२७ डिसेंबर २००८रोजी म्हणजे बरोबर ५,३०० दिवसांपूर्वी मी हा ब्लॉग लिहायला सुरूवात केली. त्यावेळी फ़ार मोठे टारगेट डोळ्यांसमोर नव्हते. फ़क्त आपण जे बसफ़ॅनिंग, रेल्वेफ़ॅनिंग करतोय ते कुठेतरी एलेक्ट्रॉनिक मेडियात साठवून असावे ही एक छोटी भावना होती. त्यापूर्वी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कुटुंबासह दक्षिण भारताचा पूर्णपणे स्वतः आखलेला आणि नियोजन केलेला यशस्वी प्रवास केलेला होता. त्या प्रवासापूर्वी सोनीचा छानसा डिजीटल कॅमेरा घेतलेला होता. त्यातून या दक्षिण भारत सहलीचे खूप सारे फ़ोटोज, व्हिडीयोज काढलेले होते. खूपसे फ़ोटोज रेल्वे व तामिळनाडू, आंध्र प्रदेश परिवहन बसेसचेही होते. त्यामुळे स्वतःला व्यक्त करता यावे म्हणून हे माध्यम निवडले.
पहिले दोन वर्षे ब्लॉगला जेमतेम शंभर व्ह्यूज मिळाले. लिखाण कमी होते आणि संगणकावर मराठी लेखन करणे मी साधारण 2 वर्षांनी शिकलो त्यामुळे तोवर ब्लॉग्ज आणि त्यांचे विषयही मर्यादित होते. तेव्हा ब्लॉग शेअर करायला फ़ेसबुकसारखे प्रभावी माध्यमही नव्हते.
हळुहळू मराठीत लिहायला लागलो, विषयही वाढलेत, ब्लॉग्जची संख्याही वाढली, शेअर करायला फ़ेसबुक, व्हॉटसॲपसारखी प्रभावी माध्यमेही तोवर स्थिरावली होती. ब्लॉग्ज लिहायला लागलो, शेअर करायला लागलो, वाचकसंख्या वाढत गेली.
२०१२ मध्ये नागपूर सोडून सोलापूर जिल्ह्यात सांगोला येथे अध्यापनासाठी गेलो. नवीन महाराष्ट्राशी परिचय झाला. नवे अनुभव, नवे जीवन. लिखाण बहरले. त्यानंतर दोन वर्षातच धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे अध्यापनासाठी गेलो. तिथेही नवी संस्कृती यांच्याशी परिचय झाला. खूप जीवनानुभव आलेत. जीवनाला भिडलो. सगळं सगळं लिखाणात उमटत होतं. वाचकांपर्यंत पोहोचत होतं. त्यांचा प्रतिसाद, प्रेम मिळत होतं.
दरवर्षी साधारण १९,००० ते २०,००० वाचकसंख्या ब्लॉगला मिळत होती. मी स्वतः आकडेवारीत, गणितात रमणारा माणूस आहे. या श्रेणीने यावर्षी साधारण डिसेंबरपर्यंत एकूण २,००,००० होईल असा माझा अंदाज होता. पण यावर्षी १२ जूननंतर ब्लॉगला दररोज १,००० ते १,५०० वाचक ब्लॉगला मिळायला लागलेत. थोडा अजून शोध घेतला असता कुणीतरी सिंगापुरी वाचकच यातले ९० % व्ह्यूज देतोय ही माहिती मिळाली. संपूर्ण वर्षाचा कोटा जून महिन्यानेच पूर्ण केला आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ब्लॉगची वाचकसंख्या २,००,००० झाली.
याबद्दल सर्व वाचकांचे, माझ्यावर, माझ्या लिखाणावर प्रेम करणा-यांचे मनापासून आभार. तुमचे प्रोत्साहन, तुमची शाबासकी माझा लेखनहुरूप सतत वाढवत असते. लेखनातून मी स्वतःला मुक्तपणे व्यक्त करीत, स्वतःलाच मोकळा करीत असतो. त्यामुळे माझ्या चांगल्या लेखनाचे श्रेय हे काही अंशी तुम्हा सर्व वाचकांचेही आहे.
यानिमित्ताने माझे काही काही खास ब्लॉग्ज आपल्यासाठी सादर.
असाच लोभ असू द्यात ही नम्र विनंती.
- आपला नम्र प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
२. नोकरी शोधण्यासाठी केलेले
दोन प्रवास. महाराष्ट्र एस. टी. चा मी यासाठी कायम ऋणी असेन.
४. अध्यात्मावरचे थोडे
चिंतन
७. एस. टी. वर पोटतिडीकेने लिहीलेला आणि जाणकारांनी खूप नावाजलेला
हा लेख.
८. माझ्यातल्या एका "वल्ली"चा
प्रवास.
९. माझ्या बालपणीची, आईवडिलांची एक रम्य
आठवण.