Thursday, January 8, 2026

भारतीय रेल्वेचा "लतेरे"पणा भाग - २ (राजधानी एक्सप्रेस)

ब्रिटीशांच्या काळापासून ते स्वातंत्र्यानंतर जवळपास दोन दशके भारतीय रेल्वेवर फ़क्त तीनच प्रकारच्या रेल्वेगाड्या धावयच्यात. मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या. पुलंच्या पेस्तनकाकांनी वर्णन केलेली तुफ़ान मेल वगैरे होती पण तो एक वेगळा किंवा विशेष दर्जा नव्हता. स्वातंत्र्यानंतर पहिली विशेष दर्जाची रेल्वे सुरू झाली ती १९६९ मध्ये राजधानी एक्सप्रेसच्या स्वरूपात. राजधानी एक्सप्रेसबाबत यापूर्वी लिहिलेला माझा लेख इथे. अर्थात राजधानी एक्सप्रेसपूर्वी राजधानी एक्सप्रेसच्याच धर्तीवर डिलक्स एक्सप्रेस रेल्वेने सुरू केलेल्या होत्या पण राजधानी सुरू झाल्यानंतर नवी दिल्ली हावडा डिलक्स एक्स्प्रेसची पूर्वा एक्सप्रेस झाली. नवी दिल्ली मुंबई डिलक्स एक्स्प्रेसची पश्चिम एक्सप्रेस झाली आणि नवी दिल्ली - हैद्राबाद / चेन्नई डिलक्स एक्स्प्रेसची दक्षिण एक्सप्रेस झाली. 


१९६९ ला हावडा राजधानी एक्सप्रेस सुरू झाली आणि त्यानंतर तीनच वर्षांनी १९७२ ला मुंबई राजधानी  सुरू झाली. भारतासाऱख्या खंडप्राय देशाच्या राजधानीला सुदूर राज्यांच्या राजधानीला जोडणारी जलद विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित सेवा म्हणून राजधानी गाड्या ओळखल्या जायच्यात. पहिल्यांदा फक्त मुंबई आणि हावड्याला  नवी दिल्ली शी जोडल्यानंतर मग इतरही राज्यांच्या राजधानांन्या नवी दिल्लीशी जोडणाऱ्या राजधानी गाड्या ९० च्या दशकात आणल्या गेल्यात. लाल आणि क्रीम रंगातल्या रंगसंगतीच्या छान निगा राखलेल्या कोचेसमधून, कोचेसना मॅचिंग असलेल्या रंगसंगतीचे  इंजिन लागलेल्या या प्रकारच्या राजधानी गाड्यांमधून प्रवास करणे हे प्रतिष्ठेचे समजल्या जाऊ लागले.


राजधानी एक्सप्रेस गाड्यांना सुरूवातीच्या काळात फ़क्त वातानुकूल प्रथम वर्ग आणि वातानुकूल चेअर कार अशा दोनच वर्गांचे कोचेस असायचेत. १९८० च्या दशकात त्यांना द्विस्तरीय वातानुकूल कोचेस (सेकंड एसी) आणि १९९० च्या दशकात त्रिस्तरीय वातानुकूल कोचेस लावल्या जाऊ लागलेत. त्यांच्या रेकमधून चेअर कारचे कोचेस मात्र वजा झालेत. खाण्यापिण्याची या गाड्यांमध्ये अतिशय उत्तम बडदास्त असायची. अगदी वेळेवर धावणा-या गाड्या म्हणून या गाड्यांची ख्याती असे. या गाड्यांच्या संचलनाचा रोजचा अहवाल थेट रेल्वेमंत्र्यांकडे जातो अशी वंदता होती. त्यामुळे राजधानी गाड्यांना सगळ्याच रेल्वे विभागांमधल्या सगळ्याच रेल्वे खंडांमध्ये पुढे जायला प्राधान्य मिळत असे.


पण ममता बाईंनी त्यांच्या कल्पनेतली दुरंतो गाडी आणली आणि राजधानी गाड्यांचे महत्व थोडे कमी झाले. पूर्वी राजधानी गाड्या त्यांच्या खूप वेगळ्या कोचेसच्या रंगसंगतीमुळे ओळखू यायच्यात. आजकाल लाल आणि राखाडी रंगसंगतीचे नवे एल एच बी कोचेस सगळ्याच रेल्वेगाड्यांना मिळायला लागलेत. त्यातही मुंबई - हरिद्वार एक्सप्रेस सारख्या काही गाड्या राजधानी नसूनही संपूर्ण वातानुकुलित असतात. त्या गाड्यांमध्ये आणि राजधानी एक्सप्रेसमध्ये दर्शनी फ़रक दिसत नाही. कोचेसना मॅचिंग रंगाच्या एंजिनाची चैन तर केव्हाच हरवली पण राजधानीसाठी वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीचे कोचेस हे पण आता हरवलेले आहे.



राजधानी एक्सप्रेसमधली खानपान व्यवस्था आणि एकंदर आदरातिथ्य एमिरेटस, एतिहाद किंवा गेला बाजार सिंगापूर  एअरलाईन्सच्या फ़र्स्ट किंवा बिझिनेस क्लासला स्पर्धा देण्याइतके उत्तम असायचे. तिथल्या वातानुकूल प्रथम वर्ग प्रवासात तर प्रवाशांना आपण जणू एखादे संस्थानिक आहोत आणि रेल्वेतल्या कॅटरींगचा, पॅण्ट्री कारचा कर्मचारी वर्ग आपला वैयक्तिक कर्मचारी वर्ग आहे अशी भावना होईल इतपत त्या प्रवाशांची बडदास्त ठेवली जात असे. पण हल्ली हे सुद्धा ओसरले आहे या माझा वैयक्तिक अनुभव आहे. 








मध्येच रेल्वेने तेजस राजधानी हा प्रकार राजधानीत आणला. पिवळ्या रंगातल्या वेगळ्या रंगसंगतीचे कोचेस, त्यांना गाडी सुटल्यानंतर आपोआप बंद होणारे दरवाजे, प्रत्येक कोचमध्येच तिथल्या प्रवाशांसाठी ओव्हन, फ़्रीज वगैरे असलेली छोटी पॅण्ट्री वगैरे चांगले बदल या प्रकारच्या कोचेसमध्ये होते. सुरूवातीला मुंबई - नवी दिल्ली राजधानी आणि ऑगस्ट क्रांती राजधानीला हे कोचेस मिळालेही. पण नंतर रेल्वेच्या मनात काय आले कुणास ठाऊक त्यांनी मुंबई - नवी दिल्ली तेजस राजधानीचा रेक काढून घेतला आणि ते कोचेस भुवनेश्वर राजधानीला दिलेत. मुंबई राजधानी पुन्हा एकदा जुन्या प्रकारच्याच एल एच बी कोचेसवर धावू लागली. हा लतेरेपणा रेल्वेने का केला याचे काही स्पष्टीकरण नाही. ऑगस्ट  किंबहुना सर्वच राजधानी गाड्यांना अशा प्रकारे तेजस कोचेस देण्यासाठी अशा प्रकारच्या कोचेसचे उत्पादन रेल्वेने वाढवायला हवे होते पण तशा हालचालीही रेल्वेकडून दिसत नाहीत. तेजस राजधानी ही संकल्पना रेल्वेने आणली काय आणि वापस का घेतली ? याचे काहीही तार्किक कारण अजूनही दृष्टीपथात दिसत नाही. राजधानीसारख्या भारतीय रेल्वेच्या जवळपास सहा दशके अत्यंत प्रतिष्ठित गाडीलाही रेल्वेने आपल्या लतेरेपणातून सोडले नाही तर इतर गाड्यांची काय कथा ?




इतर गाड्यांचा क्रमशः आढावा पुढल्या लेखांकांमध्ये.


- तिरूवनंतपुरम ते नवी दिल्ली आणि पाठोपाठ नवी दिल्ली ते दिब्रुगढ असे दोन वेगवेगळे लांब पल्ल्याचे प्रवास राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूल प्रथम वर्गातून करून तिथली बडदास्त पुन्हा अनुभवू इच्छिणारा एक प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


 ८ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


No comments:

Post a Comment