३७ वर्षांनंतरही अजून अविरत सेवा देणारा खराखुरा, सच्चा सेवक.
MWQ 965
३७ वर्षांनंतरही अजून अविरत सेवा देणारा खराखुरा, सच्चा सेवक.
MWQ 965
एखाद्या वर्षी पर्ज्यन्यवृष्टी झालीच नाही तरी मागल्या अनेक वर्षात झालेल्या वृष्टींच्या संचितातून निभावून जाऊ शकत. एखाद्या वर्षीच्या अनावृष्टीत लगेच शंभर वर्षांच्या अनावृष्टीचा अनुभव आल्यासारखे माणसे वागीत नाहीत. मार्ग काढीत जातात, जगणे शोधीत जातात.
स्वतःच स्वतःवरच्या अपेक्षांचं वाढवलेलं ओझं बाळगणं हळूहळू कमी करत नेलं...
नागपूर जलद (रातराणी सेवा) सोलापूर.
गाॅगल (कृष्णोपनेत्रः पुलंचा शब्द) आमच्या डोळ्यांवर बर्याच उशीरा आला. ११ व्या वर्गात असताना घरापासून सी. पी. अँड बेरार रवीनगर शाळेपर्यंत बसने जाताना मध्ये अलंकार टाॅकीजवर आमीर खानच्या "कयामत से कयामत तक" सिनेमाचे भलेमोठे पोस्टर लागलेले दिसे. त्या पोस्टरवर अर्ध्यापेक्षा जास्त व्यापून राहिलेला आमीर खानचा गाॅगलधारी चेहेरा अजूनही माझ्या घट्ट आठवणीत आहे.
२००१ चा गणेशोत्सव. मुंबईवरून लग्नानंतरच्या पहिल्यावहिल्या महालक्ष्म्यांच्या (ज्येष्ठा कनिष्ठा गौरी) सणासाठी नागपूरला आलेले आम्ही उभयता परत मुंबईसाठी निघालेलो होतो. नागपूर ते मुंबई प्रवास हा अक्षरशः शेकडो वेळा घडलेला असल्याने प्रवासात नाविन्य असे उरलेले नव्हते. तरीही एका रेल्वे फ़ॅनसाठी प्रत्येक प्रवास हा नवीन आणि उत्साहवर्धक असतो. तसाच मी सुद्धा हा प्रवास उत्साहाने अनुभवत होतो.
नागपूरवरून सकाळी निघणा-या आणि दिवसभर प्रवास करून मुंबईत पोहोचणा-या हावडा - मुंबई गीतांजली एक्सप्रेसचे आरक्षण होते. एकेकाळी गीतांजली एक्सप्रेस ही या मार्गावरची शान होती. मुंबईवरून निघाली की कल्याण - कसारा (घाट चढ्ण्यासाठी अधिक एंजिने लावण्यासाठीचा तांत्रिक थांबा) - इगतपुरी (घाट चढ्ल्यानंतर लावलेली अधिक एंजिने काढण्यासाठीचा तांत्रिक थांबा) - (नाशिक रोड, मनमाड इत्यादी मोठी स्थानके टाळून थेट) भुसावळ - अकोला - बडनेरा - नागपूर - गोंदिया - दुर्ग - बिलासपूर - टाटानगर - हावडा अशी धाडधाड जाणारी ही गाडी होती. नंतर एंजिनांची शक्ती वाढत गेली. ह्या आणि इतरही गाड्यांची धाववेळ कमी करण्याऐवजी अधिकचे थांबे दिले गेलेत.
आमचे आरक्षण शयनयान वर्गात होते. तिथे आम्ही प्रवेश केला पण अगदी समोरच्या बाकावरील मंडळींचे सकाळचे खाणे सुरू होते. आम्ही जरी पूर्ण शाकाहारी असलो तरी समोर बसून कुणी मांसाहार केला तरी आम्हाला किळस वगैरे कधीच वाटली नाही. पण आत्ताच्या क्षणी समोरच्या बाकावरच्या कुटुंबाचा ’माछेर झोल’ खाण्याचा प्रकार पाहून मात्र खरोखर किळस वाटून पोटात ढवळायला लागले होते. आदल्या दिवशी रात्री (कदाचित दुपारीही) घेतलेल्या जेवणाच्या डब्यात (तो ही ऍल्युमिनियमचा, कळकट्ट झालेला) भातात माश्यांचे कालवण. ते सुद्धा हाताचा पूर्ण पंजा त्यात घालून ओरपणे सुरू, त्या माश्याचा आणि भाताचा शिळा वास केवळ आमच्याच कंपार्टमेंटमध्ये नाही तर पूर्ण डब्यात पसरला होता. आमच्या कंपार्टमेंटजवळून जाणारी प्रत्येक व्यक्ती नाकाला रूमाल किंवा तत्सम काही लावूनच चाललेली होती. आणि कहर म्हणजे खाऊन झाल्यावर त्या डब्यात स्वतःजवळचे पिण्याचे पाणी टाकून त्या माणसाने तो डबा विसळला आणि ते पाणी स्वतःच्या बाकाखालीच टाकून दिले. किळसवाणेपणाचा कळस.
आता सौभाग्यवतींना मळमळायला लागले होते. मी डबा बदलून एसी डब्यात आरक्षण मिळतेय का हे बघण्यासाठी टीटीईंच्या मागे. सुदैवाने माझी धडपड यशस्वी झाली. गर्दीचा सिझन नसल्याने नागपूरवरून काही अंतर गेल्यावर लगेच आम्हाला ए एस -१ कोचमधील ५५ आणि ५६ ही आसने (शायिका) टीटीईंनी दिलीत.
आमच्या कोचमधील ४९ ते ५६ या बे मधील ५५ आणि ५६ हे साईड लोअर आणि साईड अप्पर बर्थस होते. एका रेल्वेफ़ॅनला दिवसभरच्या प्रवासासाठी एक खिडकीची जागा आणि पाय लांब करून पडायचे असले तरी खिडकीचाच बर्थ ह्यापेक्षा अजून काय हवे असते. आम्ही उभयता संसारातल्या सुखदुःखांबद्दल गप्पा टप्पांमध्ये दंग होतो. आम्ही आजुबाजूला नजर टाकली. गर्दीचे दिवस नसल्याने आमचा कोच बराच रिकामा होता. आमच्या ८ जणांच्या बे मध्ये ४९ नंबरच्या बर्थवर एक असामी पांघरूण घेऊन झोपलेली होती. त्याच्या वरच्या ५० आणि ५१ नंबरच्या बर्थसवर कुणीही प्रवासी नव्हते. त्यामुळे चांगला दिवस उजाडला तरी स्वारी निवांत झोपलेली होती. रेल्वेने दिलेले पांढरेशुभ्र अंथरूण आणि त्यावर पांढरीशुभ्र चादर अगदी डोक्यापर्यंत ओढून ही असामी झोपलेली होती. असेल कुणी थकलेला / ली बिचारा / री म्हणून आम्ही थोडे दुर्लक्षच केले. त्याच्या समोर ५२ नंबरवर एकच प्रवासी होता. तो पण आमच्यासारखाच नागपूरवरून बसलेला होता.
गाडी तुफ़ान निघाली. बडनेरा स्टेशनला एक दोघे आमच्या कोचमध्ये आलेत. अकोल्याला शेजारच्या बे मध्ये एक कुटुंब त्यांच्या छोट्याशा राजकन्येसह आलेत. माझी गट्टी छोट्या मुलांशी फ़ार लवकर जमते त्यामुळे मी माझ्या या छोट्या मैत्रिणीशी गट्टी जमविली आणि तिच्याशी खेळत बसलो. सौभाग्यवती जेवणानंतर ५६ नंबरच्या बर्थवर झोपायला गेलेल्या होत्या. गाडीत दुपारच्या झोपेत हरवलेले प्रवासी आणि एसीच्या एंजिनाच्या घरघरीचा आवाज एव्हढीच जिवंतपणीची खूण होती.
दुपार टळत आलेली होती. गाडी मनमाड स्टेशनात उभ्या असलेल्या प्रवाशांना धूळ चारत नाशिककडे धावत होती. पॅन्ट्री कारमधल्या पोरांची चहा कॉफ़ी घेऊन हाकारे देत हालचाल सुरू झालेली होती. कोचमधल्या सगळ्यांचीच दुपारची झोप वगैरे आटोपत आलेली होती. आणि आम्हाला आणि आमच्या आजुबाजूच्या बे मधल्या सगळ्यांना एक भयंकर जाणीव जवळपास एकाच वेळेस झाली...
... आमच्यी बे मध्ये ४९ नंबरवर झोपलेल्या व्यक्तीने गेल्या १० तासात कुठलीच हालचाल केलेली नव्हती. भुकेची जाणीव नाही, तहानेची नाही एव्हढेच काय तर लघुशंकेसारख्या शरीरधर्माची पण त्या व्यक्तीला सकाळपासून गरजच वाटलेली नव्हती. हे जरा वेगळे होते. किंबहुना गाडीतल्या कुणीही त्या व्यक्तीला जिवंत हालचाल करताना बघितलेले नव्हते. हळूहळू आमच्या बे मध्ये कोचमधल्या सगळ्यांची गर्दी सुरू झाली. बेडरोल आणून दिणा-या कोच अटेंडंटने सांगितले की हा माणूस पहाटे पहाटे दुर्गला गाडीत बसला आणि बेडरोल मिळताच झोपून गेला. अगदी डोक्यावरून पांघरूण घेऊन. त्यानंतर कुणीही त्याला जिवंत पाहिले नव्हते. पांढरी चादर डोक्यापर्यंत ओढून झोपलेला त्याचा देह आता तिन्हीसांजेला पांढ-या चादरीत ठेवलेल्या मृतदेहासारखा भासायला लागला होता.
आमच्या बे मधल्या जमलेल्या लोकांनी त्या व्यक्तीला "भाईसाब, ओ भाईसाब" अशा हाका सुरू केल्यात. भारताची राष्ट्रभाषा हिंदी नाही हे कुणीही कितीही कंठशोष करून सांगितले तरी अशा बिकट प्रसंगी भारतभर हिंदीचाच आश्रय घेतला जातो हे सत्य आहे. त्यात सुदूर केरळ आणि तामिळनाडूचाही अपवाद नाही. तो माणूस ढिम्म हलेना. मग जमलेल्या मंडळींचे त्याचा श्वास सुरू आहे का याचा अंदाज बांधणे सुरू झाले. अर्थात दुरूनच. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावरची चादर दूर करून बघण्याचे कुणाचेही धैर्य नव्हते. ’पोलिसकेस’ या शब्दाचे भय जनमानसात किती खोल रुतून बसलेय याची आणखी एकदा प्रतिती आली.
नाशिक स्टेशनवर टीटीईंना वर्दी मिळाली. पुन्हा त्या माणसाच्या नावाने हाकारे सुरू झालेत. पण उपयोग काहीच नाही. इगतपुरीला पोलिस येतील अशी वार्ता मिळाली. दुपारपर्यंत अज्ञानात सुख मानून त्या व्यक्तीसोबत बिनधोक प्रवास करणारे आम्ही आता मात्र शंका कुशंकांनी अस्वस्थ झालेलो होतो. आमचे बर्थस सोडून त्याच कोचमध्ये इतरत्र बसायला गेलेलो होतो. इगतपुरी येण्याची इतकी वाट आमच्यापैकी कुणीही त्यापूर्वी बघितलेली नसेल.
इगतपुरीला दोन तीन पोलिस कोचमध्ये शिरले. त्या व्यक्तीच्या डोक्यावरचे पांघरूण त्यांनी खसकन ओढले आणि त्याला हलवले. तसा तो माणूस जागा झाला. डोळे उघडताच इतकी गर्दी डोळ्यासमोर पाहून थोडा बावरला. भानावर यायला त्याला थोडा वेळच लागला आणि नंतर पोलिसांच्या प्रश्नांची सरबत्ती आणि कोचमधल्या गर्दीतले सल्ले, टोमणे, हशा यात तो आणखीनच बुजला. पोलिस निघून गेलेत. गाडी कसा-याचा घाट उतरू लागली आणि त्याने आपली हकीकत सुरू केली.
तो कुणीतरी मुंबईच्या खाजगी कंपनीत मार्केटिंगमधला कर्मचारी होता. गेल्या सतत तीन रात्री त्याची झोप अपुरी आणि वेळीअवेळी करत असलेल्या प्रवासात साचलेली होती. त्याच्या प्रवासातला शेवट्ला टप्पा दुर्गे ते मुंबई असा होता. त्यात त्याने तो झोपेचा बॅकलॉग भरून काढण्याचे ठरविले आणि पहाटे दुर्गला गाडीत चढल्या चढल्या तो गाढ झोपी गेला. खरेतर त्याला स्वतःला इतके गाढ झोपायचे नव्हतेही. साधारण ८ - ९ तास झोपून भुकेच्या वेळी उठू असे त्याने ठरविले होते. पण साचलेल्या झोपेने आणि थकव्याने त्याच्या तहान भुकेवर आणि शरीरधर्मावरही मात केली होती. जशीजशी त्याच्यामुळे संपूर्ण कोचमध्ये उडालेल्या गोंधळाची त्याला जाणीव होत होती तसातसा तो अधिक ओशाळत चालला होता. आता त्याची झोप पूर्णपणे उडालेली होती.
इकडे आम्ही मात्र त्याच्या या परिस्थितीची कीव करावी की हसावे की त्याच्यावर चिडावे की त्याच्याशी सहानुभूती दर्शवावी अशा व्दिधा, त्रिधा चतुर्विधा मनस्थितीत सापडलेलो होतो. पण एक मात्र नक्की इतक्या वर्षांनंतरही तो प्रवास आमच्या अगदी तपशीलवार स्मरणात राहिला. प्रवास नित्याचाच पण असा अनुभव मात्र एकमेकाव्दितीय.
- एक सजग रेल्वेफ़ॅन, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.