Saturday, January 22, 2022

विरूद्ध आहार : एक आठवण

 परवा मकरसंक्रांत झाली आणि काल महाविद्यालयात सहका-यांना वाटायला तिळगुळाचे लाडू घेऊन गेलो होतो. आता हे लाडू म्हणजे टिपीकल नागपुरी - वैदर्भी संस्कृतीतले लाडू. उगाचच पावणेतीन ग्रॅम तिळांना, दीड ग्रॅम साखरेच्या पाकात घोळवून, वर सव्वा ग्रॅम गुळाचे लिंपण करून तयार झालेल्या (बहुतांशी दुकानांमध्येच. घरी तिळगुळ करणे जरा out fashioned, down market वगैरे आहे ना, म्हणून.) लिमलेटच्या आकाराच्या दातफोड गोळ्यांना "तिळगुळ" म्हणून खपवू नये.



आणि असे लाडू सुध्दा किमान ५० + असलेत तरच मजा. आईने दररोज नवनवीन डबे बदलत लपवून ठेवलेला तिळगूळ चोरून खाण्यात जी मजा आहे ती उजागरीने असे १० - १५ लाडू खाण्यात नाही. पण आजकाल सगळ्यांचेच खाणे कमी झाले आहे. सगळ्यांच्याच तब्ब्येती नाजूक. एकेकाळी असले ३० - ३० लाडू आम्ही संक्रांतीच्या मौसमात खात असू. लाडूचा डब्बा आईला लपवून ठेवावा लागत असे. पण आज एकच लाडू पाहून एक सहकारी म्हणाले, "सर, अहो एव्हढा लाडू खाल्ला तर आम्हाला पचणार नाही हो." 

"काही नाही होत, सर. फ़क्त हा लाडू खाल्ल्यानंतर अर्धा तास तरी पाणी पिऊ नका म्हणजे झालं" आमच्या आईच्या, मावश्यांच्या पारंपारिक शहाणपणातून आमच्या कानावर आलेला पारंपारिक तोडगा मी त्यांना सुचवला. तिळगुळाच्या लाडवावर लगेच पाणी पिले तर पोटात गडबड होते हे पारंपारिक शहाणपण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवले.

असेच एक शहाणपण आम्हाला मात्र एका भयानक अनुभवातून मिळाले होते. फ़ेब्रुवारी २००९, इंदूरला परम पूजनीय नाना महाराजांच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी गेलेलो होतो. सकाळी परम पूजनीय नानांच्या घरी दर्शन घेतले. तिथे गेल्यानंतर आमच्या सौं ना तर अगदी माहेरी आल्यासारखे वाटते. परम पूजनीय नाना तिचे गुरू. त्यामुळे गुरूघरी तिला अगदी माहेरचा आनंद मिळतो.

इंदूरला आल्यानंतर दुपारी सराफ़्यातून एक चक्कर मारत खास इंदूरची खादाडी करणे आणि संध्याकाळी एक चक्कर छप्पन दुकान परिसरातून मारणे हा आमचा जणू शिरस्ताच झालेला आहे. परम पूजनीय नानांच्या घरीही सगळ्यांना आमच्या या सवयी माहिती आहेत आणि त्याबद्दल आमची बरीच चेष्टा मस्करीही होत असतेच. (इंदूरच्या पहिल्या भेटीतील खादाडीची हकीकत येथे) त्याप्रमाणे आम्ही दुपारी ३ च्या आसपास सराफ़्यात चक्कर मारायला निघालो.

सराफ़्यात यावेळी तो जोशी काकांकडला बहुचर्चित "भुट्टेका कीस" खायचा होता. तिथे दुपारी गर्दीही नव्हती. चांगल्या दोन प्लेट भुट्टेका कीस सोबत तिथली आलु कचोरी पण मस्त चापली. (बाकी त्या "भुट्टेका कीस" चे वर्णन "मक्याच्या कणसांचा फ़ोडणीचा कीस" असे करणे म्हणजे पुलंच्याच भाषेत आपल्या आईची ओळख "आमच्या बाबांची वाईफ़" असे करून देण्यासारखे आहे. नाही, technically ते बरोबर असेलही पण कुठल्याच संस्कृतीत बसत नाही. आणि माळव्याच्या खवय्या आणि गवय्या संस्कृतीत तर नाहीच नाही.) 

सरत्या दुपारी असा दोन तीन प्लेट नाश्ता केल्यानंतर संध्याकाळी छप्पन दुकान परिसरात खाण्यासारखे विशेष असे काही नव्हतेच. नागपूरला परतीची गाडी चांगली रात्री ९.३० ची होती. मध्ये भरपूर वेळ होताच. तरीही संध्याकाळी छप्पन दुकानाच्या कोप-यावरच्या रबडीचा मोह मला आवरला नाही. सुपत्नीचे पोट पूर्ण भरलेले होते त्यामुळे तिने रबडी खाण्यास नकार दिला. आमचे पिल्लू तर अगदीच छोटे होते. तिचा इवलासा पोटोबा तर कधीच भरला होता. मी एकट्यानेच कुल्हड मधून आलेली ती मस्त घट्ट रबडी चापली. रात्रीचे फ़ॉर्मल जेवण वगैरे करण्याच्या भानगडीत आम्ही पडलोच नाही.

रात्री ९.३० ला गाडीत बसलो. झोपीही गेलो. सुपत्नी आणि सुकन्या वरच्या बर्थसवर आणि मी खालच्या बर्थवर असे आम्ही त्या द्विस्तरीय वातानुकूल शयनयान डब्यात गाढ झोपी गेलो. प्रवासात रात्री साधारण २ ते २.३० च्या सुमारास, गाडी भोपाळ ते इटारसीच्या मध्ये बुधनी घाटात होती. मला जाग आली आणि जाणीव झाली ती तीव्र पोटदुखीची. बरे, ही पोटदुखी भुकेमुळे होती (रात्री जेवण न करता असेच सटरफ़टर खाऊन आम्ही निघालो होतो ना ?) की पोटात अन्न जास्त झाल्यामुळे होती हे मला कळेना ? वपु काळे म्हणतात की "खर्च झाल्याचे वाईट वाटत नाही, हिशेब लागला नाही की त्रास होतो." तसे मला आपल्याला काही शारिरीक दुःख झाल्याचा त्रास होत नाही फ़क्त ते का झाले ? या प्रश्नाचे माझे मलाच उत्तर मिळाले नाही की त्रास होतो. त्यामुळे आत्ता पोट कशामुळे दुखतेय ? हे कारण न कळणे आणि सोबतच दुखणारे पोट अशा दुहेरी त्रासात मी आपले मन रमविण्याचा प्रयत्न करू लागलो. खिडकीचा पडदा बाजूला करून त्यादिवशीच्या चंद्रप्रकाशात सुंदर घाटातल्या प्रवासाचा आनंद घेण्याचा, त्यात मन रमविण्याचा प्रयत्न करू लागलो. पण छे !

मग नाईलाजाने वरच्याच बर्थवर झोपलेल्या सुपत्नीला उठवले. माझ्यासारखीच ती ही एक परिपूर्ण प्रवासी पक्षी असल्याने प्रवासाच्या तयारीत प्रवासात लागणारी सर्वसाधारण सगळीच औषधे ती बॅगमध्ये भरत असतेच. तिच्याकडून पुदीन हरा गोळी मागून घेतली आणि ती गोळी घेऊन पुन्हा खालच्या बर्थवर पडून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो.

पण छे ! सकाळी ८.३० ला नागपूर येईपर्यंत झोप लागली नाहीच. पोटदुखी सुरूच होती. तीव्रता कमी झाली होती एव्हढच पण दुखणे पूर्णपणे थांबलेले नव्हतेच हे ही खरेच. घरी पोहोचलो आणि स्वच्छतागृहाच्या सतत वा-या सुरू झाल्यात. या वा-या नागपूरपर्यंतच्या प्रवासात सुरू झाल्या नाहीत याबद्दल निसर्गाचे आभार मानावेत ? की या सततच्या वा-यांमुळे गळून जाण्याच्या भावनेची चिंता करावी ? अशा द्विधेत मी सापडलो. घरी आईला सगळा प्रकार कथन केला आणि मग या त्रासाचा उलगडा झाला. मका आणि दूध असा विरूद्ध आहार मी (अजाणतेपणी का होईना) घेतलेला होता आणि त्याची पावती लगेच मला प्राप्त झालेली होती. तेव्हापासून विरूद्ध आहाराच्या बाबतीत मी जागरूक झालो आणि स्वतः तर टाळायला लागलो्च शिवाय मित्रांना, परिचितांनाही त्यापासून परावृत्त करायला लागलो. थोडा त्रास झाला खरा पण नक्की त्रास कशामुळे झाला ? या शंकेचे निरसन झाले आणि ज्ञानात नवीन भर पडली याचा आनंद त्रासाहून मोठा होता.


- जमेल तेव्हढ्या आयुर्वेदिक पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करणारा भारतीय, राम प्रकाश किन्हीकर.


दुरितक्षय

 आपण Outcomes Based System अगदी पुराणकाळापासून आपल्या आयुष्यात आचरलेली आहे. अगदी रोज प्रातःसंध्या करताना "मम शरीरशुद्ध्यर्थम भस्मधारणम अहम करिष्ये" हा संकल्प सोडून आपण भस्मधारण करतो. भस्मधारण का करतोय हे आपण आधीच जाहीर करीत असतो.

तसाच आणखी एक संकल्प म्हणजे "मम उत्पत्त दुरितक्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रातःसंध्या / सायंसंध्या अहम करिष्ये." म्हणजे माझ्याकडून जे काही दुरित झाले असेल त्याचा क्षय होण्यासाठी मी ही प्रातःसंध्या / सायंसंध्या करतोय हे Objective.

याचा आणखी खोलवर विचार करीत असताना माझ्या मनात आले की आपण सगळे सर्वसामान्य संसारी माणसे असे कुठले "दुरित" निर्माण करतोय की ज्याच्या नाशासाठी आपल्याला ही प्रार्थना रोज करावी लागते?

 याचा सूक्ष्म विचार केल्यावर लक्षात आले की आपण दुसर्या कुठल्या व्यक्तीचे मन कलुषित केले आणि त्या व्यक्तीला त्यामुळे त्रास झाला तर ते दुरितच. आपल्या कानभरण्यामळे  पती- पत्नीत, भावा - भावांमध्ये, जावा - जावांमध्ये, आई- मुलांमध्ये वितुष्ट आले तर ते आपले दुरितच. आणखीही एक सूक्ष्म विचार म्हणजे आपण जर कुणाविषयी आपल्या मनातल्या मनात जरी ईर्ष्या, व्देष करीत असू तरी ते आपल्याव्दारे या विश्वात निर्माण झालेले दुरितच.

 जर हे दुरित जर सगळ्यांच्याच मनातून नष्ट होणार असेल तर आपले जग सुंदर व्हायला किती वेळ लागणार आहे ?

 ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की आपल्याकडून अजाणतेपणी जर काही चुकीची गोष्ट झाली असेल तर आपल्याला कळल्यावर आपल्याला पश्चात्ताप झाला तर आपली कर्मशुध्दी होईल. पण कळत असताना, जाणतेपणी तरी, आपण हे दुरित वाढवू नये. आपल्याच मनाचा सूक्ष्म विचार करून हे दुरित आपल्या मनात निर्माणच होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे तर आज आपल्या हातात आहे ना ?

 आपण सर्व धार्मिक म्हणवणार्यांनी जर यादृष्टीने दृढ संकल्प केला तर माऊलींचे " दुरिताचे तिमिर जावो" हे स्वप्न साकार करण्यात आपलाही सक्रिय हातभार लागेल, नाही का ?

 - केवळ मनाच्या सूक्ष्म विचारांतून चित्तशुध्दी साधता येऊ शकेल या दृढ विचारांचा

विनोबाभक्तरामोबा किन्हीकर.

Friday, January 21, 2022

गार्ड व्हॅन आणि तिचे गारूड

 बालपणी घरी आलेल्या पाहुण्यांपैकी कुणी विचारलं की बाळा, मोठेपणी तू कोण होणार आहेस ? (त्याकाळी घरी येणारे पाहुणे राहुणे असला बिनकामाचा निरूद्देश भोचकपणा करीतच असत. कदाचित हा प्रश्न आपण विचारला नाही तर आपल्याला यजमानांकडे पाहुणचार होणार नाही अशीच सगळ्यांची प्रामाणिक समजूत असावी.)


तर आमचे उत्तर तयार असे "बस किंवा रेल्वेचा ड्रायव्हर नाहीतर कंडक्टर." बसचे, रेल्वेचे प्रेम, वेड हे असे अगदी बालपणापासूनच.


ड्रायव्हरकाकांची ती बसमध्ये बसण्याची ऐट, बसल्यानंतर ड्रायव्हर केबिनचे दार लावून घेतल्याचा तो सुंदर आवाज, कंडक्टर साहेबांचा तो अधिकार, बस फलाटाला लागल्यालागल्या "८ ते ३५ सगळे रिझर्व आहेत, तेवढे सोडून बाकी सीटसवर बसा" अशी घोषणा करण्याचा रूबाब हे सगळे आमच्या बालमनाला भुरळ पाडणारे होते.


तसेच रेल्वेच्या ड्रायव्हरकाकांचा अधिकार, गार्डकाकांचा तो ड्रेस, त्यांच्या शिट्टीची (एवढी मोठी गाडी हलवून टाकण्याची) ताकद हे सगळं अप्राप्य वाटण्याजोगे असायचे.



या मालगाडीच्या गार्डाच्या डब्ब्याचे मात्र भीतीवजा कुतुहल आमच्या मनात असायचे.  शोले सिनेमात दाखवली तेवढ्यापुरतीच ही गार्ड व्हॅन आम्ही आतून बघितली होती. त्या व्हॅनमधून कायम एकटेच प्रवास करणारे गार्ड काका, रात्री बेरात्री गाडी एखाद्या आडबाजूच्या स्टेशनच्या आऊटर सिग्नलला थांबल्यावर दूर जंगलात कुठेतरी उभी असणारी ही गार्ड व्हॅन, तिच्यातले ते एकटे गार्ड काका, शोलेत दाखवल्याप्रमाणे तिच्यावर कधीही डाकूंचा हल्ला होऊ शकण्याची vulnerabilty (वास्तविक त्या गार्ड काकांकडे लुटण्याजोगे काहीही नसते. रेल्वेचे एक रजिस्टर, ज्यामधे ते प्रत्येक स्टेशनाच्या, मार्गात लागलेल्या रेल्वे फाटकांचा काहीतरी हिशेब ते सतत लिहीत असतात, आणि त्या गार्डकाकांची शिधा वगैरे असलेली, एक भलीमोठी ट्रंक बस्स. गाडीवर धाडसी हल्ला करून हा ऐवज पळवून नेणारा डाकू म्हणजे विरळाच.) या सगळ्या बाबींमुळे या डब्यातून प्रवास करावासा तर वाटे पण हिंमत होत नसे. 


त्या मिणमिणत्या कंदीलाचा प्रकाशात धावत्या गाडीत मार्गातल्या प्रत्येक स्टेशनांवर आणि फाटकांवर काहीतरी नोंदी करत राहण्याचे काम किती अवघड आहे हे जावे त्या वंशा तेव्हा कळे. मी तसा ड्रायव्हर काकांना विनंती करून एकदा महाराष्ट्र एक्सप्रेसच्या एंजिनमध्ये मनमाड ते भुसावळ असा प्रवास केलेलाही आहे. (लेखाची लिंक इथे) पण या गार्ड व्हॅन मधून प्रवास करण्याची खूप इच्छा असतानाही त्या डब्यातल्या गूढरम्य वातावरणामुळे तशी पृच्छा त्या गार्डकाकांना आम्ही कधीच करू शकलो नाही हे वास्तव आहे.


- स्वप्ने पुरी करण्यासाठी प्रयत्न करत राहणारा पण सगळीच स्वप्ने पूर्ण झालीच पाहिजेत हा अट्टाहास नसणारा एक अनुभवी रेलफॅन, राम.


Sunday, January 9, 2022

संकल्प, तो घेणे, मोडणे, त्याची पूर्ती : एक सहज प्रक्रिया.

 दरवर्षी ३० किंवा ३१ डिसेंबर ही तारीख आली की बहुतांशी संवेदनशील माणसांच्या मनात नववर्षात घेण्याच्या संकल्पांचा विचार सुरू होतो. १ जानेवारीपासून आचरणात आणण्याचे अनेक संकल्प योजिले जातात. 

बरे हे संकल्प तरी काय काय असतात ते बघूयात. 

१. नियमीत व्यायाम करणे, अमूक एक अंतर रोज फ़िरायला जाणे.

२. रोज डायरी लिहून त्यात दिनचर्या लिहीणे.

३. रोजचा खर्च कसोशीने लिहीणे. महिन्याअखेर, वर्षाअखेर त्याचा आढावा घेऊन खर्चात अनावश्यक खर्च ओळखणे आणि त्यावर योग्य ते  उपाय करणे.

४. रोज एखाद्या तरी ग्रंथाचे वाचन करणे

वगैरे वगैरे. काही काही व्यसनी मंडळी ते ते व्यसन सोडण्याचाही संकल्प करतात.

१ जानेवारीला थाटात संकल्पांना सुरूवात होतेही. यातील ब-यापैकी संकल्प पहिल्या आठवड्यातच कोलमडतात. मग निराशा मनी दाटून राहते. "पुढल्या वर्षी संकल्पच नको" अशी मनोधारणा मनात उमळून येते.

काही काही संकल्प मात्र अगदी पूर्वीपासून मनात योजिल्या जातात. आणि ते सुद्धा अगदी अपघाताने. उदाहरणार्थ. आपल्या ऑफ़िसमध्ये काम करणारी एखादी व्यक्ती नोव्हेंबरमध्ये एखाद्या कार्यालयीन चर्चेत सहज बोलून जाते, "आजपर्यंत या वर्षात आपल्या ऑफ़िसमध्ये माझा एकही लेटमार्क झालेला नाही." झालं. मन एकदम उसळी खातं. "पुढल्या वर्षी आपलाही एकही लेटमार्क नको." असा मनातल्या मनात संकल्प घेतल्या जातो. 

बरे, या अगदी निरूपद्रवी संकल्पाला सुरूवात छान होते. २ जानेवारी, ३ जानेवारी आपण अगदी वेळेच्या १५ मिनीटे आधी आपल्या ऑफ़िसमध्ये पोहचतोही. (जशी नवीन सायकल घेतली की पहिल्या दिवशी आपण तिचे स्पोक्ससकट टायर पुसतो. तसेच या नव्या संकल्पाचे लाड होतातही) ४ जानेवारीला आपल्यालाच घरून निघायला फ़क्त ५ मिनीटे उशीर होतो. मध्येच एका ठिकाणी ट्रॅफ़िक जॅम लागतो. आपण ऑफ़िसमध्ये फ़क्त १ मिनीटेच लवकर पोहोचतो. तोपर्यंत रोज पंधरा मिनीटे लवकर पोहोचण्याचा आपला दंडक (फ़क्त मागल्या २ दिवसांचाच हं) ) आपल्याला आज फ़क्त १ मिनीटेच लवकर पोहोचणे हा आपला पराभव वगैरे वाटतो.

५ जानेवारीला मात्र आपल्याला घरून निघायला चक्क दहा मिनीटे उशीर होतो. कालचा अनुभव लक्षात घेऊन आपण मनातल्या मनात गृहीतक मांडतो की आज तर आपल्याला नक्की उशीर होणारच. मग आपला संकल्प आज मोडणारच अशा भितीपोटी आज सुट्टी टाकण्यापर्यंत आपला विचार जातो. सुट्टी घ्यायची की संकल्प मोडू द्यायचा ? या मानसिक व्दंव्दात आपण अडकतो. अशावेळी आपली चिड्चिड होते. एकदा असा संकल्प मोडला तर "संकल्पच नको" अशी नकारात्मक मनोधारणा व्हायला सुरूवात होते. 

हे सगळे मी आज इथे विषद करतोय कारण मी स्वतः या सगळ्या व्दंव्दांमधून बरीच वर्षे गेलेलो आहे. पण त्यातून परमेश्वरी शक्तीने मानसिक शक्ती दिली. त्या व्दंव्दांवर मात करण्याची बुद्धी दिली. आज संकल्प मोडला तर चिडचिड आटोक्यात आणून "संकल्प का मोडला ?" याच्या कारणांचा शोध घेण्याची बुद्धी, स्वतःचे कठोर आत्मपरिक्षण करण्याची शक्ती आणि काहीकाही गोष्टींमध्ये स्वतःला माफ़ करण्याची सोपी युक्ती त्या ईश्वरीसत्तेनेच दिली. अनेक वेळा स्वतःचे संकल्प मोडलेत तरी पुनर्विचार करून नव्या जोमाने ते संकल्प पूर्णत्वास गेलेले मी बघितले आहे. पुलंच्या "तुझे आहे तुजपाशी" त जगण्याचा नवा दृष्टीकोन सापडलेले आचार्य शेवटी काकाजींना म्हणतात ना, की "काकाजी, तुम्ही शांतीचा उपदेश करताय कारण तुम्हाला तो अधिकार आहे. जगण्यातली सगळी मजा अनुभवून तुम्ही ती शांती मिळवली आहे." तसा अनेक संकल्प मोडलेत तरी नव्याने संकल्प करून ते चांगले तप तप भर चालवण्याचा अनुभव असलेला मी सुद्धा या क्षेत्रातल्या उपदेशाचा अधिकारी "काकाजी"च म्हटला पाहिजे.  

आज संकल्प मोडला तर पुढचा मुहूर्त शोधून ठेवूयात. मागचा संकल्प का मोडला ? याचे आत्मपरिक्षण करूयात, झालेल्या चुका दुरूस्त करूयात. आपला संकल्प तर अगदी आपल्या आवाक्याबाहेरचा, क्षमतेबाहेरचा तर नाही ना ? याचाही प्रांजळपणे शोध घेऊयात. आवाक्याबाहेरचा संकल्प असेल तर आपल्या आवाक्यातला संकल्प घेऊयात. आणि हळूहळू आपला आवाकाही विस्तारत नेऊयात. म्हणजे यावर्षीचा संकल्प पुढल्या वर्षी आपल्या खरोखर आवाक्यातही येईल आणि पूर्णत्वासही जाईल.

दरवर्षी एकदाच १ जानेवारी येते पण अशी मनोवृत्ती असलेल्या व्यक्तींसाठी १ जानेवारीनंतर येणारा प्रत्येक नवा मुहूर्त (मग तो १ जानेवारीनंतर येणा-या दुस-या आठवड्यातला सोमवार सुद्धा असू शकतो. १२ जानेवारीचा युवक दिवस असू शकतो, आपला गणराज्य दिवसही असू शकतो, मकर संक्रांत, रथसप्तमी, काहीही असू शकतो. अहो आपल्याला मुहूर्तांना काय कमी असते का कधी ?) नवा संकल्पदिवस ठरेल नाही का ?

- नववर्षींच्या संकल्पांबाबत सरळसाधा उपदेश करण्याचा अधिकार कमावलेला काकाजी, रामूभैय्या नागपूरकर.


Monday, January 3, 2022

पन्नाशीला बॅग भरा....साठीला घराबाहेर पडा.

श्री. विवेकजी घळसासींना मी पहिल्यांदा 2009 मध्ये ऐकले. आमचे सदगुरू परम पूजनीय बापुराव महाराजांकडे त्यांच्या अमृतवाणीतून श्रीरामकथा ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. (त्याबद्दलची सविस्तर पोस्ट इथे.) त्यानंतर पुढच्या वर्षी लगेच त्यांच्याच मुखातून त्याच स्थानावर श्रीमदभागवत कथेचे श्रवण घडले. नंतरही त्यांच्या अनेक व्याख्यानांना आम्ही सहकुटुंब हजेरी लावली. दरवेळी त्यांच्या प्रतिपादनातून एक नवा विचार मिळत गेला. जीवन आखण्याचा, जगण्याचा एक नवा आणि प्रॅक्टीकल विचार. जे विचार अंमलात आणणे शक्य होते आणि असे विचार जे अंमलात आणल्यानंतर स्वतःसाठी आणि आसपासच्या समाजासाठीही सदैव श्रेयस्कर होते.

अशाच एका प्रवचनात त्यांचा एक विचार मनाला फ़ार भावला. "आयुष्यात पन्नाशीला बॅग भरा आणि साठीला घराबाहेर पडा." म्हणजे पन्नाशीत आल्यानंतर आपला बाह्य विश्वाचा पसारा आवरता घ्या आणि साठीला घरातून मनाने बाहेर पडा. घरात फ़ार लक्ष घालू नका. मुला-सुनेला, मुली-जावयांना त्यांचा त्यांचा संसार करू द्या. तुम्ही त्यांचे संसार करत बसू नका.
आपल्या संस्कृतीत वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम आहे तो याचसाठी. एखाद्या वानप्रस्थी व्यक्तीचे मार्गदर्शन हे त्या वानप्रस्थी व्यक्तीला सल्ला विचारल्यानंतरच मिळायला हवे. अन्यथा नाही. माझी मुले - मुली आपापला संसार करीत असताना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार आणि त्या त्या कालमानानुसार निर्णय घेत असतील तर त्यात माझ्या उपदेशाची लुडबुड नको हा वानप्रस्थी व्यक्तींनी पाळायचा छान दंडक होता. दुस-यांच्या संसारात मार्गदर्शन आणि लुडबुड यातला फ़रक आपल्या पूर्वजांना चांगलाच माहिती होता. आज आपण एखाद्याला "space देणे" म्हणतो तो प्रकार आपल्या संस्कृतीत पूर्वीपासूनच होता हो. मधल्या काळात आपणच परकीय मानसिक आक्रमणाच्या प्रभावाने त्यात फारच फेरफार केलेत.
संन्यासी व्यक्तींचा अधिकार हा सार्वभौम राजापेक्षाही जास्त असायचा तो याचमुळे. कारण एक संन्यासी जे बोलेल ते अत्यंत व्यापक समाजहितासाठीच असेल असा विश्वास सर्वजणांना असायचा. इथे संन्यासी म्हणजे केवळ वेषधारी संन्यासी नव्हे तर मनाने संन्यास ग्रहण केलेला संन्यासी. मग अशी व्यक्ती आपापल्या मुलाबाळांच्या संसारात अलिप्तपणे राहू शकते. आपल्या देहासकट या जगातल्या कशावरच आपला अधिकार नाही या भावनेने आयुष्य जगत राहू शकते. आपल्या अनुभवातून समग्र जगाचे कल्याण कसे होईल ? याचाच सदैव विचार करत राहू शकते. आणि आपल्या विचारांनेच या जगाने चालावे या अट्टाहासाशिवाय निर्मळ, निर्मम आयुष्य जगू शकते. त्यासाठी त्या व्यक्तीने वनात वास करण्याची सक्ती नाही. म्हणून आयुष्याच्या पन्नाशीला पसारा आवरता घ्या आणि तरच साठीला मनाने घराबाहेर पडू शकाल. कारण 50 वर्षेपर्यंत ज्या आसक्तीने आपण जगत असतो ती आसक्ती एकदम, एका क्षणात विरून जाणार नाही.
आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे दोन दिवसांपासून असलेल्या जबरदस्त थंडीने माझे अकडलेले गुडघे. थोडा वेळ हालचाल झाली नाही तर लगेच ते दुखायला लागत. हा अनुभव अगदी गेल्या दोन दिवसांपासूनच मला यायला लागला आहे. आजवर हा अनुभव केवळ दुस-यांकडून ऐकला होता आता स्वानुभव झाला. मला वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर हा अनुभव आला.
राजा दशरथाला कानावर रूपेरी केस दिसायला लागल्यावर स्वतःच्या म्हातारपणाची जाणीव होत, लगेच प्रभू श्रीरामांना राज्याभिषेक करण्याची आवश्यकता जाणवू लागली होती तसेच आज गुडघे दुखायला लागल्यावर मला पुढल्या 10 वर्षांचे संसारातून हळूहळू लक्ष काढून घेण्याचे नियोजन सुचायला लागले. वयाच्या साठीला "उरलो उपकारापुरता" असे रहायचे असेल तर या वर्षापासूनच तसे नियोजन करण्याची आवश्यकता अचानक आज वाटायला लागली. कितीही नाकारायचे म्हटले तरी निसर्ग आपल्या सर्वश्रेष्ठत्वाची जाणीव अशी करून देत असतोच. आज जर हे गुडघे दुखले नसते तर "Age is just a number" म्हणून मी बेफ़िकीरीत राह्यलो असतो. पण आज या दुख-या गुडघ्यांनी श्री विवेकजींच्या शिकवणीची आठवण करून दिली.



हा फ़ोटोही श्री विवेकजींच्या श्रीमदभागवतकथेत श्रीकृष्णजन्माच्या वेळी मी नंदबाबांची एक छोटी भूमिका केली होती त्यावेळेचा आहे. आजपासून जवळपास दहा वर्षांनी आपल्याला नंदबाबांसारखेच आनंदी, समृद्ध पण विरक्त असे सार्थक जीवन जगायचे आहे ही ती जाणीव.
किती सुखद आहे नाही ही जाणीव ?
- सध्या वेषधारी असलो तरी कधीतरी खराखुरा नंदबाबा बनण्याची आकांक्षा असलेला, जवळजवळ वानप्रस्थी, रामभाऊ.

Sunday, January 2, 2022

महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 3 (खान्देश)

महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 1 (विदर्भ)

महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 2 (मराठवाडा)


खान्देश हा अगदी पहिल्यापासून रेल्वेच्या मुख्य रेल्वे मार्गावर आहे. मुंबईवरून पूर्वेकडे आणि उत्तरेकडे जाणा-या गाड्या भुसावळ (जं) इथूनच आपापला मार्ग बदलतात. भुसावळ (जं) ला ९९ % गाड्या थांबतातच. भुसावळला रेल्वेची क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थाही आहे. जळगाव वरून जळगाव - उधना - सूरत असा आणखी एक महत्वाचा मार्गही आहे पण खान्देश म्हणाल तर रेल्वेच्या बाबतीत फ़ारसा पुढारलेला म्हणता येणार नाही. गेल्या ३ - ४ वर्षात जळगाव - सूरत मार्गाचे दुहेरीकरण झालेय खरे आणि चाळीसगाव - धुळे मार्गावर पॅसेंजर ऐवजी डेमू लोकल चालायला लागली एव्हढाच फ़रक पडलाय. पण दुहेरीकरण होऊनही जळगाव - सूरत मार्गावर गाड्या फ़ारशा वाढल्या नाहीत. खान्देशाला त्याचा फ़ारसा फ़ायदा नाही तो नाहीच.



1. मागील लेखात प्रतिपादन केल्याप्रमाणे जर सोलापूर - औरंगाबाद - चाळीसगाव हा मार्ग अस्तित्वात आला तर खान्देशला तो जास्त लाभदायक ठरू शकेल.


2. मनमाड - मालेगाव - धुळे - इंदूर या मार्गाविषयी घोषणा तर झालीय पण सर्वेक्षणही गेल्या दोन वर्षात पुढे सरकलेले नाही. महाराष्ट्रातील इतर प्रकल्पांचा अनुभव लक्षात घेता हा प्रकल्प किमान २० वर्षे घेणार अशीच चिन्हे दिसत आहेत. खरेतर शिरपूर नंतर सातपुडा पर्वत रांग आणि इंदूरजवळ विंध्य पर्वत रांग हा या मार्गातला अडथळा ठरायला नको. डोगरद-यांमधून रेल्वेमार्ग बांधणीचे नवे तंत्रज्ञान आज भारतीय रेल्वेकडे आहे त्याचा पूर्ण उपयोग याठिकाणी व्हायला हवाय आणि हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हायला इथल्या लोकप्रतिनिधींनी जोर लावायला हवाय. 



3. नाशिक - डहाणू रेल्वेमार्गाविषयी सुद्धा सर्व लोकप्रतिनिधींनी दबावगट बनविणे आवश्यक आहे. पुणे - नाशिक - डहाणू हा रेल्वेमार्ग मुंबई उपनगरीय रेल्वेवरचा अतिरिक्त ताण कमी करणारा महत्वाचा दुवा ठरेल. पुणे - अहमदाबाद, पुणे - राजकोट, पुणे - दिल्ली या गाड्या कल्याण - कोपर - भिवंडी - वसई मार्ग टाळून मुंबईवरचा उपनगरीय वाहतुकीचा ताण दूर करतील.


4. जळगाव - उधना मार्गावरील दोंडाइचा पासून शहादा - खापर - देढियापाडा - राजपिपला - वडोदरा असा थेट मार्ग या आदिवासी भागाचा उद्धारकर्ता ठरू शकेल. या मार्गावर शहाद्याआधी सारंगखेड्याला तापी नदी आणि राजपिपलानंतर नर्मदा नदी ओलांडावी लागेल पण आता पूल बांधणीचे तंत्रज्ञान ब-यापैकी प्रगत झालेले आहे त्यामुळे चिंता नसावी. पण या रेल्वेमार्गामुळे महाराष्ट्रातल्या कायम उपेक्षित अशा या भागाचा विकास साधला जाऊ शकेल. जमल्यास हा मार्ग नवीनच तयार झालेल्या केवाडिया स्टेशनला सुद्धा सहज जोडता येऊ शकेल आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी पूर्व भारतातून जाणा-या प्रवाशांसाठी सूरत - वडोदरा - केवाडिया हा जवळपास २०० किमी लांबीचा फ़ेरा वाचू शकेल.



ब्रिटीशांनी रेल्वेमार्ग आखताना नद्या कमीतकमी वेळा ओलांडाव्या लागाव्यात, डोंगर फ़ोडून सरळ जाण्यापेक्षा वळसा घालून जाण्यावर जास्तीत जास्त भर दिलेला होता. त्याकाळी कदाचित आजच्या इतके प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नसेल किंवा ब्रिटीशांचा भारताच्या या सर्वांगीण विकासात तेव्हढा रस नसेल पण आज लोककल्याणकारी राज्यात तरी सर्व भौगोलिक घटकांचा आणि सर्व समाजघटकांचा विकास व्हावा ही अपेक्षा अनाठायी ठरू नये.


- महाराष्ट्राभिमानी रेल्वे प्रेमी, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.

Saturday, January 1, 2022

महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 2 (मराठवाडा)

 यापूर्वीच्या या लेखात प्रतिपादन केल्याप्रमाणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठवाडा हा निझामाच्या ताब्यात होता. आणि त्यामुळे मराठवाड्यातले बहुतांशी रेल्वेमार्ग निझाम स्टेट रेल्वेच्या अखत्यारित येत होते. आजही सिकंदराबाद येथे मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या ताब्यात मराठवाड्यातले बहुतांशी मार्ग आहेत. त्यामुळे या भागाच्या विकासाविषयी त्यांना विशेष प्रेम असणे शक्य नाही.  मनमाड ते काचीगुडा या संपूर्ण मार्गाचे रूंदीकरण व्हायला इसवीसन १९९८ उजाडले होते. तर अकोला ते पूर्णा मार्गाच्या रूंदीकरणासाठी २००८ पर्यंत वाट पहावी लागली होती. संपूर्ण आंध्र प्रदेश आणि तेलंगण येथे एकाच रेल्वे विभागाची सत्ता असावी म्हणून अत्यंत टोकाचे आग्रही असणारे सत्ताधारी त्या दोन राज्यात आहेत. तेलंगणात एकही किमी रेल्वे मार्ग हा मध्य रेल्वे किंवा दक्षिण - पश्चिम रेल्वेच्या अखत्यारित नाही. मग महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या विभागात सर्वच्या सर्व रेल्वेमार्ग परप्रांतियांच्या अखत्यारित का ?

 1. नांदेड विभाग हा मध्य रेल्वेत जोडला गेला पाहिजे. किंबहुना दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग, मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग, नागपूर विभाग आणि भुसावळ विभागाचा काही भाग मिळून "मध्यवर्ती मध्य (Centrally Cenral)" असा विभाग निर्माण करून त्याचे मुख्यालय अकोला किंवा औरंगाबादला ठेवावे. विभागातल्या सर्व सुदूर ठिकाणांसाठी हे ठिकाण मध्यवर्ती ठरेल.

2. जालना - खामगाव हा रेल्वे मार्गे मराठवाड्याला आणि विदर्भाला जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे हे जाणून या मार्गाच्या कार्यवाहीसाठी मराठवाड्यातील खासदारांनीही जोर लावायला हवा.


3. नगर - बीड - परळी हा रेल्वेमार्ग तर त्रेतायुगापासून होणार म्हणून ऐकत आलेलो आहे. एव्हढ्यातच तो पूर्ण झाल्याचे वृत्त वाचायला मिळाले. आनंद झाला. पण आता त्या मार्गाला काटकोनात छेद देणारा सोलापूर - उस्मानाबाद (जं) - वाशी - मांजरसुंबा - बीड (जं) - गेवराई - औरंगाबाद (जं) - वेरूळ - चाळीसगाव (जं) - धुळे (जं) असा नवीन मार्ग आखण्याची गरज आहे. दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा आणखी एक जवळचा मार्ग यानिमित्ताने उपलब्ध होईल. सध्या सोलापूर - दौंड - अहमदनगर - मनमाड - भुसावळ - खांडवा - इटारसी - भोपाळ असा जवळजवळ २०० किमी लांबीचा फ़ेरा पडतो तो या नव्या मार्गामुळे कमी होईल.

 या मार्गावर बीड जिल्ह्यात महादेवाच्या डोंगररांगा तर धुळे जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगा रेल्वेमार्गाच्या आड य़ेण्याची शक्यता आहे. पण भारतीय रेल्वे आणि स्थापत्य अभियांत्रिकीतले तंत्रज्ञान आता खूप पुढे गेलेले आहे. ब्रिटीशांनी रेल्वेमार्गांची आखणी करताना ज्या गोष्टींसाठी काही विशिष्ट रेल्वेमार्ग करण्याचे टाळले त्या गोष्टींवर आता नव्या तंत्रज्ञानाने मात करणे सहज शक्य झालेले आहे. आपण आज सहज डोंगरातून मोठमोठे पूल उभारून, मोठमोठे बोगदे खणून या नैसर्गिक अडथळ्यांवर मात करू शकतो. आता हाती असलेल्या उपलब्ध संसाधनांचा, नवीन तंत्रज्ञानाचा, प्रशिक्षित मनुष्यबळाचा विचार करून भविष्याच्या दृष्टीने हे नवे रेल्वेमार्ग आखले जायला हवे आहेत. या नव्या रेल्वेमार्गांमुळे भारतीय अभियंत्यांच्या एका पूर्ण पिढीला काम मिळू शकते आणि इतर अनेक उद्योगांना आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला या रेल्वेमार्गामुळे चालना मिळू शकते हे लक्षात घेऊन नव्या रेल्वेमार्गाची आखणी व्हायला हवीय.

4. असाच आणखी एक रेल्वेमार्ग म्हणजे औरंगाबाद - अहमदनगर - पुणे हा रेल्वेमार्ग. जुन्याकाळी नद्यांवर पूल बांधण्याचे तंत्रज्ञान फ़ारसे प्रगत नसल्याने व त्यावर खर्च करण्याची ब्रिटीशांची इच्छा नसल्याने एखादी नदी न ओलांडता तिच्या काठाकाठाने ब्रिटीशांनी रेल्वेमार्ग आखले होते. भीमा नदी एकदाच ओलांडण्यासाठी, औरंगाबाद जिल्ह्यातली गोदावरी नदी ओलांडणे टाळण्यासाठी, शिरूर परिसरात असलेली कठीण भूगर्भशास्त्रीय रचना (Dykes and fractures) टाळण्यासाठी ब्रिटीशांनी पुण्यावरून आग्नेयेकडे भीमा नदीच्या काठाकाठाने दौंडपर्यंत मार्ग नेऊन मग परत ईशान्येकडे तो मार्ग आणून पुणतांब्याला गोदावरी नदी ओलांडली होती. आज उपलब्ध असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे गोदावरी नदीजवळ नवा पूल करून, आणि शिरूर येथेही रेल्वेमार्गाचे बांधकाम करून औरंगाबाद - अहमदनगर - पुणे हा रेल्वेमार्ग केला तर मराठवाड्याच्या विकासाला भरपूर हातभार लागू शकेल. सध्या औरंगाबादवरून पुण्याला जाताना दौलताबाद - नगरसूल - मनमाड - येवला - कोपरगाव - पुणतांबा - काष्टी - दौंड - केडगाव मार्गे उलटसुलट वळसा घेऊन ६० % जास्त लांबीच्या (२४० किमी ऐवजी ४१० किमी अंतराच्या) रेल्वेमार्गाने जावे लागते ते टळेल.


 
5. नगरसूल - पुणतांबा रेल्वेमार्ग हा शिर्डीसाठी सगळ्यात जवळचा रेल्वेमार्ग  होऊ शकेल. या मार्गाचीही घोषणा ऐकून बरेच दिवस झालेले आहेत. मार्ग कधी अस्तित्वात येईल ? याबाबत सगळ्याच स्तरांवर उदासीनता आहे.

6. लातूर रोड ते नांदेड या प्रवासासाठी सध्या परळी - परभणी - पूर्णा असे अकारण फ़िरून जावे लागते त्याऐवजी लातूर रोड - चाकूर - लोहा - नांदेड असा एक पर्यायी लोहमार्ग उपलब्ध व्हायला हवा आहे. हा मार्ग झाला तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र जवळच्या मार्गाने सांधला जाणार आहे. सेवाग्राम - नांदेड - लोहा - लातूर - बार्शी - कुर्डूवाडी हा सलग लोहमार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे.

खरेतर रेल्वे विकासाच्या बाबतीत आजवर सगळ्यात जास्त अन्याय मराठवाड्यावर झालाय पण मराठवाड्यातले राजकीय नेतृत्व याबाबत अनाकलनीयरित्या उदासीन राहिलेले आहे. आज रावसाहेब दानवेंच्या रूपाने रेल्वे राज्यमंत्रीपद मराठवाड्याकडे आलेले आहे. त्यांचा जास्तीत जास्त फ़ायदा मराठवाड्यासाठी करून घेण्याची सुवर्णसंधी आताच साधली पाहिजे.

 - महाराष्ट्राभिमानी रेल्वे प्रेमी, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.