Showing posts with label My blog posts. Show all posts
Showing posts with label My blog posts. Show all posts

Friday, August 7, 2026

Achievement Unlocked. 1000 Blog posts ब्लॉग पोस्टस चे सहस्रक

१७ वर्षे, ७ महिने आणि १० दिवसांपूर्वी, म्हणजे अचूकपणे ६४३२ दिवसांपूर्वी लिहायला सुरू केलेल्या ब्लॉगपोस्टसचे आज सहस्रक (१००० ब्लॉगपोस्टस) साजरे करताना मला विशेष आनंद होतो आहे. ब्लॉग लिहीताना सुरूवात केली तेव्हा आपल्या ब्लॉगला एकूण १००० वाचनसंख्या लाभली तरी खूप असे वाटत होते. पण लिहीत गेलो. विविध अनुभवांवर, माझ्या छंदांवर, मला दिसलेल्या, जाणवलेल्या जगावर लिहीत गेलो आणि तुम्ही सर्वांनी अगत्याने वाचन करून माझा हुरूप वाढवत नेला. आज ब्लॉगपोस्टसची एकूण वाचनसंख्या ५ लाखांवर गेली आहे त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा अक्षरशः ऋणी आहे.



६४३२ दिवसांमध्ये १००० ब्लॉगपोस्टस. म्हणजे साधारण दर आठवड्याला १ या सरासरीने हे माझे लेखन झालेले आहे. सुरूवातीच्या काळात फ़ार लिखाण झाले नाही पण गेल्या ७ - ८ वर्षांमध्ये भरपूर आणि सातत्याने लिखाण झाले. त्यामुळेच आज सरासरी एका ब्लॉगला ५२० वाचनसंख्या लाभली. 


सातत्यपूर्ण लिखाणाचा आणखीही एक फ़ायदा. नुकताच ४ जून २०२६ रोजी माझ्या ब्लॉगने ४ लाखांची वाचनसंख्या गाठली होती. तेव्हा प्रत्येक ब्लॉगपोस्टला सरासरी ४२५ वाचनसंख्या लाभलेली होती. आणि गेल्या दोन महिन्यात ही सरासरी जवळपास शंभरने वाढली. सातत्यपूर्ण लिहीत गेलोत तर कुठल्याही समाजमाध्यमाचे अल्गोरिदम ते लिखाण अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवते आणि सरसरी वाचकसंख्या झरझर वाढते हे गृहीतक आता पक्के करायला हरकत नाही.


गेल्या दोन वर्षांमध्ये मला लिहीते करणा-या श्री तुषारजी जोशी यांचा मी शतशः ऋणी आहे. त्यांनी ’सुरपाखरू’ या आपल्या अभिनव उपक्रमाद्वारे माझ्यासारख्या ब-याच हंगामी आणि मूडी लेखकांना नियमितपणे लिखाणाची सवय लावली आणि त्यामुळेच हे टप्पे मी गाठू शकलो ही माझी प्रामाणिक भावना आहे.


असो. लवकरात लवकर आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, आशिर्वादामुळे माझ्या ब्लॉग चे नवनवे टप्पे गाठले जावोत ही प्रार्थना करतो आणि विरमतो.


पुनश्च एकवार मनापासून धन्यवाद.


- कृतज्ञ असलेला प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


६४३२ दिवसांपूर्वी लिहीलेली पहिली ब्लॉगपोस्ट इथे.


Wednesday, August 5, 2026

पाचव्या शतकाची कथा, स्टॅटिस्टिक चा खेळ आणि त्याचे आकलन

१८ सामने (18 Matches)

१८ डाव (18 Innings)

एकूण धावा ९९८ (Total runs 998)

सरासरी ५५.४४ (Average : 55.44)

सर्वाधिक धावा १८३ (Maximum 183)

५ शतके, ३ अर्धशतके. (5 Centuries, 3 Half Centuries)


ही कुण्या क्रिकेटरची आकडेवारी नाही. ही आकडेवारी आहे माझ्या १८ वर्षांच्या ब्लॉग प्रवासाची. यावर्षी आजच ब्लॉगपोस्टसचे एका वर्षात गाठलेले पाचवे शतक पूर्ण झाले. अजून वर्षातला जवळपास अर्धा कालावधी बाकी आहे त्यामुळे हे आकडे निश्चितच बदलणार आहेत, यात वाढच होणार आहे. पण शतक झाल्यानंतर नवीन गार्ड घेताना बॅटसमन ज्याप्रमाणे पॅव्हेलियनकडे बॅट उंचावून अभिवादन करतो आणि नवीन गार्ड घेऊन पुढल्या खेळाला सुरूवात करतो त्याप्रमाणे यावर्षीचे हे ब्लॉगपोस्टसचे शतक पूर्ण केल्यावर आपणा सर्वांना अभिवादन करण्याचे मी ठरविले आहे. 


१८ वर्षांपूर्वी डिसेंबरला हा ब्लॉग सुरू करायचे ठरविले तेव्हा माझ्या बस आणि रेल्वे फ़ॅनिंगच्या छंदाबद्दल व्यक्त होण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असावे हा हेतू होता. त्यावेळी मी ऑरकूट या समाजमाध्यमावर होतो. माझ्या अभिव्यक्तीचे एक माध्यम म्हणून मी या समाजमाध्यमांवर असायचो. स्वतःचे विचार मांडणे, त्या धारेशी समविचारी मंडळी गोळा करीत फ़िरणे हा या समाजमाध्यमांवर असण्याचा मुख्य हेतू. नंतर नंतर अनुभव वाढत गेलेत. बस आणि रेल्वे फ़ॅनिंग व्यतिरिक्त इतरही विषयांवर लेखन होत गेले. माझे स्वतःचे क्षितीज विस्तारले. अनुभवांना एक प्रकारचा पोक्तपणा येत गेला, तो अभिव्यक्तीत दिसत गेला. वर्षाला सरासरी ५५ पोस्टस म्हणजे साधारण एका आठवडाभरात एक पोस्ट या स्ट्राईकरेटने मी गेली १८ वर्षे लेखन करत आलेलो आहे.


नंतर फ़ेसबुक आले आणि माझी अभिव्यक्ती तिथे व्यापकपणे प्रगट होऊ लागली. त्याचबरोबर व्हॉटस ॲपमुळे माझा ब्लॉग मी खूप जास्त वाचकांपर्यंत पोहोचवू लागलो. प्रतिसाद मिळत गेला. ब्लॉगची वाचने वाढू लागलीत. लिहीण्याचा हुरूप वाढला. २०२०, २०२१, २०२२ आणि २०२३ या चार वर्षांमध्ये मी माझ्या ब्लॉगपोस्टसची सलग चार शतके ठोकलीत. काही कारणांनी २०२४ आणि २०२५ या मधल्या दोन वर्षांमध्ये ब्लॉगची शतके पूर्ण होऊ शकली नाहीत. पण अर्धशतके मात्र आरामात पूर्ण केलीत.


यावर्षी मात्र अचानकपणे जानेवारी महिन्यापासूनच आमच्या सुरपाखरू गटावरील लिखाणाच्या निमित्ताने लिखाणाची लय लागली आणि भट्टी जमून आली. यावर्षी ऑगस्ट महिन्यातच लिखाणाचे शतक फ़ळ्यावर लागले गेलेत.


यानिमित्त वर्षे आणि त्यात लिहील्या गेलेले ब्लॉग्ज याचा एक ग्राफ़ काढण्याचा प्रयत्न केला. तो खाली दिल्याप्रमाणे.



या ग्राफ़मध्ये चढ उतार दिसताहेत. हो नं ? "जीवनात चढ उतार फ़ार महत्वाचे असतात. मॉनिटरवरची सरळ रेषा हे जीवन संपल्याचे दाखवते." वगैरे मोटिव्हेशनल स्पीचेसमधली वाक्ये स्वतःच स्वतःला ऐकवली पण मनाचे समाधान होईना. मग हेच आकडे वेगळ्या पध्दतीने सादर करण्याचे ठरवले. वर्षे आणि ब्लॉगपोस्टसची एकूण संख्या असा ग्राफ़ मांडला. आता मात्र चढती कमान दिसू लागली. Lies, Damn Lies and Statistics are always in ascending order असे कुणीतरी म्हणतात त्याची प्रचिती आली. आकडेवारी तीच पण तिचे स्वरूप बदलले की ती लोभसवाणी, सादर करण्याजोगी सुदृढ दिसू लागते याचे हे प्रत्यंतर.



असो. अगदी लवकरच आणखी एक मोठा टप्पा माझा ब्लॉग गाठणार आहे. तेव्हा पुन्हा या सगळ्या सादरीकरणासोबत पण वेगळ्या आकडेवारीनिशी भेटूच.


- वपुंच्या "स्टॅटिस्टिक मराठे" सारखा स्टॅटिस्टिक्स वर प्रेम करणारा गणितज्ञ, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Friday, June 5, 2026

एक नवा टप्पा Unlocked.

इसवी सन २००८ च्या डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या माझ्या ब्लॉगने आज सकाळी एक नवीन टप्पा गाठला. ४ लक्ष वाचकसंख्येचा. मला आठवतय़, अवघ्या तीन वर्षांपूर्वी जुलै २०२३ मध्ये मी २ लक्ष वाचकसंख्या गाठली होती.


पहिले २ लक्ष गाठण्यासाठी जवळपास १४ ते १५ वर्षे घेतलीत तर नंतरची २ लक्ष वाचकसंख्या गाठायला फ़क्त ३ वर्षे लागलीत. पैशांच्या वाढीच्या बाबतीत असलेला "Power of Compounding" चा नियम असा अकल्पितपणे माझ्या ब्लॉगच्या वाचकसंख्येच्या बाबतीत लागू होईल असे वाटले नव्हते. "Exponential Growth" म्हणतात ती अशीच.



मी थोडा आकडेवारीत रमणारा माणूस असल्याने माझ्या ब्लॉगच्या वाचकसंख्येवर, त्याच्या विश्लेषणावर माझे लक्ष असतेच. आजवर लिहीलेल्या ९३८ लेखांसाठी ४ लक्ष वाचक लाभलेत. म्हणजे एक लेख सरासरी ४२६ वाचकांनी वाचला.


आज मी खूप आनंदी आहे. माझ्या सर्व वाचकांमुळे, माझ्या ब्लॉगवर वारंवार अभिप्राय देत मला प्रोत्साहन देणा-या माझ्या मित्रांमुळे आणि मला काही ना काही कारणांनी लिहीते करणा-या माझ्या हितचिंतक मित्रांमुळे आज हा माझा आनंद आहे हे मी मानतो. आणि त्या सगळ्यांविषयीच कृतज्ञता व्यक्त करतो.


असाच लोभ, प्रेम असू द्यात ही नम्र विनंती. 


- रेल्वे आणि बसचा मोठ्ठा फ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Friday, December 15, 2023

माझ्या ब्लॉगपोस्टसचे सलग चौथे शतक

मी थोडा आकडेवारी, स्टॅटिस्टिक यात रमणारा अभियंता आहे. आमच्या बालपणी मोहम्मद अझरूद्दीनने पदार्पणाच्या तीन कसोटींमध्येच सलग तीन शतके झळकावून एक विश्वविक्रम केल्याचे कौतुक आम्हाला होते. मी ब्लॉग लिहायला डिसेंबर 2008 मध्ये सुरूवात केली असली तरी मी एक शतक ब्लॉगपोस्टस वगैरे लिहीन असे मला कधीही वाटले नव्हते. आणि माझ्या ब्लॉगपोस्टसची सुरूवातही तशी संथच झाली होती.


2008 मध्ये 3, 2009 मध्ये 4, 2010 मध्ये 4 अशा गतीने ती सुरूवात झाली होती. माझा रेल्वे आणि बसफ़ॅनिंगवर असा ब्लॉग सुरू करण्यामागे माझे रेल्वेफ़ॅन मित्र श्री. बिनाई शंकर यांच्या ब्लॉगचा प्रचंड प्रभाव होता हे मला कबूल केलेच पाहिजे. रेल्वेफ़ॅनिंगवर असलेला त्यांचा ब्लॉग माझे प्रेरणास्थान होता. आपणही बस आणि रेल्वेफ़ॅनिंगवर असा ब्लॉग सुरू करू शकतो हा आत्मविश्वास मला आला आणि माझ्या भारतभर भ्रमंतीवर मी हा ब्लॉग सुरू केला.




सुरूवातीची दोन वर्षे हा ब्लॉग बस फ़ॅनिंग आणि रेल्वे फ़ॅनिंग या विषयाला फ़ारच धरून होता. पण ब्लॉग लिहायला सुरूवत केल्यापासून दोनेक वर्षातच मला संगणकावर मराठी लेखन कसे करावे ? याचा शोध लागला आणि मग माझे सगळ्याच विषयांवरचे लिखाण मी माझ्या ब्लॉगवर सादर करू लागलो. 


2016 मध्ये एकूण 38 ब्लॉगपोस्टस लिहील्या गेल्यात. पण समर्थांच्या "दिसामाजी काहीतरी ते लिहावे" या उक्तीनुसार वर्षातल्या दर महिन्यात काहीतरी लिखाण झाले होते. त्यामुळे एक हुरूप आला.


2020 मध्ये लॉकडाऊन लागला आणि आमचे बाहेर फ़िरणे जवळपास थांबले. ऑनलाईन शिकवायचे असल्याने रोज कामावर जाण्यायेण्याचे तास वाचले होते. त्या वेळाचा सदुपयोग करण्यासाठी वेगवेगळ्या विषयावरचे लिखाण होऊ लागले. घरातल्या घरीच असल्याने लिखाणासाठी विषय सुचणे आणि तो ब्लॉगवर व्यक्त करता येणे यातले अंतर खूप कमी झाले. नाहीतर एरव्ही विषय खूप सुचत असत. कधी कामात असायचो, कधी प्रवासात गाडी वगैरे चालवत असायचो. हाताशी कॉम्प्युटरची गाठभेट होईपर्यंत तो विषय हवेत विरून गेलेला असायची किंवा आठवणीत असला तरी लिखाणाचा उरक तेव्हढा नसायचा. पण लॉकडाऊनने या दोन्हीही अडथळ्यांना दूर केले आणि 2020 मध्ये ब्लॉगपोस्टसचे पहिले शतक झळकावले. 153 पोस्टस त्यावर्षी लिहील्यात. एखाद्या फ़लंदाजाने 12 व्या कसोटीत पहिले शतक झळकावत 153 धावा काढाव्यात तशी माझी भावना त्यावर्षी झालेली होती.





2021 मध्ये मग तो लिखाणाचा ओघ कायम राहिला. फ़क्त 2021 मध्ये लॉकडाऊन संपून नित्य कार्यालयीन कामकाज सुरू झालेले होते. पण तरीही नरभक्षक वाघाला एकदा मानवी रक्ताची चटक लागली की तो कायम त्याच्याच शोधात असतो तसे माझे ब्लॉग लिखाणाबाबत झाले. लागोपाठ दुसरे शतक मारायचेच या हेतूने 2021 मध्ये लिखाण खाले. माझ्या कारकीर्दीच्या 13 व्या कसोटीत मी 101 धावा काढल्यात.


2022 मध्ये मग कार्यस्थळ आणि ब्लॉगलिखाण यात समन्वय कसा साधायचा. ब्लॉगलिखाणासाठी वेळ कसा काढायचा याची युक्ती जमायला लागली. नोव्हेंबर 2022 पर्यंतच मी 175 ब्लॉगपोस्टस लिहील्यात. यावर्षी पहिले द्विशतक आपण गाठू याची मला खात्री पटत चालली होती आणि माझ्यावर वज्राघात झाला. मला कायम लेखनप्रेरणा देणारी, माझ्या लेखनावर प्रेम करणारी माझी खरीखुरी जीवनसाथी, माझी प्रिय पत्नी हे जग सोडून गेली. त्या औदासिन्यातच यापुढे मी काही लिहू शके्न असे माझे मलाच वाटेना. मग ब्लॉगलेखनाचा प्रवास थांबला. पण पुन्हा तिचीच प्रेरणा मिळाली. मी ब्लॉग्ज लिहीलेत तर ते तिला आवडेल या विचारीने पुन्हा लिखाण सुरू झाले. पण द्विशतक हुकलेच. माझा प्रवास 183 ब्लॉगपोस्टसवरच थांबला.


2023 मध्ये तर घरातली माझी जबाबदारी अजूनच वाढली. घरचे स्वयंपाकपाणी, साफ़सफ़ाई आटोपून, महाविद्यालयीन काम आटोपून ब्लॉग्ज लिखाणासाठी उत्साह जमवावा लागे. पण यावर्षीही चिकाटीने ब्लॉग्जचे शतक झळकावले. म्हणूनच हे शतक विशेष आहे. 


आपल्यासारख्या मायबाप वाचकांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन आहे म्हणून मी आजपर्यंत इथवर आलेलो आहे ही माझी अत्यंत प्रामाणिक भावना आहे. अशीच लेखनसेवा माझ्याकडून नित्य व्हावी हेच मागणे मागतो आणि या लिखाणाला लेखनसीमा घालतो. 


माझ्या ब्लॉगपोस्टसमधील काही निवडक लिखाण इथे आपल्यासाठी पुन्हा सादर.


1. मला खूप मनापासून आवडलेला आणि अत्यंत लोकप्रिय असलेला माझा एक लेख. "विदर्भतून विदर्भ"


2. यावर्षी माझ्या प्रिय पत्नीच्या विरहात जागवलेली आमच्या साक्षगंध - साखरपुड्याची आठवण. "मर्मबंधातली ठेव ही"


3. ठाणे ते नागपूर हा दिवाळीनिमित्त केलेला दगदगीचा आणि कायम आठवणीत राहणारा बसप्रवास. "काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३"


4. रेल्वेतल्या विविध प्रवासांचा एक कोलाज. "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव."


5. महाराष्ट्र एस. टी. शिवशाही बसेस सुरू करणार हे वाचल्यावर मी वर्तवलेले भविष्य. "शिवशाही : एक चिंतन"


6. कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना भाग घेतलेल्या एका अत्यंत प्रतिष्ठेच्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेतल्या सहभागाची गोष्ट. "फ़लाटदादा...फ़लाटदादा ची जन्मकथा"


7. धावतपळत आणि वेगळ्या मार्गाने केलेल्या एका कराड ते नागपूर प्रवासाची मजेशीर गोष्ट. "काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र. १"


8. प्रवासात मध्येच पैसे संपल्यानंतर झालेल्या फ़जितीची आणि शिकलेल्या धड्याची गोष्ट. "काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५"


9. आमचे लग्न जुळले कसे आणि त्यानंतरचा आमचा प्रवास. "एका लग्नाच्या जमण्याची पुढची गोष्ट."


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


Thursday, July 6, 2023

(दोन) लाखाची गोष्ट

 २७ डिसेंबर २००८रोजी म्हणजे बरोबर ५,३०० दिवसांपूर्वी मी हा ब्लॉग लिहायला सुरूवात केली. त्यावेळी फ़ार मोठे टारगेट डोळ्यांसमोर नव्हते. फ़क्त आपण जे बसफ़ॅनिंग, रेल्वेफ़ॅनिंग करतोय ते कुठेतरी एलेक्ट्रॉनिक मेडियात साठवून असावे ही एक छोटी भावना होती. त्यापूर्वी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कुटुंबासह दक्षिण भारताचा पूर्णपणे स्वतः आखलेला आणि नियोजन केलेला यशस्वी प्रवास केलेला होता. त्या प्रवासापूर्वी सोनीचा छानसा डिजीटल कॅमेरा घेतलेला होता. त्यातून या दक्षिण भारत सहलीचे खूप सारे फ़ोटोज, व्हिडीयोज काढलेले होते. खूपसे फ़ोटोज रेल्वे व तामिळनाडू, आंध्र प्रदेश परिवहन बसेसचेही होते. त्यामुळे स्वतःला व्यक्त करता यावे म्हणून हे माध्यम निवडले.


पहिले दोन वर्षे ब्लॉगला जेमतेम शंभर व्ह्यूज मिळाले. लिखाण कमी होते आणि संगणकावर मराठी लेखन करणे मी साधारण 2 वर्षांनी शिकलो त्यामुळे तोवर ब्लॉग्ज आणि त्यांचे विषयही मर्यादित होते. तेव्हा ब्लॉग शेअर करायला फ़ेसबुकसारखे प्रभावी माध्यमही नव्हते.


हळुहळू मराठीत लिहायला लागलो, विषयही वाढलेत, ब्लॉग्जची संख्याही वाढली, शेअर करायला फ़ेसबुक, व्हॉटसॲपसारखी प्रभावी माध्यमेही तोवर स्थिरावली होती. ब्लॉग्ज लिहायला लागलो, शेअर करायला लागलो, वाचकसंख्या वाढत गेली.


२०१२ मध्ये नागपूर सोडून सोलापूर जिल्ह्यात सांगोला येथे अध्यापनासाठी गेलो. नवीन महाराष्ट्राशी परिचय झाला. नवे अनुभव, नवे जीवन. लिखाण बहरले. त्यानंतर दोन वर्षातच धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे अध्यापनासाठी गेलो. तिथेही नवी संस्कृती यांच्याशी परिचय झाला. खूप जीवनानुभव आलेत. जीवनाला भिडलो. सगळं सगळं लिखाणात उमटत होतं. वाचकांपर्यंत पोहोचत होतं. त्यांचा प्रतिसाद, प्रेम मिळत होतं.


दरवर्षी साधारण १९,००० ते २०,००० वाचकसंख्या ब्लॉगला मिळत होती. मी स्वतः आकडेवारीत, गणितात रमणारा माणूस आहे. या श्रेणीने यावर्षी साधारण डिसेंबरपर्यंत एकूण २,००,००० होईल असा माझा अंदाज होता. पण यावर्षी १२ जूननंतर ब्लॉगला दररोज १,००० ते १,५०० वाचक ब्लॉगला मिळायला लागलेत. थोडा अजून शोध घेतला असता कुणीतरी सिंगापुरी वाचकच यातले ९० % व्ह्यूज देतोय ही माहिती मिळाली. संपूर्ण वर्षाचा कोटा जून महिन्यानेच पूर्ण केला आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ब्लॉगची वाचकसंख्या २,००,००० झाली.


याबद्दल सर्व वाचकांचे, माझ्यावर, माझ्या लिखाणावर प्रेम करणा-यांचे मनापासून आभार. तुमचे प्रोत्साहन, तुमची शाबासकी माझा लेखनहुरूप सतत वाढवत असते. लेखनातून मी स्वतःला मुक्तपणे व्यक्त करीत, स्वतःलाच मोकळा करीत असतो. त्यामुळे माझ्या चांगल्या लेखनाचे श्रेय हे काही अंशी तुम्हा सर्व वाचकांचेही आहे. 

यानिमित्ताने माझे काही काही खास ब्लॉग्ज आपल्यासाठी सादर. 

असाच लोभ असू द्यात ही नम्र विनंती.

- आपला नम्र प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

१. माझा सर्वात लोकप्रिय ब्लॉग: विदर्भतून विदर्भ. 


२. नोकरी शोधण्यासाठी केलेले दोन प्रवास. महाराष्ट्र एस. टी. चा मी यासाठी कायम ऋणी असेन. 


३. कराडला असताना मुद्दाम केलेले रेल्वेवरचे संशोधन.


४. अध्यात्मावरचे थोडे चिंतन

५. दक्षिण दिग्विजयाची प्रेरणा.

६.  दक्षिण दिग्विजयाची सुरूवात.

७. एस. टी. वर पोटतिडीकेने लिहीलेला आणि जाणकारांनी खूप नावाजलेला हा लेख.


८. माझ्यातल्या एका "वल्ली"चा प्रवास.


९. माझ्या बालपणीची, आईवडिलांची एक रम्य आठवण.


१०. पहिल्या विमानप्रवासाची नव्हाळीची आठवण.


Wednesday, January 31, 2018

ब्लॉग लेखनाचा माझा प्रवास.

२००६ पर्य़ंत संगणक वापराचे अगदी जरूरीपुरते शिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या एका शिक्षकाला इंटरनेट हे केवळ ऐकूनच माहिती होते. पण नागपूरला आल्यानंतर रामदेवबाबा महाविद्यालयात डॉ. खापरेंसारखा मित्र आणि या क्षेत्रातला जाणकार मार्गदर्शक लाभला आणि आमची गाडी सुसाट सुटली. सुरूवातीला ऑरकूट नंतर फ़ेसबुक या समाजमाध्यमांच्या व्दारे व्यक्त व्हायला लागलो आणि ते खूप एन्जॉयपण केल. त्याचबरोबर या माध्यमांची स्वतःची असलेली मर्यादाही कळली. काही चांगले ब्लॉग्ज वाचनात आलेत आणि आपणही व्यक्त व्हायला हे माध्यम निवडावे असे ठरवून २००८ च्या डिसेंबरमध्ये "मी एक प्रवासी पक्षी" या ब्लॉगला सुरूवात केली. हे नाव ठेवण्यामागेही एक कथा होती.

पहिली पोस्ट लिहीली आणि लगेचच ४ पोस्ट टाकल्यात. पण वाचकांचा रिस्पॉन्सच येईना. आकडेवारीत रमणारा माणूस असल्याने ब्लॉगला १०० वाचक कधी मिळतात याची आतुरतेने वाट बघत होतो. तेव्हा ऑरकुटसारख्या इतर समाजमाध्यमांवर ब्लॉगपोस्टची लिंक कशी शेअर करावी याचे ज्ञान नव्हते म्हणून मग मित्र, नातेवाईक इत्यादींना ब्लॉगची लिंक मेसेजव्दारे पाठवायला सुरूवात केली. खूप थोड्या लोकांनी ब्लॉग वाचला, ब-याच जणांनी टिंगलटवाळी केली आणि काहींनी तर माझा नंबरच ब्लॉक करून टाकला. 

२००९ पण लेखनाच्या बाबतीत तसे विशेष गेले नाही. सुरूवातीला ब-याच पोस्टस इंग्रजी भाषेतच होत्या. मराठी लेखनाचा शोध जवळपास २ वर्षांनी लागला. आणि मग आमचा वारू चौखूर उधळला. १०० वाचक मिळवायला जवळपास वर्ष लागले तर ५०० वाचकसंख्या गाठायला २ वर्षे.

२०११ मध्ये ब-यापैकी लिखाण झाले. मग नोकरीनिमित्त सांगोला (जि. सोलापूर) आणि शिरपूर (जि. धुळे) यथे वास्तव्य झाले. निमशहरी, ग्रामीण महाराष्ट्र जवळून बघता, अनुभवता आला. अनुभवसमृद्धी आली आणि मग बस आणि रेल्वे फ़ॅनिंगसाठी असलेला माझा ब्लॉग सामाजिक, वैयक्तिक जाणीवांनाही व्यक्त करू लागला. २०१२ मध्ये तब्बल २७ पोस्टस झाल्यात. दरम्यान वाचकसंख्या घातांकिय श्रेणीने (Exponentially) वाढत असल्याचे मी अनुभवत होतो. हळूहळू वाचकांचीही पसंतीची पावती मिळू लागली होती.



२०१३, २०१४ आणि २०१५ मध्ये लिखाण फ़ारसे झाले नाही तरी फ़ेसबुकसारख्या माध्यमाव्दारे ब्लॉगच्या प्रसाराची ताकद कळली होती त्यामुळे वाचकसंख्य़ा सतत वाढत होती. २०१६ त छान लिखाण झाले. अगदी ठरवून लेख लिहीलेत. २०१७ त पूर्वार्धात व्यावसायिक आयुष्यातली मरगळ लिखाणात उतरली. उत्तरार्धात पुन्हा सगळे स्थिरस्थावर झाल्यावर मग चांगले लिखाण झाले.

२०१८ त सुरूवातीपासूनच थोडा कल धार्मिक लेखनाकडे झुकू लागत असल्याचे माझे माझ्याच लक्षात आले. म्हटल या वर्षी ही वाटही चोखाळून पाहुयात. म्हटल बघुयात किती नियमीत लेखन आपल्या हातून होतय ते. 

२०१८ गाठल्यागाठल्या पाऊणलाख वाचकसंख्या गाठली. सगळेच ब्लॉग्ज मी मनस्वी पद्धतीने लिहीलेत. मनात येईल ते आणि तसे सगळ्यांसमोर मांडत गेलो. सगळेच ब्लॉगपोस्टस माझ्या आवडीचेच आहेत. पण तरी त्यातले निवडक पोस्टस आपल्यासाठी पुन्हा एकदा.


२. आता आवडीचा पुरवावा सोहळा. पंढरपूरच्या एका कार्यक्रमात शौनक अभिषेकेने गायलेला अभंग ऐकणा-या गिन्याचुन्या श्रोतृवर्गात आम्ही सामील होतो. मग त्या ओळींवर चिंतन सुरू झाले आणि त्याचा परिपाक म्हणजे हा लेख.

३. माझे महाराष्ट्राचे अनुभव. पक्का वैदर्भी असलो तरी महाराष्ट्रावर माझे प्रेम आहेच.

४. एका शोधाची कथा. स्वतः संशोधन करून निष्कर्ष काढलेत.

५. माझी सगळ्यात लोकप्रिय पोस्ट. विदर्भतून विदर्भ.


वाचक मित्रांनो. असाच लोभ सतत राहू द्यात हेच मागणे. एक लक्ष वाचकसंख्या या वर्षाअखेर गाठेन असा आत्मविश्वास आहे.