Saturday, August 12, 2023

गाणं : माझे काही काही मापदंड

परवा गाण्यातल्या गायकांच्या आणि श्रोत्यांच्या एकतानतेची पोस्ट टाकली आणि मन कराडच्या दिवसांमध्ये मागे गेले. कराडला आमच्या महाविद्यालयात खूप सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचेत. वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, उत्स्फ़ूर्त वक्तृत्व स्पर्धा आणि भावगीत स्पर्धा. दर आठवड्याला, पंधरवाड्याला यातली एक तरी स्पर्धा व्हायचीच. खूप मजा यायची. स्पर्धा आहे म्हटल्यावर स्पर्धक असायचेत पण स्पर्धकालाही प्रोत्साहन देण्याची, त्याचे खुल्या दिलाने कौतुक करण्याची वृत्तीही बघायला मिळायची. आनंद होता तो यामुळे.


भावगीत स्पर्धेसाठी बहुतांशी वेळा तेव्हा कराडच्या तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत असणारे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि स्वतः एक अत्यंत उत्तम गायक असलेले प्रा. उपेंद्र कारखानीस हे परिक्षकांपैकी एक असायचेच. तेव्हा ते रिॲलिटी शोजचा वगैरे जन्म व्हायचाच होता. (तेव्हा मुळात खाजगी टी व्ही चॅनेल्सचाच जन्म व्हायचा होता.) त्यामुळे कुठल्याही स्पर्धेत नाटकीपणा, आक्रस्ताळेपणाला वाव नव्हता. गाण्याची स्पर्धा म्हणजे गायकाचे गायन कौशल्यच बघितले जायचे. तिथे जो परफ़ॉर्मन्स होईल त्यावरच विजेते ठरायचेत.


एकदा स्पर्धा संपल्यानंतर आम्ही कारखानीस सरांशी गप्पा मारत बसलेलो होतो. बुद्धीमान माणसांशी साध्या गप्पा जरी मारल्यात तरी त्यातून आपल्याही व्यक्तीमत्वाचा विकास होत असतो हे तत्व आम्हाला आमच्या वाढत्या वयातच उमगलेले होते. त्यामुळे आम्ही सरांशी विविध विषयांवर चर्चा करत होतो. चर्चेत सर सहज बोलून गेलेत. 


"भावगीतांवर खरे प्रेम असले म्हणजे ते गीत आपोआप पाठ होते. गाणे सादर करण्यापूर्वी पुरेसा सराव केलेला असला की ते गीत पाठ करण्यासाठी विशेष असे प्रयत्न करावे लागतच नाहीत. एखादेवेळी आपली स्मृती दगा देईल म्हणून ऐनवेळी सहाय्यासाठी पुढे कागद ठेवणे आणि त्यावर एखादा कटाक्ष टाकणे ठीक आहे पण पहिल्यांदाच ते गाणे वाचतोय या आविर्भावात सतत त्या कागदाकडे पहात पहात भावगीत सादर करणे म्हणजे श्रोतृवर्गाचा रसभंग होतो आणि आपली त्या गाण्याशी हवी तितकी बांधिलकी नाही हेच सिद्ध होत असते."


या गोष्टीला आता जवळपास तीस बत्तीस वर्षे होत आलीत. त्यानंतर काळ बदलला. तंत्रज्ञानाने सगळ्याच क्षेत्रांमध्ये खूप मोठी गरूडझेप घेतली. मग त्याला गायन हे क्षेत्र तरी कसे अपवाद असणार ? आम्हालाही ब-याच भावगीत / चित्रपट गीत स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून जाण्याची संधी मिळाली. दरवेळी आमचे परीक्षणाचे मापदंड पक्के होते. गाणं जर तुम्हाला आवडलेले असेल तर आणि तरच ते श्रोत्यांना आवडेल आणि आपल्याला आवडलेले गाणे हे आपल्याला खूप छान पद्धतीने आत्मसात झालेले असलेच पाहिजे हा आमचा चांगल्या गाण्यांचा मापदंड. 


आज तर ते कॅराओके आले आहे. त्यात आपल्या मोबाईलमध्ये बघत बघत गाणे सादर करण्याची नवीनच फ़ॅशन आलेली आहे. त्यातही एका हातात माईक, दुस-या हातात तो स्मार्टफ़ोन. काही कालावधीनंतर त्याची स्क्रीन ऑफ़ होत जाते. म्हणून गाण्यातल्या एखाद्या महत्वाच्या जागेकडे / शब्दाकडे दुर्लक्ष करून एका बोटाने फ़ोनच्या स्क्रीनला स्पर्श करून ती ऑफ़ न होऊ देण्याची कसरत. या सगळ्या गदारोळात हे गाणे श्रवणीय तर होत नाहीच पण प्रेक्षणीय ही होत नाही. अगदी बेंगरूळ असा तो प्रसंग दिसतो. 


आताशा बरे आहे. फ़ारशा भावगीत स्पर्धा होतच नाहीत आणि झाल्यात तरी आम्हाला परीक्षक म्हणून बोलावत नाहीत. नाहीतर अशा पद्धतीने गाणे सादर करणा-या स्पर्धकांना कधीच बक्षीस मिळू शकले नसते आणि स्पर्धेत जर सगळीच मंडळी अशीच सादरीकरण करणारी असतील तर आम्ही कुणालाही बक्षीस न देता स्पर्धाच रद्दबातल ठरवली असती. पण काळ बदलाय, परीक्षकही बदलायला हवेत. समाधान एव्हढेच की आम्हाला मनोमन पटलेली, आमच्या हृदयाशी जपून ठेवलेली ही काही मूल्ये आम्ही बदलली नाहीत.


- जुने ते सगळेच सोने नसते हे पटलेला 


पण तरीही


शाश्वत मूल्ये ही जुनी नवी असा भेद न करता कायम जपायला हवीत या ठाम मताचा, खडूस परीक्षक 


आणि 


पुलंच्या रावसाहेबांसारखा "गल्ली चुकलेले गाणे" कानांना लगेच ओळखू येणारा चांगला कानसेन,


प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर  

No comments:

Post a Comment