Sunday, August 6, 2023

गायक आणि श्रोता: तल्लीनतेचे अद्वैत.

माझे एक निरीक्षण आहे. जे लोक गाणं चांगल्या पध्दतीने ऐकू शकतात तेच लोक गाणं चांगल्या पध्दतीने गाऊपण शकतात. चांगला श्रोता नाही पण चांगला गायक झालाय असे एकही उदाहरण मी पाहिलेले नाही.

गाणं गाताना गायक किती तल्लीन झालाय हे त्याच्या चेहेर्यावर त्याच्याही नकळत येत असलेल्या एका अनामिक तल्लीन वेदनेच्या सूक्ष्म आठीतून कळत असते. तो सूर साधण्यासाठी त्याने केलेले परिश्रम, त्यात अनेकदा आलेले अपयश आणि आता तो सूर, ती जागा सापडल्यानंतर त्या गायकाला झालेला अनामिक, अनिर्वचनीय आनंद याचे प्रतीक म्हणून त्याच्या भुवयांमध्ये क्षणैक का होईना ती आठी प्रगट होते.
तसेच ऐकणाराही गायकाशी मनोमन तल्लीन झाला की गायकाच्या गळ्यातली खर चांगल्या श्रोत्यालाही जाणवते. त्या श्रोत्याच्याही गळ्यात सगळे छान असताना उगाचच त्याला खाकरायला होतं ही त्या गायकाच्या गाण्याची आणि श्रोत्याच्या तल्लीनतेची पावतीच असते.
- मालिनीताई राजूरकरांच्या अहिर भैरवचे रेकाॅर्डिंग ऐकताना प्रत्येक वेळी त्यांच्या गळ्यातली खर जाणवून घशात खाकरायला होणारा कानसेन
आणि
पिंडी तेच ब्रह्मांडी यावर विश्वास ठेऊन आपल्याला जे वाटतेय तेच आपल्यासारख्या इतर समानशीलांना वाटतेय की नाही ? हे सोशल मिडियावर तपासून बघणारा, शोधक वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment