Monday, October 2, 2023

भारतीय रेल्वेतील एक अत्यंत दुर्मिळ क्लासचा कोच : FN - 1 कोच. त्यानिमित्ताने सेवाग्राम एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, हरिप्रिया एक्सप्रेस आणि दादर अमृतसर एक्सप्रेसच्या आठवणी.

1990 च्या दशकापर्यंत पुणे ते कोल्हापूर विभाग हा दक्षिण - मध्य रेल्वेच्या अखत्यारित होता. तेव्हा नागपूर - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, कोल्हापूर - मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) सह्याद्री एक्सप्रेस, नागपूर - दादर सेवाग्राम एक्सप्रेस आणि दादर - कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस या गाड्यांचे रेक शेअरींग होत असे. ते रेक शेअरींग खालीलप्रमाणे असे. हे रेक शेअरींग मी कसे शोधून काढले याची सविस्तर शोधकथा इथे.


दिवस पहिला नागपूर (सकाळी 10.00 वाजता) --- 7384 अप नागपूर - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस --- कोल्हापूर (दिवस दुसरा दुपारी 14.30 वाजता)


कोल्हापूर यार्डात या रेकचा Secondary Manitenance.


दिवस दुसरा कोल्हापूर (रात्री 8.30 वाजता) --- 7304 अप कोल्हापूर - मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) सह्याद्री एक्सप्रेस --- मुंबई (दिवस तिसरा सकाळी 11.30 वाजता)


मुंबईतल्या मध्य रेल्वेच्या वाडीबंदर यार्डात या रेकची जुजबी साफ़सफ़ाई. कारण ही गाडी मध्य रेल्वेची नाही. दक्षिण - मध्य रेल्वेच्या मालकीची आहे.


दिवस तिसरा मुंबई (संध्याकाळी 5.45 वाजता) --- 7303 डाऊन मुंबई - कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस --- कोल्हापूर (दिवस चौथा सकाळी 6.00 वाजता) 


कोल्हापूर यार्डात या रेकचा Secondary Manitenance.


दिवस चौथा कोल्हापूर (दुपारी 12.30 वाजता) --- 7383 डाऊन कोल्हापूर - नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस --- नागपूर (दिवस पाचवा संध्याकाळी 5.30 वाजता)


नागपूरातल्या मध्य रेल्वेच्या यार्डात या रेकची अत्यंत जुजबी साफ़सफ़ाई. कारण ही गाडी मध्य रेल्वेची नाही. दक्षिण - मध्य रेल्वेच्या मालकीची आहे.


दिवस पाचवा नागपूर (रात्री 10.10 वाजता) --- 7340 अप नागपूर - दादर सेवाग्राम एक्सप्रेस --- दादर (दिवस सहावा दुपारी 3.30 वाजता) 


दादरच्या मध्य रेल्वेच्या यार्डात या रेकची अत्यंत जुजबी साफ़सफ़ाई. कारण ही गाडी मध्य रेल्वेची नाही. दक्षिण - मध्य रेल्वेच्या मालकीची आहे. आणि दादर यार्डात त्याकाळी (आणि अजूनही) मध्य रेल्वेच्याच गाड्यांची धड साफ़सफ़ाई होत नसे त्यातून ही गाडी तर दुस-या विभागाचीच. साफ़सफ़ाईकडे संपूर्णपणे दुर्लक्ष. 


दिवस सहावा दादर (रात्री 8.30 वाजता) --- 7311 डाऊन दादर - कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस --- कोल्हापूर (दिवस सातवा सकाळी 7.00 वाजता) 


आता या गाडीचा संपूर्ण Primary Manitenance कोल्हापूर यार्डात. कारण आता ही गाडी इथे दिवसभर मुक्कामाला येत होती. म्हणजे या गाडीचा Primary Manitenance आठ दिवसातून एकदाच. 


दिवस सातवा (संध्याकाळी 7.30 वाजता) --- 7312 डाऊन कोल्हापूर - दादर महालक्ष्मी एक्सप्रेस --- दादर (दिवस आठवा सकाळी 7.00 वाजता) 


दिवस आठवा (दुपारी 12.45 वाजता) --- 7339 डाऊन दादर - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस --- नागपूर (दिवस नऊवा पहाटे 5.30 वाजता) 


दिवस नऊवा (सकाळी 10.00 वाजता) --- 7384 अप नागपूर - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ---- ( चक्र पुन्हा सुरूच)


या रेकला दादर - बल्लारशाह स्लीप कोचेस लागायचेत. अर्धा फ़र्स्ट क्लास + अर्धा स्लीपर कोच असलेला एक FN - 1 कोच, आणि एक स्लीपर कोच. हे कोचेस वर्धा स्टेशनवर पहाटे काढून ठेवले जायचेत आणि वर्धा - बल्लारशाह पॅसेंजरला जोडून बल्लारशाहपर्यंत जायचेत. संध्याकाळी हीच बल्लारशाह - वर्धा पॅसेंजर हे कोचेस वर्धेपर्यंत आणायची आणि रात्री सेवाग्राम एक्सप्रेस नागपूरवरून आली की तिला हे कोचेस जोडले जायचेत. 


यातला FN - 1 कोच मोठा मजेशीर होता. कोचच्या अर्ध्या भागात प्रथम वर्ग (बिगर वातानुकूल). Aहा चार प्रवाशांसाठी असलेला  कंपार्टमेंट (सकाळी 6.00 ते रात्री 9.00 या वेळेसाठी हा कंपार्टमेंट सहा प्रवाशांना बसण्यासाठी उपलब्ध असायचा.) आणि B हा फ़क्त दोन प्रवाशांसाठी असलेला कूपे (सकाळी 6.00 ते रात्री 9.00 या वेळेसाठी हा कूपे तीन प्रवाशांना बसण्यासाठी उपलब्ध असायचा.) आणि कोचच्या उरलेल्या अर्ध्या भागात 40 शायिका असलेला बिगर वातानुकूल त्रिस्तरीय शयनयान वर्ग. चंद्रपूर - वरोरा - हिंगणघाट इथून मुंबईपर्यंत जाणा-या सर्व वर्गाच्या प्रवाशांची सोय व्हावी हा रेल्वेचा हेतू असावा. 


ही गाडी दादरला पोहोचली की महालक्ष्मी एक्सप्रेसला हे दोन कोचेस आतून बंद करायचेत आणि त्या कोचेसवर बाहेरून खडूने "कल्याण कोच" असे लिहून हे कोचेस संध्याकाळी दादर ते कल्याण पर्यंत बंद अवस्थेत न्यायचेत आणि कल्याणला उघडायचेत. त्याकाळी हे "कल्याण कोचचे" असेच प्रकार मुंबई - पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, मुंबई - पुणे डेक्कन एक्सप्रेसच्या बाबतीतही मी बघितले आहेत. मग हे दोन कोचेस कल्याण ते कोल्हापूर प्रवाशांसाठी राखीव होऊन कोल्हापूरपर्यंत जायचेत. महालक्ष्मी एक्सप्रेसच्या परतीच्या प्रवासात हेच कोचेस मात्र थेट कोल्हापूर - दादर प्रवाशांसाठी उपलब्ध असायचेत. 


1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात पुणे ते कोल्हापूर हा विभाग मध्य रेल्वेकडे आला. गाड्यांचे नंबर्स बदललेत. 7383 डाऊन / 7384 अप महाराष्ट्र एक्सप्रेसची 1039 डाऊन / 1040 अप महाराष्ट्र एक्सप्रेस झाली. 7303 डाऊन / 7304 अप सह्याद्री एक्सप्रेसची 1023 डाऊन / 1024 अप सह्याद्री एक्सप्रेस झाली. या गाड्यांचे रेक शेअरींग तसेच सुरू राहिले. आजही ते तसेच सुरू आहे. 1040 अप महाराष्ट्र - 1024 अप सह्याद्री - 1023 डाऊन सह्याद्री - 1039 डाऊन महाराष्ट्र असे सुरू आहे. या रेक शेअरींगचा Primary Manitenance मध्य रेल्वेच्या मुंबई वाडीबंदर यार्डात होतो.



7339 डाऊन / 7340 अप सेवाग्राम एक्सप्रेसची 1439 डाऊन / 1440 अप सेवाग्राम एक्सप्रेस झाली. आणि 7311 डाऊन / 7312 अप महालक्ष्मी एक्सप्रेसची 1011 डाऊन / 1012 अप महालक्ष्मी एक्सप्रेस झाली. या गाड्यांचे रेक शेअरींग तुटले. महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत वाढवल्या गेली. महालक्ष्मी एक्सप्रेसला मध्य रेल्वेचा डेडिकेटेड रेक मिळायला लागला. मग बिचा-या सेवाग्राम एक्सप्रेसला आपल्या रेक शेअरींगसाठी दुसरा जोडीदार शोधावा लागला. मग दुपारी दादर ला येणारी नागपूर - दादर सेवाग्राम एक्सप्रेस रात्री दादर - अमृतसर एक्सप्रेस म्हणून जाऊ लागली. पहाटे पहाटे दादरला येणारी अमृतसर - दादर एक्सप्रेस दुपारी दादर - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस म्हणून जाऊ लागली.



आता या दादर - अमृतसर गाडीला अगदी आत्ता आत्ता पर्यंत दादर - धुळे हे स्लीप कोचेस लागायचेत. मग बल्लारशाह - दादर हे दोन कोचेस दादर - धुळे म्हणून जाऊ लागलेत आणि धुळे - दादर दोन स्लीप कोचेस दादर - बल्लारशाह म्हणून जाऊ लागलेत. 



सेवाग्राम एक्सप्रेस सुपरफ़ास्ट झाली. 2139 डाऊन / 2140 अप हा नंबर या गाडीला मिळाला. ती थेट मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जाऊ लागली. सेवाग्राम आणि दादर अमृतसर एक्सप्रेसचे रेक शेअरींग तुटले. मग हा FN - 1 कोच पण रेल्वेने काढून टाकला. तोपर्यंत रेल्वेच्या या दुर्मिळ कोचचे नवनिर्माण थांबले होते. 1980 च्या दशकात बनवलेले हे कोचेस रेल्वे वापरत होती. आता ते जुने झाल्यामुळे त्यांची आयुर्मर्यादा संपली. त्यांच्या जागी सेवाग्राम एक्सप्रेसला मुंबई - बल्लारशाह प्रवासासाठी दोन ए सी थ्री टायर, दोन स्लीपर कोच आणि एक जनरल कोच असे स्लीप कोचेस मिळालेत तर अमृतसर एक्सप्रेसला दादर - धुळे प्रवासासाठी एक ए सी थ्री टायर, दोन स्लीपर कोच आणि एक जनरल कोच असे कोचेस मिळालेत. दादर - अमृतसर एक्सप्रेस मधली काही वर्षे अमृतसर - लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) अशी धावली आणि आता तिचाही विस्तार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत झाला आहे. सगळेच स्लीप कोचेस काढून टाकण्याचे रेल्वेचे नवे धोरण आल्याने आता दादर - धुळे स्लीप कोचेस तिला लागत नाहीत.  


महालक्ष्मी एक्सप्रेसला सुरूवातीला डेडीकेटेड रेक मिळाला खरा पण नंतर ती आपला रेक 1025 डाऊन / 1026 अप मुंबई - सोलापूर - मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेसशी शेअर करू लागली. सकाळी मुंबईला आलेली सिद्धेश्वर एक्सप्रेस रात्री महालक्ष्मी एक्सप्रेस म्हणून आणि सकाळी मुंबईत आलेली महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेस म्हणून जाऊ लागली. या दोन्हीही गाड्यांचा Primary Manitenance मध्य रेल्वेच्या मुंबई वाडीबंदर यार्डातच होत असताना हे रेक शेअरींग कशाला ? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळाले नाही.




2000 च्या दशकाच्या उत्तरार्धात मिरज कुर्डुवाडी या रेल्वेमार्गाचे रूंदीकरण (नॅरो गेज ते ब्रॉड गेज) पूर्ण झाले. आणि मध्य रेल्वेने सोलापूर - कोल्हापूर एक्सप्रेस सुरू केली. या गाडीसाठी मात्र पुन्हा रेक शेअरींग बदलले. सकाळी सोलापूरला येणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस दिवसभर सोलापूर यार्डात पडून राहण्यापेक्षा लगेच सोलापूर - कोल्हापूर एक्सप्रेस म्हणून रवाना होऊ लागली आणि दुपारी कोल्हापूरला पोहोचून त्याच रात्री कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस म्हणून मुंबईला जाऊ लागली. मुंबईला सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेसमधे असलेले रेक शेअरींग संपले. सकाळी मुंबईला आलेली महालक्ष्मी एक्सप्रेस त्याच रात्री महालक्ष्मी एक्सप्रेस म्हणून रवाना होऊ लागली. दुस-या दिवशी कोल्हापूरला सकाळी आलेली महालक्ष्मी एक्सप्रेस लगेचच कोल्हापूर - सोलापूर एक्सप्रेस म्हणून रवाना होत असे आणि सोलापूरला दुपारी आलेली कोल्हापूर - सोलापूर एक्सप्रेस त्याच दिवशी रात्री सोलापूर - मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस म्हणून मुंबईत येत असे. 




जुलै 2013 मध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस पुन्हा दक्षिण मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झाली. पुन्हा तिचा नंबर 1011 डाऊन / 1012 अप वरून 7411 डाऊन / 7412 अप असा झाला. ही गाडी आणि तिरूपती - कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेसचे रेक शेअरींग सुरू झाले. दुपारी कोल्हापूरला आलेली तिरूपती - कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेस संध्याकाळी कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस आणि सकाळी कोल्हापूरला आलेली महालक्ष्मी एक्सप्रेस दुपारी कोल्हापूर - तिरूपती हरिप्रिया एक्सप्रेस म्हणून रवाना होऊ लागली. अर्थात हरिप्रिया म्हणजे महालक्ष्मीच हे पौराणिक तत्व रेल्वेला मान्य होतेच. या रेकचा Primary Manitenance दक्षिण मध्य रेल्वेच्या तिरूपती यार्डात होतो आहे. 


इकडे सिद्धेश्वर एक्सप्रेसनेही आपला दुसरा जोडीदार शोधला. सकाळी मुंबईत आलेली सिद्धेश्वर एक्सप्रेस लगोलग मुंबई - बंगळूरू उद्यान एक्सप्रेस म्हणून रवाना होऊ लागली. उद्यान एक्सप्रेसचा दक्षिण मध्य रेल्वेचा जुना नंबर 6529 डाऊन / 6530 अप बदलून मध्य रेल्वेचा 11301 डाऊन / 11302 अप हा नवा नंबर तिला मिळाला. संध्याकाळी मुंबईत आलेली उद्यान एक्सप्रेस लगोलग रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेस म्हणून रवाना होऊ लागली. दिवसभर सोलापूर यार्डात हा रेक राहत असल्यामुळे या रेकचा Primary Manitenance सोलापूरला होतो आहे. 



सोलापूर - कोल्हापूर एक्सप्रेस बंद झाली. त्याऐवजी मिरज - पंढरपूर या मार्गावर त्याच वेळेस डेमू लोकल गाडी सुरू झाली. 


या सगळ्या गदारोळात भारतीय रेल्वेत असलेला अत्यंत दुर्मिळ वर्गाचा FN - 1 कोच मात्र सगळ्यांच्याच विस्मृतीत गेला. आता त्याचे निर्माण होत नाही आणि जुने सगळेच कोचेस रेल्वेने आत्तापर्यंत भंगारात काढले असतील.


- पुलंच्या "मोपे डार गयो" च्या स्मरणाने गहिवरणा-या रावसाहेबांसारखा; जुन्या कोचेसच्या स्मरणाने गहिवरणारा रेल्वेफ़ॅन रामसाहेब, प्रा. वैभवीरा्म प्रकाश किन्हीकर. 


No comments:

Post a Comment