Saturday, September 23, 2023

महाराष्ट्र एक्सप्रेस : स्लीप कोचेस, एक भारतीय रेकॉर्ड

परवा महाराष्ट्र एक्सप्रेसच्या एंजिनातून प्रवासाची पोस्ट टाकली तर एका रेल्वेफ़ॅनचा "बापरे ! महाराष्ट्र एक्सप्रेसला इतके कोचेस लागायचेत ?" असा एक आश्चर्योद्गार वाचला आणि महाराष्ट्र एक्सप्रेसच्या स्लीप कोचेसबद्दल विचार करू लागलो. आणि लक्षात आले की इतक्या स्लीप कोचेसची काढघाल हा भारतीय रेल्वेतला एक विक्रम आहे. स्लीप कोचेसची एक रोमॅंटिक आठवण इथे.


तसा सध्या महाराष्ट्र एक्सप्रेसच्या नावाने भारतीय रेल्वेत एक विक्रम आहे. एकाच राज्यात सगळ्यात जास्त अंतर कापणारी गाडी म्हणून ही आपली महाराष्ट्र एक्सप्रेस एकमेवाद्वितीय आहे. गोंदिया ते कोल्हापूर 1342 किलोमीटर ही गाडी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात कापते. भारतीय रेल्वेतली इतर कुठलीही गाडी एकाच राज्यात इतके अंतर कापत नाही.


आम्ही प्रवास करायचोत (1989 ते 1993) तेव्हा महाराष्ट्र एक्सप्रेस नागपूर ते कोल्हापूर असा 1211 किलोमीटरचा प्रवास करायची. सकाळी 6.00 वाजता आलेली दादर - नागपूर एक्सप्रेस सकाळी 10.00 वाजता महाराष्ट्र म्हणून कोल्हापूरला जायची आणि संध्याकाळी 5.30 ला आलेली कोल्हापूर - नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस रात्री 10.10 वाजता नागपूर - दादर एक्सप्रेस म्हणून जायची. त्या रेक शेअरींगची हकीकत इथे.


नागपूरवरून निघताना महाराष्ट्र एक्सप्रेसच्या डब्यांची पोझिशन अशी असायची.


कोच नं कुठून कुठे कोचचा दर्जा

1 नागपूर - भुसावळ जनरल कोच (GS)

2 नागपूर - कोल्हापूर लगेज + गार्ड कोच (SLR)

3 नागपूर - कोल्हापूर जनरल कोच (GS)

4 नागपूर - कोल्हापूर द्विस्तरीय शयनयान (S - 8)

5 नागपूर - कोल्हापूर प्रथम वर्ग (F - 1)

6 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 7  किंवा ब-याचदा                                                                                या कोचला रेल्वेवाले S- Extra पण म्हणायचे)

7 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 1)

8 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 2)

9 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 4)

10 नागपूर - पुणे त्रिस्तरीय शयनयान (S - 3)

11 नागपूर - कोल्हापूर जनरल कोच (GS)

12 नागपूर - कोल्हापूर लगेज + गार्ड कोच (SLR)

13 नागपूर - सोलापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 9)


गाडीला S - 5 आणि S - 6 नागपूरवरून नाहीच. S - 4 नंतर थेट S - 7  च. S - 5 आणि S - 6 ची गंमत भुसावळनंतर सुरू व्हायची.

अशी 13 डब्यांची गाडी नागपूरवरून निघायची. तेव्हा या गाडीला डबे एकमेकांशी आतून जोडलेले (Vestibuled) नसत. त्याकाळी नागपूर स्टेशनवरून जाणा-या प्रिमीयम गाड्या म्हणजे हैद्राबाद - नवी - दिल्ली आंध्र प्रदेश एक्सप्रेस, मद्रास - नवी दिल्ली तामिळनाडू एक्सप्रेस, मद्रास - नवी दिल्ली ग्रॅंण्ड ट्रंक एक्सप्रेस. या सगळ्या गाड्या आतून जोडलेल्या (Vestibuled) असत. या सगळ्या गाड्यांना 21 कोचेस असायचेत. दोन दोन डिझेल एंजिने घेऊन या गाड्या धावत असत. त्यामानाने आमच्या महाराष्ट्र एक्सप्रेसचा एकंदर आवाका आणि मान कमीच होता. एकच डिझेल एंजिन आणि 13 डब्यांसह ही गाडी धावत असे. या गाडीला आदल्या दिवशी कोल्हापूरवरून निघालेली डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेस बडने-याला क्रॉस होत असे. 

संध्याकाळी 6.00 च्या सुमारास भुसावळ स्टेशनला गाडी प्लॅटफ़ॉर्म क्र. 3 वर यायची. भुसावळ स्टेशनवर गाडीचे एंजिन आपल्यासोबत असलेला नागपूर - भुसावळ हा जनरल कोच (GS) घेऊन शेजारच्या प्लॅटफ़ॉर्म क्र. 2 वर जायचे. आणि त्याच ट्रॅकवर दूरवर उभे असलेले भुसावळ - मनमाड हे चार कोच घेऊन येत असलेले शंटिंग एंजिन उरलेल्या गाडीला हे चार कोचेस जोडून जायचे. मनमाड ते भुसावळ अप डाऊन करणा-यांच्या प्रवासासाठी 4 जनरल कोचेस जोडले जायचेत. सकाळी मनमाड ते भुसावळ आणि संध्याकाळी परत येणा-या महाराष्ट्र एक्सप्रेसला भुसावळ ते मनमाड. 

त्याचबरोबर गाडीच्या मागे आणखी एक शंटिंग एंजिन लागून 11, 12 आणि 13 नंबरचे कोचेस घेऊन निघायचे आणि बाजूच्या रूळांवर वाट बघत असलेले भुसावळ - पुणे (S - 5) आणि गोरखपूर - कोल्हापूर (S - 6 ) कोचेस त्या कोचेसना अडकवून पुन्हा गाडीला येऊन जोडायचे. म्हणजे भुसावळ स्टेशनवरून निघताना गाडीची कोच पोझिशन खालीलप्रमाणे असायची. 

कोच नं कुठून कुठे कोचचा दर्जा

1 भुसावळ - मनमाड जनरल कोच (GS)

2 भुसावळ - मनमाड जनरल कोच (GS)

3 भुसावळ - मनमाड जनरल कोच (GS)

4 भुसावळ - मनमाड जनरल कोच (GS)

5 नागपूर - कोल्हापूर लगेज + गार्ड कोच (SLR)

6 नागपूर - कोल्हापूर जनरल कोच (GS)

7 नागपूर - कोल्हापूर द्विस्तरीय शयनयान (S - 8)

8 नागपूर - कोल्हापूर प्रथम वर्ग (F - 1)

9 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 7)

10 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 1)

11 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 2)

12 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 4)

13 नागपूर - पुणे त्रिस्तरीय शयनयान (S - 3)

14 भुसावळ - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 5)

15 गोरखपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 6)

16 नागपूर - कोल्हापूर जनरल कोच (GS)

17 नागपूर - कोल्हापूर लगेज + गार्ड कोच (SLR)

18 नागपूर - सोलापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 9)

आता आमची गाडी 18 डब्यांची असायची. गाडीला थोडा तरी मान मिळाल्यासारखे वाटायचे. पण पुणे डिझेल शेडचे असलेले गाडीसाठी एकुलते एक WDM 2 एंजिन कधीकधी चढावावर थकल्यासारखे, धापा टाकत गाडी ओढायचे तेव्हा लक्षात यायचे की 18 डबे किंवा त्यावर असलेल्या डब्यांसाठी 2 एंजिने का आवश्यक आहेत ते. 

हे भुसावळ - मनमाड - भुसावळ जनरल कोचेस वैशिष्ट्यपूर्ण असायचेत. जनरल कोचेसना एका बाजूने तीन दारे (दोन दारे कोचच्या शेवटी तर एक दार कोचच्या अगदी मधोमध) असायचीत पण या भुसावळ - मनमाड - भुसावळ जनरल कोचेसना स्लीपर कोचेससारखी एका बाजूने दोनच दारे असायचीत. (कोचच्या शेवटी). मध्ये पूर्ण आसने. या पद्धतीत आसनांच्या दोन रांगा वाढत असाव्यात आणि जनरल कोचमधल्या 90 आसनांऐवजी 110 आसने तिथे असणे शक्य होते. या कोचेसमध्ये कायम अप - डाऊन वाल्यांची गर्दी असायची त्यामुळे हे कोचेस आतून बघ ण्याची तीव्र इच्छा राहूनच गेली. मला वाटतं मनमाड वर्कशॉपने जुन्या स्लीपर कोचेसना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मॉडिफ़ाय करून हे विशेष कोचेस आणले असावेत कारण यातून अप - डाऊन करणारे सगळे प्रामुख्याने रेल्वे कर्मचारी असायचेत. 

रात्री साधारण 10.00 च्या सुमारास मनमाडला आल्यानंतर एंजिन पुन्हा गाडीपासून विलग होत असे आणि भुसावळ - मनमाड कोचेस काढून शेजारच्या सायडिंगला टाकत असे. व पुन्हा तेच एंजिन गाडीसोबत पुण्यापर्यंत जाण्यासाठी गाडीला लागत असे. काढून टाकलेले हे कोचेस दुस-या दिवशी पुन्हा डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेसला लागून आपला मनमाड - भुसावळ प्रवास करीत असत. 

मनमाड ते दौंड गाडीची पोझिशन अशी असे.

कोच नं कुठून कुठे कोचचा दर्जा

1 नागपूर - कोल्हापूर लगेज + गार्ड कोच (SLR)

2 नागपूर - कोल्हापूर जनरल कोच (GS)

3 नागपूर - कोल्हापूर द्विस्तरीय शयनयान (S - 8)

4 नागपूर - कोल्हापूर प्रथम वर्ग (F - 1)

5 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 7)

6 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 1)

7 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 2)

8 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 4)

9 नागपूर - पुणे त्रिस्तरीय शयनयान (S - 3)

10 भुसावळ - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 5)

11 गोरखपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 6)

12 नागपूर - कोल्हापूर जनरल कोच (GS)

13 नागपूर - कोल्हापूर लगेज + गार्ड कोच (SLR)

14 नागपूर - सोलापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 9)

मनमाडनंतर 14 डब्यांची गाडी येवला - कोपरगाव - बेलापूर (श्रीरामपूर) - विळद - अहमदनगर - रांजणगाव रोड मार्गे दौंडकडे रवाना होत असे. विळद स्टेशन विशेष आठवणीत राहण्याचे कारण म्हणजे याच स्टेशनवर रात्री 1.00 च्या सुमारास या आमच्या गाडीला त्याच  दिवशी कोल्हापूरवरून निघालेली डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेस क्रॉस होत असे. 


उत्तररात्री 3.00 च्या आसपास दौंड स्टेशनला आल्यानंतर नागपूर - सोलापूर हा त्रिस्तरीय शयनयान (S - 9) कोच गाडीपासून विलग होत असे. तो कोच दौंडच्या सायडिंगला पडून तासाभराने येणा-या मुंबई - मद्रास मेलची वाट बघत असे. आणि तिला जोडल्या जाऊन सकाळी 8.00 च्या सुमारास सोलापूरला पोहोचत असे.


दौंडला गाडीचे एंजिन विरूद्ध बाजूला लागत असे आणि गाडीचा 13 डब्यांसह पुण्याचा प्रवास सुरू होत असे. गाडीची पोझिशन त्यावेळी अशी असे. 


कोच नं कुठून कुठे कोचचा दर्जा

1 नागपूर - कोल्हापूर लगेज + गार्ड कोच (SLR)

2 नागपूर - कोल्हापूर जनरल कोच (GS)

3 गोरखपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 6)

4 भुसावळ - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 5)

5 नागपूर - पुणे त्रिस्तरीय शयनयान (S - 3)

6 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 4)

7 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 2)

8 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 1)

9 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 7)

10 नागपूर - कोल्हापूर प्रथम वर्ग (F - 1)

11 नागपूर - कोल्हापूर द्विस्तरीय शयनयान (S - 8)

12 नागपूर - कोल्हापूर जनरल कोच (GS)

13 नागपूर - कोल्हापूर लगेज + गार्ड कोच (SLR)


पुण्याला सकाळी 6.00 ला गाडी पोहोचली म्हणजे गाडीचे एंजिन पहिल्या पाच डब्यांना घेऊन गाडीपासून विलग होत असे. पुणे यार्डात मुंबईकडल्या दिशेला जाऊन नागपूर - पुणे हा डबा यार्डात काढून ठेवत असे व उरलेले डबे गाडीला लावत असे. इतक्या वेळात पुन्हा विरूद्ध दिशेला घोरपडीवरून आलेले पुणे शेडचे दुसरे WDM 2 लागत असे. काहीवेळ ज्या एंजिनाने नागपूरवरून पुण्यापर्यंत गाडी आणली तेच एंजिन पुन्हा उलट्या बाजूने गाडी कोल्हापूरपर्यंत नेण्यास येत असे. पुणे ते कोल्हापूर हा घाटाघाटांचा (शिंदवणे घाट आणि आदर्की घाट) प्रवास करायला 12 डब्यांची गाडी सज्ज होत असे.


या शेवटल्या टप्प्यासाठी गाडीची पोझिशन अशी असे. 


कोच नं कुठून कुठे कोचचा दर्जा

1 नागपूर - कोल्हापूर लगेज + गार्ड कोच (SLR)

2 नागपूर - कोल्हापूर जनरल कोच (GS)

3 नागपूर - कोल्हापूर द्विस्तरीय शयनयान (S - 8)

4 नागपूर - कोल्हापूर प्रथम वर्ग (F - 1)

5 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 7)

6 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 1)

7 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 2)

8 नागपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 4)

9 भुसावळ - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 5)

10 गोरखपूर - कोल्हापूर त्रिस्तरीय शयनयान (S - 6)

11 नागपूर - कोल्हापूर जनरल कोच (GS)

12 नागपूर - कोल्हापूर लगेज + गार्ड कोच (SLR)


या सगळ्या डब्यांच्या काढघालीत भुसावळ, मनमाड, दौंड आणि पुणे स्टेशन्सवर गाडी तब्बल 40 - 40 मिनीटे थांबत असे. भुसावळला पुढे भुसावळ - मनमाड व मागे भुसावळ - कोल्हापूर कोचेस जोडल्यानंतर कोचेस उघडणे, (तोपर्यंत ते कोचेस आतून बंद असत. गाडीला जोडल्यावर ते उघडत असत) प्रवाशांना आत बसण्यासाठी पुरेसा वेळ देणे; मनमाडला भुसावळ - मनमाड कोचेसमधून प्रवाशांना उतरायला वेळ देणे; पुण्याला नागपूर - पुणे कोचमधून पूर्ण प्रवासी उतरल्यानंतरच तो कोच यार्डात नेऊन टाकण्यासाठी हलविणे यासाठी इतका वेळ लागायचाच. आमची बरीचशी मित्रमंडळी मनमाड ते पुणे या प्रवासात पूर्ण झोपलेली असत. जी काही मंडळी दौंड ते पुणे प्रवासात जागी व्हायचीत ती सगळी गाडी उलट्या बाजूला धावत असलेली पाहून गोंधळात पडायची. या गाडीला दोन ठिकाणी (दौंड आणि पुणे) रिव्हर्सल असल्याने अंतिमतः नागपूरवरून निघालेली सरळ गाडी कोल्हापूरला पोहोचत असे. कोल्हापूरला पोहोचेपर्यंत आदल्या दिवशी निघालेल्या अप महाराष्ट्र एक्सप्रेसला दुस-या दिवशी कोल्हापूरवरून निघालेली डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेस हातकणंगले स्टेशनवर क्रॉस होत असे. म्हणजे एका अप महाराष्ट्रला तीन डाऊन महाराष्ट्र आणि एका डाऊन महाराष्ट्रला तीन अप महाराष्ट्र एक्सप्रेस क्रॉस होत असत.

गोरखपूर - कोल्हापूर कोच हा भुसावळ स्टेशनपर्यंत गोरखपूर - मुंबई एक्सप्रेस सकाळी 9.00 च्या आसपास आणत असे. आणि त्यानंतर थेट संध्याकाळी 6.00 पर्यंत हा कोच महाराष्ट्र एक्सप्रेसची वाट बघत भुसावळला पडून राही. इतका वेळ स्लीप कोचने वाट बघण्याचा हा सुद्धा भारतीय रेल्वेतला एक नवीन विक्रम असावा. 

महाराष्ट्र एक्सप्रेसला बाकी कितीही दुय्यम वागणूक मध्य रेल्वे आणि आणि तत्कालीन पुणे ते कोल्हापूर पट्ट्यातली दक्षिण - मध्य रेल्वे देत असली तरी हे डब्यांच्या काढघालीचे विक्रम मात्र याच गाडीच्या नावावर आहेत हे नक्की. 

आज स्लीप कोचेस बंद झालेत. महाराष्ट्र एक्सप्रेसही कुठल्याही डब्यांच्या काढघालीविना 20 डब्यांसह गोंदिया ते कोल्हापूर हे अंतर आजकाल जलद कापते आहे. पण ही डब्यांची काढघाल एका रेल्वेफ़ॅनच्या स्मृतीत आणि भारतीय रेल्वेच्या रेकॉर्डबुक्समध्ये कायमची कोरल्या गेली आहे.

- आपल्या आयुष्यातल्या एकूण प्रवासापैकी 40 % प्रवास महाराष्ट्र एक्सप्रेसने केलेला (उरलेल्या प्रवासापैकी 30 % प्रवास विदर्भ एक्सप्रेस, 25 % प्रवास सेवाग्राम एक्सप्रेस आणि 5 % इतर सगळ्या एक्सप्रेस व पॅसेंजर्स मिळून केलेला); एक {एकांगी} रेल्वेफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
















Saturday, September 9, 2023

प्रवासी पक्षांचे आगळेवेगळे खेळ.

"प्रवासी पक्षाचे गाणे" या माझ्या मागील ब्लॉगपोस्टमध्ये लांबवरच्या आमच्या प्रवासातली ख्यातनाम गायकांची सोबत आणि त्यामुळे न थकता करता येणारा लांबचा प्रवास याबद्दल मी सविस्तर लिहीले होतेच. पण ब्लॉगपोस्ट लिहील्यावर आठवले की त्यात काही काही गोष्टी लिहायच्या राहूनच गेल्या होत्या.


लांब प्रवासातल्या दुपारच्या वामकुक्षीनंतर जेव्हा आमचे कन्यारत्न जागे होई तेव्हा आम्ही पहाटेपासून जवळपास सहाशे - साडेसहाशे किलोमीटर प्रवास पार पाडलेला असे. ती तेव्हा पाचव्या - सहाव्या वर्गात असेल. साहजिकच ती थोडी कंटाळायची. आम्हा दोघांनाही तिचा कंटाळा जाणवला की आम्ही गाडीतल्या गाडीत एक नवीनच खेळ खेळायला सुरूवात करायचो.


समोरून येणा-या ट्रक्स मोजणे. नुसते मोजणे नाही तर त्यांचे वर्गीकरण टाटा, लेलॅण्ड आणि इतर सगळे यांच्यात करणे आणि आमच्यापैकी एकेकाने एकेका वर्गीकरणाची जबाबदारी स्वीकारणे. म्हणजे मी जर टाटा ट्रक्स घेतलेत तर कन्यारत्न लेलॅण्ड आणि आमच्या सौभाग्यवती आयशर व इतर सगळे या वर्गीकरणाची जबाबदारी घ्यायच्यात. मग त्यात नियम होते. फ़क्त पुढून विरूद्ध दिशेने आलेलाच ट्रक मोजायचा. आपल्याच दिशेने जाणारे, थांबलेले वगैरे ट्रक्स मोजायचे नाहीत. दोनशे ट्रक्स मोजेपर्यंत ज्याची संख्या जास्त होईल तो विजेता वगैरे. मग ड्रायव्हरसाहेबांसकट सगळ्यांच्या नजरा रस्त्यावर खिळून रहायच्यात. पुढून आलेला ट्रक आपला असेल तर सगळ्यांना कोण आनंद व्हायचा. मग त्यात भांडाभांडी, चिडवाचिडवीही व्हायची. हे भांडण मुख्य म्हणजे मी आणि आमचे कन्यारत्न यांच्यात व्हायचे. त्यात आमच्या सौभाग्यवती कायम रेफ़्रीची भूमिका घायच्यात.


म्हणजे आमचे कन्यारत्न हरायला लागले की "बाबा, तुला माहिती होतं की या भागात टाटाचे ट्रक्स जास्त चालतात म्हणून तू मुद्दामच स्वतः टाटा ट्रक्स घेतलेत आणि मला लेलॅण्ड दिलेत. मला निवडीचा चॉईस तू दिलाच नाहीस. आता पुढल्या खेपेला मी पहिल्यांदा निवडेन." वगैरे भांडणं चालायचीत. बरं त्याच प्रवासात हे दोनशे पूर्ण झाले की आमचा नवा खेळ सुरू व्हायचा. त्यात आमचे कन्यारत्न हट्टाने टाटा घ्यायची आणि मी लेलॅण्ड. आमच्या घरातली सगळ्यात समजूतदार व्यक्ती म्हणजे माझी सुपत्नी आयशर व इतर हाच पर्याय निवडायची. मग त्यातही मी जिंकत आलोय हे पाहिल्यावर आमच्या कन्येची खूप चिड्चिड व्हायची आणि ती अशी चिडलेली पाहून आम्हा दोघांनाही खूप हसायला येत असे. आम्ही हसतोय हे पाहून तिची आणखी चिडचिड, रुसून बसणे वगैरे. गाडीत धमाल असायची. या सगळ्या खेळात शंभर दीडशे किलोमीटर प्रवास कसा व्हायचा हे कुणालाच कळत नसे. मजेमजेत, न कंटाळता प्रवास व्हायचा.


कधीकधी शहरी भागाजवळ असलोत की ट्रक्सऐवजी आम्ही कार्स मोजायला घायचोत. मी सुझुकीच्या, कन्या टाटाच्या तर तिची आई महिंद्रा आणि इतर सगळ्या कार्स अशी वाटणी व्हायची. यात कुणीही जिंकू शकेल अशी स्थिती असायची. कधी कधी दोनशे गाड्या मोजल्यानंतर 90 - 90 -20 अशी वाटणी व्हायची. मग आम्ही अगदी लोकसभेचे निकाल लागल्यासारखे आणि त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यासारखे एकमेकांशी वाटाघाती करीत असू. 20 जागा आलेला पक्ष ज्या 90 वाल्या पक्षाला पाठिंबा देईल त्याचेच सरकार बसेल असे असल्याने त्या 20 वाल्याच्या / वालीच्या मनधरण्या व्हायच्यात. खूप सगळी मंत्रीपदे किंवा कधीकधी पंतप्रधान पद देऊन त्याला / तिला मनवावे लागे आणि गाडीत सरकारची स्थापना होई.


त्यामुळे मधल्या एखाद्या भागात कधीकधी एखादा पक्ष 25 - 12 - 5 वगैरे संख्येने आघाडीवर असला तरी "अरे, आमच्या हक्काच्या मतदारांच्या भागातल्या पेट्या अजून यायच्या आहेत. मग बघा आम्ही कसे समोर जातोय ते. It is too early to predict and celebrate." वगैरे शेरेबाजी सुरू व्हायची. अगदी मतमोजणीच्या दिवशी वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयात जसा राजकीय नेत्यांचा माहोल असतो तसा माहोल कारमध्ये असायचा. त्यात कधीकधी एखादी टाटा ट्रक्सची रांग फ़ॅक्टरीतून कुठेतरी जायला निघालेली असायची आणि टाटा पक्षात एकदम मतसंख्या वाढायची. त्यावर अजून मजा. "बाबा, लेलॅण्डची फ़ॅक्टरी कुठे आहे रे ?" असा ज्ञान आणि रंजनाचा प्रश्न यायचा. चांगली चर्चा व्हायची. लेलॅण्डची फ़ॅक्टरी होसूर आणि चेन्नईजवळ आहे हे ऐकल्यानंतर आपल्या पुढल्या कर्नाटक आणि चेन्नई प्रवासात आपण लेलॅण्डच मागून घ्यायचं हा आमच्या कन्यारत्नाचा निर्धार पक्का व्हायचा. 


एकदा आम्ही असेच बासर ब्रम्हेश्वर क्षेत्रावरून तेलंगण - कर्नाटक - महाराष्ट्र असे येत होतो. नेहेमीप्रमाणे मी टाटा, कन्या लेलॅण्ड आणि तिची आई इतर सगळे ट्रक्स अशी वाटणी झालेली होती. खरी स्पर्धा माझ्यात आणि आमच्या कन्येत होत होती. आमच्या सौभाग्यवती कायम सगळ्यात कमी संख्या पण वर वर्णन केल्याप्रमाणे त्रिशंकू स्थिती आली तर "किंगमेकर" च्या भूमिकेत असायच्यात. पण जाहिराबादजवळ आम्ही आलो. आणि एकापाठोपाठ एक अशी आयशर ट्रक्सची रांग लागली. त्यात ती लगेच जिंकली. मी आणि आमच्या कन्येची अवस्था नेहेमी एकमेकांच्या विरूद्ध राजकारण करीत आलेल्या पण आता नरेंद्र मोदींच्या विरूद्ध एकत्र आलेल्या लालू आणि नितीश सारखी झाली. पण त्या दिवशी अशी अवस्था होती की आमच्या सौभाग्यवती निर्विवाद बहुमत जमवून जिंकल्या होत्या आणि आम्ही दोघेही एकत्र येऊनही काहीच करू शकत नव्हतो. आमच्या कन्येने लगेच आपल्या आईला पाठिंबा देऊन सरकारमध्ये जाण्याचा अजितदादा मार्ग निवडला. मी विरोधी बाकांवर. 


त्यानंतरच्या बसवकल्याण ते सोलापूर या प्रवासादरम्यान आमच्या कन्येने लगेच आयशर व इतर हे ट्रक्स निवडलेत. टाटा आणि लेलॅण्डची वाटणी आम्हा नवरा बायकोत झाली. पण एकदा खूप सारे आयशर ट्रक्स आलेत म्हणजे ते नेहेमीच येतील असे नाही हा धडा आमची कन्या शिकली. आणि शहाणी झाली. यात आम्ही असलेल्या संख्यांचे तिला विचारून टक्केवारीत रूपांतर करून घेत असू. तिच्या नकळत तिला असे गणित पचनी पाडत असू. या मजेमजेच्या खेळांमधून खूप सारा स्टॅटिस्टिकल डाटा आम्हाला मिळायचा. मला स्वतःला स्टॅटिस्टिक या विषयात खूप रूची आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातल्या, प्रत्येक जिल्ह्यातल्या वाहन संख्येचा डाटा आम्हाला मजेमजेत कळत असे. दुर्दैवाने ह्या सगळ्यांची लिखित नोंद आम्ही ठेऊ शकलो नाही. केवळ खेळ म्हणूनच आणि तेव्हढ्यापुरते मनोरंजन म्हणूनच आम्ही या सगळ्याकडे बघितले याची खंत आज वाटतेय.


पण दुपारच्या वामकुक्षीनंतर आलेला कंटाळा या खेळांनी पूर्णपणे जात असे आणि सातशे आठशे किलोमीटर्सचे प्रवास आम्ही आमच्या लहान लेकराबरोबर हसत खेळत पार पाडत असू हे याचे फ़ार मोठे यश होते.


- हसता खेळता, लहान लेकरात रमणारा, स्वतः लहान लेकरू असलेला, प्रवासी (खेळीया) पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, September 6, 2023

अरे व्हॉटसॲप वाल्या फ़ॉरवर्ड्सनो, महापुरूष आणि आपल्या संत सदगुरूंना तरी सोडा रे.

कुठल्यातरी इंग्रजी लेखकाचा "प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी बालपणी तुम्हाला फ़ुकट मिळते. तरूणपणी तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि म्हातारपणी त्यासाठी पैसे मोजावे लागतात." असा एक थोडीसा चावटपणाकडे झुकणारा सिद्धांत आहे. आज सकाळी सकाळी एका धार्मिक ग्रुपवर बघतोय तो काय ? हाच विचार एका थोर सदगुरूंच्या नावाने कुणीतरी खपवलेला आढळला. मनात अत्यंत चीड दाटून आली. अरे ! रोजच्या रोज व्हॉटसॲपवर काहीतरी फ़ॉरवर्ड केलेच पाहिजे अशा भावनेने काही काही मंडळी अत्यंत फ़ालतू काहीतरी पोस्ट ढकलत असतातच पण आता त्यांनी संत सदगुरूंनाही सोडले नाही हे बघितल्यावर खंत, राग, चीड यांचे मिश्रण दाटून आले.


यापूर्वी "म्हणून मी व्हॉटसॲपवर फ़ारसा रमत नाही" ही पोस्ट इथे. उसनी विद्वत्ता घेऊन बेधडक आपल्या नावाने खपविता येणारे हे माध्यम मला फ़ारसे भावतच नाही. आणि याचा सूक्ष्म अभ्यास केला असता असे लक्षात आले की व्हॉटसॲपी ढापाढापीत आणि ढकलाढकलीत आपल्या समाजातल्या वृद्धांचाच जास्त सहभाग आहे. त्यामानाने आजची तरूण पिढी हे माध्यम जरा जबाबदारीने वापरते.


काही वर्षांपूर्वीची गोष्ट. अशाच एका धार्मिक म्हणवल्या जाणा-या व्हॉटसॲप ग्रुपवर उत्तररात्री एका मध्यमवयीन भक्त जोडप्याने आपल्या आयुष्यातल्या अत्यंत खाजगी क्षणांचे लाइव्ह चित्रण प्रक्षेपित करायला सुरूवात केली. त्यांनाही त्या प्रक्षेपणाची माहिती नसावी. मग त्या ग्रुपमधल्या इतरांना त्यांना मेसेजेस पाठवून, फ़ोन करून चित्रीकरणाचे प्रक्षेपण थांबविण्याची कसरत करावी लागली. त्या जोडप्याने प्रसिद्धीसाठी असला प्रकार निश्चितच नव्हता केला पण एखादे साधन, माध्यम आपल्याला पुरते वापरता येत नसता ते वापरता येते हे तरूण पिढीसमोर बिंबविण्यासाठी अशा गोष्टी घडतात. 


आणखी एका ग्रुपवर स्वतःला "वेदमूर्ती" म्हणवून घेणा-या (हे एक नवीनच फ़ॅड सध्या आलेय. श्रीगणपत्यथर्वशीर्ष, पुरूषसूक्त, श्रीसूक्त, एकादष्णी आणि पवमान येव्हढेच येत असले तरी स्वतःच स्वतःला "वेदमूर्ती" म्हणवून घ्यायचे. एकेका वेदाचे भेद किती आहेत ? शाखा किती आहेत ? याची सुद्धा मोजणी येत नसलेल्या व्यक्ती "वेदमूर्ती" ? श्रीगुरूचरित्र नियमीतपणे वाचणा-यांनी तरी त्यातल्या छत्तीसाव्या अध्यायाचा अन्वयार्थ लक्षात घेऊन स्वतःला वेद कळतात असा दावा करू नये.) एका गुरूजींनी एक अत्यंत अश्लील व्हिडीयो क्लीप ग्रुपवर पाठवली होती. याचा अर्थ ते गुरूजी बाहेर वेद उपनिषदे यांचा उपदेश करून फ़ावल्या वेळात हे असले पण उद्योग करतात हे शहाण्या व्यक्तींच्या लक्षात आले. खाजगी आयुष्यात कुणी काय करावे ? हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी असल्या अत्यंत कामी व्यक्तींना वेदमंत्र उच्चारणाचा तरी अधिकार आहे का ? हा सवाल सगळ्या भाविकांच्या मनात आला. त्याचबरोबर हे निव्वळ पोटार्थी विद्या शिकून वेद वगैरे म्हणताहेत हे ही सगळ्यांच्या लक्षात आले. आपल्या एका छोट्या चुकीमुळे एकूणच वेदविद्येला हानी पोहोचतेय हे त्या गुरूजींच्या अजूनही ध्यानी नाही. गुरूजींचे वय वर्षे पासष्ट फ़क्त.


आपल्या तरूणपणी आजच्याइतके मुक्त वातावरण नसल्याची मनात खंत असलेली ही पिढी. ते तरूणपण पुन्हा जगू बघतात. पण नवीन समाजमाध्यमे नीटसे वापरण्याचे भान नाही. खूप काही करण्याची इच्छा आहे पण नवीन पिढीची जुळवून घेऊन नवे नवे शिकण्याची जिद्द नाही. आहे ती समाजमाध्यमे अशा विकृतीने वापरायचीत. त्यात कुठे असे सापडल्या गेलोत की खजिल व्हायचे आणि काही दिवसांनी आपणच "हे फ़ेसबुक म्हणजे अगदी वाईट्ट." किंवा "अहो, ही आजकालची तरूण पिढी त्या इंन्स्टावर काय थेरं करतेय तिकडे बघा ! संस्कृती अगदी बुडवलीय." म्हणायला हेच निलाजरे मोकळे. 


अरे बाबांनो. तुम्हाला ही नवी समाजमाध्यमे वापरता येत नाहीत ना तर मग नीट शिका ना. प्रत्येक समाजमाध्यमाची ताकद काय ? त्यातले धोके कुठले ? हे नीट समजून मग वापराना. आणि सगळ्यात महत्वाचे. ही समाजमाध्यमे वापरताना आमच्या श्रद्धास्थानांना सोडा रे. अध्यात्माला त्याचे त्याचे काम करू द्या. तुमच्या रोजच्या निरर्थक ढकलाढकलीला कुणीही वाचत नाही हे लक्षात घेऊन सुधरा रे.


- व्हॉटसॲपवर असे निरर्थक मेसेजेस वाचून आणि चार वर्षांपूर्वी वाचलेला तोच तोच विनोद पाच हजाराव्यांदा वाचून कंटाळलेला पण संत सदगुरूंच्या तोंडी असली नकोनको ती वचने टाकून त्यांना अपवित्र करण्याचा प्रयत्न करणा-यांवर संतापणारा, रामभाऊ सात्विकसंतापे.

Friday, September 1, 2023

कृतज्ञतेची अपेक्षा

समजा आपण एखाद्या बँकेत खूप मोठी रक्कम भरली. तिथल्या कॅशियर ने ती रक्कम मोजली आणि आपल्या खात्यात ते पैसे जमा केले. आता आपण तिथल्या त्या कॅशियर कडून किंवा त्या बँकेच्या मॅनेजर कडून कृतज्ञतेची अपेक्षा ठेवू का ? नक्कीच नाही. त्यांनी त्यांचे त्यांचे नेमून दिलेले काम केलेले आहे. आणि आपण भरलेल्या रकमेबद्दल बॅंक आपल्याला व्याजाच्या रूपाने मोबदला देत राहणार आहे. त्यामुळे आपण तिथे ठेवलेल्या मोठ्या रकमेबद्दल तिथल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याबद्दल कृतज्ञता वगैरे व्यक्त करावी ही आपली अपेक्षा नसते आणि नसावी ही.


मग या जगात वावरताना आपण एखाद्या व्यक्तीला मदत करून एखादे छोटे मोठे पुण्यकर्म करतो, तेव्हाही हा हिशेब आपण त्या मोठ्या बॅंकर वर का सोपवीत नाही ? तो सर्वव्यापी सर्वसाक्षी बँकर आपल्या कर्माची नोंद घेईल आणि त्याचे मुद्दल व व्याज आपल्याला योग्य त्या वेळेवर परत करेल हा विश्वास आपल्याला का नाही ? आपण ज्या व्यक्तीला मदत केली त्या व्यक्तीकडून कृतज्ञतेची अपेक्षा का बाळगतो ?तो तर त्या एका मोठ्या सिस्टीमचा भाग आहे. त्याने कृतज्ञता व्यक्त केली काय किंवा न केली काय ? आपले पुण्यकर्माचे काम आपण सुरूच ठेवायला हवे, नाही काय ?

थोडा आणखी खोल विचार केला तर लक्षात येईल की व्यावहारिक जगात बॅंकेकडून आपण मुद्दल आणि व्याज परत मिळण्याची अपेक्षा करतो खरे पण आध्यात्मिक जगात त्या मोठ्या बॅंकरकडून आपण केलेल्या पुण्यसंचयाबद्दल त्याच्याकडून काही परताव्याची अपेक्षाही करू नये. हा मनुष्यजन्म आपल्याला किती जन्मांनंतर मिळाला हे आपल्याला ठाऊक नाही. गेल्या कुठल्या कुठल्या जन्मात किती पापकर्मे करून आपण कर्ज करून ठेवलेय हे आपल्याला कधीच कळणार नाही. मग आज केलेले पुण्यकर्म हे आपण ठेवत असलेली ठेव नसून आपले मागील जन्मीचे कर्ज फेडतोय ही भावना का नसावी ?

सत्वगुणें मारावे रज आणि तम,
मारा सत्वाने सत्व पूर्ण

याचा हाच अर्थ असावा बहुतेक.

- सात्विकतेकडे वाटचाल करीत असताना सात्विकतेचेही ओझे होऊ नये याची काळजी घेणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.