Monday, December 23, 2019

पती पत्नीचे नातेः एक असाही दृृृष्टीकोन

"माझी बायको इतकी मूर्ख आहे 

की 

तिने चक्क माझ्याशी लग्न केलय." 

हे ज्यादिवशी प्रत्येक नवर्‍याला कळेल त्यादिवशी त्या माणसाची नैतिक, पारमार्थिक आणि संसारिक प्रगतीकडे वाटचाल चालू झाली म्हणून समजावे. (काय ? समस्त भगिनीवर्ग एकदम खूष ना ?)

— याबाबतीत अत्यंत प्रगत  आणि या चिरंतन सत्याचा साक्षात्कार झाला असलेले आपले रामचंद्ररावपंतसाहेब.

Sunday, December 22, 2019

पती पत्नींचे खट्याळ नातेः भगवंताचा उपदेश

श्रीमदभागवत दशमस्कंध.
श्रीकृष्ण रूक्मिणी संवाद.

भगवान श्रीकृष्णः रूक्मिणी, खरच मी विचार केला की तुला माझ्याहून चांगला वर नक्कीच प्राप्त झाला असता. मी सर्वार्थाने तुझ्या योग्य पुरूष नाही.

भगवंताचे हे कठोर वाक्य ऐकून रूक्मिणी बिचारी शोकाकूल झाली. आता भगवंताचा आपल्याला विरह होणार या भीतीने तिला रडूच कोसळले.

तेव्हा भगवंतांनी आपली चेष्टा आवरती घेऊन तिची समजूत घातली, मनधरणी केली. (पहा, लक्षात ठेवा. प्रत्यक्ष भगवंताला हे चुकले नाही, तिथे तुमच्या माझ्यासारख्या यःकश्चित मनुष्यमात्रांचा काय पाड ?)

त्यानंतर त्रैलोक्यस्वामी भगवान श्रीकृष्ण जे म्हणाले ते फार फार महत्वाचे आहे. अगदी काळजावर कोरून ठेवण्यासारखे.

भगवान श्रीकृष्णः प्रिये रूक्मिणी, या संसारात खरोखर काही सुखाची, आनंदाची गोष्ट असेल तर ती म्हणजे पत्नीची थट्टा मस्करी करणे, तिच्याशी प्रेमसंवाद करून तिचा रूसवा घालवणे. 
बाकी हे संपूर्ण जग दुःखानेच भरलेले आहे.

श्रीमदभागवताचे अध्ययन करताना जेव्हा जेव्हा हा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा माझ्यासरख्या खट्याळ साधकाचे याबाबतीत नियोजन सुरू होते आणि माझ्यातला व्यवस्थापक, योजक ते योग्य वेळी पूर्णत्वास नेतोही.

— आपला भरपूर खट्याळ आणि थोडा नाठाळ साधक रामभाऊ.

Saturday, December 21, 2019

प्रगती, बेरीज, वजाबाकीः एक चिंतन.

प्रगतीसाठी नेहेमीच बेरीज करून उपयोग नाही. कधीकधी प्रगतीसाठी वजाबाकी ही आवश्यक असते.

Confused ? 

नेहमी सकारात्मक असणारा हा माणूस अचानक नकारात्मक का लिहीतोय ?

तस काहीच नाहीये. साध उदाहरण घेऊयात.

१०० + (-४०) = ६०
बेरजेने १०० ची किंमत घटली ?

आता,
१०० - (-४०) = १४०.

वजाबाकीने १०० ची किंमत वाढली ?

तसच आपल्या जीवनात ज्या व्यक्ती (कारण, अकारण) नकारात्मकता आणतात (Negative persons) त्यांची जीवनातून वजाबाकी केली तर जीवनाचे मूल्य वाढेल. नाही का ?

— "Mathematics involved in interpersonal relations with special reference to self experiences in life" या K. P. Ramanujan या गणितज्ञाच्या (म्हणजे अस्मादिकच) प्रसिध्द (फारसा कुणाला माहिती नाहीये तो) शोधप्रबंधातील एक प्रमेय.

Friday, December 20, 2019

श्रीरामरक्षा आणि लॅन्सेट जर्नल

श्रीरामरक्षा स्तोत्रात "रक्षा" भागात मानवी शरीराच्या विविध भागांची नावे घेऊन त्या त्या प्रत्येक भागासाठी रक्षणकर्ता म्हणून प्रभू श्रीरामांच्याच विविध नावांचा उल्लेख केला गेलाय.

त्यातले "हृदयम जामदग्न्यजित" ह्याचा अधिक खोलात जाऊन विचार केला तर एक अचंबित करणारी गोष्ट आपल्या लक्षात येईल.

जमदग्नि हे एक अत्यंत तापट ऋषी म्हणून प्रख्यात होते. त्यांना चटकन कोप येई आणि लगेच शांतही होत असे. आजही एखाद्या पटकन भडकणार्‍या माणसाला आपण "जमदग्नीचा अवतार" म्हणून संबोधतो ते यामुळेच.

"अशा या जमदग्नींच्या क्रोधावर विजय मिळवलेल्या श्रीरामाने माझ्या हृदयाची रक्षा करावी" हा "हृदयम जामदग्न्यजित" चा भावार्थ.

लॅन्सेट या वैद्यकीय क्षेत्रातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या संशोधन नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या एका शोधनिबंधाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. निबंधात अॅड्रेनॅलिन रश आणि हृदयविकार यांच्या घनिष्ठ संबंधांविषयी संशोधन प्रकाशित केलेले आहे. ज्या व्यक्तीला अतिशय लवकर राग येतो, किंवा कसलीहि भावनिक उत्तेजना अतिजलद होते त्या व्यक्तीला हृदयविकार जडण्याचा धोका अधिक असा त्यातील निष्कर्ष.

हेच आमच्या वाल्मिकींनी समाधी भाषेत ५००० वर्षांपूर्वी लिहून ठेवलय हे समजून आपल्या संस्कृतीविषयी आदर सहस्त्रपटीने न वाढला तरच नवल.

मग मित्रमैत्रिणींनो, श्रीरामांचे उपासक असाल तर मग करणार ना आपआपल्या रागावर नियंत्रण ?

- पेशाने अभियंता असला तरी वैद्यक शास्त्राचा बाह्य अभ्यास असलेला, पुराणाभिमानी विद्यार्थी, कु. राम प्रकाश किन्हीकर.

टेलीकॉलिंगवाल्याची गोची : काही खरे अनुभव भाग - २

प्रसंगः सुटीच्या दिवशी घरी वामकुक्षीचा.
फोनः सर, हम तमकेढमके इस्टेट एजन्सीसे बात कर रहे है. नागपूर, मुंबई, पुणे की कुछ बहोतही प्राइम प्राॅपर्टीज हमारे पास अवेलेबल है. आपको कोई इंटरेस्ट ?
तो हे एव्हढ्या जलद म्हणतो की "Mutual fund investments are subjected to market risks...." म्हणणार्‍या माणसाने याच्याकडे ट्यूशन लावावी.
मी न कळल्याने त्याला पुन्हा एकदा त्याचे नाव, एजन्सीचे नाव वगैरे सावकाश वदवून घेतो आणि,
मीः हां जी. मै तो सर्च ही कर रहा हू कोई अच्छी प्राॅपर्टी की.
इस्टेट एजंट (उत्साहाने): तो सर किस लोकेशन पे आप प्राॅपर्टी खरीदना चाहोगे ?
त्या इस्टेट एजंट कडे नरसाळा, शंकरपूर, वडधामना याच्या पलीकडे एकही प्राॅपर्टी नसल्याची खात्री असल्याने,
आणि हे कोकरू भंडार्‍याच्या पूर्वेला व कोंढाळीच्या पश्चिमेला कधीही गेलेले नाही याची खात्री असल्याने,
मीः मै जरा मलाबार हिल्स, पेडर रोड या नेपियन सी रोड पे कुछ प्लाॅटस लेना चाह रहा था.
आतातरी पुढला माणूस आपली भंकस करतोय हे समजाव की नाही ? पण
इस्टेट एजंटः सर, ये कहा पे आता हे ?
मीः (आवाजात शक्य तितकी निरागसता आणत) मुंबई मे. आपने बोला न, की मुंबई की भी कुछ प्राॅपर्टीयाँ है, इसलिये. आप मॅप मे देखिये. आरामसे बताइये.
फोन ठेवल्यावर त्याने आपल्या बाॅसला हा प्रश्न विचारून चांगला धडा घेतला असणार कारण पुन्हा त्याचा फोन आला नाही.
अरे, वामकुक्षीच्या वेळी फोन सायलेंट करायला विसरलो तर याची किंमत नेहमी आम्हीच का मोजायची ?
- हाॅ, हाॅ करून विकट हसणारा पाताळविजयम चा मद्रासी राक्षस के. रामैय्या.

Thursday, December 19, 2019

नागदिवाळी परंपरा आणि पुढल्या हाका

आज नागदिवाळी होती. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या कुटुंबात खूप उत्साहात हा कुळाचार साजरा होतो.
संततीचा नावाने एखादा आवडता पदार्थ हा त्याच्या नावाचा दिवा म्हणून संततीच्या जन्मापासूनच ठरवून देतात. आज तो पदार्थ घरी आवर्जून करतात. दिव्यांनी संततीला ओवाळतात. संततीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सर्वांगीण भरभराटीसाठी हा सण करतात.
पूर्वी फक्त पुरूषांचे दिवे ठेवले जात असावेत पण गेल्या दोन पिढ्यांपासून कुटुंबातल्या लेकी सुनांचेही दिवे घरात व्हायला लागलेत. A welcome move, that too silently, without any propoganda.
माझा दिवा पुरणाचा, तर माझ्या लेकीचा आणि पत्नीचा गुलाबजांबचा.
पूर्वी साधे दिवे असायचे. लोणीसाखर, खोबरेसाखर, खीर.
काळ बदलला, नवीन काळात नवीन पदार्थ आलेत.
विचार केल्यानंतर लक्षात आले की याच कालगतीने आपल्या नातवंडांचे दिवे नक्कीच "मंचुरियन" , "पिझ्झा" आणि "पेस्ट्रीज" ठेवाव्या लागतील.
- किन्हीकर वंशाचा थोरला दिवा / दिवटा मास्टर राम

Wednesday, December 18, 2019

नियम, अपवाद, शाश्वतधर्म, आपद धर्म वगैरे वगैरे

नियम हा अपवादानेच सिध्द होत असला
तरी
अपवादाचाच नियम बनणे अवांछित आहे.
शाश्वतधर्म आणि आपदधर्म यात फरक असायलाच हवा.
e.g. घरी चार्जरला लावलेला फोन काढून घेतल्यावर प्लग चे बटण बंद करणे हा नियम आहे.
कधेमधे घाईघाईत प्लगचे बटण बंद करायला विसरणे हा अपवाद झाला.
पण
घरातले चार्जर लावलेल्या प्लग्जची बटणे कायमच सुरू असणे (आणि दरवेळी सवयीने घरातल्या व्यक्तीने त्या चार्जरला मोबाईल लावून चार्जिंग सुरू करणे) हे अत्यंत अव्यवस्थित घराचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
- समाजात आणि घरात अत्यावश्यक असलेला छोट्या पिनचा चार्जर राम छोटाखत्री.

Tuesday, December 17, 2019

"म्हैस"च (पण आघाडीच्या चिखलात रूतलेली)

"ओ मुख्यमंत्री साहेब, ते आघाडी वगैरे तर झालीय तुमची. मग खातेवाटप उरकून घ्या बघू भरभर."
"आम्हाला पावर नाय."
"पावर नाय ? म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री नाही ?"
"मुख्यमंत्री नाय तर काय निस्ता पक्षप्रमुख हाय ?"
"मग खातेवाटप का नाही करत ?"
"आमाला पावर नाय."
"मग पावर कुणाला हाय ?"
"ते पवार साहेब आन सोनिया बाईंना."
"मंग त्यांना का नाई आनल संगती ? इथ तुम्ही काय फक्त अॅक्वेरियम बनवायला आले ?" 
आता जनताही चिडायला लागली होती.

"ओ फडणवीस साहेब, ऐका आमच, फोडा आमदार, बनवा सरकार. काही झाल तर आम्ही आहो मागे"
फडणवीस शांत होते. त्यांनी आता मुनगंटीवारांना सोबत घेतले आणि ते दोघेही हिवाळी अधिवेशनाची चर्चा करू लागले.
"ऐका, ऐका फडणवीससाहेब."
"ऐका काय ? आमच्याकडे १०५ च आमदार आहेत."

- "असले पुलबिल आम्हाला नको" असे पुलंना तुम्ही कितीही हिणवलत तरी पुल ज्या मराठी माणसाच्या रक्तातून जात नाहीत तो 
पुलप्रेमी रामभाऊ.

Monday, December 16, 2019

एक नवी परिभाषा - कपड्यांसंबंधी

आता फुलपँट कोणीच घालत नाही. ट्राउझर्स घालतात. हाफपँट म्हणणे डाऊनमार्केट आहे म्हणे. बर्म्युडा म्हणा.
मनिला, बुशशर्ट फक्त १९६० ते १९८० मधल्या मराठी लेखकांच्या लिखाणात राहिले आहेत. आता सगळे "रेग्युलर फिट, स्लिम फिट किंवा नुवो फिट" शर्टस घालतात.

- एक नूर आदमी और दस नूर कपडा या वचनावर दृढ श्रध्दा असलेला, प्रोप्रा. राम टेलर्स.