Wednesday, August 9, 2023

सलूनः एक स्थानमहात्म्य

काहीकाही टीव्ही चॅनेल्स फक्त हेअर कटिंग सलून मध्ये लावण्यासाठीच जन्माला येतात की काय ? कोण जाणे. कारण त्या वाहिन्या आपण घरच्या टी व्ही चॅनेल्सच्या पॅकमध्ये एकतर घेतच नाही आणि घेतल्याच तरी ती चॅनेल्स नेहमी फक्त स्क्राॅल करूनच पुढे जातो. त्या चॅनेलवर काही सेकंदांपेक्षा जास्त आपण घरी थांबत नाही.

बरं असे हे एकापेक्षा एक सुमार सिनेमे त्या सलूनमध्ये १५ - २० मिनिटांसाठी बघताना चांगले वाटतात हो. घरी येऊन नेमकी ती वाहिनी शोधून लावावी तर घरची मंडळी आपल्याकडे "हा लेकाचा सलूनमध्ये स्वतःच्या डोक्यावरचे केसच नाही तर स्वतःच्या डोक्यातली अक्कलही देऊन आला की काय ?" या नजरेने बघतात हो. आणि खरं सांगायचं तर ते सिनैमे घरी बघताना आपल्यालाही सलूनमध्ये आवडले होते तितके आवडत नाहीत.
तसेच सलूनमध्ये जे काही पावडर, शेव्हिंग क्रीम्स, आफ्टर शेव्ह, फेस क्रीम्स हे सगळे जिन्नस (खूप दिवसांनी हा शब्द उपयोगात आला.) बाहेर कुठल्याही बाजारात विकत मिळत नाहीत. अगदी अॅमेझाॅमवर सुध्दा उपलब्ध नसतात. हे सुध्दा एक कोडंच आहे. त्या विविध ब्रँडसच्या तिथे मांडून ठेवलेल्या खोक्यांच्या आत खरोखर काही ऐवज (हा सुध्दा शब्द फार दिवसांनी वापरला.) असतो की आपले स्टँडर्ड वाढविण्यासाठी सलूनवाले नुसते रिकामे खोकेच तिथे ठेवतात का काय ? हा सुध्दा मला पडलेला प्रश्न आहे.
एकदा मी थोड्या आगाऊपणाने त्यातलेच एक आफ्टर शेव्ह लोशन खरेदी करण्याची तयारी दर्शवली. माझा नेहेमीचा सलूनवाला मित्र म्हणाला,"मी तुम्हाला असेच दुसरे आणून देतो." तो ते कुठल्या दुकानातून आणून देणार याबद्दल खोदून खोदून विचारल्यावरही त्याने त्या ठिकाणाचा थांगपत्ता मला लागू दिला नाही. जणू अॅटलांटाच्या हेड आॅफिसमध्ये असलेला कोका कोलाचा अत्यंत गोपनीय फाॅर्म्युलाच.
बाकी तात्पर्य काय? हे सलूनवाले आणि त्यांचं जग हे एक निराळंच जग आहे. आपल्या या जगात ते बाहेरच्या फारशा कुणाला प्रवेश देत नाहीत, किमान आमच्यासारख्या चौकस आणि भोचक मंडळींच्या फुकटच्या चौकशांना दाद लागू देत नाहीत हे वास्तव माझ्या लक्षात आलेले आहे आणि सलूनमध्ये गेल्यावर खुर्चीत बसल्याबसल्या "बारीक" हा एकच शब्द उच्चारून आपली डोई त्याच्या हातात देणे हा एकच नेमस्त मार्ग मी अवलंबतो.
- बालपणापासूनच कायम बारीक कटिंग करत आलेला (कुणीही बघितलं तरी "काय रे परवाच मुंज झाली का ?" असा प्रश्न विचारण्या इतपत बारीक) नेमस्त सज्जन, प्रा वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment