समर्थ रामदास स्वामींचा एक अभंग आहे.
Wednesday, August 30, 2023
दुःख हरले जन्माचे
Sunday, August 27, 2023
प्रवासी पक्षाचे गाणे
गाडीने दूर पल्ल्याच्या प्रवासाला निघायचे असते. आदल्या रात्री लवकर निजानिज झालेली असते. सामानाच्या बॅगा भरून तयार असतात. आजवरच्या माझ्या सगळ्या प्रवासांमध्ये सामानाच्या बॅगा नीट आणि अचूक भरण्याचे काम माझे वडील आणि लग्नानंतर माझ्या सुपत्नीने केलेले आहे. या दोघांचेही बॅगा भरणे बघितले म्हणजे ती एक कला आहे आणि ती कला आपल्याला अवगत होऊ शकणार नाही ही जाणीव पक्की होते. त्याच बरोबर अत्यंत आवश्यक तयारी म्हणजे ड्रायव्हरसाहेबांच्या आवडीची सगळी गाणी पेन ड्राइव्हमध्ये किंवा सीडीज मध्ये घेऊन, क्रमवार लावून तयार असतात. स्वतःची गाडी घेतल्यावर नक्की काय काय चैन करायची ? या माझ्या विचारक्रमांमध्ये स्वतःच्या आवडीची गाणी ऐकत त्या नादात ड्राइव्ह करायचे या चैनीचा क्रम पहिल्या तीनात होता.
पहाटे पहाटे लवकर आन्हिके आटोपून आम्ही प्रस्थान ठेवतो. आज जवळपास सातशे ते आठशे किलोमीटरचा प्रवास करायचा असतो. प्रवासाचे, त्यातल्या थांब्यांचे नियोजन आदल्या दिवशीच चर्चा करून आम्ही पक्के केलेले असते. त्यानुसार पहाटे साडेचारला निघून पहिला थांबा जवळपास सकाळी अकराच्या आसपास घेण्याचे ठरले असते. मग कन्यारत्नासाठी एका झाकणबंद कपात तिचे दूध आणि बोर्नव्हिटा, आम्हा सगळ्यांसाठीच ब्रेड - बटर किंवा सॅंडविचेस किंवा शक्य असल्यास चिवडा (दिवाळीच्या आसपासच्या प्रवासांसाठी) सोबत घेतला जातो. एका छोट्या थर्मासमध्ये गरमागरम चहा घेतला जातो. सोबत कागदी कप, प्लेटस, वापरलेले कप्स, प्लेटस टाकण्यासाठी कागदी पिशवी असा सगळा जामानिमा तयार करण्यासाठी आमच्या घरच्या मिसेस परफ़ेक्ट यांची मी मदतही करतो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरातल्या विविध आकारांच्या, विविध प्रकारच्या बाटल्यांमध्ये आम्ही जवळपास वीस लीटर पाणी सोबत घेऊन निघतो. प्रवासात शक्यतो बाहेरचे पाणी पिण्याची वेळ येऊ नये म्हणून ही खबरदारी. एकदा अशाच बाहेर प्यायलेल्या पाण्यामुळे ओढवून घेतलेल्या संकटाची कथा इथे. माझा मित्र सतीश या पाण्याकडे बघून माझी चेष्टाही करतो. "अरे, तुम्ही हे पाणी प्यायला नेताय की आंघोळीला ?" पण आम्ही त्याच्याकडे हसून तो मुद्दा टोलवतो.
पहाटे प्रवास सुरू होतो. आसमंतात आता अंधार असला तरी दरक्षणाला वाढत जाणा-या प्रकाशाची आस आणि आशा आमचा उत्साह वाढवीत असते. कन्यारत्न मागल्या सीटवर पाय पसरून तिची झोपेची थकबाकी गोळा करण्याच्या मागे असते तर गाडीतल्या टेपवर भजनांना सुरूवात झालेली असते. आमचे सदगुरू श्री नाना महाराज तराणेकर यांच्या प्रभाती भजनांनी सुरूवात होते. गाणारे म्हणजे परमपूजनीय नाना महाराजांचेच नातू श्री संजयदादा तराणेकर आणि अत्यंत गोड गळ्याच्या सुरेल गायिका सौ. शुभदाताई मराठे. परम पूजनीय नाना आता आमच्यासोबत प्रवासात आहेत ही जाणीवच हा मोठा प्रवास सुखकर करणारी असते. "जागो मोहन प्यारे", "जागिये रघुनाथ कुंवर", ""ऊठ पंधरीच्या राया" पासून आमच्य सदगरूंच्या "ऊठी ऊठी बा श्री गुरूवरा मार्तंडा" ही भजने मनाचा वेध घेत जातात. नागपूरला जाण्यासाठी जर हा लांब प्रवास असेल तर ही भजने संपेपर्यंत आम्ही खर्डी पार करून पंढरपूरच्या बायपासपर्यंत आलेलो असतो आणि नागपूरवरून परत कामासाठी निघालेलो असू तर ही भजने संपेपर्यंत आम्ही नागपूर महानगराची हद्द पार करून बाहेर आलेलो असतो.
तांबडं फ़ुटायच्या बेतात असतं. सभोवारचा मुक्त आसमंत जागा होत असतो. आजूबाजूला दिसणारी शेती, पाणी, वारा सगळं सकाळच्या पहिल्या प्रहरात विलोभनीय असतं. "माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा" ही सगळी त्या विठठलाची लीला आहे हे आठवून मन उल्हसित तर होतच आणि त्याच्याविषयीच्या कृतज्ञतेने भरून येतं. आणि नेमका त्याचवेळी पं. जसराजजी भटियार सादर करतात. "कोई नही है अपना..." या बंदिशीतून आपले नाते या जगायल्या नात्यांशी जुळण्याऐवजी त्या परमेश्वराशी दृढ होत जाते. आधीच हा राग मारवा थाटाचा. मारवा अंतर्मुख करतो. संध्याकाळ कातर करतो. भटियार हा राग मात्र आपल्याला ख-या स्वरूपाचे ज्ञान करवून देणारा वाटतो. विचार प्रवर्तक पण दिवसभराच्या कामांसाठी बळ देणारा.
आता आपण हायवेवर ब-यापैकी वेग पकडलेला असतो. एव्हाना पहिला टोल नाका वगैरे पार केलेला असतो. मग सुरू होते पं हरिप्रसाद चौरसिया आणि पं शिवकुमार शर्मा यांचा "कॉल ऑफ़ द व्हॅली" त ले भूप, पहाडी आणि अहिर भैरव. मंद लयीत सुरू होणारी गत जशीजशी द्रुत होत जाते तसा तसा ॲक्सिलेटरवरचा आपला पायही त्याला साथ देत देत जातो. गाण्याच्या लयीत आपल्या प्रवासाची लय मिसळत एकरूप होत जाते. गाडीत, कानात, अंगात गाणं आणि गाणंच अक्षरशः भिनतं. आपण आपले नसतोच. आपण गाण्यात आणि गाडी गाण्याच्या ताब्यात. स्पीडॉमीटर ऐंशी, नव्वद चा वेग दाखवत असतं. दोघेही सहप्रवासी अत्यंत खुशीत, तिसरा सहप्रवासी झोपेच्या खुशीत तरंगत असतो. प्रवास मजेत होत असतो. मध्ये मध्ये चालत्या गाडीतच एखादा कप चहा सहप्रवासी असलेली सुपत्नी ड्रायव्हरसाहेबांना देते. रोजचा सकाळचा चहा इतका खुमासदार का नसतो ? याचा विचार दोघांच्याही मनात येतो आणि लक्षात येतं की रोज ही सगळी गायक मंडळी सोबत नसतात ना.
आता चांगले उजाडलेले असते. प्रवास अधिक भरभर होऊ लागतो. रस्त्यावर इतर वाहनांची वाहतूक तुरळक असते. आमच्यासारखे एकटेदुकटे पहाटपक्षीच प्रवासाला बाहेर पडलेले असतात. आता राशिद खान साहेबांचा अहिर भैरव गाडीत लागलेला असतो. "अलबेला साजन आयो." ही मन उल्हसित करणारी द्रुत बंदिश दोन्हीही सहप्रवाशांच्या मनाचा ताबा घेत जाते. दोघाही सहप्रवाशांच्या जीवनाचा आजवरचा विलोभनीय सहप्रवास त्यांच्या त्यांच्या डोळ्यांसमोर उलगडत जात असतो. अपार खुशीचा. आनंदाचा.
मधेच कुठेतरी चांगलेसे टॉयलेट पाहून आम्ही शरीरधर्माला ओ देऊन येतो. आमचे कन्यारत्नही आता उठलेले असते. पाच मिनीटांच्या ब्रेकनंतर पुन्हा प्रवास सुरू होते. या दरम्यान ड्रायव्हर साहेब गाडीतल्या लॉगबुकमध्ये पाहून आपला प्रवास नियोजनानुसार सुरू आहे की नाही याचा आढावा घेतात. बहुतांशी वेळा प्रवास नियोजित वेळेपेक्षा जलद झालेला असतो. पहिले दीडशे किलोमीटर्स प्रवास हा दोन ते सव्वा दोन तासात पार पाडलेला असतो. सकाळचा कमी ट्राफ़िक आणि सकाळी सकाळी असलेला उत्साह या जलद प्रवासासाठी कारणीभूत असतो.
मग सोबत आणलेले सॅंडविचेस धावत्या गाडीतच खाल्ली जातात. नागपूरवरून अमरावती मार्गे पुढे जाणार असू तर बडने-या नंतरच्या संत्री विकणा-या दुकानांसमोर गाडी थांबवून प्रवासात खाण्यासाठी आणि ज्या गावाला चाललोय त्या गावातील मित्रमंडळींसाठी भरपूर संत्री खरेदी केली जातात. ती संत्री सोलून खाण्याचा कार्यक्रम धावत्या गाडीत सुरू होतो. खाणे आणि पुन्हा एकदा चहा झाल्यानंतर मायलेकी त्यांच्या त्यांच्या गप्पांमध्ये रंगतात आणि ड्रायव्हरसाहेब भीमसेनजींच्या "तोडी" च्या सुरात रंगतात. जरी मध्य लयीतली बंदिश सुरू असली तरी त्यातल्या त्यांच्या सट्टेदार ताना अख्ख्या गाडीला शहारून टाकतात. आणि द्रुत बंदिश सुरू होईपर्यंत गाडीने आपसूकच तिचा टॉप स्पीड (ऐंशी ते नव्वद किमी प्रतिसातचा) पुन्हा पकडलेला असतो. भीमसेनजींनंतर पुलंनी वर्णन केलेला विलायतखां साहेबांचा सतारीवरचा तोडी येतो. अक्षरशः तोडीच्या सुरांचा पाणलोट खांसाहेबांनी काढलेला असतो. त्या पाणलोटात आम्हा सगळ्यांचीच मने वाहून जातात. एव्हाना आम्ही अडीचशे किलोमीटर अंतर केवळ साडेचार तासात पार केलंय हे ड्रायव्हरसाहेबांच्याच लक्षात येतय. इतर दोन प्रवासी मात्र आनंदात, "सुरावरी हा जीव तरंगे" हे जीवनगाणे गात मजेत जात असतात. गाडीत एसी सुरू असल्याने प्रवासाचा थकवा वगैरे कुणालाही जाणवत नसतो.
इकडे राजन आणि साजन मिश्रा ललित सुरू करतात. "जोगिया मेरे घर आ..." आता रस्त्यावर ब-यापैकी वाहतूक सुरू झालेली असते. क्वचित दुमार्गी रस्ता संपून एकमार्गी रस्ता सुरू झालेला असतो. येणा-या गाड्यांवर जास्त लक्ष देऊन ड्रायव्हिंग सुरू असते. कानातले सूर रस्त्यावरचे आपले लक्ष अधिक दृढ करीत असतात. अंगात गाणं भिनलं की आपली एकाग्रता कशी वाढत जाते याचे उत्तम उदाहरण. कुशलतेने गाडी चालवताना ही सगळी एकाग्रता या गाण्यांची देणगी आहे याचाही आपल्याला विसर पडत असतो.
मग साधारण अकरा साडेअकराच्या सुमारास साडेतीनशे - चारशे किलोमीटर अंतर कापून आपण देऊळगावराजा इथला "चैत्रबन धाबा" किंवा मालेगाव (जि. नाशिक) इथला "साई कार धाबा" किंवा उमरखेड इथले गावाबाहेर असलेले एक छानसे टुमदार हॉटेल पाहून गाडी थांबवली जाते. छान पोटभर सात्विक जेवण आणि तिथे थोडी शतपावली वगैरे करून सगळे प्रवासी पुढल्या प्रवासाला सज्ज होतात.
दुपारी मग मागल्या सीटवर कन्यारत्न आणि पुढल्या सीटचे पूर्ण रिक्लाईन वापरून सहप्रवासी असलेली सुपत्नीही वामकुक्षी करायला लागतात. ड्रायव्हर साहेबांना झोपून चालत नाही. मग गाडीतल्या टेपवर वसंतरावांची अकोला नाट्यसंमेलनातली वपु काळेंनी घेतली मुलाखत, पुलंचे किंवा वपुंचे सहस्र वेळा ऐकलेले कथाकथन सुरू असते. एकेका वाक्यासरशी डोक्यात विचारांचे मंडल सुरू होत जाते. गाडी चालवत असताना लिहीता येत नाही नाहीतर प्रत्येक प्रवासानंतर विविध विषयांवरचे अगदी दहा पंधरा ब्लॉग्ज लिहून झाले असते. त्या विचारांमध्येच मध्य महाराष्ट्रातले बीड - छत्रपती संभाजीनगर - जालना आदि जिल्हे पार होतात. नागपूरकडे येत असलोत तर विदर्भात प्रवेश केलेला असतो आणि जर नागपूरवरून कामाच्या ठिकाणी जात असू तर पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश केलेला असतो. गेल्या बारा तासांत (एक तासांचा जेवणाचा थांबा धरून) जवळपास साडेपाचशे किमी प्रवास झालेला असतो. सहप्रवाशांची झोप वगैरे झालेली असते. नागपूरकडे येताना कारंजा (लाड), शिरपूरकडे जाताना एरंडोलला किंवा सांगोल्याला जाताना बार्शीला एका छान हॉटेलला चहापानासाठी गाडी थांबवली जाते. पंधरा वीस मिनीटांचे सुंदर चहापान आटोपून मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने प्रवास सुरू होतो.
मावळतीचा सूर्य म्हणजे सुरूवातीला वसंतरावांचा "नट भैरव" त्यातला मध्यम लयीतला बडा ख्याल "मान अब मोरी बात..."हाच मुळी सर्व प्रवाशांच्या अंगातला आत्तापर्यंतचा आळस झटकून नवी स्फ़ूर्ती देणारा असतो. आणि त्यातली द्रुत बंदिश "गुन की चर्चा सुजान करिये..." हा तर उत्साहाचा अगदी कळसच. मग अपरिहार्य असा मारवा. तो पण भीमसेनजींचा. त्या पाठोपाठ मालिनीताईंचा. सुट्ट्या संपवून कामाच्या ठिकाणी चाललोय म्हणून मनात एक प्रकारची उदासी असते ती दर्शविणारा मारवा, सुट्ट्या घालवायला, नातेवाईकांमध्ये रहायला नागपूरला जातोय त्या अनामिक आसेचा मारवा अशी मारव्याची विभिन्न रूपे मनात घर करून राहतात. मारवा संपेपर्यंत पुन्हा संधिप्रकाश व्हायला सुरूवात झालेली असते. सकाळी आपल्या साक्षीने सुरू झालेला सूर्यनारायणाचा दिवसभराचा प्रवास संपत आलेला असलो. आपला प्रवास मात्र अजून दीडएकशे किलोमीटर बाकी असतो.
या कातर वेळी मालिनीताई भीमपलास सुरूवात करतात. मने पुन्हा उल्हसित होतात. "जा जा रे अपने मंदिरवा" या द्रुत बंदिशीने तर मनांमध्ये कमाल घडवलेली असते. जन्मभूमी नागपूर किंवा कर्मभूमी पश्चिम महाराष्ट्र या दोन्हीही ठिकाणी असलेली घरे आपली मंदिरेच आहेत आणि तिथेच आपण चाललोय ही भावना गाडीला पुन्हा द्रुत गती प्राप्त करते. प्रवासाचा हा शेवटचा टप्पा न थकता, न कंटाळता पार पाडण्याची शक्ती देते.
कधी प्रवास लांबलाच आणि मध्येच चंद्रोदय झालाच तर प्ले लिस्टमधली मधली मधली गाणी बाजूला सारून मी मालिनीताईंचे मालकंस मधील "नभ निकस रयो चंद्रमा" लावतो. त्या सुरांनी मी आणि सुपत्नी अत्यंत रोमॅंटिक मूडमध्ये जातो. आणि अधिक प्रवास लांबलाच तर मालिनीताईंचा किंवा राशिदखां साहेबांचा बिलासखानी तोडी तयार असतो. बहुतांशी वेळा प्रवास हे भीमपलास किंवा फ़ार फ़ार तर मालकंस मध्येच संपतात. सातशे - आठशे किलोमीटर प्रवास करून आपण गंतव्य स्थानी पोहोचतो. आपले फ़्रेश चेहेरे पाहून सगळे विचारतात "अरे ! तुम्ही इतके कसे फ़्रेश ? कंटाळला नाहीत ?" आपल्या मनातले उत्तर असते. "छे, छे. अजून दोन अडीचशे किलोमीटर अंतर सहज जाऊ शकू." कारण अजून गाडीतल्या प्ले लिस्ट मध्ये भीमसेनजींचा बिलासखानी तोडी, मल्लिकार्जून अण्णांचा केदार, आणि वरीलपैकी सगळ्यांनीच गायलेली किंवा इंस्ट्रूंमेंटसवर वाजवलेली भैरवी हे ऐकायचे बाकी असतात आणि ते ऐकताना उरलेला दोन अडीचशे किलोमीटरचा प्रवास हा सुखरूप आणि सुरेल होणार याची खात्री असते.
- तानसेन नसला तरी चांगला कानसेन असलेला प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
Thursday, August 24, 2023
मनुष्याचा पिंड कसा घडत जातो ?: एक चिंतन.
मनुष्याचा पिंड कसा घडत जातो ? याचे चिंतन अनेक मानसशास्त्रज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी केलेले आहे. ते वाचले पण जोपर्यंत स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत ते प्रत्ययाला येत नाही. ती व्याख्या पाठ होऊ शकेल पण ती आत्मसात झाली असे अनुभवाशिवाय म्हणता येणार नाही. असाच एक स्वानुभव.
महाल / इतवारी भागात बालपण गेल्यामुळे महालच्या केळीबाग रोडवरचे आंबेकर घी शॉप हे बालपणाचा अविभाज्य भाग बनले होते. त्यांच्याकडले तूप, लोणी हे अक्षरशः रक्तात गेले. आमच्या बालपणी सणासुदीलाच तूप वगैरे प्रकार परवडत असे. सणावारांचे दिवस आले की वडिलांसोबत आंबेकर घी शॉप मध्ये कडीचा डबा घेऊन जायचे आणि तत्कालीन परिस्थितीप्रमाणे कधी पाव किलो, कधी अर्धा किलो तूप घेऊन परतायचे हा नित्यक्रम होता. महाल सोडून पश्चिम नागपुरात रहायला आलोत तरी बरीच वर्षे महालातल्या फ़ेरीत आंबेकरांच्या दुकानात फ़ेरी नक्की असायची. तिथल्याशिवाय इतर कुठलेच तूप, लोणी आवडायला तयारच नव्हते.
नोकरीनिमित्त मुंबईत, ठाण्यात जवळपास एक तप वर्षे घालवलीत. दरवेळी नागपुरातून नोकरीसाठी परतताना दुपारच्या विदर्भ एक्सप्रेसने किंवा रात्री उशीराच्या सेवाग्राम एक्सप्रेसने परतणार असलो तर त्याचदिवशी सकाळी आंबेकरांच्या दुकानात चक्कर मारून तिथून एक, दीड किलो तुपाची खरेदी व्हायची. तेव्हढाच आपल्या नागपूरचा मुंबईत दुवा. ते तूप संपेपर्यंत आपण नागपुरातच आहोत अशी मनाची समजूत. "दिलको बहलाने के लिए, गालिब खयाल अच्छा है." तसेही तुम्ही नागपुरी माणसाला नागपूरच्या बाहेर काढू शकता, नागपुरी माणसाच्या बाहेर त्याच्या आतले नागपूर काढू शकत नाही.
मुंबईत खूप जणांकडून तिथल्या खूप जणांकडल्या तूप लोण्याचे कवतिक ऐकले. आम्हाला जसे ’आंबेकर’ तसे त्यांच्या त्यांच्या विभागातले ’आंबेकर’ हीच मंडळी असतील म्हणून सगळ्यांच्या शिफ़ारसी ऐकून तिथल्या तिथल्या तुपाची, लोण्याची चवही घेऊन पाहिली. अगदी "आनंदाचे डोही आनंद तरंग" या चालीवरच्या "सामंतांचे लोणी, सामंतांचे तूप", ठाण्यातल्या "खंडेलवाल" सगळ्या ठिकाणची चव घेऊन पाहिली पण "तस्य तदेवहि मधुरम यस्य मनो यत्र संलग्नम" या संस्कृत सुभाषिताप्रमाणेच त्या सगळ्या ठिकाणी ते आमचे ’आंबेकर’ नव्हते. अगदी माणदेशात सांगोल्याला असताना ’गोकुळ’ वगैरे ब्रॅंण्डचेही तूप चाखून बघितले. खान्देशात शिरपूरला असताना ते गीर गायीचे अगदी दोन हजार रूपये किलोचे ए -टू टाईपचेही तूप एकदा चाखून बघितले. चंद्रपूरला सासुरवाडीला खेडेगावातून येणा-या विक्रेत्यांनी आणलेले अस्सल गावराणी तूप पण खाऊन पाहिले पण दरवेळी कुठलेच तूप आंबेकरांच्या तुपाच्या तोडीचे नाही याची जाणीव अधिक पक्की झाली.
पुन्हा नागपुरात परतलो. तोवर आंबेकर घी शॉपची एक शाखा पश्चिम नागपुरात घराजवळच राणाप्रताप नगरला उघडलेली होती. आता केळीबाग रोड पर्यंत गाडी दामटवण्याची गरज नव्हती. खूप आनंद झाला.
आता मागल्या आठवड्यातलीच गोष्ट. घरातले तूप संपले होते. संध्याकाळी आंबेकरांकडे गेलो. त्यांच्याकडलाही तुपाचा स्टॉक नेमका संपलेला होता. सकाळी आलेला काही किलो तुपाचा स्टॉक संध्याकाळी सात पर्यंत संपणे म्हणजे त्या मालाच्या दर्जाची ग्वाहीच होती. मग त्यांच्याकडले अगदी शेवटचे उरलेले शंभर ग्रॅम तूप घेऊन परतलो. आता ते तूप किती दिवस पुरणार ? पण गेला संपूर्ण आठवडा खूप धावपळीचा गेला आणि सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा त्यांच्याकडे तूप आणायला जाणे झालेच नाही. आज मात्र अगदी सगळी कामे बाजूला ठेऊन आंबेकरांकडे जायचेच ठरवले. तसे तूप म्हणजे अगदी जीवनावश्यक वस्तू वगैरे नाही पण ही किमया आंबेकरांकडल्या तुपाच्या चवीची, शुद्धतेची.
मी माझाच शोध घेत गेलो आणि लक्षात आले की अरे, आपल्या बालपणापासून आपला पिंड तर आंबेकरांकडल्या तुपावरच पोसला गेलेला आहे. त्यामुळे आता इतर कुठलाही तुपाचा ब्रॅण्ड आपल्याला चालूच शकत नाही. हे आणि फ़क्त हेच तूप.
आता यात कुणाला तरी आंबेकरांची जाहिरात वगैरे केल्याचा संशय येईलही. पण आंबेकरांना कधीच जाहिरातीची गरज नव्हती आणि नसेलही. ज्यांनी एकदा त्यांच्याकडल्या तुपाची, लोण्याची चव घेतली ते त्यांच्याशी कायमचे जोडले जातात हे अगदी खरी गोष्ट आहे. आणि त्यासाठी आंबेकरांना जाहिरातीची गरजच नाही.
आणि एखाद्या खरोखर चांगल्या गोष्टीची आपल्याकडून जाहिरात होत असेल तर नक्की व्हावी असे मला मनापासून वाटते. आजच्या या दर सेकंदाला बदलत जाणा-या अनित्य जगात आम्हाला आमच्या बालपणाशी जोडून ठेवणारा दुवा म्हणजे आंबेकरांच्या तुपाची गेल्या पन्नास (कदाचित शंभरही. आम्हाला आमच्या आयुष्यातली पन्नास वर्षे आठवत आहेत.) वर्षात न बदललेली चव आणि शुद्धता. हे नुसते आंबेकर घी शॉप नाही तर आमच्या बालपणात, आमच्या आजीने, आईने वाढलेल्या पंक्तींची आठवण ताजी करणारी, आमच्या वडील, आजोबांचे हात धरून महालातल्या यांच्या दुकानात जाण्याच्या आठवणींची टाईम मशीन आहे. हे दुकान म्हणजे आमची नाळ नक्की कुठे पुरल्या गेलेली आहे याची जाणीव सदैव जागृत ठेवणारा एक सांस्कृतिक ठेवा आहे.
- आठवणींमध्ये रमणारा, भूतकाळाशी कायम कृतज्ञ असणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
Thursday, August 17, 2023
जीवनाचे सोने
इसवी सन पूर्व वर्ष ५१२६: महाभारत युद्ध समाप्त झाले होते. न्यायाने अन्यायावर भगवंताच्या मदतीने आणि साक्षीने विजय मिळवला होता. सर्वसामान्यांनी आपापल्या संसारात साक्षीभावाने कसे रहावे ? याचा उपदेशकर्ता भगवंत स्वतःच या सृष्टीच्या नियमनाच्या हेतूने झालेल्या महायुद्धात केवळ साक्षीभावाने उपस्थित होता. पण त्याची आंतरिक शक्ती सगळी सत्याच्या, न्यायाच्या बाजूने उभी होती.
युधिष्ठीर महाराजांना हस्तिनापूरचा राजा म्हणून राज्याभिषेक झालेला होता. त्यानिमित्त त्यांनी मोठा यज्ञ आरंभला. त्या यज्ञात भारतवर्षातले सगळे श्रेष्ठ राजे जातीने हजर होते. मोठाच आनंद सर्वत्र झालेला होता. आलेल्या सर्व जणांचा आदरसत्कार स्वतः अर्जुन आणि भीम बघत होते. यज्ञाची व्यवस्था स्वतः नकुल आणि सहदेव बघत होते. यजमानीण बाई म्हणून द्रौपदी अभ्यागतांना हवे नको ते बघत होती आणि त्यांचा मामेभाऊ, भगवंत श्रीकृष्ण स्वतः सगळ्या व्यवस्थेत घरच्यासारखा राबत होता, लक्ष ठेवत होता.
यज्ञसमाप्तीच्या दिवशी सगळ्या याचकांना, अतिथींना महाराज युधिष्ठीरांनी सालंकृत गायी, रथ, घोडे, सुवर्णालंकार, जमिनी यांचे दान केले. कर्णाच्या दातृत्वाला लाजवेल असा दानधर्म त्या यज्ञमंडपात सुरू होता. सगळे पांडव, द्रौपदी आणि भगवंत श्रीकृष्ण हात पुढ्यात बांधून, अतिशय नम्रतेने, याचकांच्या डोळ्यात न बघता दानधर्म करीत होते. दानकर्त्याने स्वतःकडे अभिमान न घेता, याचकाच्या डोळ्यात न बघता दान केले पाहिजे हा त्रेतायुगाचा नियम तिथे आवर्जून पाळला जात होता. अजून कलियुगाची सुरूवात झालेली नव्हती.
त्या समाप्तीदिवशी तिथे एक अदभूत मुंगूस आले. अर्धे अंग सोन्याचे आणि अर्धे नेहेमीच्या कातड्याचे. असे ते मुंगूस त्या यज्ञमंडपात आले आणि त्या पवित्र यज्ञमृत्तिकेत लोळू लागले. दरवेळा दोन तीन कोलांट्या मारल्यात की ते आपल्या उरलेल्या अर्ध्या अंगाकडे निरखून पाही. उरलेले अर्धे अंग सोन्याचे झाले नाही म्हणून निराश होई. पुन्हा कोलांट्या मारे. पण त्याचे सगळे प्रयत्न विफ़ल झालेत. मग ते निराशेने तो यज्ञमंडप सोडून जायला निघाले.
त्याच्या या सगळ्या कृत्याचा अर्थ भगवान श्रीकृष्णांसह तिथे उपस्थित असलेल्या कुणालाही लागेना. भगवंतांनी त्या मुंगूसाला थांबवले आणि त्याला या कृत्याचा अर्थ विचारला आणि ते मुंगूस बोलू लागले.
"भगवन, क्षमा असावी. पण आत्ता काही दिवसांपूर्वी मी आपल्याच राज्यातल्या एका गरीबाघरी गेलेलो होतो. त्या घरात खाणारी तोंडे पाच. पती पत्नी आणि वाढत्या वयाची तीन मुले. घरी दोन माणसांना पुरेल एव्हढाच शिधा. तो शिधाही त्या घरात जवळपास आठवडाभराने आलेला. त्या दोन माणसांचा शिधा रांधून थोडे थोडे खाऊ असा विचार करून त्या सुगृहिणीने तो शिधा रांधायला घेतला न घेतला तोच दारात एक अतिथी आला. अतिथी जवळपास पंधरवाड्यापासून उपाशी होता हे पाहून त्या गृहिणीने आपल्या शिध्यातला अर्धा शिधा त्याला दिला. तो शिधा घेऊन तो अतिथी जातोय न जातोय तोच तशाच परिस्थितीतली त्याची पत्नी तिथे हजर. ती सुद्धा पंधरवाड्यापासून उपाशी आहे कळल्यावर त्या गृहिणीसकट सगळ्या घराने उरलेला शिधाही तिला देण्याचे ठरविले. हे अतिथी तर पंधरवाड्यापासून उपाशी आहेत. आपण तर फ़क्त आठवडाभरापासून उपाशी आहोत. आपण अजून एक आठवडा उपाशीपोटी काढू शकतो या भावनेने सगळ्या घराने असलेला सगळा शिधा अतिथी दांपत्याला देऊन टाकला आणि स्वतःहून उपाशी राहण्याचा मार्ग स्वीकारला."
"राजा, मी तिथेच बाजूला होतो. त्या अतिथीला दान देताना त्या शिध्यातले काही कण जमिनीवर सांडले त्या कणांमधून मी सहज गेलो तर ते कण माझ्या अंगाला चिकटून माझे एव्हढे अंग सोन्याचे झाले. आज तुझ्या यज्ञाविषयी, दानधर्माविषयी मी खूप ऐकले आणि या यज्ञात अवभृत स्नान करून माझे उरलेले अंग सोन्याचे होतेय का ? हे बघायला आलोय. पण माझी निराशा झाली. राजा अजून तुला खूप मोठी मजल गाठायची आहे."
मुंगूस निघून गेले. आपल्या मनातला सूक्ष्म अहंकार नष्ट करायला आपल्या आतेभावाने, भगवान श्रीकृष्णाने ही आणखी एक लीला केलेली आहे हे महाराज युधिष्ठीरांसकट सर्व पांडवांना समजले. आपल्या सात्विकतेचाही अभिमान बाळगू नये. फ़क्त अधिकाधिक सात्विक होत जावे ही शिकवण घेऊन ते पुढील जीवनात मार्गक्रमण करू लागलेत आणि इतर मर्त्य मानवांप्रमाणे आपले देहकार्य आटोपून भगवंताच्या चरणांशी अक्षय्य रुजू झालेत.
इसवी सन २०२३ : कलियुग सुरू होऊन पाच हजारांपेक्षा जास्त वर्षे उलटली होती. काही लक्ष वर्षे आयुष्य असलेल्या कलियुगाने आपला अंमल मात्र फ़ार म्हणजे फ़ारच लवकर वसवला होता. पहिल्या पाच हजार वर्षातच सर्वत्र कलियुगाचा बोलबाला होऊ लागला होता.
महाराज आनंदेश्वर स्वामी हे आपल्या संपूर्ण प्रदेशात फ़ार मोठे महापुरूष म्हणून ओळखले जात होते. आपल्या वागणुकीने त्यांनी सर्व नागरिकांसमोर वागणुकीचा एक आदर्श ठेवलेला होता. गृहस्थाश्रम स्वीकारून तो अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवत महाराज आणि त्यांच्या पत्नीने सर्व प्रदेशात "अशा पद्धतीने गृहस्थाश्रम केला तर त्याला संन्यासाश्रमाचे फ़ळ आहे." हे सिद्ध करून दाखवले होते. सर्व प्रदेशात या दांपत्याविषयी एक आदर होता.
अधिक श्रावण महिना. आश्रमात महिनाभराचे विष्णुयाग नियोजित केल्या गेलेले होते. खूप मोठ्या प्रमाणात याग होणार. खूप अभ्यागत यागासाठी येणार म्हणून आश्रमात जय्यत तयारी होती. या यागासाठी दूरदूरवरून विद्वान, वैदिक ब्रम्हवृंद आलेला होता. आश्रमाच्या अत्यंत पवित्र वातावरणात, महाराजांच्या आणि त्यांच्या सुपत्नींच्या निगराणीत तो याग पार पडणार म्हणून सर्व भक्त मंडळी हरखून गेलेली होती. अनेक इच्छुक दांपत्यांनी यागासाठी आपली नोंदणी केलेली होती. सर्वांची राहण्या खाण्याची आणि इतर व्यवस्थांची सोय व्यवस्थित व्हावी म्हणून यागाला बसणा-या भक्त मंडळींकडून एक विशिष्ट सेवाशुल्क घेण्यात आले होते. सर्व भक्तमंडळी तशी सधन होती आणि ही पर्वणी साधण्यासाठी थोडाफ़ार जास्त खर्च झाला तरी त्याला कुणाचीही हरकत नव्हती.
नियोजनाप्रमाणे यागाला सुरूवात झाली. सर्वत्र वेदमंत्रांचा घोष, पवित्र समिधांच्या आहुत्यांनी पवित्र झालेले वातावरण यामुळे यज्ञमंडपात एक वेगळीच उर्जा निर्माण झाली होती. महाराजांसकट सर्व भक्तमंडळींच्या डोळ्यात ती कृतार्थता वाचता येत होती.
पहिल्या दिवशीचा शेवट जवळ आला होता. स्वतः महाराज सपत्निक यज्ञात आहुती टाकत होते. अचानक वेदमंत्रांच्या मागून "विठ्ठलपंत उभा द्वारी, दीन अनाथ भिकारी, महाराजा हाक मारी." अशी अस्पष्ट हाक महाराजांच्या कानावर आली. त्यांनी आजुबाजूला नजर टाकली पण सुंदर सुंदर पितांबर नेसून असलेली भक्त मंडळी आणि पैठण्या, शालू नेसलेल्या त्यांच्या अर्धांगिनी ही सगळी मंडळी यज्ञकार्यात दंग होती. पाच दहा मिनीटांनी महाराजांच्या कानावर ही हाक पुन्हा आली. पूर्वीपेक्षा थोडी अधिक स्पष्ट, खणखणीत. त्यांनी आपल्या एका सेवकाला बोलावून प्रवेशद्वारावर धाडले आणि कोण आलय ? हे बघून यायला सांगितले.
सेवक प्रवेशद्वारी आला तेव्हा प्रवेशद्वाराबाहेर एक दांपत्य उभे होते. साधे, थोडे मळकेच धोतर, अंगात जुनापानाच, थोडा उतरलेला सदरा घातलेला माणूस आणि साध्यातलेच पण धुतलेले पातळ नेसलेली त्याची पत्नी.
"काय हवेय ?" सेवकाने थोड्या त्रासिकतेनेच विचारले.
"काही नाही जी. इथे मोठा यज्ञ होतोय म्हणून कळले. म्हणून लांबून आलोय जी."
"ठीक आहे. आत या. भोजनप्रसाद सुरू आहे. तो घ्या." आश्रमात आलेल्या कुणाही अतिथी अभ्यागताला उपाशी पाठवायचे नाही ही आश्रमाची प्रथा त्या सेवकाला चांगलीच ठाऊक होती.
ते दांपत्य आत आले. यज्ञमंडपाच्या शेजारीच भोजनमंडपात सकाळपासून एकसारख्या भोजनपंक्ती उठत होत्या. तिथे हे दांपत्य भोजनाला बसले. अगदी अल्प अन्नात त्या दोघांनीही आपापले भोजन आटोपले. त्या दोघांच्याही भोजनाकडे पाहून ते अन्नार्थी याचक नव्हते हे लक्षात येत होते. भोजन करताना सुद्धा दोघेही अनिमिष नेत्रांनी यज्ञमंडपात, त्यात टाकल्या जाणा-या आहुतींकडे आणि म्हटल्या जाणा-या वेदमंत्रांकडे अगदी प्राण देऊन लक्ष ठेऊन होते.
हा क्रम रोजच सुरू झाला. रोज संध्याकाळच्या वेळी यज्ञमंडपात बसलेल्या महाराजांच्या कानी "विठ्ठलपंत उभा द्वारी, दीन अनाथ भिकारी, महाराजा हाक मारी." ही हाक यायची. ते आतून अस्वस्थ व्हायचेत. स्वतः यज्ञात सहभागी असल्याने कुणातरी सेवकाला ते दारावर पाठवून द्यायचेत. तो सेवक त्या दंपतीला यज्ञमंडपात घेऊन यायचा. भोजन करता करता त्या चाललेल्या यागाकडे ते दोघेजण अनिमिष बघत रहायचे. थोडेसेच जेवून, तृप्त होऊन ते दंपती आल्यापावली परतायचेत.
महिना संपत आला. सगळ्या गोष्टी नियोजनाप्रमाणे होत होत्या. भक्तमंडळीही खूष होती. खूष आणि तृप्त नव्हते ते खुद्द महाराज. आपल्या अतृप्तीचे कारण काय ? याचा त्यांनी स्वमनात शोध घेण्याचा खूप प्रयत्न केलेला होता पण त्यात त्यांना यश आलेले नव्हते. किंबहुना त्यांना "महाराज" पद प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकारची अतृप्ती, अशा प्रकारची अस्वस्थता त्यांना पहिल्यांदाच अनुभवायला येत होती. आपल्याला नक्की काय खटकतंय, नक्की कुठे कमी पडतंय हेच त्यांना कळत नव्हते. कुठेतरी काहीतरी कमी होतं हे मात्र नक्की त्यांना कळत होतं.
"महाराज, आपल्या अस्वस्थतेचे कारण कळेल ?" पतीची अस्वस्थता त्यांचे अक्षरशः अर्धांग असलेल्या पत्नीला कळल्याशिवाय थोडीच राहील. एके दिवशी रात्री विश्रामापूर्वी महाराजांच्या पत्नीने त्यांना विचारले. महाराजांनाही आपल्या अस्वस्थतेचे नक्की कारण सांगता येईना. आपल्या सुपत्नीपासून त्यांनी आजवर काहीही लपवून ठेवलेले नव्हते हे त्यांनाही आणि त्यांच्या सुपत्नीलाही माहिती होते. त्यामुळे महाराज खरोखर अस्वस्थ आहेत आणि त्यांच्या अस्वस्थतेचे कारण त्यांचे त्यांनाही उमगत नाही हे तिच्या लक्षात आले. मग तिने त्यांना यज्ञाच्या पहिल्या दिवसापासून घडत आलेल्या एकेका प्रसंगांविषयी सविस्तर विचारायला सुरूवात केली. महाराजही तिच्यापासून काहीही न लपवता सगळे सांगत होते. त्यांनाही हे अपूर्णतेचे ओझे असह्य झाले होते. बोलता बोलता दर संध्याकाळी महाराजांच्या कानावर येणा-या "विठ्ठलपंत उभा द्वारी, दीन अनाथ भिकारी, महाराजा हाक मारी." या हाकेविषयी त्यांनी सांगितले आणि त्यांच्या अस्वस्थतेचा त्या दोघांनाही एकाच वेळी उलगडा झाला. इतकी साधी घटना आपल्याला लक्षात का आली नाही ? हे महाराजांनाही आश्चर्य वाटले. पत्नीशी सल्लामसलत करून दुस-या दिवशी संध्याकाळी ही हाक कानी आली की स्वतः दारावर जाऊन कोण आहे ते बघायचे हे त्यांनी ठरविले.
दुस-या दिवशी ठरल्याप्रमाणे सर्व यज्ञविधी सुरू झालेत. पण आज महाराजांचे मन त्या विधींमध्ये नव्हते. ते संध्याकाळची वाट बघत होते. ती हाक कधी कानावर येतेय आणि कधी आपण जाऊन तो हाक मारणारा कोण आहे ? हे बघतोय असे त्यांना झाले होते. आजवर त्यांनी ज्या सेवकांना तिथे पाठवले होते त्यांच्यापैकी एकानेही त्या दंपतीचा विषय महाराजांसमोर काढला नव्हता. एकंदर कार्यात ही एक छोटी घटना होती आणि कार्यबाहुल्यामुळे या घटनेबाबत महाराजांशी मुद्दाम बोलावे असे त्या सेवकांपैकी एकालाही वाटले नव्हते.
संध्यासमय आला. यज्ञात असतानाच महाराजांच्या कानी रोजची "विठ्ठलपंत उभा द्वारी, दीन अनाथ भिकारी, महाराजा हाक मारी." ही हाक आली. हातातली आहुती यज्ञात टाकून ते लगबगीने प्रवेशद्वारापाशी गेले. तेच दंपती. तसेच साधे, किंचित मळके कपडे. पण आजवर एकाही सेवकांच्या लक्षात न आलेली एक गोष्ट महाराजांच्या चटकन लक्षात आली ती म्हणजे दोघांचेही हात त्यांच्या त्यांच्या गुडघ्यापर्यंत येऊन पोहोचत होते आणि त्यांनी वर बघितले आणि ते चमकलेच. त्या दोघांच्याही डोळ्यात एक विलक्षण तेज होते. असे तेज महाराजांनी आजवर भगवंतांच्या विग्रहातही बघितलेले नव्हते.
"यावे यावे अतिथी. काय आज्ञा आहे ?" महाराजांनी अकृत्रिम नम्रतेने विचारले.
"आनंदेश्वर महाराज, आम्ही जवळपास गेले महिनाभर आपणाकडे रोज येतोय. रोज भोजनप्रसाद घेतोय आणि परततोय. आम्ही अन्नार्थी याचक निश्चितच नाही. या यज्ञात सहभागी व्हावे, आपल्या हातून आहुती पडाव्यात अशी इच्छा आहे. पण आम्ही गरीब माणसे. यज्ञाच्या शुल्काचा दहावा भागही आम्ही देऊ शकत नाही. आमच्या हातून या इतक्या महान यज्ञात आहुती पडावी ही मनोमन इच्छा आहे पण "उत्पद्यन्ते, विलीयन्ते दरिद्रीणाम मनोरथः" हे आम्हाला माहिती असल्याने आजवर आपल्या सेवकांशी याबाबत बोलण्याचे धाडस होत नव्हते. आज आपल्याशी बोलताना आमच्याकडून काही औद्धत्य झाले असल्यास क्षमा करा." त्या माणसाच्या डोळ्यात पाणी होते. त्याने महाराजांसमोर हात जोडलेले होते.
महाराज गहिवरले. त्या दोघांचाही हात धरून महाराजांनी त्यांना आत नेले. भोजनमंडपात बसविले. त्यांच्या भोजनाकडे जातीने लक्ष दिले. त्यांचे अगदी अल्प भोजन पाहून ते अन्नार्थी याचक नाहीत याची महाराजांनीही अनुभूती घेतली. उद्या सकाळी यज्ञविधी सुरू होण्याआधी यज्ञमंडपात येण्याचे त्या दोघांनाही निमंत्रण देऊन त्यांना निरोप दिला. त्या रात्री महाराज निवांत, विना रूखरूख झोपू शकलेत.
यागाचा अखेरीचा दिवस उजाडला. रोजच्याप्रमाणे त्या सुंदर यज्ञमंडपात उंची वस्त्रे, प्रावरणे परिधान केलेल्या सर्व श्रीमान यजमान मंडळींची लगबग सुरू होती. ठरलेल्या वेळेवर साध्या कपड्यातले हे दांपत्य आले. महाराजांनी स्वतःशेजारीच त्या दोघांचेही आसन मांडले. यज्ञविधी सुरू झाला. महाराज आणि त्यांच्या सुपत्नींसोबतच हे दांपत्यही यज्ञात आहुत्या टाकू लागलेत. त्यांनी टाकलेल्या एकेका आहुतीसरशी आपले एकेका जन्मातले कर्म जळून त्यांची राख होतेय ही अंतर्यामी जाणीव महाराजांना होऊ लागली. त्यांना यज्ञमंत्र ऐकूच येईनात. आपले डोळे भरल्यामुळे कानाने का ऐकू येत नाही ? हेच त्यांना कळत नव्हते. त्यांच्या सगळ्या देहजाणीवा गोठल्यात. त्या दंपतीकडे बघणेही अशक्य व्हावे इतका प्रकाश त्या यज्ञमंडपात जणू फ़ाकला होता. पण ही फ़क्त महाराजांची जाणीव होते. इतर सर्व मंडळींसाठी नित्यक्रमानुसार यज्ञकर्म सुरू होते.
संध्याकाळ झाली. यज्ञकर्म आटोपले. रोजच्याप्रमाणे महाराज, त्यांच्या सुपत्नी आणि इतरही भक्त गणांनी भोजनप्रसाद ग्रहण करण्यास सुरूवात केली. आज त्या दंपतीचे आसन महाराजांनी स्वतःशेजारी मांडलेले होते. रोजच्याप्रमाणेच अगदी अल्पाहार करून त्या दंपतीने आपले भोजन आटोपले. महाराजांना तर भूक नव्हतीच. सगळ्याच देहजाणीवा गोठल्यावर भूक तरी कशी लागणार ? त्या दंपतींना निरोप द्यायला महाराज आणि त्यांच्या सुपत्नी मंडपद्वारापर्यंत गेलेत. इतर शिष्यवर्ग आवरासावरी करण्यात गुंतलेला होता. प्रवेशद्वारातून बाहेर पडण्याआधी महाराज त्या दंपतीच्या चरणावर एखाद्या निर्जीव काठीसारखे कोसळले. त्यांना साष्टांग दंडवत घातला. ते कोण आहेत ? कुठून आलेत ? हे प्रश्न विचारण्याची महाराजांना गरज नव्हती कारण काल संध्याकाळपासून त्या तत्वाची अनुभूती ते स्वतः घेत होते आणि ते पुरेसे होते. तो अनुभव वर्णण्यासाठी शब्द अगदी आगंतुक ठरले असते.
दंपती आशिर्वचन मुद्रेत उभे राहिले. महाराज आणि त्यांच्या सुपत्नींना त्यांनी मनःपूर्वक आशिर्वाद दिला. आणि एका क्षणात वीज चमकून नाहीशी व्हावी तसे ते दोघेही अचानक नाहीसे झालेत. आपल्या पतीच्या डोळ्यातले दिवसभर न खळणारे अश्रू त्यांच्या पत्नी बघत होत्या. त्यांनाही त्या तत्वाची आंतरिक अनुभूती झाली. आपल्या पतीच्या अधिकाराने आपणही कसल्या अधिकाराला पोहोचलोय याची त्यांना जाणीव झाली. आपल्या पतीप्रमाणेच आपलाही हा शेवटचा जन्म हे त्यांनी क्षणात ओळखले.
त्या रात्री सगळी आवराआवर अर्धवट झालेली असताना आश्रमात एक मुंगूस आले. अंगाचे अर्धे सोने झालेले. त्याने त्या यज्ञमृत्तिकेत लोळण घेतली आणि आपले उरलेले अंगही सोन्याचे करून घेऊन हे समाधानाने निघून गेले. त्याचे अंग आणि महाराज व त्यांच्या सुपत्नीचे जीवन सोन्याचे झालेले होते. इतर जगासाठी दुस-या दिवशी सकाळपासून जगरहाटीची नित्यकर्मे सुरू होणार होती.
- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
श्रावण शुद्ध प्रतिपदा, शके १९४५, दिनांक १७ / ८ / २०२३
Wednesday, August 16, 2023
सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजतील पापाला.
आज अधिक महिना संपला. अधिक महिना, पुरूषोत्तम महिना आणि त्यातही अधिक श्रावण. गेले महिनाभर धार्मिक कार्यक्रमांचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा होता. खूप अनुष्ठाने, आवर्तने यामुळे गेले महिनाभर धार्मिक वातावरण होते.
आज एका धार्मिक ग्रूपवर एका गुरूबंधूंची पोस्ट वाचली आणि अस्वस्थ झालो. एका धार्मिक ठिकाणी याग झाला आणि त्या यागात सहभागी व्हायचे असेल तर पाच सहस्र इतके शुल्क इच्छुकांना भरावे लागणार होते. याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे ज्या व्यक्तीकडे इतके शुल्क भरण्याची ऐपत आहे तो किंवा तीच या यागाची अधिकारी आहे. त्या व्यक्तीचे वैयक्तिक, धार्मिक, सामाजिक आचरण कसेही असले तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करून केवळ त्याच्या अर्थार्जनाकडे बघून त्याला अधिकारी किंवा अनाधिकारी ठरवणार आहोत हे आता नक्की झाले.
नाही, अशा यज्ञ यागाच्या आयोजनासाठी खर्च, खूप खर्च येतो हे मला माहिती आहे. तो खर्च भरून काढायला हवा म्हणून आयोजकांनी, भक्त मंडळींनी ऐच्छिक हातभार लावावा हे सुद्धा अगदी मान्य. पण यातून भक्तांच्या भावनांशी खेळून आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न करणे ही शुद्ध लुच्चेगिरी आहे, फ़सवेगिरी आहे हे आपल्या लक्षात येतय का ? यज्ञ यागाचा एकूण खर्च काढून त्याप्रमाणे प्रत्येक इच्छुक व्यक्तीला शुल्क आकारण्यापेक्षा भक्तमंडळींच्या ऐच्छिक देणग्यांमधून एकूण किती रक्कम गोळा होतेय ? याचा अंदाज घेऊन त्या प्रमाणात यज्ञ यागाचे आयोजन करणे सगळ्यांसाठीच जास्त हितावह आहे हे आपल्या लक्षात येतय का ? यज्ञ यागाला आयोजकांनी आपले स्वतःचे भौतिक जीवन समृद्ध करण्याचे साधन बनवू नये ही अपेक्षा अगदी त्रेतायुगातली तर नाही ना ? आपण अध्यात्माला कुठे घेऊन चाललोय ? त्याचा उत्कर्ष करणे आपल्या क्षमतेच्या बाहेर असेल तर किमान अशा पद्धतीने तर त्याचा अपकर्ष होऊ देऊ नये हे तर आपल्या हातात आहे ना ?
खरेतर मी माझ्या मागील लेखात लिहील्याप्रमाणे अध्यात्म हा केवळ परमेश्वर आणि भक्त या दोघांमधला मामला आहे. हे यज्ञ, याग ही सगळी अध्यात्म साधण्याची बाह्य अंगे आहेत. ह्या साधनांचा वापर करून आपण स्वतःच स्वतःला परमेश्वराचा निकट सहवास मिळावा म्हणून अधिकारी करायचे आहे. साध्य परमेश्वर आहे आणि ही सगळी साधने आहेत. परमेश्वराच्या दरबारी कुणाचा किती अधिकार असेल ? हे बाह्य अंगाने लक्षात येणे कठीण आहे. पण आजकाल आपण हा अधिकार त्या व्यक्तीच्या विशिष्ट रक्कम खर्च करू शकण्याच्या किंवा न करू शकण्याच्या क्षमतेशी जर जोडणार असू तर कलियुगाच्या एका लीलेला आपण शरण गेलेलो आहोत. आणि संत गाडगे बाबांनी लिहीलेले भजन "सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजतील पापाला." हे आपल्यालाच लागू आहे हे आपण समजले पाहिजे.
- साध्य आणि साधन यातला फ़रक संतकृपेने मनात पक्का असलेला, कर्मठ, याज्ञिक, सात्विक मनुष्य, राम
Saturday, August 12, 2023
गाणं : माझे काही काही मापदंड
परवा गाण्यातल्या गायकांच्या आणि श्रोत्यांच्या एकतानतेची पोस्ट टाकली आणि मन कराडच्या दिवसांमध्ये मागे गेले. कराडला आमच्या महाविद्यालयात खूप सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचेत. वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, उत्स्फ़ूर्त वक्तृत्व स्पर्धा आणि भावगीत स्पर्धा. दर आठवड्याला, पंधरवाड्याला यातली एक तरी स्पर्धा व्हायचीच. खूप मजा यायची. स्पर्धा आहे म्हटल्यावर स्पर्धक असायचेत पण स्पर्धकालाही प्रोत्साहन देण्याची, त्याचे खुल्या दिलाने कौतुक करण्याची वृत्तीही बघायला मिळायची. आनंद होता तो यामुळे.
भावगीत स्पर्धेसाठी बहुतांशी वेळा तेव्हा कराडच्या तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत असणारे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि स्वतः एक अत्यंत उत्तम गायक असलेले प्रा. उपेंद्र कारखानीस हे परिक्षकांपैकी एक असायचेच. तेव्हा ते रिॲलिटी शोजचा वगैरे जन्म व्हायचाच होता. (तेव्हा मुळात खाजगी टी व्ही चॅनेल्सचाच जन्म व्हायचा होता.) त्यामुळे कुठल्याही स्पर्धेत नाटकीपणा, आक्रस्ताळेपणाला वाव नव्हता. गाण्याची स्पर्धा म्हणजे गायकाचे गायन कौशल्यच बघितले जायचे. तिथे जो परफ़ॉर्मन्स होईल त्यावरच विजेते ठरायचेत.
एकदा स्पर्धा संपल्यानंतर आम्ही कारखानीस सरांशी गप्पा मारत बसलेलो होतो. बुद्धीमान माणसांशी साध्या गप्पा जरी मारल्यात तरी त्यातून आपल्याही व्यक्तीमत्वाचा विकास होत असतो हे तत्व आम्हाला आमच्या वाढत्या वयातच उमगलेले होते. त्यामुळे आम्ही सरांशी विविध विषयांवर चर्चा करत होतो. चर्चेत सर सहज बोलून गेलेत.
"भावगीतांवर खरे प्रेम असले म्हणजे ते गीत आपोआप पाठ होते. गाणे सादर करण्यापूर्वी पुरेसा सराव केलेला असला की ते गीत पाठ करण्यासाठी विशेष असे प्रयत्न करावे लागतच नाहीत. एखादेवेळी आपली स्मृती दगा देईल म्हणून ऐनवेळी सहाय्यासाठी पुढे कागद ठेवणे आणि त्यावर एखादा कटाक्ष टाकणे ठीक आहे पण पहिल्यांदाच ते गाणे वाचतोय या आविर्भावात सतत त्या कागदाकडे पहात पहात भावगीत सादर करणे म्हणजे श्रोतृवर्गाचा रसभंग होतो आणि आपली त्या गाण्याशी हवी तितकी बांधिलकी नाही हेच सिद्ध होत असते."
या गोष्टीला आता जवळपास तीस बत्तीस वर्षे होत आलीत. त्यानंतर काळ बदलला. तंत्रज्ञानाने सगळ्याच क्षेत्रांमध्ये खूप मोठी गरूडझेप घेतली. मग त्याला गायन हे क्षेत्र तरी कसे अपवाद असणार ? आम्हालाही ब-याच भावगीत / चित्रपट गीत स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून जाण्याची संधी मिळाली. दरवेळी आमचे परीक्षणाचे मापदंड पक्के होते. गाणं जर तुम्हाला आवडलेले असेल तर आणि तरच ते श्रोत्यांना आवडेल आणि आपल्याला आवडलेले गाणे हे आपल्याला खूप छान पद्धतीने आत्मसात झालेले असलेच पाहिजे हा आमचा चांगल्या गाण्यांचा मापदंड.
आज तर ते कॅराओके आले आहे. त्यात आपल्या मोबाईलमध्ये बघत बघत गाणे सादर करण्याची नवीनच फ़ॅशन आलेली आहे. त्यातही एका हातात माईक, दुस-या हातात तो स्मार्टफ़ोन. काही कालावधीनंतर त्याची स्क्रीन ऑफ़ होत जाते. म्हणून गाण्यातल्या एखाद्या महत्वाच्या जागेकडे / शब्दाकडे दुर्लक्ष करून एका बोटाने फ़ोनच्या स्क्रीनला स्पर्श करून ती ऑफ़ न होऊ देण्याची कसरत. या सगळ्या गदारोळात हे गाणे श्रवणीय तर होत नाहीच पण प्रेक्षणीय ही होत नाही. अगदी बेंगरूळ असा तो प्रसंग दिसतो.
आताशा बरे आहे. फ़ारशा भावगीत स्पर्धा होतच नाहीत आणि झाल्यात तरी आम्हाला परीक्षक म्हणून बोलावत नाहीत. नाहीतर अशा पद्धतीने गाणे सादर करणा-या स्पर्धकांना कधीच बक्षीस मिळू शकले नसते आणि स्पर्धेत जर सगळीच मंडळी अशीच सादरीकरण करणारी असतील तर आम्ही कुणालाही बक्षीस न देता स्पर्धाच रद्दबातल ठरवली असती. पण काळ बदलाय, परीक्षकही बदलायला हवेत. समाधान एव्हढेच की आम्हाला मनोमन पटलेली, आमच्या हृदयाशी जपून ठेवलेली ही काही मूल्ये आम्ही बदलली नाहीत.
- जुने ते सगळेच सोने नसते हे पटलेला
पण तरीही
शाश्वत मूल्ये ही जुनी नवी असा भेद न करता कायम जपायला हवीत या ठाम मताचा, खडूस परीक्षक
आणि
पुलंच्या रावसाहेबांसारखा "गल्ली चुकलेले गाणे" कानांना लगेच ओळखू येणारा चांगला कानसेन,
प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर
Wednesday, August 9, 2023
सलूनः एक स्थानमहात्म्य
काहीकाही टीव्ही चॅनेल्स फक्त हेअर कटिंग सलून मध्ये लावण्यासाठीच जन्माला येतात की काय ? कोण जाणे. कारण त्या वाहिन्या आपण घरच्या टी व्ही चॅनेल्सच्या पॅकमध्ये एकतर घेतच नाही आणि घेतल्याच तरी ती चॅनेल्स नेहमी फक्त स्क्राॅल करूनच पुढे जातो. त्या चॅनेलवर काही सेकंदांपेक्षा जास्त आपण घरी थांबत नाही.
Sunday, August 6, 2023
गायक आणि श्रोता: तल्लीनतेचे अद्वैत.
माझे एक निरीक्षण आहे. जे लोक गाणं चांगल्या पध्दतीने ऐकू शकतात तेच लोक गाणं चांगल्या पध्दतीने गाऊपण शकतात. चांगला श्रोता नाही पण चांगला गायक झालाय असे एकही उदाहरण मी पाहिलेले नाही.