Wednesday, May 7, 2025

तबियतेने केलेल्या प्रवासातले एक रेल्वेफ़ॅनिंग

बरोबर १० वर्षांपूर्वीचा प्रवास.  ठाण्यावरून शिरपूरसाठी आम्ही कुटुंब सकाळी निघालो. संध्याकाळपर्यंत शिरपूरला पोहोचलो असतो तरी चालले असते.


३५० किमी पूर्ण प्रवास हा चारपदरी असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गाने होणार होता. ३५० किमी प्रवासाला फार तर ६ तास लागले असते म्हणून आम्ही अधिकच रमत गमत निघालो होतो.


शहापूरच्या जवळ भरपेट नाश्त्यासाठी तबियतीने थांबणे, थळ घाटात (कसारा घाटात) थांबून जिथे जिथे रेल्वेमार्ग रस्त्याखालील बोगद्यांमधून पसार होतात, तिथले फोटो काढणे वगैरे रेलफॅनिंग  सुरूच होते. 


इगतपुरीनंतर घोटीजवळ रस्ता आणि रेल्वेमार्ग अगदी एकमेकांजवळून जातात. तिथे रेल्वेमार्गावर इंग्रजी S आकाराचे वळण आहे. रस्त्याच्या कडेला गाडी तबियतीत थांबवली आणि एक छोटे टेकाड ओलांडून साधारण अर्धा तास रेल्वेफॅनिंग केले.


माझ्या या प्रेयसीने मला निराश केले नाही. मुंबई - भुसावळ पॅसेंजर नाशिककडे गेली, भुवनेश्वर - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपर एक्सप्रेस मुंबईकडे गेली. तोच हा व्हिडीओ.





- प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे नव्हे तर मार्ग पूर्णपणे अनुभवत, आनंद घेत जाणे यातच खरे प्रवासाचे आणि जीवनाचेही इंगित आहे असे समजणारा, प्रवासी पक्षी, वैभवीराम.

चॅट जीपीटी शिकतेय पण हळूहळू

चॅट जीपीटी (or any ai tool for that matter) शिकत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला माझी लाडकी महाराष्ट्राची एस टी काढायला सांगितल्यावर त्याने काहीच्या काही चित्रे काढून दिलीत. मुंबईची बेस्ट बस हल्लीचे बाॅलीवुडवाले जशी दाखवतात तशी. जुन्या सिनेमांमध्ये बाॅलीवुडवाले त्यांच्या सिनेमांमध्ये बेस्ट बसेस छान दाखवायचेत. अगदी खर्याखुर्या. पण आजकाल बाॅलीवुडवाले खाजगी आॅफिस बसेसना बेस्टच्या रंगात रंगवून, बेस्टचा लोगो वगैरे डकवून बेस्टच्या बसेस म्हणून खपवतात. उदाहरणार्थ अनिल कपूरचाः नायक.

तसेच काहीसे चित्र आपल्या एस टी विषयी काही दिवसांपूर्वी हे चॅट जीपीटी दाखवत होते. पण आज त्याला विचारल्यानंतर त्याने दिलेल्या चित्रांमध्ये बरीच सुधारणा दिसली.
त्यात या एका बसचा नंबरसुध्दा MH 14 / BT 3812 हा खर्याखुर्या एस टी चा च नंबर आहे.


हा नंबर खर्
याखुर्या एस टी चा आहे पण या बसचा दरवाजा मागे दाखवला गेलाय. तो पुढे असायला हवा होता. आणि लेलँडच्या बसला टाटाची फ्रंट ग्रील बसवलीय.

MH 40 / Y ही सिरीज हिंगणा कार्यशाळेने बांधलेल्या एस टी बसची च आहे पण तो नंबर मात्र एस टी बसला मिळालेला नाही. Y सिरीजमध्ये 5999 पर्यंतच नंबर्स एस टी ला मिळालेत. त्यानंतर एस टी साठी MH 40 / AQ 6XXX सिरीज सुरू झाली.


MH 40 / Y पर्यंत बरोबर आहे. पण या सिरीजमध्ये शेवटली एस टी ही 5999 ही आहे.

त्यामुळे एक चित्र सोडले तर बाकी चित्रांवरचे बसगाड्यांचे नंबर्स म्हणजे परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्नाचे पूर्ण उत्तर माहिती नसताना काहीतरी इकडचे तिकडचे, peripheral लिहून पेपरची पाने भरून काढणार्या टिपीकल street smart विद्यार्थ्याप्रमाणे चॅट जीपीटी वागलाय.


MH 12 सिरीजमध्ये BT सिरीजची एस टी नक्कीच नाही.


कोल्हापूर महापालिका परिवहन बसचा नंबर आपल्या एस टी ला दिलाय. दरवाजा पुन्हा एकदा मागल्या बाजूला दाखवलाय. दरवाजा पुढे हवा होता.

त्यानंतर आम्ही त्याला आपल्या एस टी तल्या निम आराम (हिरकणी) बसेसचे चित्र काढायला सांगितले. त्यात तो पूर्णपणे गंडला.


"हिरकणी" पूर्णपणे गंडलीय. नंबर खर्याखुर्या एस टी चा आहे पण "हिरकणी" ला हिरवा रंगाचा पट्टा कुठे असतो ? किंबहुना हिरकणीची रंगसंगती कशी असते ? याविषयी या विद्यार्थ्याला काहीही माहिती नाही. बाकी आयशर चेसिसवर "हिरकणी" हे जरा नवीनच आहे.


रत्नागिरी पासिंगची "हिरकणी" एस टी ? सिंधुदुर्ग आणि रायगड पासिंगच्या हिरकण्या एस टी त आहेत. आणि "अर्ध लक्झरी" काय ? एक तर "सेमी लक्झरी" म्हणा नाहीतर "निम आराम" तरी म्हणा.


हा नंबर सुध्दा खर्याखुर्या एस टी बसचा आहे. हिरकणीला पांढर्या रंगावर हिरवा पट्टा असतो हे आत्ता या विद्यार्थ्याला कळलेय. या निम आराम बसमधली आतली आसनेसुध्दा जरा आरामदायक प्रकारची दाखवलेली आहेत. चॅट जीपीटी शिकतेय.

शिकतंय पोरगं. पण अजून त्याला खूप पल्ला गाठायचा आहे हे नक्की.

- "Real Time Measurement of Learning Outcomes and Inference about Learning Curves by AI tools" या लठ्ठ शोधनिबंधाचे किडकिडीत लेखक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, May 6, 2025

नामस्मरण: अचानक स्फ़ुरलेले काही विचार

श्रीमद्भगवतगीतेच्या दहाव्या अध्यायात प्रत्यक्ष भगवंताने त्याच्या स्वतःच्या विभूती सांगून ठेवल्या आहेत.

त्यात " यज्ञानाम जपयज्ञोस्मि " असे सांगितलेले आहे.


कलियुगात साधली जाणारी एकमेव साधना म्हणजे भगवंताचा जप. भगवंताने हेच सांगितले, ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांसकट सगळ्या संतांनीही हेच सांगितले. " मय्येव मन आधस्त्व, मयी बुध्दीम निवेशय " ( हे साधका, तू तुझे मन, तुझी बुध्दी माझ्याकडे लाव ) इतकी या सगळ्या संत विभूतींची साधी अपेक्षा.


किती कमी साधनात, किती कमी श्रमात ही साधना होते हो. फक्त मन हेच त्याचे साधन. बरे त्याला फार नियम वगैरेंचे बंधनही नाही. अगदी हाॅस्पिटलच्या बेडवर असतानाही मन जागृत असेपर्यंत ही साधना करता येईल की नाही ?


आज अनेक सद्भक्त मंडळीही हे सोपे साधन करता करता त्या साधनाच्या आनुषंगिक बाबींच्या चर्चेत अडकलेले पाहिले म्हणजे खरोखर वाईट वाटते. जप करायला आसन कुठले घ्यावे ? माळ तुळशीची की स्फटिकाची ? जप करताना तोंड कुठल्या दिशेला करावे ? या सगळ्यातच अडकून आपण मूळ साध्यापासून तर दूर जात नाहीये ना याचा विचार खर्‍या पारमार्थिक व्यक्तींनी करायला हवा असे मनापासून वाटते.


या संदर्भात परम पूजनीय ब्रम्हचैतन्य महाराजांचेच एक वाक्य आहे. 


" साखर कशीही खाल्ली तरी ती गोडच लागते. उभ्याने, बसून, झोपून  कशीही खाल्ली तरी ती गोडच लागते. " हे नामाबद्दल चिकित्सा करणार्‍या साधकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.


मन एकाग्र झाल्यावर नाम घ्यावे ? की नाम घेता घेता मन एकाग्र होईल ? या चिकित्सेत फार न पडता फक्त नाम घेत जावे. 


" नकळत पद अग्निवरी पडे,

न करी दाह असे कधीही न घडे,

अजित नाम घडो भलत्या मिसे,

सकल पातक भस्म करितसे." 

हा श्लोक लक्षात ठेवावा आणि आपली जपसाधना अचल अविरत करीत जावी. 


- अचानक अंतःप्रेरणेने सुचलेले सर्वांपर्यंत सहज पोहोचवणारा साधक, वैभवीराम प्रकाश किन्हीकर




Monday, May 5, 2025

चंद्रपूर आणि व्हॉल्व्हो बस यांचे नाते

संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी बसेसचे पेव साधारण १९९१-१९९२ पासून फुटले. माझ्या लाडक्या चंद्रपूर शहरातूनही याच सुमारास नागपूरसाठी खाजगी बससेवा सुरू झाली.

सुरूवातीला फक्त चंद्रपूर - नागपूर, चंद्रपूर - गडचिरोली आणि चंद्रपूर - ब्रह्मपुरी या मार्गांवर असलेल्या सेवा काही कालावधीने चंद्रपूर - छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर - पुणे अशा विस्तारित झाल्यात.
२ बाय २ विना वातानुकूल आसनी - २ बाय २ वातानुकूल आसनी ते २ बाय १ वातानुकूल शयनयान इथपर्यंत बसेसचा दर्जा वाढत गेला.
फक्त एकच खंत आहे ती म्हणजे चंद्रपूरच्या पावन भूमीवर व्हाॅल्वो बसची चाके कधी धावलीच नाहीत. नाही म्हणायला गणराज ट्रॅव्हल्सने मधल्या काळात १५ मीटरची लांबचलांब मर्सिडीज बस चंद्रपूर - नागपूर मार्गावर चालवून पाहिली. एस. टी. ने ही चंद्रपूर - नागपूर - पुणे ही मल्टीअॅक्सल स्कॅनिया (ब्रँडनेमः अश्वमेध) चालवली. (आणि या आतबट्ट्याच्या व्यवहारात चांगलेच हात पोळून घेतले होते) पण चंद्रपूरमधल्या एकाही ट्रॅव्हल्सवाल्याला किंवा चंद्रपूरपर्यंत सेवा देणार्या महाराष्ट्रातल्या एकाही ट्रॅव्हलवाल्याला चंद्रपूर मार्गावर व्हाॅल्वो बस धाडावी असे वाटले नाही. असे का ? हा मला कायम छळणारा प्रश्न आहे.
- नव्या सहस्रकाच्या पहिल्या दशकात जगभरातल्या अनेक बसेस जरी भारतात अवतरल्यात तरी व्हाॅल्वो ती व्हाॅल्वोच या प्रांजळ मताचा, चंद्रपूरप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
यापूर्वीच्या सविस्तर आठवणींचा लेख इथे.



Sunday, May 4, 2025

नागपूरकर आणि हापूस

पु.ल. म्हणाले होते की नागपूरकरांच्या "या नागपूरला संत्री बिंत्री खायला" या आमंत्रणाला प्रतिसाद देण्याच्या भानगडीत मुंबईकराने पडू नये. मुंबई ते नागपूर जाणेयेणे प्रवासभाडे लक्षात घेता मुंबईत संत्री स्वस्त मिळतात.

त्याच्या अगदी १८० अंश विरोधात नागपूरकर (किंवा कुठलाही वैदर्भिय) आणि हापूस यांचे नाते आहे.
एकतर वैदर्भिय माणसाला हापूसचे अजिबात कौतिक नाही. खूप जणांनी शिफारस केल्यानंतर "तो हापूस हापूस म्हणतात तो आंबा खाऊन तरी बघू" असे म्हणून तो हापूस विकत घ्यायचा विचार करतो न करतो तोच...
...नागपूरातले हापूसचे दर ऐकून यापेक्षा याच खर्चात दोन माणसांनी रत्नागिरीला / देवगडला जाऊन यापेक्षा दुप्पट हापूस खाऊन परतता येते हे गणित त्याच्या लक्षात येते.
इथे एक वैदर्भिय खवैय्या माणूस किमान ५ किलो आंब्याचा रस दोन तीन दिवसात खातो हे गृहीत घेतले आहे. बादल्या बादल्यांमध्ये आंब्याचा रस भरलेला, पंगतीत आग्रह करकरून १० - १० वाट्या आंब्याचा रस वाढलेला (सोबत कांद्याचे भजे, तोंडीलावणे म्हणून भोकराचे लोणचे) त्याने बघितला असतो. तेवढा हापूसचा रस दोन माणसांनी नागपुरात खायचे ठरवले तर त्या किंमतीत तेच दोघे जण कोकणात जाऊन तेवढाच रस खाऊन परतू शकतात.
आणि सगळ्यात कहर म्हणजे शेवटी तो हापूस खातही नाही आणि रत्नागिरी /देवगडलाही जात नाही.
- ठाणे/मुंबईत मुक्कामी असताना दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत नागपूरला परतताना आवर्जून दोन तीन पेट्या हापूस घेऊन जाणारा हापूस प्रेमी, बेलमपल्ली (उच्चारी बैंगनफल्ली) धर्मी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Thursday, May 1, 2025

एक झोका : आठवणींचा

आज संध्याकाळी घरी परतताना थोडासा रिमझिम पाऊस पडत होता. गाडीत नेमका "गारवा" अल्बम लागलेला होता.

मराठी गाण्यांमध्ये मी पुण्याची गाणी आणि मुंबईची गाणी असे दोन प्रकार मानत आलेलो आहे. शब्दप्रधान गायकीची, मोजक्याच वाद्यवृंदासह घनगंभीर गायलेली गाणी पुण्याच्या (गायक / वादक / गीतकार) संचातली असतात.
तर सुंदर वाद्यवृंदात, शब्दांना हवे तितकेच महत्व देऊन केलेली मेलोडियस गाणी ही मुंबईच्या (गायक / वादक / गीतकार) संचातली असतात हे माझे निरीक्षण आहे.
तर "गारवा" अल्बम टिपीकल पुणेरी संचातला आहे. गाणी, त्यांची सुरावट ऐकता ऐकता आणि बाहेरचे कुंद, सर्द वातावरण बघता अनुभवता मी ३५ वर्षे भूतकाळात गेलो.
अचानक मला पुण्यावरून कराडचा प्रवास एस. टी. ने करणारा द्वितीय किंवा तृतीय वर्ष अभियांत्रिकीतला राम दिसायला लागला. सातारा बसस्टॅण्ड साधारण दुपारी ३.०० - ३.३० ला सोडलेले. सातार्याची खिंड ओलांडून त्यावेळेसच्या NH 4 ने बस कराडच्या दिशेने धावतेय. वातावरणात मळभ दाटून आलेले. दूरवरचा साखर कारखाना आणि तिकडे ऊस घेऊन जाणार्या ट्रॅक्टर्सची, बैलगाड्यांची रांग दिसतेय. उद्यापासून पुन्हा काॅलेज, सबमिशन्स, अभ्यास याचे रहाटगाडगे सुरू होणार या जाणीवेने मन हळुहळू कातर होत चाललेय. उंब्रज बसस्थानकावरून बस कराडकडे निघाली की चाफळ फाट्याकडे बघून बसमधूनच त्या दिशेला हात जोडत, "रामराया, सांभाळून घे रे बाबा. सीतामाई, लक्ष राहू दे गं बाई. लक्ष्मणा, वेळीप्रसंगी धावून ये रे बाबा."
"हनुमंता, सदैव सोबत रहा रे मित्रा. रामदासस्वामी महाराज, आशीर्वाद कायम पाठीशी असू द्यात." अशी अत्यंत करूणायुक्त भावनेने या सगळ्यांना घातलेली साद आठवते.
काहीकाही स्वर, काहीकाही दिवसवेळा अशा असतात की अगदी बालपणीचा कुहीकर वाडा आठवतो. त्या वाड्यातल्या दोन खोलींच्या २२५ स्केअर फूटच्या घरातली हिवाळी दुपार आठवते. आईच्या कुशीत, कधी तिच्या मांडीवर डोके ठेऊन गोधडी पांघरून पसरलोय. आई काहीतरी बोलतेय, कधी तिच्याविषयी, कधी तिच्या आपल्याबद्दलच्या स्वप्नांविषयी, कधी एखादी गोष्ट सांगतेय तर कधी संत गजानन प्रार्थना स्तोत्र पुटपुटतेय. त्या ग्लानीतच झोप लागतेय.
ते सुख, तो आनंद पुन्हा भोगावासा वाटण्यासाठी यानंतर किती जन्म घ्यावे लागतील ? हे सांगता येणार नाही. या जन्मात तर आता आईच्या मांडीवर झोपायला आता आई नाही, कुहीकरांचा वाडाही नाही आणि आता ते बालपणही नाही.
कुठल्या क्षणी कुठल्या एखाद्या वासामुळे, स्वरामुळे, वातावरणामुळे मन किती आणि कुठे जाईल ? किती भूतकाळात जाईल ? किती भविष्यात घेऊन जाईल ? काहीच सांगता येत नाही. मन तिथेच रमून जाते.
गाडीच्या टायर्सना, एंजिनला नेहेमीची सवय झाली आहे म्हणून गाडी सुखरूप घरी घेऊन आली एव्हढेच. बाकी आज मन भलतीकडेच होते. हात यांत्रिकपणे स्टिअरींगवर, गियर नाॅबवर आणि पाय सरावाप्रमाणे ब्रेकवर, अॅक्सीलेरेटरवर चालत होते, बस्स.
- मनाला जेवढे ताब्यात ठेवण्याचा जेवढा अट्टाहासाने प्रयत्न करू तेवढे मन नाठाळ घोड्याप्रमाणे उधळते हे जाणणारा (आणि त्याचबरोबर कधीकधी कसलाही प्रयत्न न करता मन इतके नितळ तळ्यासारखे होते की मनाच्या खोलखोल तळ्यात आपण आरपार बघू शकतो, त्याचा अंदाज घेऊ शकतो हा अनुभव घेणारा) सर्वसामान्य माणूस प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Sunday, April 13, 2025

चैत्र पौर्णिमेची एक आठवण: कायम काळजात रुतून बसलेली

मी बालपणापासूनच खूप नातेवाईकांशी, मित्रांशी अगदी नियमित पत्रसंवाद साधलेला आहे. आणि मलाही तितकीच पत्रे अनेक नातेवाईक आणि मित्रांकडून प्राप्त झालेली आहेत. मला आलेली सगळी पत्रे मी अगदी जतन करून ठेवलेली आहेत कारण त्यातले काही काही नातेवाईक असे आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्यभरात अवघी दोन तीन पत्रे लिहीली असतील त्यातले एक पत्र मला आलेले आहे. 


मी आणि माझ्या प्रिय पत्नीचे लग्न फ़ेब्रुवारी २००० मध्ये ठरले, मार्च २००० मध्ये साक्षगंध साखरपुडा विधी झाला आणि लग्न मात्र डिसेंबर  मध्ये झाले. त्या ८-९ महिन्यांच्या प्रियाराधनाच्या काळात मी माझ्या वाग्दत्त वधूला आठवड्यातून तीन अशी पत्रे पाठवलीत. तिनेही तितक्याच उत्कटतेने तेव्हढीच उत्तरे मला लिहीलीत. मी पाठवलेल्या पत्रांची तिने एक फ़ाईलच करून ठेवली होती तर तिने पाठवलेली एकूण एक पत्रे मी जतन करून ठेवली होती.



लग्नानंतर मग आम्ही माझे पत्र त्यावर तिचे उत्तर अशी ती सगळी पत्रे पुन्हा लावून जपून ठेवलीत. तो काळच वेगळा होता. 


चैत्र पौर्णिमेला सौ. वैभवीच्या माहेरी कुळाचार असतो. मला अत्यंत आवडते म्हणून तिने पुरणपोळी आणि वडाभात याच दिवशी शिकून घरचा कुळाचार केलेला होता. बरोबर २५ वर्षांपूर्वी. तिने पाठवलेले ते पत्र आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी त्याची एखादी गोष्ट शिकून घेण्याची तिची मनिषा ही माझ्या काळजात खोल रूतून बसलेली आहे. दरवर्षीची चैत्र पौर्णिमा माझ्या अशीच, ह्याच आठवणीत लक्षात राहते.




एका संपूर्ण अनोळखी व्यक्तीशी जन्मभराचेच नव्हे तर अनंत जन्मांच्या पलिकडले नाते असेच जोडले जात असेल का ?


- सौ. वैभवीच्या सहवासात असताना "अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी" या वृतीने जगत असलेला, संपूर्ण वैभवीमय झालेला प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.



सजणा पुन्हा स्मरशील ना