Thursday, August 24, 2023

मनुष्याचा पिंड कसा घडत जातो ?: एक चिंतन.

मनुष्याचा पिंड कसा घडत जातो ? याचे चिंतन अनेक मानसशास्त्रज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी केलेले आहे. ते वाचले पण जोपर्यंत स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत ते प्रत्ययाला येत नाही. ती व्याख्या पाठ होऊ शकेल पण ती आत्मसात झाली असे अनुभवाशिवाय म्हणता येणार नाही. असाच एक स्वानुभव.


महाल / इतवारी भागात बालपण गेल्यामुळे महालच्या केळीबाग रोडवरचे आंबेकर घी शॉप हे बालपणाचा अविभाज्य भाग बनले होते. त्यांच्याकडले तूप, लोणी हे अक्षरशः रक्तात गेले. आमच्या बालपणी सणासुदीलाच तूप वगैरे प्रकार परवडत असे. सणावारांचे दिवस आले की वडिलांसोबत आंबेकर घी शॉप मध्ये कडीचा डबा घेऊन जायचे आणि तत्कालीन परिस्थितीप्रमाणे कधी पाव किलो, कधी अर्धा किलो तूप घेऊन परतायचे हा नित्यक्रम होता. महाल सोडून पश्चिम नागपुरात रहायला आलोत तरी बरीच वर्षे महालातल्या फ़ेरीत आंबेकरांच्या दुकानात फ़ेरी नक्की असायची. तिथल्याशिवाय इतर कुठलेच तूप, लोणी आवडायला तयारच नव्हते.


नोकरीनिमित्त मुंबईत, ठाण्यात जवळपास एक तप वर्षे घालवलीत. दरवेळी नागपुरातून नोकरीसाठी परतताना दुपारच्या विदर्भ एक्सप्रेसने किंवा रात्री उशीराच्या सेवाग्राम एक्सप्रेसने परतणार असलो तर त्याचदिवशी सकाळी आंबेकरांच्या दुकानात चक्कर मारून तिथून एक, दीड किलो तुपाची खरेदी व्हायची. तेव्हढाच आपल्या नागपूरचा मुंबईत दुवा. ते तूप संपेपर्यंत आपण नागपुरातच आहोत अशी मनाची समजूत. "दिलको बहलाने के लिए, गालिब खयाल अच्छा है." तसेही तुम्ही नागपुरी माणसाला नागपूरच्या बाहेर काढू शकता, नागपुरी माणसाच्या बाहेर त्याच्या आतले नागपूर काढू शकत नाही.


मुंबईत खूप जणांकडून तिथल्या खूप जणांकडल्या तूप लोण्याचे कवतिक ऐकले. आम्हाला जसे ’आंबेकर’ तसे त्यांच्या त्यांच्या विभागातले ’आंबेकर’ हीच मंडळी असतील म्हणून सगळ्यांच्या शिफ़ारसी ऐकून तिथल्या तिथल्या तुपाची, लोण्याची चवही घेऊन पाहिली. अगदी "आनंदाचे डोही आनंद तरंग" या चालीवरच्या "सामंतांचे लोणी, सामंतांचे तूप", ठाण्यातल्या "खंडेलवाल" सगळ्या ठिकाणची चव घेऊन पाहिली पण "तस्य तदेवहि मधुरम यस्य मनो यत्र संलग्नम" या संस्कृत सुभाषिताप्रमाणेच त्या सगळ्या ठिकाणी  ते आमचे ’आंबेकर’ नव्हते. अगदी माणदेशात सांगोल्याला असताना ’गोकुळ’ वगैरे ब्रॅंण्डचेही तूप चाखून बघितले. खान्देशात शिरपूरला असताना ते गीर गायीचे अगदी दोन हजार रूपये किलोचे ए -टू टाईपचेही तूप एकदा चाखून बघितले. चंद्रपूरला सासुरवाडीला खेडेगावातून येणा-या विक्रेत्यांनी आणलेले अस्सल गावराणी तूप पण खाऊन पाहिले पण दरवेळी कुठलेच तूप आंबेकरांच्या तुपाच्या तोडीचे नाही याची जाणीव अधिक पक्की झाली.


पुन्हा नागपुरात परतलो. तोवर आंबेकर घी शॉपची एक शाखा पश्चिम नागपुरात घराजवळच राणाप्रताप नगरला उघडलेली होती. आता केळीबाग रोड पर्यंत गाडी दामटवण्याची गरज नव्हती. खूप आनंद झाला.


आता मागल्या आठवड्यातलीच गोष्ट. घरातले तूप संपले होते. संध्याकाळी आंबेकरांकडे गेलो. त्यांच्याकडलाही तुपाचा स्टॉक नेमका संपलेला होता. सकाळी आलेला काही किलो तुपाचा स्टॉक संध्याकाळी सात पर्यंत संपणे म्हणजे त्या मालाच्या दर्जाची ग्वाहीच होती. मग त्यांच्याकडले अगदी शेवटचे उरलेले शंभर ग्रॅम तूप घेऊन परतलो. आता ते तूप किती दिवस पुरणार ? पण गेला संपूर्ण आठवडा खूप धावपळीचा गेला आणि सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा त्यांच्याकडे तूप आणायला जाणे झालेच नाही. आज मात्र अगदी सगळी कामे बाजूला ठेऊन आंबेकरांकडे जायचेच ठरवले. तसे तूप म्हणजे अगदी जीवनावश्यक वस्तू वगैरे नाही पण ही किमया आंबेकरांकडल्या तुपाच्या चवीची, शुद्धतेची.


मी माझाच शोध घेत गेलो आणि लक्षात आले की अरे, आपल्या बालपणापासून आपला पिंड तर आंबेकरांकडल्या तुपावरच पोसला गेलेला आहे. त्यामुळे आता इतर कुठलाही तुपाचा ब्रॅण्ड आपल्याला चालूच शकत नाही. हे आणि फ़क्त हेच तूप.


आता यात कुणाला तरी आंबेकरांची जाहिरात वगैरे केल्याचा संशय येईलही. पण आंबेकरांना कधीच जाहिरातीची गरज नव्हती आणि नसेलही. ज्यांनी एकदा त्यांच्याकडल्या तुपाची, लोण्याची चव घेतली ते त्यांच्याशी कायमचे जोडले जातात हे अगदी खरी गोष्ट आहे. आणि त्यासाठी आंबेकरांना जाहिरातीची गरजच नाही. 


आणि एखाद्या खरोखर चांगल्या गोष्टीची आपल्याकडून जाहिरात होत असेल तर नक्की व्हावी असे मला मनापासून वाटते.  आजच्या या दर सेकंदाला बदलत जाणा-या अनित्य जगात आम्हाला आमच्या बालपणाशी जोडून ठेवणारा दुवा म्हणजे आंबेकरांच्या तुपाची गेल्या पन्नास (कदाचित शंभरही. आम्हाला आमच्या आयुष्यातली पन्नास वर्षे आठवत आहेत.) वर्षात न बदललेली चव आणि शुद्धता. हे नुसते आंबेकर घी शॉप नाही तर आमच्या बालपणात, आमच्या आजीने, आईने वाढलेल्या पंक्तींची आठवण ताजी करणारी, आमच्या वडील, आजोबांचे हात धरून महालातल्या यांच्या दुकानात जाण्याच्या आठवणींची टाईम मशीन आहे. हे दुकान म्हणजे आमची नाळ नक्की कुठे पुरल्या गेलेली आहे याची जाणीव सदैव जागृत ठेवणारा एक सांस्कृतिक ठेवा आहे.


- आठवणींमध्ये रमणारा, भूतकाळाशी कायम कृतज्ञ असणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


No comments:

Post a Comment