Thursday, October 6, 2011

२ ओक्टोबर ची सहल.

पूर्वरंग:
खूप दिवसांपासून भांब देवी ला जाण्याचे मनात होते. बरीच वर्षे या देवस्थानाचे व्यवस्थापन किन्हीकरांकडे होते. मला आठवते मी १९९८ च्या आसपास कारंजाला गेलेलो असताना श्री. अशोककाकांनी मला त्यांच्या बजाज एम.८० वर भांब देवी ला नेले होते. २ ओक्टोबरला हा योग पुन्हा जुळवून आणायचे ठरले. चि. श्रीकांत (धाकटा भाऊ) आणि चि. सौ. अश्विनी ला विचारले, ते पण तयार होते. रविवारी सकाळी ६.०० वाजता नागपूर सोडायचे ठरले.

२/१०/२०११.
सकाळी पावणेचारला आम्ही उठलो खरे पण मलाच बरे वाटत नव्हते. आवरून निघायला पावणेसात झालेच. ६.५३ ला घरून निघालोत. देवनगरवरून चि. श्रीकांत , चि.सौ. अश्विनी आणि चि. रेणुकाला घेतले आणि निघालो तेव्हा चक्क ०७.०३ झाले होते.
चि. रेणुकाच्या बोबड्या बोबड्या बोलांनी मजा येत होती. खेळायला तिची ताई चि. मृण्मयी आणि तिची काकू सौ. वैभवी होत्याच. गाडी चालवताना फ़ार वेळ मागे वळून पाहता येत नसल्यामुळे तिची काही मस्ती मी बघायला मुकलो. फ़क्त श्रवणावरच समाधान मानत रिलायन्स च्या गॆस पंपावर गाडी थांबवली (०७.२८--०७.३०). १८ किमी अंतर २१ मिनीटांत. आजकाल नागपूर ते बुटीबोरी हा रस्ता ६ लेन्स चा असूनही वाढत्या वाहतूकी मुळे अपूरा पडायला लागलाय. दोन तीन वर्षांपूर्वी ह्या रस्त्यावरून तुफ़ान वेगाने जाण्यात जी मजा होती ती आता राहिली नाही. जरा कुठे ६०-७० ची स्पीड गाठतोय न गाठतोय होच अडथळा येतो आणि पुन्हा दुस-या तिस-या गियर पासून सुरुवात करावी लागते.
बुटीबोरी मागे टाकून आम्ही वर्धेच्या दिशेने लागलो तेव्हा वाहतूक त्या मानाने कमी झाली होती पण रस्त्याची हालत खराब झाली होती. दोन वर्षांपूर्वी हा रस्तापण छान होता. खडकी, केळझर ला जायला खूप मजा यायची.

खरंतर हा नागपूर-वर्धा-कारंजा(लाड)-मेहेकर-सिंदखेड राजा-औरंगाबाद-शिर्डी-सिन्नर-घोटी-मुंबई जाणारा राष्र्टीय महामार्ग म्हणून विकसीत होणार होता. नितीन गडकरी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनीच पुढाकार घेऊन ह्या रस्त्याचे नियोजन व बांधकाम केले होते. नागपूर ते मुंबई हा रस्ता एका सरळ रेषेत जातो. उगाच अमरावती-अकोला-धुळे-नाशिक हा लांबचा पल्ला टाळला जातो आणि जवळपास १५० किमी अंतर वाचतं. शिवाय मुंबई आग्रा महामार्गावरचा ताणही कमी होतो. पण माणसांसारखी रस्त्यांचीपण नशीबे असावीत. १९९९ मध्ये भाजप-सेनेचे सरकार गेले आणि या रस्त्याला सावत्रपणाची वागणूक मिळायला सुरूवात झाली ती आजतागायत. विदर्भाला मिळणा-या सापत्न वागणुकीचा आणखी एक बळी.

वर्धा बायपास वरून थोडा वेळ यवतमाळ रस्त्याला लागून आम्ही या महामार्गावर उजवीकडे वळलो. आता रस्ता थोडा बरा होता. दहेगाव स्टेशनच्या बाजुने जाताना आमच्या सहप्रवाशांना केळकरांच्या राजमलाई आणि बोरकुटाची आठवण झाली पण झपझप अंतर कापायचे म्हणून आम्ही थांबायचे टाळले.

पुलगाव बायपास घेऊन नाचणगाव मार्गे आम्ही खातखेड्याला पोहोचलो तेव्हा ०९.३१ झाले होते.(९५ किमी २ तासात). खातखेडला आमचे गुरू महाराज श्री. बापुराव महाराज खातखेडकर यांची शेती आहे आणि लगतच त्यांची कुलस्वामिनी जगदंबा हिचे मंदिर आहे. मी आणि श्रीकांतने ह्यापूवी इथे दर्शन घेतले आहे पंण आमच्या दोघांच्याही सौभाग्यवती यापूर्वी इथे कधीच आलेल्या नव्हत्या. अनायासे आम्ही नवरात्रात बाहेर पडलो होतो मग जगदंबेचे दर्शन आणि सौ. वैभवी व सौ. आश्विनीचा ओटी वगैरे भरण्याचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान श्रीकांत आजुबाजूच्या शेतांमध्ये शिरला होता आणि खायला शेतातल्या ताज्या मिरच्या शोधत होता.



खातखेडची तू अंबाबाई.



प.पू. बापुराव महाराजांची शेती, खातखेड.



नवीन फोटोग्राफर- मृण्मयी.



जगदंबा माता की जय.



माझा प्रवासातला विश्वासू साथीदार- माझी वॆगन आर.



राम आणि मृण्मयी.



चि. श्रीकांत, अश्विनी व रेणुका.

खातखेडलाच आम्ही थोडी पोट्पूजा आटोपली. निघालो तेव्हा सकाळचे १० वाजले होते.
रस्ता आता छान होता. ८०-९० ची स्पीड सहज गाठता येत होती. देवगाव-सुलतानपूर मार्गे कारंजाला गुरूमंदिरात पोहोचलो तेव्हा ११.५४ झाले होते.(१०३ किमी १ तास ५४ मिनिटांत, सरासरी ५४ चा वेग. ठीक)

गुरूमंदिरात हातपाय धुतानाच एका गृहस्थांनी आम्हाला बोलावले आणि प्रसाद घेऊनच जा असा आग्रह केला. श्रीकांतला नवरात्राचे उपवास होते त्याने थोडा इनकार करताच त्याला त्यांनी जास्तच आग्रह केला. अर्थात प्रसादाचा अव्हेर करणे आम्हाला शक्यच नव्हते.

मंदिरात शिरता शिरता आरती सुरू झाली होती. खरंतर गुरूंची प्रसन मूर्ती आम्हाला अजून दिसू शकत नव्हती पण ती दिव्य स्पंदने जाणवली. आपण गुरूमूर्तीकडे तोंड करून उभे असताना आपल्या पाठीमागे नाना महाराज तराणेकर आणि इतर समकालीन श्रेष्ठ गुरूभक्तांच्या तसबिरी आहेत. आपण इथपर्यंत पोहोचण्यामागे श्री. नानाच आहेत ही भावना उचंबळून आली आणि डोळे पाणावलेत. मन अगदी हलके झाले. हीच तर गुरूकृपा आहे.

आरती संपली. तीर्थ प्रसाद प्राशन करून थोडा वेळ आम्ही नामसंकीर्तन केले आणि प्रसादगृहाकडे प्रस्थान ठेवले. महाराजांच्या कृपेचा दिव्य प्रसाद ग्रहण करून येणारी तृप्ती रोजच्या भोजनात येणे अशक्यच.

तृप्त मनाने आणि पोटाने कारंजा सोडले तेव्हा १३.२४ झाले होते. तिथल्याच एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घेतले आणि धनज मार्गे भांब देवी कडे निघालो. हा रस्ता ग्रामिण भागातला होता त्यामुळे अरुंद रस्ता, खाच-खळगे हे होतेच पण आजुबाजूला छान हिरवीगार शेते आणि त्यात कापायला आलेली कणसे, भाजी वगैरे दिसत होती. विदर्भावर निसर्गाने भरपूर कृपा केलेली आहे. काळी कसदार जमीन ही एक जमेची बाजू आहे. शेतक-याला जर सिंचनाची साथ मिळाली तर तो काय करू शकतो हे या भागातल्या शेतक-यांनी दाखवून दिले आहे. एका शेतात भरपूर फुलकोबी (फ़्लॊवर) दिसल्या. आम्ही गाडी थांबवली. शेतकरी तिथेच होता. त्याला विनंती करताच तो त्या शेतात उतरला आमच्यासाठी भली मोठी पाच-सहा फ़्लॊवर घेऊन आला. आम्ही त्याली दिलेले पैसे त्याने घेतले नाहीत.

भांबदेवीला पोहोचलो तोवर दुपारचे १४.२६ झाले होते. मी १९९८ मध्ये पाहिलेले भांब आणि आत्ताचे भांब यात कल्पनातीत फ़रक पडलेला होता. संस्थानसुद्धा खूप विकसीत झालेले होते आणि नवरात्रांमुळे भाविकांची बरीच गर्दी होती.
गर्दीतच दर्शन घेतले. सौ. आश्विनी आतापर्यंत फ़क्त पाण्यावरच होती. तिने आत्ता थोडा फ़लाहार केला आणि आम्ही १४.५१ ला आमच्या मुक्कामाकडे निघालो.



रेणुका श्रीकांत किन्हीकर

खेर्डाफ़ाटा येइपर्यंत पुन्हा ग्रामीण रस्ता आणि नंतर एन.एच.६ ला लागलो. हा रस्ता पण छान झालाय. अमरावतीला बायपास करून सतत ८०-९० च्या वेगात निघालो. मागची प्रवासी मंडळी झोपी गेलेली होती. बाजुच्या सीटवर श्रीकांतलापण झोप येत असावी पण तो झोपला मात्र नाही. गाडी चालवताना मला बाजूचा सहप्रवासी झोपला तरी काही फ़रक पडत नाही. गाडी चालवायला मला प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतं. आणि सहसा मी स्वतः रात्री ९ नंतर गाडी चालवतच नाही. मला ज्या प्रदेशातून आपण प्रवास करतोय तो प्रदेश पूर्ण पाहण्याची खूप आवड आहे त्यामुळे रेल्वे प्रवासाचे नियोजन करताना सुद्धा मी दिवसभर प्रवास आणि रात्री मुक्काम असा प्रवास करतो. हॊटेलचा खर्च वाढतो खरा पण आपण पंजाबातून प्रवास करतोय आणि तिथली हिरवीगार "सरसोंकी खेती" आपण अंधारात मिस करतोय ही जाणीव किती दुःखदायक आहे!

तळेगावला दुपारी १६.५३ ला पोहोचलो. (१०१ किमी २ तास ३ मिनीटांत. सरासरी ४९ चा वेग). आता मागे बसलेल्या पासिंजरांची झोपबीप झाली होती. चहा घेण्यासाठी थांबण्याचा आग्रह झाला. नवीनच झालेल्या आणि खूप किर्ती ऐकलेल्या ’बात आणि बॊल ’ मध्ये आम्ही थांबलो.
क्रिकेटवर असलेले हे थीम रेस्टॊरंट. आवडले.

















नागपूरपासून जर हे थोडं अधिक जवळ असतं तर बहार आली असती. आत्त्ताही मजा आलीच. ती पूर्ण मजा उपभोगून चहा नाश्ता घेऊन आम्ही निघालो तेव्हा १७.४८ झाले होते. चि. मृण्मयी आणि चि. रेणुका तर यायलाच तयार नव्हत्या. कसेबसे त्यांना गाडीत घेतले आणि निघालो.
उरलेले ९७ किमी कापून घरी यायला १९.३० झालेत. (९७ किमी १ तास ४२ मिनीटांत. सरासरी वेग ५७ किमी. प्रतितास. अमरावती-नागपूर रस्ता खरच खूप छान झालाय). समाधानी दिवस, सर्वार्थाने.

Tuesday, August 2, 2011

ठेंगणी माणसे.



ठेंगण्या माणसांचे, ठेंगणे संसार,I
ठेंगणेच घर, ठेंगण्यांचे.II

ठेंगण्यांचा व्याप, व्याप म्हणू नये,I
इवलेसे माप, ठेंगण्यांचे.II

हरभ-याचे झाड, ठेंगण्यांना माड,I
डबकेच आड, ठेंगण्यांना.II

ठेंगण्यांचे सुख, मोहरीएवढे,I
दुःखही तेव्हढे, ठेंगण्यांचे.II

ठेंगण्यांचे विश्व, स्वतःपुरतेच,I
आभाळ ठेंगणे, ठेंगण्यांचे.II

- सुधीर शरद गोखले


(ही कविता वृत्तीने ठेंगण्या माणसांसाठी आहे. उगाच नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस नको.)

या कवितेची थोडी पार्श्वभूमी :

कराडला वसतीगृहात रहात असताना आम्हा समानविचारी मित्र-मैत्रिणींचा एक छान ग्रुप झाला होता. त्यातच तिसर्या वर्षात आम्हां सर्वांना कवितेच्या भुताने पछाडले आणि एप्रिल १९९२ च्या ३० दिवसांमध्ये आम्हा सगळ्यांकडूनच काही छान कविता झाल्यात. त्यात विश्वास सुतार होता, राजा चौधरी होता, विजय कुळकर्णी होता, सुधीर गोखले होता, लीना भिडे (आताची लीना सोमण) होती, मी होतो. आमचे श्रोते म्हणून सतीश तानवडे, शारदा गाडगीळ (तानवडे), वैशाली जोशी (फाटक), रोहिणी कुळकर्णी (गद्रे) ही सगळी मंडळी असायचीत. (रोज नवकवींच्या नवनवीन कविता ऐकणे, त्यासुध्दा ४,५ कवींकडून, म्हणजे मनःशांतीची कसोटीच होती. तेव्हा ते जाणवले नाही, आज जाणवतेय. मला वाटतं सतीशच सुंदर गाणं रोज ऐकायला मिळणे हा त्यावरचा उतारा होता.)

रोजच सगळ्यांचाच कडून छान कविता व्हायच्यात असं मात्र नाही. कधीकधी एखादी कविता फ़सायची सुध्दा. सुधीरने त्या कवितांना बुंदी हे नाव ठेवले होते. बुंदी जशी मुद्दाम पाडतात तशी कविता ही मुद्दाम पाडली की ती बुंदी. कविता या अंतःप्रेरणेतूनच व्हायला हव्यात तरच त्या प्रथम आपल्याला भावतात आणि मग वाचकांना हे तत्व फ़ार लवकर समजले ते सुधीरमुळेच. त्याची स्वतःची एक चांगली आणि मला आवडलेली कविता.

हा ब्लॊग लिहिताना विजय कुळकर्णीची खूप आठवण येतेय. तो आज हा ब्लॊग वाचायला नाही ही जाणीव छळतेय. विज्या हा ब्लॊग तुझ्यासाठीच.

Sunday, July 24, 2011

अजनी स्टेशनवरचा अर्धा तास.

फ़ारा दिवसांनी अजनी स्टेशनवर गेलो होतो. व.पुं. प्रमाणे, या स्टेशनची, मी गाडीत असताना माझी गाडी थांबली की मला चीड येते आणि मी या स्टेशनवर गाडी पकडायला किंवा कुणाला आणायला गेलो की कीव येते. पण यावेळेस अजनी स्टेशनवर गेल्याबरोबर माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तिथली स्वच्छता. कदाचित छोटं स्टेशन असेल म्हणुनही असेल पण नजरेत भरण्याजोगी स्वच्छता पाहून मन प्रसन्न झाले. बरेच नवीन बदल झालेले सुद्धा मी टिपले. फ़लाटाची लांबी २४ डब्यांच्या गाड्यांसाठी वाढली. फ़लाटाच्या बहुतांशी भागात छप्पर आले. प्रवाशांना बसण्यासाठी ग्रेनाइटचे ओटे आलेत. एकंदर प्रगती होती.




माझी आत्या आणि आतेबहीण फ़ार दिवसांनी नागपूरला येणार होत्या. अकोल्यावरून महाराष्ट्र एक्सप्रेस ने निघणार म्हणून कालच त्यांचा फोन आला होता. घरून निघताना मी रेल्वेच्या चौकशी संकेतस्थळावर बघितलं तर बडने-याला महाराष्ट्र एक्सप्रेस चक्क १५ मिनिटे लवकर आलेली दिसत होती. साधारण दुपारी ३ च्या सुमारास आत्याला फोन लावला तेव्हा गाडी वर्धेत होती. आता काय फ़क्त एकच तास. भराभर आवरलं आणि स्टेशनवर पोहोचलो.

सुरुवातीला पाच मिनिटे काहीच चहलपहल नव्हती. आम्ही तिघे आणि रेल्वेचे आवश्यक सेवेतले एक दोन कर्मचारी याशिवाय कोणीही नव्हते. अचानक नागपूरकडून काहीतरी हालचाल जाणवली.




एक डिझेल एंजिन गरीब रथच्या काही डब्यांना घेऊन येत होते. पहिल्यांदा ते डबे गरीब रथचेच आहेत की नाही यावर सुपत्नीचा आणि माझा एक "लडिवाळ संवाद" झाला. (त्याच काय आहे, माझ्या या रेल्वे विषयक प्रेमाची लागण सुपत्नी आणि सुकन्येला झालेली आहे.) पण गाडी जवळ येताच माझी सरशी झाल्याचे माझ्या लक्षात आले. पुणे नागपूर गरीब रथ आज नागपूरात आला असेल आणि त्याचेच चार डबे घेऊन ते कटनी शेड चे डिझेल एंजिन अजनीच्या यार्डात जात होते. गाडी थोडी दूरवरून म्हणजे प्लॆटफ़ॊर्म ३ वरून जात होती.




नेमकी त्याचवेळी खापरीच्या दिशेनेही काहीतरी हालचाल जाणवली. एक लालागुडा शेडचे WAG 9 एंजिन गॆस टॆंकरचा रेक घेऊन नागपूरकडे येत होतं. सुकन्येच्या अचानक लक्षात आलं आणि ती म्हणाली की " बाबा गरीब रथ आणि या एंजिनचा रंग किती सारखा आहे नं!" मलाही ते पटलं आणि मी गरीब रथला WAG 9 लावलं तर कसं दिसेल या मनोराज्यात दंग झालो.




त्यादरम्यान ती गाडी आमच्या अगदी जवळून प्लॆटफ़ॊर्म १ वरून हळूहळू नागपूरकडे गेली.



आता जवळपास दुपारचे चार वाजत होते त्यामुळे ह्या मालगाडीच्या मागेच महाराष्ट्र एक्सप्रेस असणार याविषयी आम्हाला आशा वाटु लागली होती.

दरम्यान नागपूरवरून येणारी आणखी एक मालगाडी दिसली.



रूळांवर टाकण्यासाठीची गिट्टी (खडी) घेऊन जाणार्या वाघिणी घेऊन पुन्हा एक WAG 9 एंजिन (अजनी शेड) ब-यापैकी वेगात वर्धेच्या दिशेने निघाले होते. अचानक ती मालगाडी अजनीला थांबली आणि पाचच मिनिटांत पुन्हा सुरू झाली आणि बघता बघता तिने वेगही घेतला.




आता मात्र गाडीची वाट पहाणे जरा गांभिर्याने सुरू झाले. चि. मृण्मयीचा गाण्याचा वर्ग साडेचारला सुरू होणार होता. आमच्या नियोजनाप्रमाणे चार सव्वाचार पर्यंत गाडी आल्यानंतर आम्ही तिला तिच्या गाण्याच्या वर्गात सोडणार होतो. आता सव्वाचार तर इथेच वाजत होते.

पुन्हा एका गाडीचा आवाज ऐकू येऊ लागला. अजनी स्टेशनवर गाडी येण्याबद्दल उदघोषणा होणार की नाही याविषयी मी साशंकच होतो त्यामुळे ही गाडी महाराष्ट्रच असणार याविषयी मला आशा वाटु लागली पण दूरवरून डिझेल एंजिन दिसले आणि जाणवले की अरे ही तर नंदीग्राम. चोवीस तासांपूर्वी बिचारी मुंबईवरून निघालेली. लांबच्या रस्त्याने नागपूर गाठणारी ही गाडी मात्र वर्धेनंतर दादागिरी करते. महाराष्ट्र एक्सप्रेसला सिंदी स्टेशनवर मागे टाकून नागपूरला आधी येते. आजही ती तशीच आली. पुणे शेड्चे WDM 2 18612 या गाडीला घेऊन येत होते. मनमाड पासून या एंजिनाने याच गाडीची सोबत केली असणार आणि उद्या हेच एंजिन पुन्हा या गाडीला मनमाड पर्यंत सोबत करणार.




पहिला डबा हा मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर धावणार्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी या गाड्यांच्या रेक मधला होता. त्याचा टिपीकल रंग.




अनपेक्षितपणे गाडी अजनीला थांबली. गाडीत अजिबात गर्दी नाही. थोडावेळ थांबून गाडी हलली. गाडीच्या मागचा X मला माझ्या टिपीकल स्वप्नाची आठवण देऊन गेला. (माझं पेट स्वप्न म्हणजे स्टेशनवर जातोय गाडी पकडण्याचा प्रयत्न करतोय (यादों की बारात फ़ेम) पण गाडी निघून जातेय आणि शेवटचा X मला खिजवून हळूहळू माझ्यापासून दूर जातोय) आज ते सगळं आठवलं आणि नकळत हसु आलं.





पुन्हा एकदा खापरी दिशेकडून गाडीचा आवाज आणि आमची उत्सुकता चाळवली जाणे हे आपसूक घडले. यावेळी त्या दिशेकडून एक WAP 4 एंजिन गाडी घेऊन येताना दिसले. ही महाराष्ट्र एक्सप्रेस असण्याची शक्यता नाकारता येण्याजोगी नव्हती. कधीकधी महाराष्ट्र एक्सप्रेसला भुसावळ शेड्चे WAP 4 एंजिन लागतेही.

पण ती गाडी जशीजशी जवळ येत होती तसतसा तिचा वेग कमी होण्याऐवजी वाढतच गेला आणि शेवटच्या क्षणी जाणवलं की अरे ही तर मुंबई-हावडा ज्ञानेश्वरी सुपर डीलक्स एक्सप्रेस.



२८ मे २०१० मध्ये नक्षलवाद्यांनी जो घातपात केला त्यानंतर ह्या मार्गावरच्या गाड्या वेळेवर कधी धावतच नाहीयेत. सकाळी साडेनऊला नागपूरला येणारी ही गाडी तब्बल वर्षभरापासून दुपारी चार साडेचार वाजता येतेय. (नक्षलवाद्यांना घाबरून एवढ्या महत्वाच्या मार्गावरच्या गाड्यांच्या वेळा बदलणारे धन्य ते रेल्वे प्रशासन आणि धन्य त्या ममता दीदी. बंगाली लोकांचे शतशः धन्यवाद की त्यांनी ममतांना मुख्यमंत्री बनविले आणि समस्त देशवासियांना त्यांच्या तावडीतून सोडविले. पु. लं. च्याच भाषेत सांगायचे झाले तर "बाई असेल मोठी हो. पण आमच्या लेखी तिचे मोठेपण कुठल्या खात्यात मांडायचे ते सांगा बघू?")

गाडी भरवेगात प्लॆटफ़ॊर्मवरून जाताना जाणवलेली नवीन गोष्ट म्हणजे या गाडीला आता पूर्ण वातानुकूल प्रथम वर्ग डबा जोडलेला आहे.(H-1). पूर्वी अर्धा प्रथम वर्ग आणि अर्धा द्विस्तरीय वातानुकूल शयनयानाचाच डबा असायचा. (HA-1).


आता चार वाजून चाळीस मिनिटे झालेली होती. आत्याला फोन लावावा म्हटल. फोन केल्यावर कळले की महाराष्ट्र एक्सप्रेसला सिंदीला मागे टाकून या दोन्ही गाड्या पुढे काढल्या होत्या आणि आता महाराष्ट्र एक्सप्रेस खापरीवरून निघते आहे. बस आता फ़क्त दहाच मिनिटे.

महाराष्ट्र एक्सप्रेसच्या दयनीय अवस्थेविषयी मनात अपार करूणा दाटून आली. सद्यस्थितीच्या महाराष्ट्राचे ही गाडी प्रतीक आहे असे वाटले. महाराष्ट्रात भाव नाही, दिल्लीत कुणी विचारत नाही. खरतर आंध्रप्रदेश एक्सप्रेस हैद्राबाद-नवी दिल्ली, तामिळनाडू एक्सप्रेस चेन्नई-नवी दिल्ली, केरळ एक्सप्रेस तिरूअनंतपुरम-नवी दिल्ली, कर्नाटक एक्सप्रेस बंगलोर-नवी दिल्ली, मग महाराष्ट्र एक्सप्रेस मुम्बई-नवी दिल्ली का नको? असो.

शेवटी एकदाची पावणेपाच वाजता उदघोषणा झाली. (अजनी स्टेशनवर उदघोषणा होते ही एक नवीन भर माहितीत पडली). नेहमीचे भुसावळ शेडचे WAM 4 महाराष्ट्र एक्सप्रेसला घेऊन येताना दिसले. प्रतिक्षा संपली.

Monday, July 11, 2011

पावसातली तू

लावू नकोस बोल मला तो पावसाचा दोष होता,
आषाढघन बरसताना खरंच तुलाही होष होता?

पावसात भिजावे तू हा अनामिक आदेश होता,
मदनाने पावसाचा फ़क्त घेतला वेष होता.

नभात मेघ दाटले अन धरती ही तृणबावरी,
सांग फ़ुलून आली कशी मुलुखाची तू लाजरी.

नितळ धारांसारखे प्रेम तुझे हे उचंबळे,
मग हातांवरील मेंदी नेत्रात का गं साकळे?

खरंच का नेत्रात तुझ्या, अश्रु डोकावून गेला?
की पावसाचा थेंब हा मार्ग वेडावून गेला?

सांग केला का कधी, मी मर्यादाभंग होता?
वेडे अग सगळाच तो पावसाचा रंग होता.

-प्रा. राम प्रकाश किन्हीकर.

(ही कविता दै. तरूण भारत, नागपूर मध्ये दि. २० ऒगस्ट २००० रोजी प्रकाशीत झालेली आहे.)



(ही कविता ब्लोगवर खास सुधीर गोखले (नाना) साठी टाकली. बुंदींच्या दिवसांची आठवण अजूनही आहे म्हणून.)

कवितेची थोडी पार्श्वभूमी:

माझ्या जीवनात रेल्वेचे अनन्यसाधारण स्थान आहे. मला रेल्वे प्रवासही भरपूर घडला आहे. रेल्वे माझी पहिली प्रेयसी आहे. त्यामुळे माझ्या बहुतेक लेखनात बस किंवा रेल्वे चा संदर्भ येतोच येतो.

वास्तविक ही एक प्रेमकविता. आमचे लग्न दि. ०७/०२/२००० (नाथबीज) रोजी जमले. दि. १२/०३/२००० ला चंद्रपूरला साक्षगंध झाले. लग्नाची तारीख मात्र फ़ार लांबची निघाली.(माझ्याच आग्रहावरून) तारीख निघाली ती ०२/१२/२०००. तब्बल आठ साडेआठ महिन्यांचा कालावधी आम्हाला एकमेकांना समजून घ्यायला मिळाला.

दरम्यानच्या काळात मी नागपूरला आलो की वैभवी चंद्रपूरवरून नागपूरला यायची. आम्ही मग मनसोक्त भटकायचो. थोडी लांब सुटी आली की मी चंद्रपूरला जायचो. तसही चंद्रपूर माझं आजोळ असल्याने बालपणापासूनच मला चंद्रपूरची ओढ होतीच.

अशाच एका पावसाळी दिवशी आम्ही खूप भटकलो. थोडे ओलेही झालोत. त्याच दिवशी रात्रीच्या सेवाग्राम एक्सप्रेसने मी मुंबईला परत जायला निघालो होतो. दिवसभर भटकूनही तिच्याविषयी वाटणारी ओढ कमी झाली नव्हती. सारखा डोक्यात तिचाच विचार चालला होता. (या ओढीलाच राधा-कृष्णाची ओढ म्हणतात हे सौ. मंदामावशींनी सांगितल्यानंतर तर अशी ओढ वाटण्यात आम्हा दोघांनाही धन्यता वाटायला लागली होती.)

ती आत्ता काय करीत असेल? आठवणींमध्ये गुंग असेल की दुसर्या कामांमध्ये तिने स्वत:ला गुंतवून घेतले असेल? असलेच असंख्य विचार. सारखी बेचैनी, अनामिक हुरहुर बस्स.

अशातच गाडी सुटली. मधला बर्थ होता. रात्रीचे नऊ वाजत होते. आजुबाजुच्या पासिंजरांनी आपापले बर्थस लावून घेतेलेत. मला झोप येत नसतानाही मधला बर्थ पकडून आडवे व्हावे लागले. हुरहुरीतूनच या कवितेचा जन्म झाला. तेव्हा गाडीने ८० कि.मी. अंतर कापून वर्ध्यात आगमन केलेले होते. रेल्वेच्या बर्थ वर केलेली कविता.

Wednesday, July 6, 2011

माझी एक आणखी आवडती कविता.

संपले आयुष्य सारे, संपली नाही तृषा,
संपले नाहीत तारे संपली नाही उषा.
संपले नाहीत उखाणे प्राक्तनाने घातलेले,
येथल्या खेळात पाची प्राण माझे गुंतलेले.


-प्राचार्य राम शेवाळकर.

Monday, April 11, 2011

२०१० आणि २०११.

दि. २०/१२/२००९. सकाळी ९.०० वाजता
स्थळ : प.पू. बापुराव महाराजांचे घर, एन. १५, रेशीमबाग, नागपूर.


विवेकजी घळसासींची रामकथा सुरू होतेय. निमित्त आहे आमच्या गुरूमाउली प.पू.मायबाई महाराज खातखेडकर यांचा जन्मशताब्दी सोहोळा. व्यासपीठ मोठे सुंदर सजवलेले आहे आणि व्यासपीठावर प.पू. बापुराव महाराज आणि प.पू. मायबाई महाराजांच्या प्रतिमांच्या पायापाशी बसून ही रामकथा ऐकण्याचे भाग्य मला लाभतेय.

खरंतर व्यासपीठावर नागपूरातील प्रथितयश गायिका व उत्कृष्ट प्राचार्या डॊ. स्नेहलताई पाळधीकर त्यांच्यासोबतच डॊ.निताताई झिंझर्डे आणि सौ. माधुरीताई करमरकरांसारख्या दिग्गज गायिका. त्यांच्यासोबत मागे कोरसमध्ये गाणं म्हणण तर सोडाच पण व्यासपीठावर तरी बसावं का? हा प्रश्न मला पडलेला. पण व्यवस्थेचा भाग म्हणून श्री. नानासाहेब(श्री. रमेशराव) खातखेडकरांनी बसायला सांगितलय. (यामागे काहितरी ईश्वरी संकेत होता असं मला आज वाटतय.)


आधी वंदू सदगुरू मायबापा.




प.पू.मायबाई महाराज जन्मशताब्दी सोहोळ्यानिमित्त उदघाटन समारंभासाठी आलेली संत मंडळी व मान्यवर.


सकाळच्या पवित्र वातावरणात स्नेहलताईंचं "श्रीरामचंद्र कृपालु भजमन...." हे गाणं हृदयात रामप्रेमाची ज्योत लावतय. विवेकजींना मी पहिल्यांदाच ऐकतोय. पण त्यांनी बोलायला सुरूवात केली आणि माझाच नव्हे तर त्या सभामंडपात उपस्थित असलेल्या शेकडो भाविकांच्या काळजाचा ठाव घेतला. राम शेवाळकरांसारखी रसाळ आणि प्रासादिक वाणी, जडजंबाल शब्दांचा अभाव, विद्वत्ता प्रदर्शनाचा कुठेही हव्यास नाही, विषयापासून कुठेही भरकटणे नाही, विनोदाचा हव्यास नाही आणि वावडेही नाही. प्रत्येक श्रोत्याचं मन राममय करून टाकताना त्यांच रामकथेवरचं निरूपण सुरू होतं. "मी आज २०१० मध्ये रामकथा कां ऐकावी ?" या प्रश्नाचं उत्तर ते देतायत. आजच्या युगात ही रामकथा आपल्याला काय देणार या प्रश्नाचं सर्वसमावेशक, समर्पक आणि आणि सर्वांना पटेल अस उत्तर ते देतात.



श्रीरामकथेत श्री. विवेकजी.

पहिल्याच सत्रात त्यांनी माझ्या मनाचा ताबा घेतला. त्यांच्यापासून अगदी १० फ़ुटांवर बसून रामकथा ऐकताना, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वागणं जमेल का? त्यांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे खर्या अध्यात्मिकतेने आपल्याला जगता येईल कां? हाच विचार मनामधे रुंजी घालू लागलाय. त्यांचं प्रतिपादन असं की "आपण सर्वच आज स्वतःला धार्मिक म्हणवून घेतोय पण धार्मिकतेच्या आचरणासाठी विचारांची बैठक पक्की हवी नाही तर तो धार्मिकतेचा निव्वळ आव होईल. आज आपल्या जीवनाचा बहुतेक भाग, खूप शक्ती, आपण जे नाही ते दाखवण्यात खर्च होतोय."

"बाहर क्या दिखलाईयें, अंतर जपिये राम
कहां काज संसारसे? तुझे धनीसे काम"


त्यांनी सांगितल की किमान अध्यात्मात तरी अकृत्रिम जगा. मोकळं जगा. वर्तमानात जगा. फ़ार भूतकाळात नको, फ़ार भविष्यात नको. त्यांच बोलण मनाला भिडलं. आणि नववर्षात नवीन पद्धतीने जगण्याचा मी संकल्प केला.



भजनानंदात रंगलेल्या भक्त मंडळींचा फ़ेर.





श्रीमद भागवताची दिंडी. २००९. सर्वात समोर असलेले आमचे वासुदेवदादा.




दिंडी नंतर रंगलेला फ़ेर. भागवतधर्माची पताका उंच आहे आणि राहीलही.


आज जाणवतय की २०१० मी तसं जगलो. खूप आनंदी जगलो. भविष्यातल्या संकटांचा खूप आधीपासून बागुलबुवा केला नाही.

(मध्ये एका चॆम्पियन फ़ुट्बॊल खेळाडूची कथा वाचली होती. तो होता हुशार आणि सामन्यापूर्वी त्याचे खूप मनोरथ असायचेत की माझ्याकडे चेंडू आल्यावर मी असा मारेन, तसा मारेन वगैरे वगैरे. पण प्रत्यक्ष खेळ सुरू झाल्यावर मात्र तो त्याच्या स्वप्नरंजनातून बाहेर यायलाच तयार नसायचा आणि विचार कृतीत यायचेच नाहीत. ऐनवेळी एखादा चेंडू त्याच्याकडे गेलाच तर तो त्याच्या मनासारखा खेळू शकायचाच असं नाही. मग त्याने वर्तमानाचा विचार करून खेळायचे ठरवले. मनाशी ठरवले की एकदा चेंडू माझ्याकडे येउ तर दे. माझं पुरेसं प्रशिक्षण झालेलं आहे मी तो ऐन वेळी ठरवेन कसा खेळायचा तो. आणि काय आश्चर्य! त्याचा खेळ सुधारला. केवळ तो वर्तमानात जगायला लागला म्हणून.)

मलाही २०१० ने निखळ आनंद दिला. बहुतांशी वेळ मी वर्तमानात जगलो. जे मी नाही ते दाखवण्याचा हव्यास कमी झाला. चांगलं वाचन झालं. (२०१० मध्ये वाचलेली पुस्तके आणि त्यांचं विचेचन हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. येत्या महिन्याभरातच ते लेखन प्रकाशित करेन)

आणि मग ७ दिवस अश्याच भारलेल्या अवस्थेत रामकथा ऐकल्यानंतर आमच्या श्री वासुदेवदादांनी आम्हा सर्वांच्याच हृदयातली भावना विवेकजींसमोर प्रगट केली की पुढील वर्षी प.पू. मायबाईंच्या जन्मशताब्दी सांगता सोहोळ्याला विवेकजींनीच श्रीमद भागवत कथेचं विवेचन करावं. विवेकजींनीही ही विनंती अकृत्रिमपणे मान्य केली. श्री वासुदेवदादांनीच विचारपूर्वक २५ डिसेंबर २०१० ही तारीख ठरवली.

पण नियती मनुष्यांच्या मनाप्रमाणे वागत नाही याचा प्रत्यय आला. सर्व कार्यक्रमांची नियोजनबद्ध आखणी करून आमचे वासुदेवदादा दि. २२/८/२०१० ला अकस्मात रामनामात विलीन झालेत. आम्हा सर्वांवर दुःखाचा जणु पहाड्च कोसळला. जीवनात रितेपण जाणवायला लागले.

पण श्री. नानासाहेब खातखेडकरांनी धीराने पुन्हा संघटन केले. त्यांच्या डोळ्यातल्या अश्रुंना त्यांनी थांबवले आणि श्रीमद भागवत सप्ताहाचे कार्य हे परमेश्वरी कार्य आहे याची जाणीव त्यांनी सगळ्यांना दिली. अनेक संतवरांचे आशिर्वाद या कार्याला लाभले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे संगीतावहिनींनी पतीवियोगाचे आणि आमच्या प्रमिलामावशींनी पुत्रवियोगाचे दुःख मोठ्या धीराने दडपले आणि भगवतकार्यासाठी अश्रु लपविले.

यावर्षी पुन्हा श्री. विवेकजींच्याच रसाळ वाणीतून श्रीमद भागवत कथा ऐकली. यावर्षी मात्र हक्काने व्यासपीठावर बसलो. त्यांच्या इतक्या जवळ बसून श्रीमद भागवत कथा ऐकण्याचा एक फ़ायदा माझ्या लक्षात एव्हाना आलेला होता तो म्हणजे विवेकजींच्या कथेमधल्या शिस्तीमुळे श्रोत्यांना आपली स्वतःची आसनसिद्धी साधावी लागत असे. कथा ऐकत असताना मध्ये कुठल्याही क्षुल्लक कारणावरून उठणे हा एक कथाविक्षेप आहे अशी सगळ्यांची भावना विवेकजींनी गेल्यावर्षीच दृढ केलेली होती. त्यामुळे मी एकदा व्यासपीठावर बसलो की मग कुठल्याही कारणासाठी उठण्याची शक्यताच नव्हती. (त्यासाठी गाणार्या मंडळींना कोरस हे एक निमित्त होतं. आमच्या साउंड सिस्टीमवाल्या वामनरावांनी आमचे माइक बहुतांशी वेळा बंदच ठेवले असल्याने आमची गाण्यातली झाकली मुठ सव्वा लाखाची राहिली.)

माझ्या चंचल स्वभावाला संपूर्ण श्रीमद भागवत कथा ऐकवण्याची ही महाराजांची योजना मला यावर्षी कळाली. प्रेक्षकांमध्ये बसलो असतो तर कदाचित एखादे वेळी उठण्याचा प्रसंग आला असता पण व्यासपीठावरून उठणे शक्यच नव्हते. सर्व व्याप ताप दूर ठेवावेच लागलेत आणि जाणवलं की हे करताना जगाचं आपल्यावाचून फ़ार अडत नसतं. आपणच उगाच आपल्याला अडकवून घेत असतो आणि गैरसमजुतीत असतो.



२०१० मधील श्रीमद भागवत कथेसाठीचे व्यासपीठ.

आजवर श्रीमद भागवत कथा वाचत होतो आणि ऐकतही होतो पण प.पू. बापुराव महाराज आणि प.पू. मायबाई महाराज भागवतमय जीवन जगले म्हणजे काय? हे यावर्षीच्या भागवत कथेतून कळले. श्रीमद भागवत हे केवळ एक पुराण नसून तो एक परिपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग आहे याचा बोध झाला. (तशी या संदर्भातली रोकडी प्रचिती यायला डिसेंबर महिन्यात श्रीराम मंदीर वडधामना येथे झालेल्या श्री. शार्दूल शास्त्री तेलंग यांच्या श्रीमदभागवताच्या दशम स्कंध प्रवचनांपासूनच झाली होती.)



श्री.शार्दूल शास्त्री तेलंग श्रीमद भागवताच्या दशम स्कंधावर प्रवचन करताना. स्थळ : वडधामना येथील श्रीराम मंदीर.


दि.२५/१२/२०१० ते १/११/२०११ हे नऊ दिवस आम्ही सगळेच भागवतमय झालो होतो. रात्री झोपतानाही सकाळी सौ. स्नेहलताईंनी गायलेलं मधुराष्टक "मधुराधिपते रखिलं मधुरं" च कानात रुंजी घालत असायच आणि सकाळी उठल्यावर पहिले शब्द तेच आठवायचेत. बरं ही प्रचिती मला एकट्यालाच आलेली नाही तर माझे कुटुंबिय आणि ज्या आप्तमित्रांजवळ मी ही भावना बोलून दाखवली त्या सर्वांना आलेली आहे.









श्री. विवेकजींच्या विविध भावमुद्रा.






१ जानेवारी २०११. दिंडी नंतर चाललेले पाउल भजन आणि रंगलेली भक्त मंडळी. नववर्षाची यापेक्षा चांगली सुरूवात काय असू शकेल?

यावर्षी काही नवीन गोष्टी उमगल्यात. जीवन जगण्याच्या मार्गात त्यांचीही भर २०११ मध्ये घालायची हा निश्चय पक्का झाला.

Monday, March 28, 2011

आठवणीतली कविता.

तुझ्यासाठी काय ठेऊन जाऊ सांग?
तशा पुष्कळ कविता आहेत तुझ्यावरती.
तू दिलेले फोटो परत दिलेत तर,
उगाच तुझ्या खणात होईल, भारूडभरती.

अर्धवट एक कथा लिहिलिय, तीच देऊ?
तू आणि तूच फ़क्त ती करशील पुरी.
त्याच्यापेक्षा नाकारलीस जी माझी भेट,
आता तुला चालेल का ती चंदनसुरी ?

पावसात जिथे भिजलो होतो नाचत नाचत,
जपून ठेवले आहे तिथले एक मोरपीस.
तेच तुला दिले असते पण नकोच,
उगाच माझी आठवण होईल दिसंदिस.

त्याच्यापेक्षा तुझ्यासाठी हवेवरती,
सोडून जाइन गाण्यामधले हळवे सूर.
चांदण्यात फ़िरताना ते ऐकू नकोस,
उगाच तुझ्या पापणीमध्ये येइल पूर.

- कविवर्य वसंत बापट

- वसंत बापट.

Tuesday, March 1, 2011

मराठी भाषा दिन

स्वार

घनदाट अरण्यामधूनी, बेफ़ाम दौडतो स्वार,
अवसेची राक्षस रात्र, साचला नभी अंधार.

स्तब्धात नादती टापा, खणखणत्या खडकांवरती,
निद्राळ तरुंच्या रांगा, भयचकीत होऊनी बघती.

गतिधुंद धावतो स्वार, जखमांची नव्हती जाण,
दूरातील दीपासाठी, नजरेत साठले प्राण.

मंझिल अखेरी आले, तो स्फ़टीकचि-यांचा वाडा,
पाठीवर नव्हता स्वार, थांबला अकेला घोडा.

वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज)

एका माणसानं किती ध्येयवादी असावं, याचं हा स्वार उत्कृष्ट उदाहरण आहे अस मला वाटतं.

Monday, February 14, 2011

आवडेल तेथे प्रवास भाग २

पूर्वपीठिका:
आधीचा अनुभव गाठीशी होताच त्यामुळे लगेच नवीन मुंबईच्या दत्ता मेघे इंजिनीअरींग कॊलेजचा इंटरव्ह्यु कॊल आल्यानंतर पुन्हा एकदा आवडेल तेथे प्रवास योजनेनेच मुंबईपर्यंत जाण्याचा विचार केला. परतल्यापासून आठव्याच दिवशी पुन्हा एकदा नागपूर डेपो मॆनेजर समोर जाऊन ठाकलो. त्यांनी विचारलेच "काय हो! तुम्हाला ही कल्पना फ़ारच आवडलेली दिसतेय." त्यांना माझा मागील प्रवास थोडक्यात सांगितला आणि नवीन पास घेतला. पुन्हा एकदा पोटापाण्याच्या शोधात मुशाफ़िरी सुरू झाली.
१०/९/१९९५
नागपूर ते अकोला : आसन क्र.१७
नागपूरवरून प्रयाण : ०६.०० वाजता
मार्गावरील थांबे : कोंढाळी, तळेगाव, अमरावती, मूर्तिजापूर, बोरगाव(मंजू)
बस : नागपूर जलद बुलढाणा
बस क्र. : MH-31/ M 9166 म.का.ना. न.टा. २४८, १९९४-९५
आगार : बु. बुलढाणा आगार
चेसिस नं. : ७२७७६५
खिड्क्या हिरव्या रंगातल्या
मॊडेल : TATA 1510 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
अकोला आगमन : ११.५० वाजता
एकूण अंतर : २५० किमी.
सरासरी वेग : ४२.८५ किमी प्रतितास
गेल्यावेळी याच अकोला नागपूर प्रवासाला जवळपास ७ तास लागले होते. त्यामानाने हा प्रवास जलद झाला. सकाळी फ़ार वाहतूक नसल्यामुळे गाडी जरा वेगात आणता आली असावी.

१०/९/१९९५
अकोला ते श्रीक्षेत्र शेगाव : आसन क्र.२६
अकोलावरून प्रयाण : १२.१० वाजता
मार्गावरील थांबे : एकही नाही (मार्गे बाळापूर)
बस : मोर्शी जलद शेगाव
बस क्र. : MH-31/ 9137 म.का.ना. न.टा. ८३, १९९३-९४
आगार : अम. मोर्शी आगार
मॊडेल : TATA 1510 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
श्रीक्षेत्र शेगाव : आगमन : १३.१० वाजता
एकूण अंतर : ५० किमी.
सरासरी वेग : ५० किमी प्रतितास
व्वा! काय सुपर आणली गाडी! मस्तच. शेगावला गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो. सगळी चिंता त्यांच्यावर टाकली आणि पुढच्या प्रवासाला सिद्ध झालो


गजानन माउली, प्रेमाची साउली, शेगावी राहिली, भक्तांसाठी

१०/९/१९९५
श्रीक्षेत्र शेगाव ते खामगाव हा प्रवास MH-28/ B 128 MATADOR F 307 काळ्या पिवळ्या टॆक्सी ने केला.

१०/९/१९९५
खामगाव ते औरंगाबाद : आसन क्र.५० (खामगाव ते चिखली), आसन क्र. १३ (चिखली ते औरंगाबाद)
खामगाववरून प्रयाण : १७.३० वाजता
मार्गावरील थांबे : चिखली, चिखली ढाबा, देउळगाव राजा, जालना, सिडको बस स्थानक (औरंगाबाद)
बस : नागपूर जलद औरंगाबाद
बस क्र. : MH-20/D 2030 म.का.औ. न.ले. ३०, १९९५-९६
आगार : औ. औरंगाबाद-२ आगार
चेसिस नं. : ३०१८७
मॊडेल : ASHOK LEYLAND CHEETAH
एकूण आसने : ५५
औरंगाबाद आगमन : २२.४५ वाजता
एकूण अंतर : २३० किमी.
सरासरी वेग : ४३.८० किमी प्रतितास



१२/९/१९९५
औरंगाबाद ते नाशिक : आसन क्र.१०
औरंगाबादवरून प्रयाण : ०६.१५ वाजता
मार्गावरील थांबे : देवगाव(रंगारी), लोणी(खु.), नांदगाव, मनमाड, चांदवड, पिंपळगाव बसवंत, ओझर(मिग)
बस : औरंगाबाद जलद नाशिक
बस क्र. :MH-12/F 4954 म.का.दा. न.ले.
आगार : औ. औरंगाबाद-२ आगार
मॊडेल : ASHOK LEYLAND CHEETAH
एकूण आसने : ५५
नाशिक आगमन : ११.०० वाजता
एकूण अंतर : २२० किमी.
सरासरी वेग : ४६.३१ किमी प्रतितास



१२/९/१९९५
नाशिक ते कल्याण : आसन क्र.२६
नाशिकवरून प्रयाण : ११.४५ वाजता
मार्गावरील थांबे : घोटी ढाबा, थळघाट चेकपोस्ट, शहापूर, भिवंडी
बस : धुळे जलद वाशी
बस क्र. : MH-20/D 2028 म.का.औ. न.ले. २८, १९९५-९६
आगार : धु. धुळे आगार
मॊडेल : ASHOK LEYLAND CHEETAH
एकूण आसने : ५५
कल्याण आगमन : १६.०० वाजता
एकूण अंतर : १५० किमी.
सरासरी वेग : ३५.२९ किमी प्रतितास
मुंबईच पहिलं जवळून दर्शन. तसं मी १९९१ मध्ये आलो होतो पण मद्रास मेल ने आलो आणि लगेचच गीतांजली मध्ये जाउन बसलो होतो. धड व्ही.टी. स्टेशन पण नीट बघितलं नव्हतं. फ़क्त कल्याण ते मुंबई हा प्रवास भल्या पहाटे व मुंबई ते कल्याण हा प्रवास भल्या सकाळी झाला होता.
कल्याण ला स्टॆण्ड बाहेर लगेच स्टेशनवर प्लॆट्फ़ॊर्मवर गेलो. संध्याकाळपर्यंत मुलुंड ला गेलो. उद्या सकाळी ऐरोलीला इंटरव्ह्यु ला जाइन.

१३/९/१९९५
हा दिवस आयुष्यातला एक महत्वाचा दिवस. आज ऐरोलीच्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरव्ह्यु झाला. इंटरव्ह्यु समिती मध्ये डॊ.परमेश्वरन व डॊ.पंड्या (व्ही.जे.टी.आय.) होते. माझा नंबर सगळ्यात शेवटी संध्याकाळी ६ वाजता लागला. इंटरव्ह्यु मध्ये माझ्या आवडीच्या विषयातलेच (इंजिनीअरींग जिऒलॊजी) प्रश्न विचारलेत त्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि निवड होईलच असे वाटत होते.संध्याकाळी अण्णाकाकांचे मित्र श्री.कस्तुरेकाकांकडे जाउन आलो.

१४/९/१९९५
ठाणे ते पुणे (स्वारगेट) : आसन क्र.१७
ठाणे वरून प्रयाण : ०८.०५ वाजता
मार्गावरील थांबे : पनवेल, खोपोली, लोणावळा, पिंपरी-चिंचवड
बस : ठाणे जलद करमाळा
बस क्र. : MH-12/ Q 8806 म.का.दा. न.टा., १९९४-९५
आगार : सो. करमाळा आगार
चेसिस नं. : DVQ ७१००३४
मॊडेल : TATA 1510 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
पुणे(स्वारगेट) आगमन : १३.१५ वाजता
एकूण अंतर : १६५ किमी.
सरासरी वेग : ३१.९३ किमी प्रतितास

माझा पहिला खंडाळा घाटाचा अनुभव. आजवर मराठी कथा कादंबर्यांतून, प्रवास वर्णनांतून खूप वाचले होते. पहिला अनुभव हा त्यावर कळस करणारा ठरला. मुंबई सोडताना वातावरण कुन्द व ढगाळ होते. खोपोली पर्यंत पावसाने सोबत केली. खंडाळा घाट चढायला सुरुवात केली तेव्हा आकाशात ढग आणि पाऊस. घाटात ढगांनी गाडीत प्रवेश करायला सुरूवात केली होती. कपड्यांना, अंगाला तो ओला मऊसूत स्पर्श अजूनही मला आठवतोय. गाडी घाट चढून लोणावळ्याच्या जवळ आली तेव्हा आकाशात स्वच्छ ऊन पडले होते आणि खाली दरीत ढगांची दुलई अंथरली होती. विधात्याच्या या विलोभनीय मायेची इतकी रूपे इतक्या कमी वेळात दाखवणार्या खंडाळा घाटाने मला पहिल्याच दर्शनात जिंकले नव्हे खिशात टाकले.

१४/९/१९९५
पुणे(शिवाजीनगर) ते अहमदनगर : आसन क्र.१३
पुणे(शिवाजीनगर) वरून प्रयाण : १४.१० वाजता
मार्गावरील थांबे : एकही नाही
बस : पुणे सुपर नगर
बस क्र. : MH-12/ R 1276 म.का.दा. न.टा.
खिड्क्या लाल रंगातल्या
आगार : अह. अहमदनगर आगार
मॊडेल : TATA 1510 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
अहमदनगर आगमन : १६.५० वाजता
एकूण अंतर : १३० किमी.
सरासरी वेग : ४८.७५ किमी प्रतितास

१४/९/१९९५
अहमदनगर ते तारकपूर(अहमदनगर) : उभ्याने प्रवास
अहमदनगरवरून प्रयाण : १७.२० वाजता
मार्गावरील थांबे : एकही नाही
बस : परळी जलद नाशिक
बस क्र. : MH-20/ D 1625 म.का.औ. न.ले. १९९४-९५
आगार : बी. परळी आगार
मॊडेल : ASHOK LEYLAND CHEETAH
एकूण आसने : ५५
तारकपूर(अहमदनगर) आगमन : १७.३० वाजता
एकूण अंतर : ५ किमी.
सरासरी वेग : ३० किमी प्रतितास



१४/९/१९९५
तारकपूर(अहमदनगर) ते औरंगाबाद : आसन क्र.५४
अहमदनगरवरून प्रयाण : १७.४५ वाजता
मार्गावरील थांबे : घोडेगाव, वडाळा, नेवासे फ़ाटा
बस : पुणे सुपर यवतमाळ
बस क्र. : MH-31/ M 9161 म.का.ना. न.टा. २४३, १९९४-९५
आगार : य. यवतमाळ आगार
चेसिस नं. : ७२७७४५
मॊडेल : TATA 1510 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
औरंगाबाद आगमन : २०.३० वाजता
एकूण अंतर : १२० किमी.
सरासरी वेग : ४३.६३ किमी प्रतितास

रात्री औरंगाबादला अण्णाकाकांकडे मुक्काम.

१५/९/१९९५
औरंगाबाद ते अमरावती : औरंगाबाद ते खामगाव (आसन क्र.११), खामगाव ते अमरावती (आसन क्र.३१)
औरंगाबादवरून प्रयाण : ०९.१० वाजता
मार्गावरील थांबे : जालना, देउळगाव राजा, चिखली, खामगाव, अकोला, मुर्तिजापूर
बस : औरंगाबाद अतिजलद साकोली
बस क्र. : MH-31/M 9159 म.का.ना. न.टा. २४१, १९९४-९५
आगार : भं २/९५. साकोली * आगार
चेसिस नं. : ७२७६५२
मॊडेल : TATA 1510 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
अमरावती आगमन : १७.३५ वाजता
एकूण अंतर : ३६० किमी.
सरासरी वेग : ४२.७७ किमी प्रतितास

ही गाडी १९९५ मध्ये नुकतीच सुरू झालेली होती. तत्पूर्वी औरंगाबाद ते नागपूर मार्गावर फ़क्त सकाळी ९.३० ला नागपूर डेपोची आणि संध्याकाळी ७.३० ला औरंगाबाद डेपोची अशा दोनच एशियाडस (निम आराम गाड्या) होत्या.

 (पहिल्यांदा बरीच वर्षे ही गाडी (औरंगाबाद-साकोली) साधी होती गेल्या ४ वर्षांपासून ही फ़ेरी निम-आराम केलेली आहे.)

या गाडीचा कर्मचारी बदल अमरावतीला होतो हे कळले आणि ही गाडी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारासच नागपूरला पोहोचते हे सुध्दा कळले. (आजही हेच वेळापत्रक कायम आहे)आणि त्यामुळेच मी खामगावपासूनच दाराजवळची जागा पकडून दुसरं कुठलं चांगलं कनेक्शन मिळतय का ते बघत होतो.

* या पद्धतीने डेपो लिहिणे ही भंडारा विभागाची खासियत होती. त्याचं डिकोडींग असं. विभाग - त्या वर्षातली त्या डेपोत आलेली त्या नंबरची गाडी (नं/वर्ष) - आगार.

१५/९/१९९५
अमरावती ते नागपूर : अमरावती ते तिवसा (आसन क्र.३), तिवसा ते नागपूर (आसन क्र. २६)
अमरावतीवरून प्रयाण : १७.४५ वाजता
मार्गावरील थांबे : गुरूकुंज मोझरी, तिवसा, तळेगाव, कारंजा (घाडगे), कोंढाळी
बस : अमरावती सुपर नागपूर
बस क्र. : MH-12/R 1262 म.का.दा. न.टा., १९९४-९५
आगार : अम. अमरावती-१ आगार
चेसिस नं. : ७२७७७१
मॊडेल : TATA 1510 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
नागपूर आगमन : २१.५५ वाजता
एकूण अंतर : १५४ किमी.
सरासरी वेग : ३६.९६ किमी प्रतितास

हा प्रवास मात्र सफ़ल झाला. मुंबईला कायम नोकरी मिळाल्याचा निरोप दोन दिवसांनी कळला. जीवनातले एक कष्ट्प्रद पर्व संपले. आज वळून पाहताना लक्षात येतं की त्या दिवसांनी, त्या अपमान, अवहेलनांनी जीवनात खूप शिकवलं. हे पर्व आयुष्यात आवश्यक आहे.

(Thanks to My bus fan and artist friend Mr. Vishal Joshi for sending me the sketches of the buses in one particular series. Without his encouragement and help it was not possible for me make my blog beautiful. All credit to Vishal)


















Tuesday, February 8, 2011

आवडेल तेथे प्रवास भाग १

पूर्वपीठिका:

१९९५ वर्ष अर्धे सरलेले. स्नातक आणि त्यातही अभियांत्रिकी स्नातक होऊनही जवळपास दोन वर्षे लोटलेली. मध्ये धामणगाव १९९४-१९९५ मधला अध्यापनाचा कालावधी सोडला तर हाती ठोस असे काही नव्हते. (धामणगावात मात्र अध्यापनासोबतच नाट्य क्षेत्रात खूप मुशाफ़िरी केली होती. अनेक एकांकिका आणि "प्रेमाच्या गावा जावे" चा एक नेटका प्रयोग.)|

स्वतःच स्वतःवरचे प्रेशर वाढवत होतो. अध्यापनाच्या क्षेत्रातच जायचे हा निश्चय तर झाला होता.

वर्तमानपत्रात जाहीराती वाचून अप्लाय करणे सुरू होतेच. प्रवरानगर च्या कॊलेजचा इंटरव्ह्यु कॊल आला. घरी खूप पैसे मागायला जिवावर आले होते. अचानक महाराष्ट्र एस. टी. मदतीला धावली. ३५० रुपयांमध्ये "आवडेल तेथे प्रवास" योजनेची जाहिरात पाहिली आणि तोच विचार पक्का केला. वाटेत जाताना शेगावचे ही दर्शन होईल आणि अण्णाकाकांकडेही औरंगाबादला जाणे होईल हा विचार आवडला. आणि सुरू झाली मनसोक्त भटकंती.

कामाबरोबर काम ही झाले, प्रवासाबरोबर प्रवासही झाला. एखाद्या बस मध्ये बसल्यानंतर जर तिच्या वेगाने निराशा केली तर मध्येच एखाद्या स्टॊप वर बस सुध्दा बदलली. ७ दिवसात आवडेल तेथे प्रवासाची भरपूर मजा लुटली.

२९/८/१९९५

नागपूर ते अमरावती : आसन क्र.३९ (नागपूर ते कोंढाळी), आसन क्र.३ (कोंढाळी ते अमरावती)

नागपूरवरून प्रयाण : दुपारी ११.३० वाजता
मार्गावरील थांबे : कोंढाळी, कारंजा (घाडगे), तळेगाव
बस : साकोली जलद शेगाव
बस क्र. : MH-31 / M 9017 म.का.ना. न.टा. १०८, १९९४-९५
आगार : भं. साकोली आगार
मॊडेल : TATA 1510 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
अमरावती आगमन : दुपारी १५.३० वाजता
एकूण अंतर : १५४ किमी.
सरासरी वेग : ४०.१८ किमी प्रतितास





या बसने निराश केले. कधी पोहोचणार ही शेगावला? अमरावतीला ड्रायव्हर व कंडक्टर बदलणार म्हणजे अधिकच वेळ जाणार. अमरावती स्थानकात पोहोचता पोहोचता दुसरी बस तयार होती. लगेचच त्या बसमध्ये जावून बसलो.

२९/८/१९९५

अमरावती ते खामगाव : आसन क्र.११

अमरावतीवरून प्रयाण : दुपारी १५.३० वाजता
मार्गावरील थांबे : मूर्तिजापूर, अकोला, बाळापूर
बस : अमरावती जलद मलकापूर
बस क्र. : MH-12 / Q 8164 म.का.दा. न.टा.,१९९४-९५
खिड्क्या पोपटी रंगातल्या
आगार : बु. मलकापूर आगार
मॊडेल : TATA 1510 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
खामगाव आगमन : सायंकाळी १९.०० वाजता
एकूण अंतर : १४० किमी.
सरासरी वेग : ४० किमी प्रतितास




२९/८/१९९५

खामगाव ते श्रीक्षेत्र शेगाव : आसन क्र.२६

खामगाववरून प्रयाण : सायंकाळी १९.४५ वाजता
मार्गावरील थांबे : बरीच छोटी छोटी खेडी
बस : खामगाव - शेगाव
बस क्र. : MWY 9730 म.का.ना. न.टा.
खिड्क्या पोपटी रंगातल्या
आगार : बु. खामगाव आगार
मॊडेल : TATA 1210
एकूण आसने : ५५
श्रीक्षेत्र शेगाव आगमन : रात्री २०.१५ वाजता
एकूण अंतर : १५ किमी.
सरासरी वेग : ३० किमी प्रतितास





२९/८/१९९५

श्रीक्षेत्र शेगाव ते खामगाव : आसन क्र.२१

श्रीक्षेत्र शेगाववरून प्रयाण : रात्री २१.३० वाजता
मार्गावरील थांबे : बरीच छोटी छोटी खेडी
बस : शेगाव - खामगाव
बस क्र. : MWQ 6751 म.का.दा. न.टा
खिड्क्या पोपटी रंगातल्या
आगार : बु. खामगाव आगार
मॊडेल : TATA 1210
एकूण आसने : ५५
खामगाव आगमन : रात्री २१.५५ वाजता
एकूण अंतर : १५ किमी.
सरासरी वेग : ३६ किमी प्रतितास

३०/८/१९९५

खामगाव ते औरंगाबाद : आसन क्र.३९

खामगाववरून प्रयाण : रात्री १.३० वाजता
मार्गावरील थांबे : चिखली, चिखली ढाबा, देऊळगाव राजा, जालना
बस : नागपूर सुपर पुणे
बस क्र. : MH-31 / M 9256 म.का.ना. न.टा. ०६, १९९५-९६
आगार : नाग. नागपूर-२ आगार
मॊडेल : TATA 1210 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
औरंगाबाद आगमन : सकाळी ०६.४५ वाजता
एकूण अंतर : २३० किमी.
सरासरी वेग : ४३.८० किमी प्रतितास

सकाळी सकाळी रिक्षा केला आणि अण्णाकाकांकडे गेलो.

३१/८/१९९५

औरंगाबाद ते घोडेगाव : आसन क्र.३१

औरंगाबादवरून प्रयाण : दुपारी १२.०० वाजता
मार्गावरील थांबे : नेवासे फ़ाटा, वडाळा
बस : सिल्लोड जलद पुणे
बस क्र. : MH-20 / D 2072 म.का.औ. न.ले. ७२, १९९५-९६
आगार : औ. सिल्लोड आगार
चेसिस नं. : 30272
मॊडेल : ASHOK LEYLAND CHEETAH
एकूण आसने : ५५
घोडेगाव आगमन : दुपारी १४.०० वाजता
एकूण अंतर : ८० किमी.
सरासरी वेग : ४० किमी प्रतितास

३१/८/१९९५

घोडेगाव ते श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर : आसन क्र.२३

घोडेगाववरून प्रयाण : दुपारी १४.१५ वाजता
मार्गावरील थांबे : एकही नाही
बस : घोडेगाव - राहुरी
बस क्र. : MH-12 / F 2609 म.का.दा. न.टा.
खिड्क्या लाल रंगातल्या
आगार : अह. नेवासा आगार
मॊडेल : TATA 1210
एकूण आसने : ५५
श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर आगमन : दुपारी १४.३० वाजता
एकूण अंतर : ०५ किमी.
सरासरी वेग : २० किमी प्रतितास

३१/८/१९९५

श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर ते घोडेगाव हा प्रवास एका मालवाहू विक्रम रिक्षेने केला.

३१/८/१९९५

घोडेगाव ते अहमदनगर : आसन क्र.४५

घोडेगाववरून प्रयाण : दुपारी १६.१५ वाजता
मार्गावरील थांबे : एकही नाही
बस : औरंगाबाद जलद दौंड
बस क्र. : MH-12 / R 1558 म.का.दा. न.टा. १९९५-९६
आगार : अह. श्रीगोंदा आगार
चेसिस नं. :AVQ 705832
मॊडेल : TATA 1510 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
अहमदनगर आगमन : दुपारी १७.१५ वाजता
एकूण अंतर : ४० किमी.
सरासरी वेग : ४० किमी प्रतितास

३१/८/१९९५

अहमदनगर ते लोणी : आसन क्र.३१

अहमदनगरवरून प्रयाण : सायंकाळी १८.३० वाजता
मार्गावरील थांबे : राहुरी, कोल्हार, बाभळेश्वर, प्रवरानगर
बस : अहमदनगर - संगमनेर
बस क्र. : MH-12 / F 2833 म.का.दा. न.टा.
आगार : अह. संगमनेर आगार
मॊडेल : TATA 1510
एकूण आसने : ५५
अहमदनगर आगमन : रात्री २१.०० वाजता
एकूण अंतर : ६६ किमी.
सरासरी वेग : २६.४० किमी प्रतितास

रात्री लोणीतल्या एका छोट्या लॊज मध्ये एका मोठ्या हॊल मध्ये आम्ही जवळपास वीस जण झोपलो. सगळेचजण महाराष्ट्रातल्या विविध भागांतून उद्याच्या इंटरव्ह्यु साठी दाखल झाले होते.

१/९/१९९५

हा दिवस म्हणजे सगळा सावळागोंधळ होता. सकाळी ९.१५ वाजता इंटरव्ह्यु ची वेळ दिलेली असल्याने आम्ही सगळे लवकरात लवकर तयार होऊन आम्ही पोहोचलो तिथे झाडलोट सुरू होती. प्रत्यक्षात मुलाखती रात्री ८.१५ ला सुरू झाल्यात. विषयांची एक्स्पर्टस पॆनेल्स जरी सकाळीच आलेली होती तरी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब विखे पाटील मुंबईत असल्याने ते आल्याशिवाय मुलाखती सुरू केल्या नाहीत. स्थापत्य अभियांत्रिकीच्या ५ जागांसाठी जवळपास ९० अभियंते आले होते. (काय ही अवस्था!).

कॊलेजला गणपतीच्या सुट्ट्या लागल्यामुळे कॆन्टीन रिकामे होते. कॊलेज कंपाउंड बाहेर एका छोट्याश्या टपरीवर काही बाही खाउन आम्ही सगळ्यांनी दुपार तर टाळली. संध्याकाळ पर्यंत भुकेमुळे, कंटाळ्यामुळे आणि अव्यवस्थेच्या आलेल्या संतापामुळे मुलाखत देण्याचा मूड्च संपला होता. ही आपल्यासारख्या बेरोजगारांची कुचेष्टा वगैरे आहे असे सारखे वाटत होते. इंटरव्ह्यु ला केवळ उपस्थित रहायचे म्हणून राहिलो. इथे नोकरी करावी असे वाटण्याजोगे तिथे काहीही नव्हते.

ती रात्र पुन्हा त्या हॊटेल मध्ये काढण्याचा मूड नव्हता आणि तेव्हढे पैसेही नव्हते.

१/९/१९९५

लोणी ते बाभळेश्वर हा प्रवास विक्रम प्रवासी रिक्षेतून केला.

१/९/१९९५

बाभळेश्वर ते अहमदनगर : आसन क्र.१२

बाभळेश्वरवरून प्रयाण : रात्री २०.३० वाजता
मार्गावरील थांबे : कोल्हार, राहुरी
बस : मनमाड जलद अहमदनगर
बस क्र. : MH-12 / F 2276 म.का.दा. न.टा.
आगार : ना. मनमाड आगार
मॊडेल : TATA 1210
एकूण आसने : ५५
अहमदनगर आगमन : रात्री २२.४५ वाजता
एकूण अंतर : ५६ किमी.
सरासरी वेग : २४.८८ किमी प्रतितास




१/९/१९९५ व २/९/१९९५

अहमदनगर ते औरंगाबाद : आसन क्र.३९

अहमदनगरवरून प्रयाण : १/९/१९९५ रात्री २२.४५ वाजता
मार्गावरील थांबे : वडाळा, नेवासे फ़ाटा
बस : पुणे जलद अकोला
बस क्र. : MH-31 / M 9292 म.का.ना. न.टा. ४३, १९९५-९६
आगार : अ. अकोला-२ आगार
मॊडेल : TATA 1510 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
अहमदनगर आगमन : २/९/१९९५ रात्री १.१५ वाजता
एकूण अंतर : १२० किमी.
सरासरी वेग : ४८ किमी प्रतितास

२/९/१९९५

औरंगाबाद ते अकोला : आसन क्र.३१

औरंगाबादवरून प्रयाण : दुपारी ११.३० वाजता
मार्गावरील थांबे : जालना, देऊळगाव राजा, चिखली, उंद्री ढाबा, खामगाव
बस : औरंगाबाद जलद यवतमाळ
बस क्र. : MH-31 / 9901 म.का.ना. न.टा. २४७, १९९३-९४
खिड्क्या निळ्या रंगातल्या
आगार : य. यवतमाळ आगार
मॊडेल : TATA 1510 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
अहमदनगर आगमन : सायंकाळी १७.४० वाजता
एकूण अंतर : २५० किमी.
सरासरी वेग : ४०.५४ किमी प्रतितास

२/९/१९९५ व ३/९/१९९५

अकोला ते नागपूर : आसन क्र.११

अकोल्यावरून प्रयाण : २/९/१९९५ सायंकाळी १८.३० वाजता
मार्गावरील थांबे : मूर्तिजापूर, अमरावती, तळेगाव, कोंढाळी
बस : अकोला सुपर नागपूर
बस क्र. : MH-31 / M 9279 म.का.ना. न.टा. ३०, १९९५-९६
आगार : अ. अकोला-१ आगार
मॊडेल :TATA 1510 AIR BRAKES
एकूण आसने : ५५
नागपूर आगमन : ३/९/१९९५ रात्री १.४५ वाजता
एकूण अंतर : २५० किमी.
सरासरी वेग : ३४.४८ किमी प्रतितास

अकोला - नागपूर गाडीने निराशा केली. गाडी नवीकोरी असूनही स्पीड गव्हरनर असल्यामुळे कधी वेगच घेउ शकत नव्हती. जेमतेम वेग घ्यायला सुरूवात करणार तोच काहीतरी अडथळे यायचेत. संध्याकाळची वेळ, एन.एच. ६ वरील बेधुंद ट्रक्सची वाहतूक या सर्वांमुळे बळी गेला तो आमच्या वेळेचा. नागपूरला पोहोचायला फ़ारच वेळ झाला.बस फ़ॆनिंगच्या दृष्टीने सफ़ल सहल. वैयक्तिक दृष्टीने निराश करणारी सहल.

(या लेखांमधील सुंदर फोटोंबद्दल श्री. विशाल जोशी रत्नागिरी यांचे आभार मानावे तेव्हढे थोडे आहेत. हा लेख पहिल्यांदा प्रकाशित झाल्यानंतर त्यांनीच स्वतः फोन करून त्यांचे स्वतः मेहनत घेऊन काढलेले हे स्केचेस मला टाकण्याबद्दल सुचविले आणि लगेच पाठविले सुध्दा. थॆंक्स विशाल.)