२००६ पर्य़ंत संगणक वापराचे अगदी जरूरीपुरते शिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या एका शिक्षकाला इंटरनेट हे केवळ ऐकूनच माहिती होते. पण नागपूरला आल्यानंतर रामदेवबाबा महाविद्यालयात डॉ. खापरेंसारखा मित्र आणि या क्षेत्रातला जाणकार मार्गदर्शक लाभला आणि आमची गाडी सुसाट सुटली. सुरूवातीला ऑरकूट नंतर फ़ेसबुक या समाजमाध्यमांच्या व्दारे व्यक्त व्हायला लागलो आणि ते खूप एन्जॉयपण केल. त्याचबरोबर या माध्यमांची स्वतःची असलेली मर्यादाही कळली. काही चांगले ब्लॉग्ज वाचनात आलेत आणि आपणही व्यक्त व्हायला हे माध्यम निवडावे असे ठरवून २००८ च्या डिसेंबरमध्ये "मी एक प्रवासी पक्षी" या ब्लॉगला सुरूवात केली. हे नाव ठेवण्यामागेही एक कथा होती.
पहिली पोस्ट लिहीली आणि लगेचच ४ पोस्ट टाकल्यात. पण वाचकांचा रिस्पॉन्सच येईना. आकडेवारीत रमणारा माणूस असल्याने ब्लॉगला १०० वाचक कधी मिळतात याची आतुरतेने वाट बघत होतो. तेव्हा ऑरकुटसारख्या इतर समाजमाध्यमांवर ब्लॉगपोस्टची लिंक कशी शेअर करावी याचे ज्ञान नव्हते म्हणून मग मित्र, नातेवाईक इत्यादींना ब्लॉगची लिंक मेसेजव्दारे पाठवायला सुरूवात केली. खूप थोड्या लोकांनी ब्लॉग वाचला, ब-याच जणांनी टिंगलटवाळी केली आणि काहींनी तर माझा नंबरच ब्लॉक करून टाकला.
२००९ पण लेखनाच्या बाबतीत तसे विशेष गेले नाही. सुरूवातीला ब-याच पोस्टस इंग्रजी भाषेतच होत्या. मराठी लेखनाचा शोध जवळपास २ वर्षांनी लागला. आणि मग आमचा वारू चौखूर उधळला. १०० वाचक मिळवायला जवळपास वर्ष लागले तर ५०० वाचकसंख्या गाठायला २ वर्षे.
२०११ मध्ये ब-यापैकी लिखाण झाले. मग नोकरीनिमित्त सांगोला (जि. सोलापूर) आणि शिरपूर (जि. धुळे) यथे वास्तव्य झाले. निमशहरी, ग्रामीण महाराष्ट्र जवळून बघता, अनुभवता आला. अनुभवसमृद्धी आली आणि मग बस आणि रेल्वे फ़ॅनिंगसाठी असलेला माझा ब्लॉग सामाजिक, वैयक्तिक जाणीवांनाही व्यक्त करू लागला. २०१२ मध्ये तब्बल २७ पोस्टस झाल्यात. दरम्यान वाचकसंख्या घातांकिय श्रेणीने (Exponentially) वाढत असल्याचे मी अनुभवत होतो. हळूहळू वाचकांचीही पसंतीची पावती मिळू लागली होती.
२०१३, २०१४ आणि २०१५ मध्ये लिखाण फ़ारसे झाले नाही तरी फ़ेसबुकसारख्या माध्यमाव्दारे ब्लॉगच्या प्रसाराची ताकद कळली होती त्यामुळे वाचकसंख्य़ा सतत वाढत होती. २०१६ त छान लिखाण झाले. अगदी ठरवून लेख लिहीलेत. २०१७ त पूर्वार्धात व्यावसायिक आयुष्यातली मरगळ लिखाणात उतरली. उत्तरार्धात पुन्हा सगळे स्थिरस्थावर झाल्यावर मग चांगले लिखाण झाले.
२०१८ त सुरूवातीपासूनच थोडा कल धार्मिक लेखनाकडे झुकू लागत असल्याचे माझे माझ्याच लक्षात आले. म्हटल या वर्षी ही वाटही चोखाळून पाहुयात. म्हटल बघुयात किती नियमीत लेखन आपल्या हातून होतय ते.
२०१८ गाठल्यागाठल्या पाऊणलाख वाचकसंख्या गाठली. सगळेच ब्लॉग्ज मी मनस्वी पद्धतीने लिहीलेत. मनात येईल ते आणि तसे सगळ्यांसमोर मांडत गेलो. सगळेच ब्लॉगपोस्टस माझ्या आवडीचेच आहेत. पण तरी त्यातले निवडक पोस्टस आपल्यासाठी पुन्हा एकदा.
२. आता आवडीचा पुरवावा सोहळा. पंढरपूरच्या एका कार्यक्रमात शौनक अभिषेकेने गायलेला अभंग ऐकणा-या गिन्याचुन्या श्रोतृवर्गात आम्ही सामील होतो. मग त्या ओळींवर चिंतन सुरू झाले आणि त्याचा परिपाक म्हणजे हा लेख.
३. माझे महाराष्ट्राचे अनुभव. पक्का वैदर्भी असलो तरी महाराष्ट्रावर माझे प्रेम आहेच.
४. एका शोधाची कथा. स्वतः संशोधन करून निष्कर्ष काढलेत.
५. माझी सगळ्यात लोकप्रिय पोस्ट. विदर्भतून विदर्भ.
वाचक मित्रांनो. असाच लोभ सतत राहू द्यात हेच मागणे. एक लक्ष वाचकसंख्या या वर्षाअखेर गाठेन असा आत्मविश्वास आहे.