आजकाल एका कंपनीची एक नवीनच जाहिरात टीव्हीवर येते आहे. त्या जाहिरातीत ती कंपनी प्रवाशांना कन्फ़र्म रेल्वे तिकीट देण्याचा वादा करते आहे. त्यात तो तरूण म्हणतो "पुण्याला गाडीत बसा, भुसावळला सीट बदला आणि नागपूरला उतरा." इतकी बिनडोक जाहिरात बघून हसूच येते. अरे बाबा, पुण्याला संध्याकाळी गाडीत बसलेला माणूस पहाटे पहाटे आपली अर्धी साखरझोप सोडून भुसावळला आपली सीट का बदलेल ? आणि पुणे ते नागपूर ८९२ किलोमीटर अंतरापैकी पुणे ते भुसावळ हे ४९६ किलोमीटर अंतर एका सीटवर / बर्थवर काढून उरलेल्या ३९६ किलोमीटर अंतरासाठी दुस-या बर्थवर का जाईल. अर्थात ह्या जाहिरातीचा मराठी तजुर्मा करताना हा बिनडोकपणा झालाय की मुळातलीच ही जाहिरात तशीच आहे ? हे कळायला वाव नाही.
१९८९ साली नागपूरवरून कराडला जाण्यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये पाऊल टाकले तेव्हापासून दरवर्षी भरपूर रेल्वे प्रवास घडत आलेला आहे. मग त्या रेल्वे प्रवासात दरवेळी रिझर्वेशन्स मिळवताना करावे लागणारे उपाय यावर एक मोठ्ठा प्रबंध लिहीण्याइतकी सामग्री जमा झालेली आहे. पहिल्या काही प्रवासांमधली गोष्ट. तरूण वयात आपल्या कोचच्या बाहेर लागलेला रिझर्वेशन चार्ट पाहून त्यात आपल्या कोचमध्ये आणि त्यातही आपल्या सीटजवळ कुणी प्रवासी F 16 ते F 25 या वयोगटातली आहे का ? हे सगळेच तरूण तपासतात. पण माझ्या पहिल्याच प्रवासात आमचे लक्ष ही सगळी ७२ प्रवासीमंडळी कुठे चाललीत यावर होते. आमच्या कोचमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त प्रवासी मंडळी नागपूर ते जेजुरी चाललेली पाहून मला आश्चर्य वाटले. आमचे महाविद्यालय सुरू होण्याच्या वेळेला जेजुरीला कुठली यात्रा वगैरे आहे की काय ? अशी शंका मला आली. पण गाडीत उलगडा झाला. जेजुरीचे तिकीट काढलेले बहुतेक प्रवासी पुण्यापर्यंतच जाणार होते. नागपूर ते पुणे ह्या प्रवासासाठी मर्यादित सीटसचा कोटा उपलब्ध असल्याने, नागपूर ते पुणे तिकीटे संपलीत की प्रवासी मंडळी नागपूर ते जेजुरी ही तिकीटे काढायचीत. नागपूर ते जेजुरी आणि नागपूर ते पुणे या प्रवास तिकीटांमध्ये तेव्हा फ़क्त १० रूपयांचा फ़रक होता. पण नागपूर ते जेजुरी (आणि पुढे कोल्हापूरपर्यंतची सगळी स्थानके) हा रेल्वेचा End to End Quota असल्याने तुलनेने तिप्पट चौपट तिकीटे या प्रवासासाठी उपलब्ध असायचीत. म्हणून मग नागपूर ते पुणे तिकीटांचा कोटा संपला की पुण्याचे सगळे प्रवासी जेजुरीचे तिकीट काढून प्रवास पसंत करायचे.
आज महाराष्ट्र एक्सप्रेस आणि विदर्भ एक्सप्रेस या गाड्या गोंदियापर्यंत पळवल्या गेल्यात. या दोन्हीही गाड्यांचा अनुक्रमे नागपूर ते कोल्हापूर आणि नागपूर ते मुंबई हा जागांचा कोटा खूप कमी झाला. मग हा कोटा संपला की माहितगार प्रवासी मंडळी नागपूर आधीच्या कामठी स्थानकापासून कामठी ते कोल्हापूर किंवा कामठी ते मुंबई या End to End Quota मध्ये तिकीटे काढतात. गोंदिया पासून सुरू होणारा हा End to End Quota कामठी पर्यंत असतो. त्यानंतर नागपूर पासून हा End to End Quota संपून Pooled Quota सुरू होतो. आणि नागपूर ते मुंबई व कामठी ते मुंबई या तिकीटांमध्ये फ़ार फ़ार तर २० ते ५० रूपयांचा फ़रक असतो. तो फ़रक भरून कन्फ़र्म तिकीट घेऊन जाण्याला सगळ्यांची पसंती असते.
परतीच्या प्रवासातही तेच. विदर्भ एक्सप्रेसची मुंबई ते नागपूर तिकीटे संपलीत की सगळी मंडळी मुंबई ते कामठी अशी End to End Quota मधली तिकीटे काढतात. थोडेसेच जास्त पैसे लागतात पण कन्फ़र्म तिकीटे तर मिळतात या भावनेने मंडळी निवांत असतात. प्रवासी माणसांचे मुख्यतः दोन प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे म्हणजे तिकीटे घेऊ. वेटलिस्ट तर वेटलिस्ट. बघू ऐनवेळी काय होते ते ? जर तिकीट कन्फ़र्म नाहीच झाले तर बघू पुढचे पुढे. ऐनवेळी टीटीई कडे विनंती करून वगैरे जागा मिळतेय का बघू, नाहीतर आदल्या दिवशी तत्काळ जिंदाबाद आहेच.
तर दुसरा प्रकार म्हणजे कन्फ़र्मच तिकीटे पाहिजे बुवा, ऐनवेळी धावपळ, टीटीईला पटवा, तत्काळचे जास्त पैसे भरा यात पैसे घालवण्यापेक्षा जर आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये नागपूर ते पुणे ती तिकीटे संपल्यानंतर थेट हावडा ते पुणे किंवा खरगपूर ते पुणे (पण बोर्डिंग ॲट नागपूर) असे End to End Quota मधले तिकीट जर २०० रूपये जास्त भरून का होईना उपलब्ध होत असेल तर नंतरची अनिश्चितता तर टळेल या भावनेने अशी तिकीटे काढणा-यांचा आहे. मग त्यात एखादेवेळेस नागपूर ते चेन्नई प्रवासासाठी तामिळनाडू एक्सप्रेसचे नवी दिल्ली ते चेन्नई (बोर्डिंग ॲट नागपूर) असे तिकीट काढणारीही मंडळी मी बघितलेली आहेत.
त्यामुळे ही अर्धवट माहितीची जाहिरात कशीही पचनी पडत नाही.
- रेल्वेच्या रिझर्वेशन सिस्टीमचे अल्गोरिदम कोळून प्यायलेला (पण अजूनही हावडा ते पुणे बोर्डिंग ॲट नागपूर असे तिकीट काढल्यावर त्या जागेवर रेल्वे हावडा ते नागपूर किंवा खरगपूर ते बिलासपूर व बिलासपूर ते नागपूर किंवा हावडा ते खरगपूर व गोंदिया ते नागपूर असे प्रवासी भरू देण्यासाठी परवानगी देते का ? या प्रश्नाचे उत्तर न कळलेला) स्वतः कायम कन्फ़र्म रिझर्वेशन घेऊनच प्रवास करणारा, भारतातील ३५०० रेल्वेफ़ॅन्सपैकी एक, प्रा. वैभवीराम वैशाली प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment