आज आषाढी एकादशी. आजपासून आपला चातुर्मास सुरू. दिवाळी, दसरा, गणपती, महालक्ष्म्या यासारखे सणवार आणि श्रावण महिन्यासारखा संपूर्ण उत्सवी महिना याच कालावधीत येतो. आपल्यापैकी अनेक जण या कालावधीत काहीतरी संकल्प करीत असतात आणि थेट कार्तिकी एकादशीपर्यंत त्याचे पालन करीत असतात. या चार महिन्यांच्या कालावधीत एखादा पदार्थ जेवणातून पूर्ण वर्ज्य करणे, श्रावण महिन्यात रोज एकवेळेसच जेवणे वगैरे शारिरीक तपाचे संकल्प त्यात असतात तर एखादी पोथी, एखाद्या संताचे चरित्र रोज वाचणे, रोज श्रीविष्णुसहस्रनाम म्हणणे वगैरे अध्यात्मिक तपाचे संकल्पही त्यात असतात. तप म्हणजे तापून निघणे. शरीरासाठी रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळे करून त्यात शरीर तापवायचे तसेच मनासाठी अशा अध्यात्मिक संकल्पांचे पालन करून त्याला वळण लावणे हा या संकल्पांमागचा हेतू.
परम पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संकल्पांविषयी म्हणतात "संकल्प छोटा असला तरी चालेल पण तो रोज पाळता येईल असा, शाश्वताचा असावा. सातत्याला इथे फ़ार महत्व आहे." आपले मन हे आजवरच्या आपल्या कर्मांमुळे एखाद्या कठीण दगडासारखे झालेले आहे. त्या दगडावर थेंबथेंबच का होईना पण सातत्याने पाणी पडत गेले तर काही कालावधीत त्या दगडाला वेगळा आकार प्राप्त होईल पण हेच लाखो लिटर पाणी एकदमच त्या दगडावर ओतले तर तो दगड काही काळ ओला होईल पण पाणी वाहून गेल्यानंतर पुन्हा कोरडाच्या कोरडा. म्हणून एखादी गोष्ट सतत करत राहण्याला महत्व.
परम पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या संकल्पांविषयी पुढे असेही म्हणतात "चातुर्मासात कांदा लसूण खाणार नाही हा शारिरीक तपाचा संकल्प तर महत्वाचा आहेच पण त्याहूनही महत्वाचा संकल्प म्हणजे चातुर्मासात मी कुणाचे मन दुखावणार नाही असा मानसिक तपाचा असू शकतो." हा मानसिक तपाचा संकल्प वरवर पाहता सोपा वाटतो खरा पण तो पालन करण्यास अत्यंत अवघड असा आहे. त्यासाठी संपूर्ण चातुर्मास आपल्याला आपले मन सजग ठेवावे लागेल आणि सतत ते मन विविध कसोट्यांवर घासून बघावे लागेल. या चातुर्मासात देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी) ला देव झोपी जातात आणि थेट उत्थापिनी एकादशी (कार्तिकी एकादशी) ला देव त्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात अशी मान्यता आहे. अशावेळी आपण मनुष्यमात्रांचे मन कायम जागृत रहायला हवे म्हणून ते मानसिक तपाचे संकल्प.
या संकल्पांमध्ये "मी कुणाचीही निंदा नालस्ती करणार नाही." हा सुद्धा एक चांगला आणि तितकाच पाळायला कठीण असा मानसिक तपाचा संकल्प आहे. रोजच्या आयुष्यात इतरांच्या बद्दल आपण न्यायाधीश होण्याचे इतके प्रसंग येतात की असे एखाद्याबद्दल टीकाटिप्पणी न करता राहू शकणे ही अशक्य गोष्ट वाटते. पण परम पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज महाराज म्हणतात "अशी एखाद्याची निंदा करणे आवडणे म्हणजे शेण खाणे आवडण्यासारखे आहे." निंदानालस्तीचा अध्यात्मिक फ़टका फ़ार जोरदार बसतो आणि मुख्य म्हणजे आपल्याला तो कधीच कळत नाही.
अशा संकल्पांमध्ये "मी कायिक वाचिक मानसिक हिंसा करणार नाही. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करेन. त्या व्यक्तीने केलेली एखादी कृती मला कितीही न आवडणारी असली तरी ती त्याने मुद्दाम केलीय की त्याच्याकडून अनवधानाने झाली याचा विचार मी करेन." हा संकल्पसुद्धा जगातला किती ताप, संताप दूर करणारा ठरेल याचा विचार करा. आपण सर्वसामान्य प्रापंचिक माणसे. आपल्या आयुष्यातले जास्तीत जास्त ताप हे आपल्याच विचारांमुळे उत्पन्न होत असतात आणि त्यावरअधिकाधिक प्रतिक्रिया देऊन देऊन आपणच हे खूप मोठे करीत असतो. त्यापेक्षा या सांसारिक तापांवर या छोट्याच मानसिक तपाचा उपचार केला तर आपण सुखी राहू शकू असे नाही का वाटत ?
बरे आपण अशा मानसिक तपांना, संकल्पांना आजपासून सुरूवात केली तरी मानवी मन इतके विचित्र आहे की या तपाचा प्रभाव तत्काळ दिसावा अशी इच्छा ते करते. रोज रोज त्या तपाचा प्रभाव किती झाली याची परिक्षा घेण्याची आपल्याला इच्छा होते. अशावेळी श्रीदत्तसंप्रदायातील एक सत्पुरूष परम पूजनीय श्रीकृष्णदास आगाशे काका काय म्हणतात हे आपण पक्के ध्यानात ठेवलेच पाहिजे. आगाशे काका म्हणतात "एखादे बी आपण जमिनीत पेरले आणि झाड उगवण्याची वाट बघू लागलो तरी ते बीज फ़ळायला, अंकुरायला त्याला हवा तितका वेळ आपण द्यायलाच हवा. ताबडतोब ते झाड मोठे व्हावे हा अट्टाहास चुकीचा आहे आणि रोज ते झाड किती मोठे झाले हे जर आपण त्या पेरलेल्या जागेवर पुन्हा पुन्हा खणून बघू लागलोत तर ते झाड कधी रूजणारच नाही मग ते मोठे होण्याचा प्रश्नच नाही." तसेच आपल्या संकल्पाचे होईल. म्हणून आपल्या संकल्पाला किती फ़ळ आले याची लगोलग परिक्षा करीत बसून नये. आपण नेमाने ही मानसिक तपे आचरत गेलो तर आपल्या व्यक्तीमत्वातला फ़रक हा आपल्या सहवासातील इतरांना योग्य काळानंतर जाणवेल. तो जाणवून देण्याची घाई नसावी. संकल्पाचा अनुभव घेण्याची घाई नसावी. जगातले ताप संताप भगवंत जेव्हा दूर करतील तेव्हा करू देत पण आज माझ्या आतला ताप संताप माझ्या आतला भगवंत दूर करतोय का हा अत्यंत गूढ, गुह्य आत्मिक अनुभव माझा मलाच घेणे आवश्यक आहे ही भावना असावी. आणि प्रत्येकाने हा विचार केला तर जगातले सगळे ताप संताप दूर होण्यासाठी भगवंताला अवतार घेण्याचीही गरज नाही.
मग करायची आजपासून ही सुरूवात ? अत्यंत सात्विक भावाने, वृत्तीने, केवळ भगवंतासाठी सोडायचे हे संकल्प ? असे भगवंतासाठी संकल्प सोडलेत तर त्याच्या फ़ळांची आस आपल्याला लागत नाही. घेता देता तोच आहे. त्याच्या मनाला वाटेल आणि माझे पूर्वकर्म जसे असतील त्याप्रमाणे, त्यावेळी तो मला फ़ळ निश्चित देईल. त्यावर माझा अधिकार नाही ही भावना मनात असली की मोकळेपणाने, मुक्त मनाने संकल्प आचरता येतील.
आपणा सर्वांना चातुर्मास संकल्प घेण्यासाठी आणि निष्काम आचरणासाठी अगदी मनापासून शुभेच्छा.
- आपल्या सर्वांच्या कृपेचा अभिलाषी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.