सोशल मिडीयावर राहून आणि सातत्याने लिखाण करून आता जवळपास १८ वर्षे झालीत. पहिल्यांदा ऑर्कुट, नंतर फ़ेसबुक आणि सोबतच ब्लॉगस्पॉटवर स्वतःचा ब्लॉग लिहीणे. सुरूवातीला ब्लॉग लिखाणाला प्रतिसाद फ़ार कमी होता पण चिकाटीने ४ - ५ वर्षे लेखन सुरू ठेवले. मग हळूहळू वाचकसंख्या वाढू लागली.
सगळ्याच सोशल मिडीयांवर समानशील व्यक्ती भेटल्यात. आपल्यासारखाच विचार करणारे, जीवन जगणारे दुसरे कुणीतरी आहे ही भावनाच आपला एकटेपणा दूर करून जीवन जगायला बळ देणारी असते. आपल्यासारखीच जीवनमूल्ये घेऊन जगणारी असंख्य मंडळी या जगात आहेत ही भावना जगातल्या आणि आपल्याही अंतरातल्या चांगुलपणावर विश्वास दृढ करणारी असते.
या सोशल मिडीयावर वावरताना काही पथ्ये पाळावीच लागतात. फ़ार जास्त एकांगी होऊन, मनस्वीपणे आपली मते प्रदर्शित करून, आपल्या मनातल्या वैयक्तिक रागाला तिथे मूर्त स्वरूप देऊन अजिबात चालत नाही. सगळ्याच वाचकांच्या जीवनात काही ना काही कटकटी, दुःखे, नकारात्मकता, अडचणी असतातच. त्यामुळे आपणही आपली दुःखे, कटकटी, नकारात्मकता तिथे मांडली तार वाचकांना "घरचे झाले थोडे आणि व्याहाने धाडले घोडे" अशी अवस्था होऊन जाते. म्हणून मी कटाक्षाने या गोष्टी तिथे टाळतो. कुणाचीतरी निर्वीष खिल्ली उडवणे, राजकारण्यांवर टीका टिप्पणी करणे हे चालते पण माझे बहुतांशी लेखन हे सकारात्मक असते. सुदैवाने मला लिहायला माझे छंद, माझा अवलीपणा, मला शिक्षण नोकरीदरम्यान आलेले असंख्य गंमतीदार अनुभव, माझे प्रवास असे अनेक विषय असतात. त्यामुळे मुद्दाम एखाद्या घटनेबाबत, व्यक्तिंबाबत नकारात्मक लिहावे असे काही नसते.
काही काही नियमित वाचकांकडून एक आश्चर्ययुक्त पृछा कायम येतेच. "सर, तुम्हाला सगळीकडेच कशा चांगल्या व्यक्ती भेटतात ? कधीतरी काही बदमाष, कटकट्या आणि अप्रामाणिक व्यक्ती भेटल्या असतीलच की." अशी विचारणा झाली की मग मनात विचार सुरू होतात आणि यानिमित्ताने आत्मपरिक्षण सुरू होते.
कावेबाज, बदमाष माणसे जगात सगळीकडे असतीलच. सुदैवाने माझ्या वाट्याला कमी आलीत. जी काही थोडी आली असतील त्यांचा लेखाजोखा मी पटकन पुसून टाकला. धडा शिकलो पण त्या घटना अगदी मनातून पुसून टाकल्यात. माझ्याबाबतीत झालेले अपमान, बदमाषी यांना मी मनात फ़ारसा थारा दिला नाही. त्यातून धडा शिकलो पण ती घटना मनाला चटका देत ठेवली नाही.
आता त्यातली एखादी घटना क्वचित आठवलीच तरी राग, चीड न येता, त्या माणसाविषयी कीव वाटते किंवा कुठल्या परिस्थितीत ती व्यक्ती अशी कावेबाज वागली असेल ? याचा मी अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो, सोडून देतो.
शिक्षकी पेशात पहिल्यापासून असल्याने कायम संपर्क तरूण मुलांशी, घडविण्याजोगा मातीच्या गोळ्यांशी, आला. ९९ % विद्यार्थी बाह्य जगाच्या दुनियादारीशी अपरिचित, निरागस असे असतात. आपल्या सकारात्मक वागण्याबोलण्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर कितपत होतोय ? याचे दरवर्षी नवनवे प्रयोग करताना स्वतःच्याच व्यक्तीमत्वात खूप सकारात्मकता येत गेली. बाह्य जगाच्या दृष्टीने भाबडा तर भाबडा, पण शिक्षक होण्याचे perks काय असतात ? हे मास्तरकी केल्याशिवाय कळत नाही. दरवर्षी तेच तेच विषय जरी शिकवायचे असलेत तरी दरवर्षी विद्यार्थी वेगवेगळे असतात. त्यांची एकंदर बुद्धीमत्ता, त्यांची शिकण्याची पद्धती, त्यांचा कल आणि दरवर्षी बदलणारे तंत्रज्ञान या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून मग दरवर्षी आपल्या शिकवण्यात बदल करावा लागतो. दरवर्षी ही अशी आपली आपल्याशीच शर्यत असते. मागील वर्षापेक्षा अधिक चांगले होण्याची. कालपेक्षा आज आपण जास्त अपडेट आणि अपग्रेड झालोय की नाही ? हे बघण्याची शर्यत. स्वतःमध्ये निरंतर उत्कृष्टतेचा समावेश करण्याची धडपड.
मला वाटतं की ही धडपड, ही शर्यतच आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ प्रदान करते. ख-या अर्थाने जीवनाला गती देते. ही धडपड, शर्यत जर थांबली तर मग जीवन दिशाहीन होऊन जाईल. उद्या काय करायचे ? या प्रश्नाचे उत्तर तयार नसेल, उद्याच्या कार्यक्रमांनी आजची आपली डायरी भरली नसेल तर संपलंच की सगळं. मी सर्वसामान्य माणूसच आहे त्यामुळे कधीकधी या कामांच्या सततच्या रगाड्याचा कंटाळा येतोही. एखाद्यादिवशी त्या डायरीचे दर्शनही नको वाटतं. नको तो टाइमटेबल असे सुद्धा वाटते. पण कधीमधी हे असे वाटणे हे सुद्धा स्वाभाविक आहे हे मनाने स्वीकारले की जीवनाची रंगत अजून वाढते. ९९ वेळा आपले आजच्या दिवसाचे नियोजन चुकले हे डायरीतल्या कामांवर मारलेल्या फ़ुल्यांमधून कळले तरीसुद्धा १०० व्या दिवशी ती फ़ुल्या मारलेली कामे आपल्या डायरीत घेणे आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करून त्यावर राइट मार्क घेणे हीच तरी खरी जीवनाची मजा आहे, नाही ?
"Power of positive thinking" हे Norman Vincent Peale चे पुस्तक, UPSC / MPSC ची तयारी करताना, फार वर्षांपूर्वी वाचले होते. त्यातले एक अक्षरही आता लक्षात नाही. पण एक मात्र नक्की जाणवतंय की सकारात्मक विचारसरणी आणि त्याप्रमाणे आपला स्वतःचा आचार हा एक सातत्याने प्रयत्नरत असण्याचा आणि प्रत्यक्ष अनुभवण्याचा भाग आहे.
आणि एकदा असे आपले आचरण राहिले की कटकट्या, कावेबाज मंडळींनी कितीही कट कारस्थाने केलीत तरी तुमच्यावर काही फरक पडत नाही. आणि तुम्ही कपटाने विचलित होत नाही म्हटल्यावर त्यांचा पराभव अटळ असतो. मग ती सगळी मंडळी आपसूकच तुमच्यातला त्यांचा रस कमी करतात, तुमच्यापासून दूर जातात. अंतिमतः फायदा तुमचाच होतो.
- "The only rule of life is that there is no single rule that suits all" हे सत्य अनुभवलेला आणि तरीही स्वतःचे नियम मांडणारा एक सरळ साधा शिक्षक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
१४ जानेवारी २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
No comments:
Post a Comment