Tuesday, March 19, 2024

त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवीत होता...

परवा अचानक नागपुरात वावटळ सुटली. रस्त्यावरची धूळ, कचरा वारा इतस्ततः वाहून नेऊ लागला. त्यावेळी मी नेमका दुचाकीवर फिरत होतो. धूळ कचरा नाकातोंडात जाऊ लागला आणि डोळ्यात कचरा गेल्यानंतर आहे त्या जागी थांबावे लागले. डोळ्यांना लागलेल्या धारा पुसून, डोळ्यात गेलेला कचरा काढून पुढे जावे लागले आणि कवी ग्रेस आठवले. 


ती आई होती म्हणूनी 

घनव्याकुळ मी ही रडलो

त्यावेळी वारा सावध

पाचोळा उडवीत होता. 


कवी ग्रेस यांची खूप गाजलेली ही कविता. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी तिला चाल लावून "निवडुंग" सिनेमातही आणले. या कवितेच्या पहिल्या चार ओळी वाचल्यात तर प्रेयसीच्या विरहातल्या प्रियकराचे हे गाणे वाटते पण "ती आई होती म्हणूनी..." ही ओळ आल्यानंतर ही कविता कवीच्या आईच्या मृत्यूप्रसंगीची आहे हे लक्षात येते. आणि पहिल्या चार ओळींचा अर्थ नव्याने कळतो. 


ती गेली तेव्हा रिमझिम

पाऊस निनादत होता

मेघांत अडकली किरणे

हा सूर्य सोडवीत होता. 


या ओळींनंतर ही प्रेयसीच्या तात्पुरत्या विरहातली कविता आहे असे वाटू शकते पण नंतरच्या चार ओळी 


ती आई होती म्हणूनी 

घनव्याकुळ मी ही रडलो

त्यावेळी वारा सावध

पाचोळा उडवीत होता. 


या ओळी वाचल्यात की कवितेच्या विषयाचा उलगडा होतो आणि पहिल्या चार ओळींचा अर्थ नव्याने उमगतो. 


वास्तविक आईचा मृत्यू हा कुठल्याही जिवासाठी अत्यंत दुःखदायक असतो. आणि हे दुःख आयुष्यभरासाठी असते. अगदी बालपणी, नकळत्या वयात जरी आईचा मृत्यू झाला आणि त्यावेळीजरी  त्या मृत्यूचे दुःख झाले नाही तरी कळते झाल्यावर, "आई" शब्दाचा अर्थ ध्यानात आला, आजुबाजूला आपल्या समवयस्कांमध्ये आई आणि मुलाचे नाते बघितले की मग आपल्याला आई नाही याचे फार दुःख होते , आपली आई आपल्याला "आई" जाणवण्यापूर्वीच आपल्यापासून दूर गेली हे कळते आणि नकळत्या वयात आपण किती मोठा आघात सोसला हे लक्षात येऊन आपले आपल्यालाच रडू येते, आपणच आपली कीव करावी अशी ही अवस्था. 


आई हा असा विषय आहे की केवळ स्वतःच्याच नव्हे तर कुणाच्याही आईच्या जाण्याचे दुःख संवेदनशील व्यक्तीला होतेच होते. आणि खोल विचार केला तर लक्षात येते की आई गमावण्याइतकेच मोठे दुःख आईतले आईपण गमावण्याइतके आहे. आपल्या आईची आपल्यातली माया संपली हे दुःख आईच्या भौतिक जगातल्या मृत्यूपेक्षाही फार भीषण असते. 


स्त्रिया या निसर्गतःच खूप मोकळ्या असतात. मोकळेपणाने त्या हसू शकतात तितक्याच मोकळ्या होऊन रडूही शकतात. पुरूषांवर मात्र आपण strong आहोत, सहजासहजी परिस्थितीला शरण जाणारे नाही वगैरे मॅचोनेस दाखविण्याची जबाबदारी समाजाने, परिस्थितीने टाकल्यासारखे पुरूष वागतात. मनमोकळे होत नाहीत. पण आईच्या जाण्याचे इतके दुःख झालेले असतानाही, मोकळे व्हायचे असतानाही अश्रू डोळ्यांमध्येअडकून आहेत, रडे घशामध्ये अडकून आहे या भावनेला ग्रेसने "मेघात अडकली किरणे" या उपमेत घातलेले आहे. 


पण शेवटी ती आई होती म्हणून कवी घनव्याकुळ रडलेला आहे. पण त्याच्या त्या जगासमोर अशा उघड रडण्याचेही समर्थनही तो कवी त्यावेळी वाहत असलेला वारा आणि त्याने उडवलेल्या धुळीच्या कणांद्वारे करतोय. त्या धुळीच्या कणांमुळे माझ्या डोळ्यातून असे जाहीररित्या पाणी येतेय हे कवीचे लंगडे समर्थन आहे. आणि अशा नेमक्यावेळी स्वतःच्या मदतीला येणार्‍या वार्‍याला तो "सावध वारा" ही उपमा देतोय. 


काल खरोखर डोळ्यांमध्ये पाचोळा, धूळ गेल्यानंतर आलेल्या पाण्याने गेल्या २ - ३ वर्षांमधल्या अशा सगळ्या दुःखद घटना आठवल्यात. काही काही घटनांमधले माझे गोठणे आठवले, काही काही घटनांमधले माझे कोसळून जाणे, उन्मळून पडणे आठवले आणि ही कविता पुन्हा जगत मी तिचा प्रत्यय घेतला. 


- एखाद्या नदीच्या काठाकाठावर बसून, तिच्या पाण्याविषयी, रंगाविषयी केलेले निरीक्षण महत्वाचे खरे पण तिच्यात उतरून चिंब भिजल्याशिवाय त्या पाण्याची चव कळणार नाही तसेच कवितेला असे पूर्णपणे भिडल्याशिवाय किंवा कधीकधी कविताच अशी जीवनाला भिडल्याशिवाय तिचा अर्थ कळत नाही. बाकी कवितेची इतर समिक्षा म्हणजे काठावरचा कोरडा आस्वाद असे ठामपणे अनुभवणारा चिंब समीक्षक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment