जाऊ शकतात तर नागपुरात ही गंगा उलटी वाहण्याचे कारण काय ? हा एक मोठ्ठा यक्षप्रश्नच आहे. पूर्वी नागपुरात शहर बस सेवा एस. टी. महामंडळाकडे होती. महामंडळ ती सेवा द्यायला अपुरे पडायला लागले म्हणून २००९ च्या आसपास नागपूर महनगर पालिकेने खाजगी कंत्राटदारांच्या मदतीने स्वतःची शहर बस सेवा नागपुरात सुरू केली. पण महानगरपालिकेच्या बससेवेबाबत नियोजनशून्य कारभारामुळे कालचा गोंधळ बरा होता अशी अवस्था झाली. महानगरपालिकेच्या परिवहन समितीवरच्या सदस्यांना वाहतुकीची आखणी आणि नियोजन हा एका शास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे आणि नागपुरात त्यासाठी भरपूर प्रशिक्षित तज्ञ अभियंता मंडळी आहेत याचा पत्ताच नाही. तज्ञांचा सल्ला घेऊन अधिकाधिक सुखकर, भरवशाची आणि परवडण्याजोगी सेवा अजूनही नागपूर शहरात पुरवल्या जाऊ शकते. अजूनही उशीर झालेला नाही पण आता लक्ष दिले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी अवस्था आहे. 






नागपुरात मेट्रो हळूहळू वाढते आहे. पण मेट्रोला पूरक सेवा जर एका विशिष्ट नियोजनाने विकसित झाल्या नाहीत तर मात्र नागपूर मेट्रो ही केवळ "जॉय राईड"च बनून राहील ही भविष्यातली भीषण वास्तवता आहे.


सीताबर्डी हा नागपूरचा मध्यवर्ती व्यापारी भाग. नगर नियोजनात Central Business District (C.B.D.) ची संकल्पना आहे. तसा इतवारी भागही CBD मध्येच गणला जाईल. (नवी मुंबईत मात्र बेलापूरला CBD म्हणण्याचे नेमके काय कारण आहे ? हे मला तिथे १२ वर्षे राहूनही समजले नव्हते. कदाचित शहर वसवताना तिथे मध्यवर्ती व्यापारी भाग वसविण्याचा बेत असावा पण आता तो पूर्ण भाग शासकीय कार्यालयांमुळे आणि निवासी भागामुळे CBD संकल्पनेला विसंगत असा झाला आहे.) आज सीताबर्डी आणि लगतच्या रामदासपेठ, धंतोली भागात वाहतुकीची मोठ्ठी समस्या निर्माण झालेली आहे. नागपूरकरांच्या मूळ सुशेगाद स्वभावामुळे नागपूरकर मंडळी त्या समस्येशी जुळवून घेताहेत खरे पण हे फ़ार दिवस चालणार नाही आणि या समस्येकडे लवकर लक्ष दिले नाही तर समस्येचा स्फ़ोट उग्र रूप धारण करेल हे नक्की.


सीताबर्डी आणि आसपासच्या विभागात व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात मोरभवन म्हणजे जणू एक भोज्या असावा आणि त्या भोज्याला शिवल्याशिवाय गत्यंतर नाही या आविर्भावात एस. टी. आणि नागपूर शहर बस सेवेचे आजवरचे नियोजन आहे. नागपूर मेट्रोचे ऑरेंज लाईन (उत्तर दक्षिण कॉरिडॉर) आणि ऍक्वा लाईनचे (पूर्व पश्चिम कॉरिडॉर) इंटरचेंज स्टेशनही सीताबर्डीवरच आहे. त्यात सीताबर्डी ही एक मोठी व्यापारी बाजारपेठ असल्याने व्यापा-यांची आणि सर्वसामान्य खरेदीदारांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असतेच. गाड्यांचा ट्रॅफ़िक जाम, माणसांना चालायला जागा नाही, प्रदूषण आणि गोंधळ यामुळे येथे जाणे नकोसे होऊन जाते. या भागातल्या हॉस्पिटल्समध्ये राहणा-या रूग्णांची आणि त्यांच्यासोबतच्या नातेवाईकांची अवस्था बिकट होते. शहराच्या एकूणच अवस्थेवर ताण पडतो.



नागपुर शहर बस ताफ़्यात आता बॅटरीवर चालणा-या प्रदूषणविरहित बसेसची भर पडलेली आहे. आता गरज आहे ती सीताबर्डीसारख्या मध्यवर्ती भागात "शून्य प्रदूषण विभाग" म्हणून विकसित करण्याची. खालील नकाशात दाखवल्याप्रमाणे सीताबर्डी, धंतोली, रामदासपेठ हा विभाग सर्व बाजूनी बंद करून इथे फ़क्त बॅटरीवर चालणा-या शून्य प्रदूषण वाहनांना परवानगी देण्याची इथे गरज आहे. व्यापा-यांच्या मालवाहतुकीसाठी बॅटरीवर चालणा-या रिक्षा आणि प्रवाशांसाठी या हद्दीच्या सीमेवर प्रवाशांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ उभारून आत फ़क्त या बॅटरीवर चालणा-या बसेस Hop On - Hop Off (Ho-Ho) या सोयीने चालविल्या गेल्या पाहिजेत. पत्रकार निवासांना लागून असलेल्या "विदर्भ हॉकी असोसिएशन"च्या मैदानावर हॉकीचा सामना झालेला मी गेल्या २० वर्षात तरी बघितलेला नाही. उलट आजुबाजूच्या झोपडपट्टीवाल्यांचे आक्रमण थोपवता थोपवता हे मैदान आक्रसून चालले आहे. ते अधिक आक्रसण्याआधी त्यावर बहुमजली वाहनतळ बांधून होऊ शकेल. तसेच वाहनतळ यशवंत स्टेडियमशेजारी असलेल्या जागेवर आणि बारासिग्नल शेजारी असलेल्या जागांवर बांधून सर्व खाजगी वाहने तिथे थांबवता येतील.



बर्डी CBD प्रभागात सर्वत्र या Hop On Hop Off (Ho-Ho) यंत्रणेअंतर्गत शून्य प्रदूषण करणा-या बसेस चालविल्या गेल्या पाहिजेत. या बसेसना कुठूनही कुठेही प्रवास करण्याचे एका विशिष्ट कालावधीसाठी (३ ते ४ तास) एक निश्चित तिकीट असावे. ते तिकीट खाजगी गाड्या पार्किंगच्या जागी आणि बसमध्येही वाहकाकडे मिळावे. पार्किंगच्या जागांपासून निघून संपूर्ण सीताबर्डी - धंतोली -  रामदासपेठ परिसरात या बसेसने उलटसुलट फ़े-या सतत मारत असाव्यात आणि प्रवाशांना एकदाच तिकीट काढून, बसच्या नियत थांब्यावरून, त्यांच्या सोयीनुसार, कुठूनही कुठेही जाण्याची (त्या ३ ते ४ तासांमध्ये) परवानगी असावी.


यामुळे

१. सीताबर्डी भागातला ट्रॅफ़िकचा गोंधळ कमी होईल.

२. प्रदूषण पातळी खूप कमी होईल.

३. सार्वजनिक वाहनांच्या उपयोगाकडे लोकांचा कल वाढेल.

४. मेट्रो जादा प्रवासी आकृष्ट करेल. (सीताबर्डीपर्यंत जाऊन तिथे बाहेर आपली दुचाकी / चारचाकी गाडी पार्क करून बसमध्ये फ़िरणे कुणाला जिवावर येत असेल तो / ती सरळ आपल्या घरापासून मेट्रोने सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन गाठेल आणि तिथले काम / खरेदी वगैरे आटोपून परत मेट्रोने आपल्या घरी परत येईल.


यापेक्षा अधिक काही आपल्याला सुचत असल्यास कृपया कळवा. तशी एक चळवळच उभी करता येईल.


- सजग आणि पर्यावरणाविषयी कळकळ असलेला प्रवासी पक्षी, राम किन्हीकर.


Friday, January 1, 2021

नववर्ष आणि कॅलेंडर्स.

 एकेकाळी नववर्षाची चाहूल लागली की कॅलेंडर्सची धूम सुरू व्हायची. मुख्य जोर असायचा तो नेहेमी संबंध येणा-या किराणा दुकानदार, टेलर्स आणि स्टेशनरी दुकानदारांवर. ही मंडळीही आपल्या प्रतिष्ठानाचे नाव खाली असलेली आणि वर देव देवतांची किंवा इतर देखाव्यांची छान चित्रे असलेली कॅलेंडर्स छापून घ्यायचीत. गुळगुळीत कागदांवर छापलेली छान छान चित्रे हे मुख्य आकर्षण असायचे. ज्या दुकानदारांची चित्रे अगदी सुस्पष्ट आणि सुंदर कागदांवर असायची त्यांची अभिरूची उच्च समजली जाई आणि त्यांच्याकडे पुढील वर्षभरासाठी गि-हाईकांची आत्मीयता वाढती राही. न मागता त्या दुकानाचे असे छान कॅलेंडर हक्काने मिळणे हा नेहेमीच्या गि-हाईकाच्या अस्मितेचा मामला असायचा.


त्याकाळी घरोघरी समोरच्या खोलीला (तिला "दिवाणखाना" वगैरे म्हणणे त्याकाळी फ़ारसे प्रचलित नव्हते. फ़ारतर "बैठकीची खोली" असे नामाभिधान प्राप्त होत असे.) खूप सा-या खुंट्यांवर आणि खिळ्यांवर छान छान कॅलेंडर्स लटकलेली असणे हे अगदी सर्वसामान्य दृश्य असायचे. त्यातल्या त्यात शहरातल्या एखाद्या प्रतिष्ठित दुकानाचे कॅलेंडर लटकलेले दिसणे म्हणजे त्या घरातल्या मंडळींचा अगदी मानबिंदू असे. मग ते कॅलेंडर आपल्याला मिळवून देण्याची गळ एखादी जवळची पाहुणे मंडळी घालीत असत आणि ती मागणी ब-याचदा पूर्णही होत असे.


वर्ष संपले की त्यातल्या काही छान फ़ोटोंची फ़्रेम करायला टाकली जायची. बहुधा शंकरजींच्या ध्यानस्थ मुद्रेतला, बाळवेषातील लोभसवाण्या दत्तद्गुरूंचा फ़ोटो अशा कॅलेंडर मधूनच फ़्रेम केला गेलेला असे. ही कॅलेंडर बनविणारी मंडळीही त्यात त्या कलाकाराचे किंवा प्रतिष्ठानाचे नाव अगदी अशा जागी टाकीत असत की फ़्रेम करताना ते नाव कापून पूर्ण चित्राची फ़्रेम बनविणे अशक्यच. मी बघितलेला खोडता न येणारा हा पहिला कॉपीराईट. त्यामुळे त्याकाळी ब-याच देवघरांमध्ये प्रभू रामचंद्रांच्या पायापाशी "केशव टेलर्स" बसलेले दिसायचे, दत्तगुरूंच्या त्रिशूळाच्या टोकाशी "मेसर्स गोविंद दिनकर गोखले ऍण्ड सन्स" चे अस्तित्व अभिन्नपणे जाणवायचे. अर्थात त्याकडे लक्ष आम्हासारख्या अति चिकित्सक मंडळींचेच जायचे. त्या घरच्या कुटुंबप्रमुखाला आणि इतर नित्य उपासकांना त्यात त्या त्या उपास्य देवतेच्या पलिकडे काही दिसत नसे.


हळूहळू समोरच्या खोलीचा "दिवाणखाना" नंतर "ड्रॉईंग रूम" आणि आताशा 2 BHK मधला "हॉल" झाला आणि समोरच्या खोलीत खुंट्या, खिळे वगैरे असणे मागासलेपणाचे समजले जायला लागले. घरात एकुलते एक असे "भविष्य मेन्यु आरोग्य ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान" असलेले कालनिर्णय समोरच्या खोलीत न असता स्वयंपाकघरात विराजमान व्हायला लागले. पण हळूहळू टीव्हीवर रोजचे भगरे गुरूजींचे भविष्य, यूट्यूबवर विविध मेन्यू, व्हॉटसऍप नामक उच्छादावर रोज आरोग्याविषयीची उलटसुलट माहिती आणि मोबाईलवरच असलेले रोजचे पंचांग त्यामुळे कालनिर्णयचीही उपयुक्तता कमी व्हायला लागली. तरीही गतकाळाच्या जिव्हाळ्यामुळे किमान मराठी घरांमध्ये तरी कालनिर्णय आपले स्थान टिकवून आहे.


विजय अण्णाच्या किंगफ़िशरच्या कॅलेंडर्सविषयी आम्ही फ़क्ते ऐकले आहे. आमच्या परिचयाच्या कुणाकडेही हे कॅलेंडर असलेले आम्ही बघितले नाही. आणि घरी नुसते किंगफ़िशर कॅलेंडरचे नाव जरी काढले असते तरी "वात्रट कारट्या" म्हणून कानाखाली जाळ निघाला असता असे कर्मठ वातावरण. आता अण्णाही इंग्लंडला परागंदा झाल्यामुळे त्याचे कॅलेंडर बंद पडल्याचे ऐकले आहे. अर्थात त्या कॅलेंडरचे कधीही दर्शन न झाल्याने आणि विजय अण्णाला आजवर कशाही प्रसंगी एकही रूपया न दिल्यामुळे त्याच्याशी आपले कसलेही सोयरसुतूक नाही ही भावना पक्की आहे.


गतवर्षी आमच्या एस. टी. फ़ॅन्स ग्रूपचे अधिवेशन झाले आणि त्यात खूप अभिनव कल्पनेचे एस. टी. चे कॅलेंडर आम्हा सर्व सहभागींना मिळाले. वर्षभर ते कॅलेंडर मोठ्या अभिमानाने आमच्या दिवाणखान्याची शोभा वाढवित होते. 





आमच्या बालपणी "कॅलेंडर छापणे" हा वाक्प्रचार घरात नव्या बाळाच्या आगमनाची तयारी करणे या थोड्या वेगळ्या अर्थाने वापरला जाई. "अरे त्याच्या घरी काय ? दर दोन वर्षांनी नवीन कॅलेंडर." म्हणजे त्या एखाद्याच्या घरी दर दोन वर्षांनी पाळणा हलतो या अर्थाचे वाक्य असे. किती गंमत नाही ! हल्ली हा वाक्प्रचार कुणी फ़ारसा वापरताना दिसत नाही. अहो, बरोबर आहे. एक किंवा दोन कॅलेंडर्सपेक्षा (दोन्ही अर्थाने) घरात जास्त कॅलेंडर्स ठेवणे हे मागसलेपणाचे लक्षण नाही का ? हल्ली एकही कॅलेंडर्स न ठेवण्याची पद्धतही खूप प्रचलित होतेय असे ऐकतोय. पुढील काळाचे भान, जाण आणि विचार नसल्यावर कॅलेंडर्स नकोशी वाटणारच, त्यात नवल नाही.

 

असो, वर्षे बदललीत, कॅलेंडर्स बदलत गेलीत, कॅलेंडर्सची एकूण संस्कृती बदलत गेली. बदलली नाही ती नववर्षात मागील सर्व गोष्टींवर बोळा फ़िरवून नव्या जोमाने सुरूवात करण्याची मनुष्यमात्रांची विजिगिषू वृत्ती.


- १९७२ चे कॅलेंडर, कुमार राम प्रकाश किन्हीकर.