Sunday, November 21, 2021

"शोध सुखाचा"

 "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?" हे ज्याचे त्याला कळले की प्रत्येकजण "काय पुण्य असले की ते मिळते ?" या प्रश्नाच्या शोधात गुंतून जातो.


पण प्रत्येकाला स्वतःच्या सुखाचा शोध घेणे हे फ़ार जड जाते. इथे प्रत्येकजण दुसरा सुखी आहे असे समजून त्याला मिळालेले सुख स्वतःला मिळायला हवे म्हणून प्रयत्न करत जातो. आणि त्या सुखाच्या मुकुटाआड दड्लेले काटे स्वतःला बोचले म्हणजे त्याच्या सुखातले वैय्यर्थ लक्षात येऊन आणखी दुस-या व्यक्तीचे सुख शोधायला लागतो. "तुझे आहे तुजपाशी" या वचनावर आमचा विश्वास नाहीच मुळी आणि त्यामुळेच अशा व्यक्तींचा सुखाचा शोध कधीही संपत नाही.


पाडगावकरांच्या "बोलगाणी" शैलीत मी असे म्हणेन की 

"आपले सुख दुःख आपल्याला कळले पाहिजे, 

आपले आयुष्य आपल्याला सुखात जगता आले पाहिजे."


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर 

Friday, November 19, 2021

सुरक्षा यंत्रणांच्या अनास्थेचा एक अनुभव.

 १७ मे २००६. श्रीवैष्णोदेवीचे दर्शन आटोपून आम्ही कट-यावरून जम्मूतावीला परतलो होतो. (जम्मू ते कटरा हा मजेशीर प्रवास इथे वाचा.) वाटेत जम्मूतल्या श्री रघुनाथ मंदिराचे दर्शन घेऊन, जेवणे वगैरे आटोपून रात्री ११.०० च्या गाडीसाठी अंमळ लवकरच म्हणजे रात्री ९.०० वाजताच जम्मू स्टेशनच्या फ़लाट क्र. १ वर आम्ही मुक्काम ठोकला. आमचा १४ जणांचा मोठठा ग्रुप होता. सामानसुमान भरपूर होते. त्यामुळे ऐनवेळी धावपळ करत गाडीत बसण्यापेक्षा लवकर स्टेशन गाठून तिथे गाडीची वाट बघत बसणे केव्हाही श्रेयस्कर होते.


आमच्या सहलीतले पुढले ठिकाण होते ते म्हणजे हरिद्वार आणि ऋषीकेश. जम्मूवरून सुटणा-या आणि हरिद्वारपर्यंतच जाणा-या हेमकुंट एक्सप्रेसची आम्हा सगळ्यांची कन्फ़र्म्ड तिकीटे होती. आमच्या गाडीच्या रेकची कोच पोझिशन इंडिकेटरवर दाखवत होते. आम्ही आमच्या कोचच्या इंडिकेटरजवळ होतो. फ़लाटावर गाडी लागण्याची वाट बघत आम्ही गोलाकार मंडलात बसलो प्रत्येकाने आपापले सामानसुमान स्वतःच्या आसपास असेल असेच ठेवले होते. गाडीचा रेक रात्री १०.३० ला फ़लाटावर लागेल या अपेक्षेने आम्ही थोडे सैलावलो होतो.


त्यापूर्वी दोन वर्षे आधी, २००४ मध्ये, जम्मू स्टेशनवर आणि रघुनाथ मंदिरावर अतिरेकी हल्ला झालेला होता. रघुनाथ मंदिरात त्या हल्ल्याच्या खुणा दिसत होत्या आणि रघुनाथ मंदिरात आणि जम्मू स्टेशनवरही खूप जबरदस्त सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली दिसत होती. या सगळ्या दहशतीच्या वातावरणाशी आम्ही अनभिज्ञ असल्याने ती सुरक्षा व्यवस्था पाहून आम्ही सगळेच बुजल्यासारखे झालेलो होतो. जम्मू स्टेशनच्या फ़लाटावर तर दर १० मीटरवर वाळूच्या पोत्यांची पुरूषभर उंचीची एक बॅरीकेड रचून त्याआड एक हेल्मेट घातलेला बंदुकधारी सुरक्षारक्षक तिथे तैनात होता. ही सगळी शस्त्रसज्जता, "इथे कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते" ही आम्हा सगळ्यांच्या मनातली भिती, आमची गाडी लागण्याची उत्सुकता वाढवीत होते. कधी एकदा आमची गाडी लागतेय ? आणि आम्ही इथून सुखरूप रवाना होतोय ? असे आम्हा सगळ्यांनाच झालेले होते.


आणि अचानक ...


आमच्या सामानसुमानाजवळ एक प्लॅस्टिकचे पोते आणि त्याच्या आत पाईपसदृश काही सामान असल्याचे आमच्या लक्षात आले. आमच्यापैकी कुणाचेही ते सामान नव्हते. आसपास असलेल्या प्रवाशांनाही विचारले पण त्यांच्यापैकीही कुणाचे ते सामान नव्हते. आजवर घडलेल्या अनेक दहशतवादी घटना डोळ्यांसमोर येऊ लागल्यात. त्या सामानात काय काय असू शकतं याची जंत्रीच आम्हा सगळ्यांच्या मनात येऊन गेली. मग मी आणि माझा मामेभाऊ त्याविषयी माहिती द्यायला निघालो. वाटेत जवळच असलेल्या वाळूच्या बॅरीकेडआड असलेल्या जवानाकडे चौकशी केली तेव्हा त्याने स्टेशनवरच्या मुख्य सुरक्षा अधिका-याकडे जाण्यास सांगितले.


स्टेशन फ़लाटावर स्टेशन मास्तर ऑफ़िसशेजारीच हे मुख्य सुरक्षा अधिका-याचे कार्यालय होते. आत स्वतः तुंदिलतनू आणि सुस्त साहेब आणि हिंदी सिनेमात दाखवतात त्यासारखे त्यांचे दोन तीन चमचे असिस्टंट निवांत गप्पा मारीत होते. रात्रीचे ९.३०, ९.४५ झाले असावेत.


मी आणि माझ्या मामेभावाने मोठ्या काळजीने त्या बेवारस पोत्यासंबंधी माहिती त्यांना दिली. माहिती ऐकत असताना ते अत्यंत अनिच्छेने ती ऐकताहेत हे त्यांच्या मुद्रेवरून आम्हाला कळत होते. आमची माहिती सांगून झाल्यावर त्यांचे उत्तर ऐकून आम्ही सर्दच झालो. आम्ही त्या बेवारस पडलेल्या संशयास्पद पोत्याविषयी माहिती दिल्यावर ते म्हणाले, "यहॉ लेके आओ" 


"क्काय ?" आम्हा दोघांच्याही तोंडातून एकदम आश्चर्योदगार निघाला. आमची अपेक्षा अशी होती की इतकी महत्वाची माहिती त्यांना दिल्यावर त्यांनी जलद हालचाल करून त्यांचे आणखी सुरक्षारक्षक फ़लाटावर पाठवायला हवे होते. पण हे साहेब ढिम्म होते.


"लेके आव" त्या दोनशे पाऊंडाच्या देहातून पुन्हा आवाज आला.


"अरे ऐसे कैसे लेके आऍ ? अंदर कुछ गड्बड सामान होगा तो ? आप अपने लोग वहॉ भेजिये ना ?" 


"यहा लेके आओ. बादमें देखते है" ते आपल्या आग्रहावर ठाम होते. त्या बथ्थड माथ्याशी आता चर्चा करणे म्हणजे आपला अमूल्य वेळ घालवणे हे आता आमच्या दोघांच्याही लक्षात आले. जाताजाता माझ्या मावसभावाने अगदी मार्मिक व-हाडी कॉमेंट टाकली. तो म्हणाला, "आत्ता आम्हाले समजलं बे इथे बॉम्बस्फ़ोट कशे होतेत ते ? येक नंबर गलंग हाये लेको तुमी." 


आम्ही विनाविलंब फ़लाटावर धाव घेतली. सुरक्षा रक्षकांच्या असल्या अनास्थेबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यापेक्षा आपली सुरक्षा आपण स्वतःच करूयात या विचाराने आम्ही सगळे जण त्या पोत्यापासून शक्य तितके दूर जाण्याच्या प्रयत्नांना लागलो. गाडीच्या शेवटी लागणार असलेल्या आमच्या कोचपासून अगदी दूर एंजिनाकडे आम्ही धाव घेतली. १० दिवसांच्या प्रवासासाठी भरपूर सामानसुमान घेऊन निघालेले आम्ही सगळे प्रवासी मंडळी, सोबत माझे मामा आणि सौ. मामी हे ज्येष्ठ नागरिक. त्यांना इतक्या लांब फ़लाटावर रात्री सामानसुमासकट चालावे लागणे हा कष्टप्रद अनुभव होता.


हळूहळू फ़लाटावरच्या प्रवासी मंडळींमध्ये ही बातमी पसरली. कुणीही त्या पोत्याच्या आसपास १५ - २० मीटरच्या परिसरात थांबायला तयार नव्हते. पण सुरक्षा व्यवस्था ढिम्म होती. कुणालाही त्या बेवारस पोत्याची दखल घ्यावीशी वाटेना.


त्या गडबडीतच आमची गाडी रात्री १०.४५ च्या आसपास फ़लाटावर लागली. पुन्हा एंजिनापासून आमच्या डब्यापर्यंत आमचा कष्टप्रद प्रवास झाला. डब्यात बसल्यावरही फ़लाटावरचे ते बेवारस पोते आम्हाला दिसत होते. गाडी लवकरात लवकर इथून हलावी अशी प्रार्थना आम्ही आत बसल्याबसल्या करीत होतो. परिस्थितीत आता थोडी सुधारणा एव्हढीच झालेली होती ती म्हणजे फ़लाटावर त्या बेवारस वस्तूच्या मालकाच्या शोधाविषयी उदघोषणा सुरू होती. फ़क्त उदघोषणाच हं. सुरक्षा व्यवस्थेतले कुणी तिथे येऊन तिथल्या स्थितीचा आढावा वगैरे घेणे या गोष्टीला अजूनही सुरूवात झालेली नव्हती. स्टेशनात येताना स्टेशनबाहेर बॉम्ब शोधक पथकाची गाडी आम्हाला दृष्टीस पडली होती पण त्यांना अजूनही फ़लाटावर पाचारण करण्यात आलेले नव्हते.


आमची गाडी जम्मूतावी स्टेशनवरून १६ मिनिटे उशीरा, रात्री ११.१६ ला निघाली आणि आमच्यापैकी प्रत्येकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. तत्पूर्वी आमच्या कोचमधल्या केवळ आमच्याच नव्हे तर इतर सगळ्या बर्थसखाली आम्ही बघून घेऊन, अशीच एखादी बेवारस वस्तू तिथे नसल्याची खात्री करून घेतली होती. दुस-या दिवशी वर्तमानपत्रात काही अप्रिय घटनेची बातमी वगैरे आली नाही म्हणजे त्या पोत्यात तशी काही दहशतवादी वस्तू नसावी पण त्याबाबत तिथल्या सुरक्षा यंत्रणांचा गलथानपणा आम्हाला चिंताक्रांत करून गेला हे निश्चित.


इतक्या संवेदनशील जागी, सुरक्षा यंत्रणांच्या इतक्या पराकोटीच्या अनास्थेचा हा अनुभव आम्हा सगळ्यांच्या मनात पंधरा वर्षांनंतरही घर करून राहिला हे नक्की.


- राष्ट्राच्या सुरक्षेविषयी आणि राष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेविषयी अत्यंत आग्रही असलेला सामान्य नागरिक, राम प्रकाश किन्हीकर.


Sunday, November 14, 2021

भारतीय रेल्वेची एक नावडती गाडी

 आम्ही आमच्या बालपणी ऐकलेल्या गोष्टींमध्ये राजाची एक "आवडती" आणि एक "नावडती" राणी असत. बालपणी आम्हाला कायम आश्चर्य वाटत असे की एखादी गोष्ट इतकी "नावडती" वगैरे कशी असू शकते ? पण १९८९ साली कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाराष्ट्र एक्सप्रेसचा वारंवार प्रवास घडायला लागला आणि लक्षात आले की महाराष्ट्र एक्सप्रेस हीच ती नावडती राणी.

साधारण १९९७ पर्यंत महाराष्ट्र एक्सप्रेस ही दक्षिण मध्य रेल्वेच्या मालकीची होती. एकूण पुणे ते कोल्हापूर हा रेल्वेमार्गच दक्षिण - मध्य रेल्वेच्या मालकीचा होता. त्यामुळे १२१९ किमी पैकी ९९० किमी मध्य रेल्वेवर चालणा-या या गाडीला दक्षिण मध्य रेल्वे ही आई जेऊ घालीना आणि ९९० किमी चालत असली तरी पूर्ण गाडी दक्षिण मध्य रेल्वेची असल्याने मध्य रेल्वे हा बाप भीक मागू देईना अशी अवस्था होती. बाकीच्या गाड्यांचे वापरून झालेले, किमान १५ ते २५ वर्षे जुने झालेले कोचेस, जुन्या प्रकारची एंजिने या गाडीला मिळत असत. ७३८३ डाऊन / ७३८४ अप असा या गाडीचा द. म. रेल्वेनंबर होता. १९९७ नंतर पुणे - कोल्हापूर हा विभाग मध्य रेल्वेला जोडल्यानंतर या गाडीला सध्याचा १०३९ / १०४० हा नंबर मिळाला. 

नावडती मुलगी लग्न होऊन सासरी वगैरे गेली तरी तिचे हाल संपत नसत. तसेच महाराष्ट्र एक्सप्रेसचे झाले. पूर्वी डबे १५ ते २५ वर्षे जुने मिळायचेत ते आता १० ते २० वर्षे जुने मिळायला लागलेत. आजही महाराष्ट्र एक्सप्रेसच्या नवीनतम डब्यांचा नंबर 12XXX इतकाच असतो. २०१२ पर्यंतच बनलेले डबे या गाडीला मिळतात. जणू २०१९ - २०२० चे डबे या गाडीला दिले तर रूळावरून घसरूनच पडतील. आज नागपूर ते भुसावळ सेक्शनमध्ये सगळ्याच गाड्यांना अगदी लेटेस्ट असे थ्री फ़ेज एंजिने WAP 7 मिळतात पण महाराष्ट्र एक्सप्रेसला अजूनही १५ वर्षे जुनी WAP 4 एंजिनेच मिळतात. नावडतीला काय करायचेत नवे कपडे ? या भूमिकेतून महाराष्ट्रला काय करायचेत ते WAP 7 ? असे रेल्वे बोर्डाचे धोरण असावे.

एकेकाळी महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूरला सह्याद्री एक्सप्रेस, नागपूरला सेवाग्राम एक्सप्रेस आणि दादरला सेवाग्राम एक्सप्रेस ही महालक्ष्मी एक्सप्रेससोबत आपला रेक शेअर करीत असे. त्यासंबंधी सविस्तर वर्णन असलेला लेख इथे आहे. आज सह्याद्री एक्सप्रेस सोडली तर सेवाग्राम एक्सप्रेस ही नागपूर विभागाची लाडकी राणी झालेली आहे आणि महालक्ष्मी एक्सप्रेस ही पूर्वी मध्य रेल्वेची आणि आता हरिप्रिया एक्सप्रेस या दक्षिण मध्य रेल्वेसोबतच्या रेक शेअरींगमुळे दक्षिण मध्य रेल्वेची लाडकी गाडी झालेली आहे. सेवाग्रामचे डबे एकदम नवे नसलेत तरी नुकतेच refurbished केलेले असतात. नागपूर यार्डात तिचे खूप लाड होतात. रंगरंगोटी, नवनवीन सुविधा तिला प्रदान केल्या जातात. पण महाराष्ट्र एक्सप्रेसचे नशीबच खोटे. चांगली नागपूरपर्यंतच धावली असती तर नागपूर विभागाचे लाड तिचाही नशिबात आले असते (किंवा मग तिचे आणि सेवाग्रामचे रेक शेअरींग चालू राहून सेवाग्रामचेही आज होताहेत तितके लाड झाले नसते.) पण प्रफ़ुल्ल पटेलांनी तिला गोंदियापर्यंत पळवून नेली आणि दक्षिण पूर्व रेल्वेच्या सासुरवासात ती अडकली. तिथे तिच्याकडे, तिच्या मेंटेनन्सकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. 

१९८९ मध्ये नागपूर विभागात कोळसा एंजिने हळूहळू हद्दपार होत होती. मध्य रेल्वे्च्या नागपूर विभागात वर्धेचे कोळसा एंजिन शेड होते आणि भुसावळ विभागात भुसावळचे कोळसा एंजिन शेड होते. कोळसा एंजिने फ़क्त पॅसेंजर गाड्यांना नाहीतर मालगाड्यांना लागायचीत. पण १९८९ ते १९९१ काळात दोन तीनदा महाराष्ट्र एक्सप्रेसला कोळसा एंजिन लागलेले आम्ही बघितले होते. त्या कोळसा एंजिन लागलेल्या गाडीत बसणे म्हणजे मोठीच शिक्षा असायची. ती कोळश्याची उडत असलेली धूळ खिडकीतून आत येऊन कपडे काळे होणे, त्या कोळश्याचा आणि त्या गाडीच्या लोखंडाचा एक एकत्रित असा एवंगुणविशिष्ट वास कपडे आणि सामानासुमानाला लागणे, गाडी पूर्ण जोशात धावत असताना उडणा-या कोळशाच्या ठिणग्यांमुळे खिडकीतून बाहेर बघण्याची सोय नसणे (बालपणी मनमाड ते कोपरगाव या एका प्रवासात ही ठिणगी डोळ्यात जाऊन सुजलेल्या आणि ठणकलेल्या डोळ्याची आठवण ४३ वर्षांनंतर अजूनही ताजी आहे.) या सगळ्या गोष्टींमुळे मुलांमधल्या उपजत रेल्वेफ़ॅनिंगला मर्यादा यायच्यात. म्हणून ही कोळसा एंजिने आपल्या गाडीला नकोशी वाटायचीत. आज ही एंजिने दुर्मिळ वगैरे झाल्याने त्यांना heritage value प्राप्त झालेली आहे. तरीही आम्हाला ती नकोशीच वाटतात. या एंजिनांना वेग घ्यायला वेळ लागायचा त्यामुळे यांचा सरासरी वेग फ़ार कमी असायचा. त्यात महाराष्ट्र एक्सप्रेसला थांबे भरपूर म्हणून एकदा का गाडीला उशीर झाला की तो उशीर भरून काढून पुढील स्टेशनावर वेळेवर पोहोचणे (मेकप करणे) या गाडीसाठी अशक्य होत असे.


Maharashtra Express at Akola Jn. Photo Courtesy:  Bigley Hall

काल आमच्या एका रेल्वेफ़ॅन ग्रूपवर हा अकोला स्टेशनवरचा महाराष्ट्र एक्सप्रेसचा (साधारण १९८६-८७ चा) फ़ोटो आला. Photo Credits: Bigley Hall. कुणीतरी परदेशस्थ रेल्वेफ़ॅनने काढलेला हा फ़ोटो. त्याकाळी ब्लॅक ऍण्ड व्हाईट फ़ोटोच दुर्मिळ होते तर हा रंगीत फ़ोटो कुठला रेल्वेफ़ॅन काढणार ? अहो लग्नात देखील मोजून ३६ किंवा ७२ च फ़ोटो काढले जायचेत. म्हणजे एक किंवा दोन रोल. फ़क्त. कारण फ़ोटो काढण्याइतकेच पैसे ते फ़ोटो डेव्हलप करण्यासाठी मोजावे लागायचेत. काढल्यानंतर ८ - १५ दिवसांनी ते फ़ोटो हातात आल्यानंतरच ते कसे निघालेत ते कळायचे. त्यात एखाद्या रोलमध्ये ३६ ऐवजी ३७ वा फ़ोटो बसला की आम्हाला कोण आनंद व्हायचा ? ते आजकालच्या हातातल्या सेलफ़ोन्सने सतत "खिचिक" करत राहणा-या आणि एकदा काढलेला फ़ोटो पुन्हा कधीही न बघणा-या आजच्या पिढीला कळणार नाही.

या फ़ोटोत महाराष्ट्र एक्सप्रेसला लागलेले एंजिन हे WP प्रकारचे. हे एंजिन प्रवासी गाड्या ओढ्ण्यासाठी खास बनलेले असायचे. जास्त वेग आणि त्यामानाने कमी टॉर्क. (खेचण्याची ताकद) अशा एंजिनच्या बॉयलरचा समोरचा फ़ुगीर भाग आणि त्यावरील चांदणी हे आमचे बालपणीचे आकर्षण असायचे. नागपूरवरून जाणा-या जीटी एक्सप्रेस किंवा दक्षिण एक्सप्रेसला अशा प्रकारची एंजिने लागायचीत. महाराष्ट्र एक्सप्रेसला सहसा WG प्रकारची एंजिने लागायचीत. ही WG प्रकारची एंजिने मालगाड्यांसाठी बनविलेली असायचीत. जास्त टॉर्क (खेचण्याची ताकद) आणि त्यामानाने कमी वेग अशी. आजही WAG 7, WAG 9, WAG 12  ही इलेक्ट्रीक एंजिने मालगाड्यांसाठी तर WAP 4, WAP 5, WAP 7 ही इलेक्ट्रीक एंजिने प्रवासी गाड्यांसाठी वापरली जातात. त्याकाळी हे WP एंजिन महाराष्ट्र एक्सप्रेसला मिळाले म्हणजे या मार्गावरच्या इतर एक्सप्रेस गाड्यांना (मेल, गीतांजली, हावडा - मुंबई एक्सप्रेस) नक्कीच डिझेल एंजिने मिळत असणार. हे नकोसे असलेले, जुने झालेले एंजिन या नावडतीच्या माथ्यावर आलेले असणार. 

बरे एकेकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसला डब्यांची काढघालही बरीच असायची. नागपूर ते भुसावळ एक साधारण वर्गाचा (General Class) डबा भुसावळ स्टेशनात निघायचा तर भुसावळ - मनमाड असे ४ सर्वसाधारण वर्गाचे डबे (भुसावळ - मनमाड रोज अप डाऊन करणा-यांसाठीचे) डबे पुढून जोडले जायचेत. गाडीच्या मागल्या बाजूने गोरखपूर - कोल्हापूर आणि भुसावळ - पुणे असे दोन शयनयान वर्गाचे डबे जोडले जायचेत. भुसावळला ४० मिनीटे थांबा होता. मनमाड स्टेशनवर हे भुसावळ - मनमाड डबे निघायचेत. पुन्हा अर्धा तास गाडीचा थांबा. दौंड स्टेशनवर नागपूर - सोलापूर हा एकुलता एक शयनयान डबा निघायचा. आणि एंजिनाची व गाडीची दिशा बदलायची. त्यात पुन्हा ४० मिनीटे थांबा. पुणे स्टेशनवर नागपूर - पुणे, भुसावळ - पुणे हे दोन डबे गाडीपासून वेगळे काढणार आणि पुन्हा एंजिनाची व गाडीच्या रेकची दिशाबदल. पुन्हा ४० मिनीटे थांबा. अशी ही लेकुरवाळी गाडी होती. 

आता नवीन एल. एच. बी. कोचेस लागायला लागल्यानंतर मधल्या स्टेशन्सवर ही डब्यांची काढघाल पूर्णपणे बंद होणार असल्याचे कळलेय. सेवाग्राम एक्सप्रेसला मुंबई - बल्लारशाह हे स्लीप कोचेसचे डबे बंद करण्याची सूचनाही निघाली आहे. (या स्लीप कोचेसची एक रोमॅंटीक आठवण या ठिकाणी.)  बहुतेक सेवाग्राम एक्सप्रेसला हे नवे एल. एच. बी. डबे लवकरच मिळतील असे वाटतेय. पण महाराष्ट्रला हे डबे कधी मिळणार ? या प्रश्नाचे उत्तर "मध्य रेल्वेचा पहिला एल. एच. बी. डबा १५ वर्षे जुना झाल्यावर" असेच आहे. मध्य रेल्वेत पहिला एल एच बी डबा साधारण २०१२-१३ मध्ये प्रवेशकर्ता झाला होता. त्या न्यायाने २०२७ - २०२८ मध्ये महाराष्ट्र एक्सप्रेसला हे नवे डबे मिळतील अशी आशा आहे. तोपर्यंत सगळ्या लाडक्या एक्सप्रेस गाड्यांना "तेजस" या प्रकारातले डबे मिळायला सुरूवात झालेली असेल आणि हे एल एच बी डबे जुने म्हणून गणल्या गेलेले असतील.

बालपणीच्या गोष्टींमध्ये गोष्टीच्या शेवटी नावडती राणी काहीतरी पराक्रम करून राजाची आवडती होत असे. आता महाराष्ट्र एक्सप्रेसने असा कोणता पराक्रम करायला हवाय की ती मध्य रेल्वेची आवडती होईल ? हा सगळ्या महाराष्ट्र प्रेमींसमोरचा मोठा यक्षप्रश्न आहे. 

- एकूण रेल्वे प्रवासापैकी ४० % प्रवास महाराष्ट्र एक्सप्रेसने (उरलेला ४० % विदर्भ एक्सप्रेसने, १५ % सेवाग्राम एक्सप्रेसने आणि ५ % उरलेल्या सगळ्या गाड्यांने) केलेला एक स्टॅटिस्टिशियन रेल्वेफ़ॅन, राम प्रकाश किन्हीकर.

Saturday, November 13, 2021

स्लीपर: एक पायताण

 मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गाने जाताना खलघाट ला नर्मदामैय्या ओलांडली आणि धामनोद ला आलोत की रस्त्याच्या बाजूला स्लीपर्सची एकापेक्षा एक मोठमोठी दुकाने लागतात. आजही अगदी ५० ते १०० रूपयांमध्ये छान छान डिझाईन्सच्या आणि पायाला मऊ मुलायम, सुखद फ़िलींग देणा-या सुंदर स्लीपर्स तिथे मिळतात. ब-याचदा अशा स्लीपर्सचे कंटेनर्सच्या कंटेनर्स तिथे रिकामे होताना मी पाहिलेत. सुरूवातीला मला ह्या स्लीपर्स चिनी वाटल्या होत्या. पण त्या स्लीपर्स आपल्या देशातच बनतात आणि पूर्वेकडल्या खूपशा देशांमध्ये निर्यातही होतात हे ही मला कळले आणि त्या स्लीपर्सकडे माझा बघण्याचा दृष्टीकोन बदलला.



आमच्या बालपणच्या स्लीपर्स मला आठवल्यात. तेव्हा फ़क्त बाटा आणि करोना या दोनच कंपन्या स्लीपर्स बनवायच्यात. त्या स्लीपर्स म्हणजे पांढ-या रंगाच्या बेसवर निळ्या किंवा बदामी रंगाचे पट्टे बसविलेल्या असायच्यात. यापेक्षा तिसरा रंग मला त्या स्लीपर्समध्ये आढळला नाही. आजकाल बाटा च्या दुकानांमध्ये स्लीपर्स दृष्टीस पडतच नाहीत. आजकाल बाटाच्या दुकानांमध्ये फ़ार जाणेही होत नाही म्हणा. बालपणी भरपूर चालणे व्हायचे. चपला हरवता येतील अशा ठिकाणांना भेटी व्हायच्यात. वाढत्या अंगामुळे चपला छोट्या व्हायला लागायच्यात आणि मग चपलांच्या दुकानात वारंवार चकरा ठरलेल्या असायच्यात. आजकाल चपला, बुटांचा एकेक जोड हा पाच पाच, सहा सहा वर्षे टिकतो. साहजिकच चपला दुकानांच्या चकरा कमी झाल्यात.



बालपणी आमच्या शाळेसाठी् युनिफ़ॉर्म असला तरी युनिफ़ॉर्मचे लोण चपला बुटांपर्यंत पोहोचलेले नव्हते. त्यामुळे बहुतांशी मुले चपला आणि स्लीपर्स मध्येच यायचीत. पावसाळ्यात चालताना त्या स्लीपर्सचा मागचा भाग टाचेवर आपटून शर्ट - पॅंटवर (आणि क्वचित आतल्या बनियनवरही) चिखल माध्यमातल्या आधुनिक चित्रकलेचे एक प्रात्यक्षिक होत असे. आणि त्यामुळे घरी गेल्यावर शर्टाआधी आमची धुलाई होत असे. साहजिक आहे हो. त्याकाळी ते "पो रब पो" वगैरे प्रकार निघाले नव्हते ना. आमच्या आया बिचा-या "सनलाईट" किंवा "५०१ साबण बार" वर अवलंबून असायच्यात. आपल्या मुलांना मळक्या. डाग लागलेल्या कपड्यांनी शाळेत जावे लागू नये ही तळमळ त्या दोन्ही धुलाईंमागे असायची. त्या चपलांचा तो पांढरा बेस थोड्याच दिवसात ऑफ़ व्हाईट - तपकिरी आणि नंतर मातकट काळा असा व्हायचा. पावसाळ्यात एखाद्या स्वच्छ प्रवाहात पाय आणि त्या स्लीपर्स धुवून घेऊन त्या स्लीपर्सना त्यांचे मूळ रूप प्राप्त करून देण्याचे आमचे प्रयत्न असायचेत, नाही असं नाही. पण मुद्दाम स्लीपर्स घरी धुण्याचे लाड वगैरे होत नसत. अहो जिथे अंघोळीला आणि वापरालाच जेमतेम पाणी पुरत असे तिथे स्लीपर्स धुण्यासाठी पाण्याची उधळपट्टी कोण करणार ?


त्या स्लीपर्सचा अंगठा त्याच्या छिद्रातून निसटणे आणि त्याला रस्त्यात चालता चालता पुन्हा त्या छिद्रात टाकणे हे उद्योग तर माझ्या पिढीतल्या प्रत्येकाने केलेले असतील. काही काही स्लीपर्स खूप घासल्या जाऊन तो अंगठा त्या छिद्रात कशाही प्रकारे राहीनासा होई. अशा वेळी त्या अंगठ्यात एक सेफ़्टी पिन आडवी टाकली की काही दिवसांची निश्चिंती होत असे. एकत्र शिकणा-या सर्वांचीच आर्थिक परिस्थिती एकसमान असल्याने सगळ्यांवरच असे प्रसंग वर्षा दोन वर्षात येत असत. अशा पद्धतीने एखादी छोटी गोष्टही दुरूस्त करून वापरणे ही तत्कालीन जनरीत होती.



काळ बदलला. मुलांना युनिफ़ॉर्मचे दोन बूटस (एक चामडी आणि एक कॅनव्हासचा), बाहेर कुठे जायला एखादी सॅंडल, घरात वापरायला एखादी आधुनिक स्लीपर असे विविध जोड आलेत. नवनवीन दुकानांमधून नवनवीन कंपन्यांची छान, आरामदायक पादत्राणे उपलब्ध झालीत. स्लीपर्स घरापुरत्या मर्यादित झाल्यात की काय ? अशी भिती वाटू लागली. मधल्या काळात छान छान चपला बुटांचे प्रस्थ वाढले आणि स्लीपर्स घालून सार्वजनिक ठिकाणी वावरणे हे अगदीच मागासलेपणाचे आणि गावंढळ समजले जाऊ लागले. पण आजकाल तरूण तरूणी त्याच स्लीपर्सचे आधुनिक नामकरण "फ़्लोटर्स" असे करून त्या स्लीपर्स सुटसुटीतपणे सार्वजनिक ठिकाणी घालून वावरताना पाहिली की कालचक्राचा एक फ़ेरा पूर्ण झाल्याचे समाधान लाभते.


एक मात्र खरे. ज्या पायांनी आपण चल राहतो त्या पायांना सुरक्षा आणि आराम पुरविण्याचे काम या पादत्राणांनी केलेय पण ज्या महापुरूषांनी स्वतःच्या चालण्यासोबत आपल्यासोबतच्या समाजाला चालवले, त्यांच्या विचारांना चालवले आणि प्रगतीपथावर नेले त्या महापुरूषांची पादत्राणे नुसत्या चपला रहात नसून "पादुकां"चा दर्जा प्राप्त करतात आणि निरंतर पूजल्या जातात.


- अनेक संत सत्पुरूषांचा चरण रज आणि "पायीची वहाण, पायी बरी" या उक्तीवर स्वतःची किंमत जोखणारा रजःकण, राम प्रकाश किन्हीकर.


Tuesday, November 9, 2021

काही लुप्त झालेले व्यवसाय


एकत्र कुटुंबे दुर्मिळ झाल्यानंतर स्टील, तांब्या पितळेच्या दुकानांसमोर (क्वचित सोनाराच्या पेढ्यांसमोरही) बसणारी भांड्यांवर नाव टाकून देणारी मंडळी अस्तंगतच झाली.


आमच्या बालपणी भांड्यांच्या प्रत्येक दुकानांसमोर ही मंडळी असायचीच. पूर्वी यांच्या हातात पेनवजा छोटीशी छन्नी आणि छोटी हातोडी असायची. कालांतराने त्यांच्या हातात विजेवर चालणारे पेनसदृश हत्यार आले.

भांड्यावर नक्की काय लिहायचे ? हा मजकूर या कारागिरांना लिहून द्यावा लागे. त्यात "अमुकतमुक (आत्या/काका/ मावशी) कडून चि. ह्यास / हीस सप्रेम भेट असा मजकूर बहुधा असायचा आणि पुढे कंसात त्या समारंभाची तारीख असायची.


काहीकाही कारागीर त्या छोट्याशा छन्नी हातोड्यानेही सुंदर हस्ताक्षरात हा मजकूर लिहायचेत. बहुतांशी कारागिरांचे हे लिखाण खूप सुरेख नसले तरी सुवाच्च तरी असायचेच. या व्यवसायासाठी ही अगदी मूलभूत अट असावी हे स्वाभाविक होते.

आजही घरी कधी दिवाळीची साफसफाई करताना जुने डबे मिळतात, कधी घरी भांडी घासताना जुन्या भांड्यांवरची नावे दृष्टीस पडतात. मन त्यावर टाकलेल्या दिवशी जाते. आप्तांची आठवण निघते. आप्त दिवंगत असतील तर डोळ्यांच्या कडा ओलावतातही. त्या चहा साखरेच्या डब्ब्यांवरच्या, एखाद्या पातेल्यावरच्या साध्याशा नावांमध्ये आपल्याला त्या काळात नेऊन, त्या आप्ताशी भेट करून देण्याचे कालातीत असे अफाट सामर्थ्य असते.

एकत्र कुटुंब पध्दती हळुहळू लयाला गेली. लग्न व इतर समारंभांमध्ये भांडीकुंडी भेट म्हणून देण्याचे प्रमाण कमी झाले. आणि प्रत्येक राजाराणींच्या त्रिकोनी / चौकोनी संसारात भांड्यांवर नावे लिहून ठेवण्याची गरजही संपली. आता समारंभांमध्ये महागड्या भेटींचा आणि उगाचच्या डामडौलाचे महत्व वाढले. प्रत्येक मनुष्याला भूतकाळात साधे डोकावण्यापेक्षाही भविष्यातल्या अनिश्चिततेकडे जिवाच्या आकांताने धावणे अतिशय आवडू लागले आणि भांड्यांवर नावे टाकून देणारी, आपल्याला तात्पुरती का होईना, भूतकाळात रमवून आणणारी ही कारागीर मंडळी स्वतःच इतिहासजमा झालीत.

- बदलत्या सामाजिक स्थितीचा दूरस्थ व्यवसायांवर होणारा "butterfly effect" या सामाजिक प्रबंधातील एका सिध्दांताचे उदगाते, प्रा. राम किन्हीकर.

Thursday, November 4, 2021

भारतीय शयनयान बसेसमधले आवश्यक असे बदल.

 खालील फ़ोटोंमध्ये परदेशी बांधणीच्या डबल डेकर बसचे फ़ोटो आहेत.






परदेशी बसेस डबलडेकर असूनही त्यांची उंची जास्त नाही. तेवढी उंची आपल्याकडल्या स्लीपर कोचेसची किंवा आपल्या महाराष्ट्र एस टी ने मधल्या काळात आणलेल्या माईल्ड स्टील बसेसची असतेच असते. (आता पुन्हा आपल्या एस टी ने कमी उंचीच्या माईल्ड स्टील बसेस बांधायला सुरूवात केलीय हे चांगले पाऊल आहे.)


आपल्याकडल्या स्लीपर कोचेसमध्ये वरच्या बर्थसवर चढणे / उतरणे हे स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांना जिकीरीचे होऊन जाते. त्याऐवजी तेवढ्याच उंचीच्या डबलडेकर बसेसमध्ये खालच्या आणि वरच्या अशा दोन्ही मजल्यांवर सगळेच लोअर बर्थ उपलब्ध होतील. शयनक्षमता तेव्हढीच असेल आणि खालच्या मजल्यावर मागील बाजूला प्रवाशांचे सामानसुमान व्यवस्थितपणे रचून ठेवण्यासाठी विमानासारखा कक्षही तिथे उपलब्ध होईल. किंवा खालच्या डेकवर मागल्या बाजूला प्रवाशांसाठी विमानाच्या धर्तीवर एखाद दुसरा प्रसाधनकक्ष (शुध्द मराठीत टाॅयलेट ब्लाॅक) उपलब्ध करून देता येईल. आज बंगलोर ते जोधपूर, पणजी ते इंदूर, पुणे ते गोरखपूर अशा ३५ - ४५ तासांच्या लांब लांब पल्ल्याच्या खाजगी बसेस उपलब्ध होत असताना आरामशीर प्रवास आणि अशी प्रसाधनगृहे उपलब्ध असणार्या बसेस मिळणे हे प्रवाशांसाठी भलतेच सुखकर होईल.

राष्ट्रीय महामार्गांचा निरंतर सुधारणारा दर्जा, मार्गावरील खाण्यापिण्याच्या उत्तम दर्जाच्या सुविधा आणि खंडप्राय धावणार्या अशा बसेस हे तिन्ही घटक भविष्यातली रस्ते वाहतुकीची समीकरणे बदलायला कारणीभूत ठरतील यात शंका नाही.
जागतिकीकरणाचा रेटा पाहिला तर ही संकल्पना भारतात लवकरच येईल यात शंका नाही.

तुम्हाला गंमत वाटेल पण जालंदर येथल्या सतलज मोटर्सने अशी बस SUTLEJ Lexus या माॅडेलच्या रूपात साधारण १२ वर्षांपूर्वीच बाजारात आणलेली होती. पण कालबाह्य संकल्पनेइतकीच काळाच्या खूप पुढे असणारी संकल्पनाही स्वीकारली जात नाही. म्हणून हे माॅडेल तेव्हा यशस्वी ठरले नाही. फारसे कुठे दिसलेच नाही.
पण आज जर असे सगळ्या लोअर बर्थसचे, सुखसुविधाजनक बसचे माॅडेल आले तर ते पटकन लोकप्रिय होईल यात शंका नाही.
- लांब पल्ल्याचे बसप्रवास सतत करणारा प्रवासी पक्षी, राम प्रकाश किन्हीकर.